चीनच्या वुहानमधल्या एका मासळी बाजारातून २०१९पासून जगभर पसरलेला कोरोनाचा विषाणू अख्ख्या जगाला हादरवून गेला. कोटी कोटी रुपये खर्च होऊनही लाखोंचे बळी घेऊन गेलेल्या या महाभयानक मृत्यूदात्याचा, आपल्या महानगरी मुंबईने मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली अभूतपूर्व नियोजनबद्ध मुकाबला करून जगाला आश्चर्यचकीत केले. खरे तर, गेल्या ५० वर्षांत आपल्याकडे शोधपत्रकारिता चांगलीच दृढमूल झाली आहे. पण तरीही ‘मुंबई मॉडेल’च्या या चमत्काराचा वेध मराठी, इंग्रजी, गुजराती, कुठल्याही भाषेतील पत्रकाराने घेतल्याचे वाचनात आले नव्हते. म्हणूनच या ‘मुंबई मॉडेल’चे कर्तेकरविते सुरेश काकाणी यांनी स्वत:च त्या अभूतपूर्व प्रयोगावर ग्रंथलेखन केले आहे. हे कळताच ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या त्या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहून ‘लढा मुंबईचा कोविडशी’ हे पुस्तक विकत घ्यावेसे वाटले…
– – –
भारतवर्षाची औद्योगिक राजधानी म्हणून विश्वविख्यात असलेल्या आपल्या मुंबापुरीला रोगाच्या नवनवीन साथींशी लढावे लागणे, यात नवीन असे काहीच नाही. तब्बल एक कोटी वीस लाखांची प्रचंड लोकसंख्या असलेल्या या नगरीत लोकसंख्येची प्रचंड घनताही आढळते. इथे एक चौरस किलोमीटर परिसरात तब्बल २८ हजार लोक राहतात. जगातल्या सर्वात महागड्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबईत, जगातल्या सर्वात मोठ्या म्हणून ओळखल्या जाणार्या धारावीसारख्या काही मोठ्या झोपडपट्ट्याही आहेत. किंबहुना स्थलांतरितांपैकी जास्तीत जास्त म्हणजे ५२ टक्के रहिवासी मुंबईतील या झोपडपट्ट्यांत राहतात. त्यामुळे ही मुंबापुरी सदैव विविध रोगांच्या साथींनी बेजार झालेली असतेच! गतवर्षाअखेर कोरोना आटोक्यात आल्या-आल्या नोव्हेंबरअखेरीला मुंबईतील गोवराच्या रुग्णांची संख्या शेकड्यात गेली होती आणि मृतांची संख्या दुहेरी आकड्यांत! खरे तर लहान बालकांना जी त्रिगुणी लस दिली जाते, त्यात गोवर-प्रतिबंधही गृहीत असतो. तरीही साथ बळावली तर तो संसर्ग जुन्याच विषाणूपासून आलाय की मूळ विषाणूच आपलं रुप बदलत पसरत आहे, या दृष्टीने संशोधकांना शक्यता तपासाव्या लागत आहेत.
इतके काही हे रोग घरोघरी घुसलेले आढळतात की हिवताप, विषमज्वर आणि बहुतेक रोगांची मराठी नावे विस्मरणात जाऊन मलेरिया, टॉयफॉईड, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो, चिकनगुनिया यांसारखी त्यांची मूळ इंग्रजी नावेच सर्व डॉक्टर-पेशंटच्या तोंडी हल्ली सर्रास रूढावलेली दिसतात. मी स्वत: या शहतात ७७ वर्षे जगताना देवी, विषमज्वर व इन्फ्लुएन्झा या तीन रोगांच्या साथींची शिकार झालेली आहे. त्यामुळेच नोव्हेंबर २०१९मध्ये चीनच्या वुहानमधल्या एका मासळी बाजारात उगम शोधला गेलेला कोरोना विषाणू २०२०च्या पहिल्या दोन-तीन महिन्यांतच जगभर आपले हातपाय पसरू लागल्याचे उतारवयात ऐकताच, आपोआपच स्वत:ला घरात डांबून घ्यावेसे वाटले होते. धडघडत्या अंत:करणाने कोरोना प्रादुर्भावाच्या जगभरच्या बातम्या टीव्हीवर बघत… अधिकृत ‘लॉकडाऊन’चा अभूतपूर्व अनुभव घेत…
दुबई-सहलीचा फटका
दि. १ मार्च २०२० रोजी दुबईची सहल करून मुंबई विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांपैकी पुण्याचे एक दांपत्य महाराष्ट्रात प्रथम कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे ९ मार्च २०२० रोजी आढळले. तेव्हा सावध झालेल्या शासकीय टेहळणी पथकाने, त्या सहलीहून राज्याच्या सहा जिल्ह्यांतील आपापल्या घरी परतलेल्या सार्याच पर्यटकांचा मागोवा वेगाने घ्यायला सुरुवात केली. मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील एकच वयोवृद्ध दांपत्य त्या ‘दुबई-रिटर्न’ पर्यटकांत होते. आजारवयामुळे त्यांची चाचणी करण्यात आली, तर ११ मार्चला त्याही दांपत्याचा रिपोर्ट कोरोना-पॉझिटिव्ह आला. मुंबईतील ते पहिले कोरोना रुग्ण ठरले. योगायोगाने त्याच दिवशी, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला ‘जागतिक महासाथ’ घोषित केले. कारण जानेवारी २०२०मध्ये ‘अज्ञात कारणांमुळे झालेला न्युमोनिया’ म्हणून प्रारंभी नोंदला गेलेला हा आजार तोवर ११४ देशांमध्ये आणि एक लाख १८ हजार रुग्णांमध्ये फैलावला होता.
वाढती मृत्यूसंख्या
दि. १७ मार्च २०२० रोजी मुंबईतला पहिला कोरोना मृत्यू झाला. हा मार्च संपला तेव्हा मुंबईत एकूण १५ कोरोना बळी गेले होते. पण ही संख्या झपाट्याने कित्येक पटीत वाढली. एप्रिल संपेस्तोवर कोरोनाने मुंबईत तब्बल ४३१ जणांचे बळी घेतले होते. पुढल्याच मे महिन्यात तर त्याच्या सहापट म्हणजे २४०९ आणि जूनमध्ये १९९६ मुंबईकरांचे बळी कोरोनाने घेतले होते. दुसर्या शब्दांत सांगायचे तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत मे महिन्याच्या मध्यावर मुंबई शहरात दररोज तेराशे ते पंधराशे जणांना कोरोनाची बाधा होत होती. पण लवकरच वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड्सची मागणी वाढली तेव्हा शेकड्यांत नव्हे, हजारांत बेड्स हवे होते.
खरं तर पन्नास लाख लोकसंख्येच्या आपल्या महानगरी मुंबईत एरवी वर्षाला सरासरी ९० हजार मृत्यू होतच असतात. त्या मृतांच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्रे देणे, मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे या सर्व प्रक्रियाही अगदी सहजसुलभपणे पार पडत असतात. पण कोरोना मृत्यू ही ‘नॉर्मल’ स्थिती नव्हती. पहिला प्रश्न उभा राहिला होता, विषाणूसंसर्ग झालेल्या मृतदेहांची विल्हेवाट कशी लावायची? त्यांचं दहन करायचं की दफन? पहिला मृत्यू होईपर्यंत, अंत्यसंस्काराबाबत कोणतीही नियमावली ठरवली गेली नव्हती. तशाच मृतांचे सर्व जवळचे कुटुंबीयही कोरोना संसर्गामुळे रुग्णालयातच अलगीकरणात दाखल होते. शेवटी मृताची कोरोनाबाधित पत्नी व मुलगा यांनी रुग्णालयाच्या खिडकीतून दुरूनच मृताचे अंत्यदर्शन घेतले. अलगीकरणात असलेले मुलगी व जावई यांनीही सरकारी कर्मचारी करत असलेले मृताचे अंत्यसंस्कार लांबूनच पाहिले… अंत्यसंस्कार पार पडल्यावर ते केलेल्या सरकारी कर्मचार्यांनी अंगावरची सर्व संरक्षक साधनं जाळून टाकली. कपड्यांवर जंतूनाशक फवारलं आणि स्वच्छ अंघोळ केली. विद्युतदाहिनीचा आसपासचा भागही ‘सॅनिटाईझ’ करण्यात आला.
फिलिपाईन्सचा नागरिक
मुंबईतील दुसरा कोरोनाबाधित मृत होता फिलिपाईन्सचा नागरिक असलेला एक पर्यटक. त्याचे कोणीच नातेवाईक मुंबईत नव्हते. मग मृतदेह ताब्यात घ्यायला आणि त्याचे झालेले ८० हजार रुपयांचे हॉस्पिटल बिल भरायला कोणाला गाठायचे? शेवटी एम्बसीमार्फत फिलिपाईन्समधील मृताच्या भावाचा पत्ता, ईमेल आयडी मिळवून मृतदेहावर इथे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या भावाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळवणे, हे सर्व सव्यापसव्य राज्याच्या कोविड टास्क फोर्सने केल्यानंतर पहिल्या रुग्णाप्रमाणे याही मृतदेहाचे दहन करण्याच्या हालचाली सुरू केल्या, तर तो मृत मुस्लीम असल्याने त्याचे दफनच झाले पाहिजे, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली. आपल्याकडे संसर्ग व्हायला नको, या भीतीने मुंबईतील कोणतीच दफनभूमी त्या कोरोना-मृताचे दफन आपल्याकडे होऊ देण्यास राजी नव्हती. अखेर दोन दिवसांनंतर, मुंबईच्या सीमेवरील मुलुंडच्या दफनभूमीत त्या मृताला मूठमाती देण्यात आली.
अंगावर काटा येतो
या सार्या प्रकारात सर्व सरकारी कर्मचार्यांना कशी २४-२४ तास, छाती फाटेस्तोवर धावपळ करावी लागत होती, वाढत्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी रुग्णवाहिन्यांचे ड्रायव्हर्स आणि स्मशानभूमींतील सर्व कामगार अहोरात्र कसे राबत होते, ते विस्मयकारक आहे. हे सर्व कर्मचारी एरवी पूर्ण वर्षभरात जेवढे मृतदेह हाताळायचे, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मृतदेह यातील काहीजणांना त्या एका महिन्यात कसे हाताळावे लागले होते, त्यावेळी मुंबई महापालिकेने या प्रत्येक मृतदेहामागे एक हजार रुपये विशेष भत्ता द्यायला सुरुवात करून स्मशानभूमींतील मनुष्यबळही कसे वाढवले होते, हे सर्व वाचताना टास्क फोर्सच्या नियोजनाचे एकीकडे कौतुक वाटते, तर दुसरीकडे त्यामागच्या भीषण वास्तवाच्या कल्पननेही अंगावर सरसरून काटाही येतो.
‘प्राण वाचवा’ मोहीम
इथे मुंबईतील वाढत्या मृत्यूसंख्येच्या कारणांचा शोध पालिका रुग्णालयांतील डॉक्टरांशी एक दिवसाआड झूम बैठका घेऊन टास्क फोर्स घेत होताच. पण शहराच्या मृत्यूसंख्या सरासरीपेक्षा पालिका रुग्णालयांतील मृत्यूंचे प्रमाण कितीतरी (दररोज सरासरी शंभर एक बळी) का आहे, याचा शोध घ्यायला टास्क फोर्स प्रमुख, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्वत:च पीपीई सूट चढवून, शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या कोविड वॉर्डात जायची हिंमत केली. तिथले डॉक्टर्स-विद्यार्थी यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना दोन-तीन धक्कादायक वस्तुस्थितीदर्शक घटना त्यांच्या लक्षात आल्या. त्यातली महत्त्वाची गोष्ट ही होती की प्रचंड संख्येने रोज भरती होत असलेल्या नवीन कोरोना रुग्णांवर उपचार करावे लागत असलेल्या, तुलनेने नवख्या असलेल्या त्या निवासी डॉक्टरांना त्यांच्या अनुभवी वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळतच नव्हते. कारण पन्नाशीवरच्यांना कोरोना संसर्ग चटकन होतो आणि तो चटकन गंभीररीत्या बळावतो, या जगभरच्या निरीक्षणामुळे हे पन्नाशीपुढले वरिष्ठ डॉक्टर्स, मेडिकल कॉलेजमधले बरेचसे ज्येष्ठ अध्यापक-विभागप्रमुख, स्वत:ला संसर्ग-धोका टाळायला रुग्णालयात ड्युटीवर मुळी येतच नव्हते. पालिकेच्या नायर, केईएम व कूपर या अन्य रुग्णालयांतही हीच स्थिती होती. त्यामुळे अननुभवी निवासी डॉक्टरांना योग्य मार्गदर्शन मिळतच नव्हते.
दुसरी भीतीदायक वस्तुस्थिती ही होती की, या सार्या रुग्णालयांचे विलगीकरण कक्ष व अतिदक्षता विभाग यात दाखल होणारे सारे रुग्ण हे अतिगंभीर अवस्थेतील असायचे. कोरोनाची प्रारंभिक लक्षणे दिसू लागली की शक्यतो जवळच्या खासगी रुग्णालयांत दाखल झालेल्या रुग्णांना प्राथमिक उपचारांनी आपण सावरू शकत नाही, हे मान्य करण्याची त्या खासगी रुग्णालयवाल्यांची इच्छा शेवटपर्यंत नसे. त्यामुळे रुग्णाची स्थिती अतिगंभीर बनली की मगच त्यांना पालिकेच्या खास कोरोना रुग्णालयात पाठवले जात असे. तोवर प्रकृती प्रचंड ढासळलेल्या त्या रुग्णांना वाचवायला खूपच कमी वेळ पालिका रुग्णालयांतील या शिकाऊ निवासी डॉक्टरांना मिळत असे.
तशात अननुभवी निवासी डॉक्टरांना हवे ते मार्गदर्शन कातडीबचाऊ वरिष्ठांकडून मिळतच नव्हते. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी टास्क फोर्सने प्रथम अशा बेजबाबदार खासगी रुगणालयांची ‘कोविड रुग्णालय’ म्हणून असलेली मान्यताच काढून घेतली. त्यामुळे सर्वच खासगी रुग्णालये सावध झाली आणि त्यांच्याकडे येणार्या कोविड रुग्णांना वेळीच महापालिका रुग्णालयांत पाठवू लागली. पुढले कठोर पाऊल टास्क फोर्सने उचलले. ते म्हणजे ‘अहर्निशं सेवामहे’ हे सर्व डॉक्टरांचे आद्यकर्तव्य असते, असे कडक शब्दांत बजावून, मेडिकल कॉलेजमधल्या सर्व ज्येष्ठ विभागप्रमुखांनी अतिदक्षता विभागांच्या राऊण्ड्स घेणे आणि रुग्णांवरील उपचारांत प्रत्यक्ष सहभागी होणे, हे टास्क फोर्सने अनिवार्य केले. त्यांच्या कामांचे मुळी वेळापत्रकच टास्क फोर्सने लावले आणि ‘रुग्णालयात सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे तुम्ही ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी आलात की नाही हे आम्हाला कळेलच’ असे कडक शब्दांत त्यांना बजावले. त्याचवेळी ‘आपल्या संपूर्ण पथकाला विश्वासात घ्या आणि हाच विश्वास रुग्णांनाही द्या’ असं थोडं भावनिक आवाहनही केलं.
त्याचा फायदा झाला. प्रथम आढावा बैठकीतील चर्चेतूनच ३० जूनपासून पालिकेने ‘प्राण वाचवा’ मोहीम सुरू केली. वैद्यकीय उपचारांची कडक नियमावली, उपचार सुरू होण्यातील विलंब टाळणे, केसेसबद्दल चर्चा करण्यासाठी ‘क्लिनिकल मीटिंग्स’ घेणे, तरुण डॉक्टरांना प्रशिक्षण देऊन त्यांना ‘केसेस’ आत्मविश्वासाने हाताळण्यासाठी तयार करणे आणि होणार्या मृत्यूंचे ‘ऑडिट’ करणे, या पाच गोष्टींवर या मोहिमेत लक्ष केंद्रित करण्यात आले होते. बाहेरच्या काही स्पेशालिस्टांनाही फोर्सने सोबत जोडून घेतले होते. गंभीर ‘कॉम्प्लिकेशन्स’ असलेल्या रुग्णांना तपासण्यासाठी हे विशेषज्ञ डॉक्टर्स नियमित यायचे आणि उपचारांबद्दलचा सल्ला निवासी डॉक्टरांना देऊन मार्गदर्शन करायचे.
विधायक दूरदर्शित्व
गंभीर रुग्णांवर उपचारार्थ अटळ असलेली ‘रेमडेसिवीर’ व ‘टॉसिलिझुमॅब’ ही दोन औषधं महापालिकेने भरपूर प्रमाणात खरेदी केली होती. त्यामुळे ती सरकारी रुग्णालयांत उपलब्ध होती. ती मिळवण्यासाठी दाही दिशा पळापळ करण्याची पाळी रुग्णांच्या नातेवाईकांवर आली नाही. टास्क फोर्सने दाखवलेले दुसरे दूरदर्शित्व होते ते रुग्णांना उपलब्ध करून दिलेल्या टॅबलेट्सचे! संसर्गभीतीतून एकाकी पडलेल्या रुग्णांचे भावनिक स्वास्थ्य ढासळू नये, सदेह न भेटताही, आपल्या जिवलगांना प्रत्यक्ष बघणे-बोलणे त्यांना शक्य व्हावे म्हणून टास्क फोर्सने शेकडो टॅबलेट्स खरेदी करून ते कोविड सेंटर्सना पुरवले. खचलेल्या रुग्णांना या टॅबलेट्सवरून आप्तांशी संपर्क साधणे, त्यांना प्रत्यक्ष बघणे, त्यांच्याशी बोलणे शक्य झाले. या संवादाचा लाभ रुग्ण लवकर बरे व्हायला होत असल्याचे उपचारकर्त्या डॉक्टरांना जाणवत राहिले.
कोरोना बळींचे नियमित ऑडिट
कोरोना बळींचे नियमित होणारे ऑडिट ‘प्राण वाचवा’ मोहिमेसाठी खूप महत्त्वाचे ठरले. ऑक्सिजन पुरवठा सुरू असतानाही मृत्यू झालेल्या रुग्णांच्या फाईल्स व सीसीटीव्ही फुटेज या दोन्हीचीही तपासणी करताना लक्षात आले की बरेच रुग्ण रात्री एक ते पहाटे पाच या वेळेत लघुशंकेला जाताना तोंडावरून ऑक्सिजन मास्क काढून ठेवायचे. ऑक्सिजन पुरवठा अचानक थांबणे आणि त्यानंतर काही पावलं घाईघाईत चालणे यामुळे त्यांची ऑक्सिजन पातळी झटकन खाली यायची. त्यामुळे त्यांची अवस्था अचानक गंभीर बनायची. हा धोका टाळण्यासाठी टास्क फोर्सने प्रत्येक वेळेला बेडपॅन देण्याचा निर्णय घेतला. जिथे हे शक्य नव्हतं तिथे चार-चार बेड्सना क्युबिकल्स दिली गेली. तिथपर्यंत जायला त्या रुग्णाला वॉर्डबॉय मदत करत. रुग्ण एक क्षणही ऑक्सिजन मास्क तोंडावरून काढत नाही ना, यावर ते डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत.
नामवंतांचे बळी घेतले
या सगळ्या उपाययोजनांचा उपयोग होतोय असं वाटू लागलं, कारण जूनपासून कोरोना बळींची दैनंदिन संख्या घटू लागली. म्हणून लॉकडाऊन थोडा शिथिल करण्यात आला. पण परिणामस्वरुप पुढल्या जुलै महिन्यापासून कोरोना बळींचा आलेख थोडा चढलाच. इतकेच नव्हे तर ‘कोरोना हटाव’ मोहिमेत प्रथमपासूनच सक्रीय असलेले सहाय्यक महापालिका आयुक्त अशोक खैरनार यांचा बळी ११ जुलैला कोरोनाने घेतला. आणखी पाचच दिवसांनी आणखी एका प्रसिद्ध व्यक्तीचा बळी कोरोनाने घेतला. त्या होत्या माझ्या स्नेही श्रीमती मालती तांबे-वैद्य. पहिल्या आयएएस बॅचमधील ख्यातनाम प्रशासनिक अधिकारी. महाराष्ट्रातील पहिल्या महिला निवडणूक आयुक्त. ख्यातनाम लेखिका म्हणून सर्वज्ञात असलेल्या या कर्तबगार महिलेचा बळी क्रूर कोरोनाने सेव्हन हिल्स रुग्णालयात घेतला. तेव्हा त्यांचे पती व चिरंजीवही कोरोनाबाधित असल्यामुळे त्याच रुग्णालयात उपचार घेत होते, तर विवाहित कन्या व जावई घरीच विलगीकरणात होते. त्यामुळे मालतीताईंचे अंत्यसंस्कार महापालिका कर्मचार्यांनीच सन्मानपूर्वक पार पाडले. कोरोनाकाळात पालिकेच्या दोनशेहून अधिकारी, कर्मचार्यांनीही प्राण गमावले, पण त्यांच्या सहकार्यांनी मनोबल खच्ची होऊ दिले नाही, याचा विशेष उल्लेख केलाच पाहिजे.
जम्बो हॉस्पिटल्स
कोरोनासंसर्ग वाढत चालला होता. त्यावर व्यापक उपचारव्यवस्थेसाठी काहीतरी मोठा तोडगा काढण्याची गरज भासू लागली. एक विचित्र योगायोग म्हणजे जगाला कोरोना विषाणू देणार्या चीननेच त्या विषाणूशी दोन हात करण्यासाठी ‘फील्ड हॉस्पिटल्स’ची एक नवी महत्त्वपूर्ण संकल्पनाही तेव्हाच जगाला दिली. संशयित कोरोनारुग्णांना क्वारन्टाईन करण्यासाठी तसेच निदान झालेल्या कोरोनरुग्णांना अलग ठेवून, त्यांच्यावर झटपट उपचार करण्यासाठी तब्बल दहा हजार बांधकाम कामगारांना मिळवून अवघ्या दहा-बारा दिवसांत ‘जम्बो रुग्णालय’ उभारणीचा एक आदर्श चीनने जगापुढे ठेवला होताच. कारण २००३मध्ये ‘सार्स’च्या (सिव्िहअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम) साथीच्या वेळीही अशी प्रचंड तंबू-रुग्णालये झटपट उभारण्याचा अनुभव चीनच्या गाठीशी होताच. त्यामुळे आपल्या टास्क फोर्सने साधक बाधक विचार करून ज्यादा बेड्सची मागणी पूर्ण करण्यासाठी जम्बो फील्ड हॉस्पिटल्सच्या उभारणीचा निर्णय घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन ‘महापालिका यंत्रणा कोरोनाग्रस्तांच्या उपचारांत व्यस्त आहे, तेव्हा या जम्बो हॉस्पिटल्सच्या उभारणीसाठी तुम्हीच पुढाकार घ्या,’ असं साकडं सिडको, मुंबई मेट्रो, रेल कॉर्पोरेशन, मुंबई मेट्रो पोलीस रिजनल डेव्हलपमेंट अॅथॉरटी आदी बृहन्मुंबईत पायाभूत सुविधा विकासात व्यस्त असलेल्या संस्थांना घातलं. ‘साथी हाथ बढाना’ या प्रेरणेने सर्व एकजुटले आणि २१ एप्रिल २०२० रोजी वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये मुंबईतले पहिले जम्बो रुग्णालय उभे राहिले देखील. डोममधले हे ५१८ बेड्सचे कोविड सेंटर, गंभीर रुग्णांसाठी नायर रुग्णालयाला संलग्न ठेवण्यात आले होते. तिथे रुग्ण दाखल व्हायला सुरुवात झाली, तसे देशातले पहिले खरेखुरे जम्बो फील्ड हॉस्पिटल बीकेसी (वांद्रे कुर्ला संकुलातील) मोकळ्या मैदानावर उभारायला सुरुवात झाली. एमएमआरडीएच्या पन्नास एकरांच्या मैदानावरील त्या रुग्णालयाच्या १०२६ बेड्सच्या पहिल्या टप्प्याच्या उभारणीचे आव्हान, सर्वांनी एकजुटीने केवळ दोन आठवड्यांत साकारले आणि ८ मे २०२० रोजी ते रुग्णालय सुरूही झाले. लगेच १७ जून २०२० रोजी दुसरा टप्पाही सुरू करण्यात आला. आयसीयू/ ऑक्सिजन पुरवठा/ डायलिसिस या तिन्ही महत्त्वाच्या उपचारांची सोय असलेल्या या बीकेसी रुग्णालायने २७ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले. नंतर ते रुग्णालय मोफत लसीकरणाचे शहरातले सर्वात महत्त्वाचे केंद्र बनले. जवळपास पाच लाखांहून अधिक नागरिकांनी इथे कोरोना-प्रतिबंधक लस घेतली.
तिसरे जम्बो रुग्णालय गोरेगावला
मे २०२०मध्ये मुंबईची सक्रीय कोरोनारुग्णांची संख्या सुमारे ८० हजार होईल असा तज्ज्ञांचा अंदाज होता. त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये तिसरे जम्बो रुग्णालय उभारण्यात आले. तिथे जून २०२० ते फेब्रुवारी २०२२ या काळात २६ हजार कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. मार्च २०२० ते सप्टेंबर २०२० या काळात आणखी सहा जम्बो रुग्णालये भायखळा, मुलुंड, कांजुरमार्ग, दहिसर, मालाड येथे बांधण्यात आली. त्यामुळे शहरात ८,३६६ ज्यादा (एकूण १६ हजार) बेड्स उपलब्ध झाले.
वादळांशी मुकाबला
कोरोनाचे संकट जसे अकल्पित होते, तसेच या जम्बो रुग्णालयांना चक्रीवादळांशी करावा लागलेला मुकाबलाही अनपेक्षित होता. खरं तर गेल्या ७० वर्षांत मुंबईला कधीही चक्रीवादळाने तडाखा दिला नव्हता. पण आपत्काळाची गरज म्हणून उघड्यावर उभारण्यात आलेल्या या जम्बो रुग्णालयांवर मात्र चक्क ‘निसर्ग’ व नंतर ‘तौक्ते’ या दोन चक्रीवादळांचा मुकाबला वर्षभरात करण्याची पाळी ओढवली. ते आव्हान टास्क फोर्सने सुनियोजन करून ज्या प्रकारे यशस्वीपणे पेलले, ते मुळातूनच वाचणे एखाद्या साहसकथेसारखे चित्तथरारक आहे. इतक्या बहुसंख्येने गंभीर रुग्णांना रातोरात मोठ्या रुग्णालयांत सुरक्षित हलवणे ही सोपी गोष्ट नव्हती.
श्रेय लाटत नाहीत
एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून सुरेश काकाणी यांनी केलेल्या या स्वानुभव कथनाचे शब्दांकन सुमित्रा देबरॉय यांनी मूळ इंग्रजीत सुविहितपणे केले आहे. (वैशाली रोडेने त्याचा मराठी अनुवादही चांगला केला आहे. केवळ वाक्याची सुरुवात संख्येने करू नये. उदा. ५६ वर्षांच्या या रुग्णाला… पान-४७; प्रत्येक मृतदेहामागे १,००० रु. विशेष भत्ता… पान-६२ हे व अनेक ठिकाणी लिहिलेत, त्याप्रमाणे शून्य शून्य देऊन मोठ्या रकमा लिहू नयेत. कारण त्यातील एखादे शून्य कमी किंवा जास्त पडले तर अर्थभेद होऊ सकतो, असे काही शुद्धलेखनाचे साधेसोपे नियम तिने अनेक ठिकाणी पाळलेले नाहीत. रुग्णालयांतील स्यूट्सना ‘विशेष आलिशान कक्ष’ असा मराठी पर्यायही देता आला असता.)या शब्दांकनातील मला मुख्यत: भावले ते म्हणजे देशातील सर्वात मोठ्या व सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सम्यक परिचय लेखकाने वाचकाला प्रारंभीच करून दिलेला आहे. आपल्या या मुंबई महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प, भारतातील वैâक छोट्या राज्यांच्या अर्थसंकल्पांपेक्षाही मोठा म्हणजे वार्षिक ४५ हजार कोटी रुपयांचा असतो आणि त्यातील जवळजवळ सात हजार कोटी रुपयांची तरतूद एकट्या आरोग्यसेवेसाठी चालू अर्थसंकल्पात होती. पण कागदावरील तरतूद गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या नेतृत्त्वाखालील टास्क फोर्सने सगळ्यांना मेळवून, सुयोग्य माणसांना योग्य वेळी संधी देत, त्यांच्या चांगल्या कामाला दाद देत, जे सकारात्मक वातावरण तयार केले, ‘कर्मचारी’ ते ‘टीम’ असे त्यांच्यात मानसिक परिवर्तन घडवून आणले, त्यायोगे मुंबई महापालिका आणि तिची ही झुंजार ‘टीम’ संपूर्ण जगाला विस्मयचकित करून ‘आदर्श’ ठरलेल्या ‘मुंबई मॉडेल’चे जन्मदाते ठरले.
मला भावलेला या विधायक इतिहास लेखनाचा आणखी एक विशेष म्हणजे, एवढे सगळे मिळवूनही ग्रंथलेखक सुरेश काकाणी या मोठ्या कामगिरीचे श्रेय स्वत:कडे न घेता कोविड महासाथीशी हातात हात घालून लढलेल्या बृहन्मुंबई म्ाहानगरपालिकेच्या संपूर्ण चमूला देतात. लेखकाचा हा विनम्रपणा वाचकाला भावतोच भावतो.
सुशासनाचा आलेख… पण!
एकूणच, राजकारणापासून जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतील नकारात्मक बातम्याच वाचायला मिळण्याच्या आजच्या जमान्यात पालिकेच्या सुशासनाचा विधायक आलेख काढणारे हे पुस्तक वाचताना, या इतक्या उत्तम कार्याला कुणाची नजर कशी अद्याप लागलेली नाही याचंच आश्चर्य मनोमन वाटत होतं. अखेर २० जुलै २०२३ रोजी राजकीय पार्श्वभूमी असलेली ती बातमी प्रसिद्ध झालीच. कोरोना काळात वरळी व दहिसर येथील कोविड केंद्रांस डॉक्टर्स व अन्य वैद्यकीय सेवा कर्मचारी पुरवण्याचे काम ज्या ‘लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी’ला मिळाले होते, तिचे एक भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांना आणि डॉक्टर्स-कर्मचारी यांच्या भरतीतील कथित आर्थिक गैरव्यवहारांत त्यांना साथ दिलेल्या दहिसर कोविड केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर बिसुरे यांना केंद्रीय सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्याची ती बातमी होती. मागोमाग त्याच संदर्भात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आल्याची बातमी वाचायला मिळाली. एवंच, ही कोविड केंद्रे तूर्त कायद्याच्या कचाट्यात अडकलीत. त्यामुळे त्यातील खर्याखोट्याचा निवाडा यथावकाश होईलच. सद्य:स्थितीत आपण त्याबाबत काहीच निष्कर्ष काढू शकत नाही. मात्र त्यामुळे प्रशासनिक अधिकारी सुरेश काकाणी यांच्या या सत्यकथनपर ‘लढा मुंबईचा कोविडशी’ या पुस्तकाचे महत्त्व कमी होत नाही.
देव न करो आणि कोविडसारख्या आणखी कुठल्या महाभयंकर रोगाची वक्रदृष्टी महागर्दीच्या या मुंबापुरीवर पुनश्च न पडो! पण ते दुर्दैव ओढवलेच तर, न डगमगता त्याचा यशस्वीपणे मुकाबला कसा करायचा, याचे नेमके मार्गदर्शन आता सुरेश काकाणी यांच्या अनुभवसिद्ध पुस्तकातून आपल्यासाठी उपलब्ध आहे. वाईटातून कधी कधी चांगलेही निघते, ते हे असे…
लढा मुंबईचा कोविडशी
लेखक : सुरेश काकाणी
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठे : २११; मूल्य : ३५० रुपये