हे व्यंगचित्र आहे १९८४ सालातल्या सप्टेंबर महिन्यातलं. काँग्रेसची अस्वस्थ राजवट होती. काही काळापूर्वीच बॅ. बाबासाहेब भोसले नावाचे कोणालाही माहिती नसलेले विदूषकी थाटाचे बाहुलेवजा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवण्याचा उपक्रम इंदिरा गांधी यांनी केला होता. तो काँग्रेसच्या अंगलट आला होता. त्यामुळे वसंतदादा पाटील यांच्याकडे राज्याची धुरा सोपवण्यात आली होती. त्यांची खुर्चीही अस्थिरच आहे, ते कधीही जाऊ शकतात, अशा कंड्या पिकवल्या जात होत्या. महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार सत्तापालटाची वाट पाहून पाहून थकले आणि त्यांनी वसंतदादांशी जुळवून घेण्याचा निर्णय केला, यावर बाळासाहेबांनी रेखाटलेले हे अफाट व्यंगचित्र. श्री गणरायांच्या मूर्तीला त्यांनी वसंतदादांच्या देहयष्टीची अशी अफाट डूब दिली आहे की गणराय कुठे संपतात आणि वसंतदादा कुठे सुरू होतात, ते कळत नाही. समोर उभ्या असलेल्या खासदारांच्या बेरकी चेहर्यावरचे भावही फार बोलके आहेत… महाराष्ट्रात ३९ वर्षांनी हीच परिस्थिती आली आहे… मंत्रालयातल्या देव्हार्यातल्या मूर्तींचे विसर्जन पक्के आहे… काही ना काही केविलवाण्या युक्ती लढवून ते पुढे पुढे ढकलण्याचे उद्योग सुरू आहेत… त्यामुळे बिचारी जनता आणि अधिकारी यांचीच मनोभावे आरती करण्याचा देखावा करत आहेत… ऐन गणेशोत्सवात ही आरास उदासवाणी आहे…