मानस आणि मानसी यांच्या जीवनात दरमहा घडणारी ही २०२३मधील कथा. मात्र ही कथा नुसती एकाची आहे का? तर अजिबात नाही. सार्याच समाजाची आहे असे म्हटले तरी फारसे वावगे ठरणार नाही. ‘मार्मिक’चे वाचक विचारतील, समाजातल्या एखाद्या व्यक्तीवर कथा असते; समाजाचीच कथा ही भानगड कशी काय? पण समाजातील दहामधील सहा घरात हे घडत असेल आणि उरलेल्या चार घरांचे तसेच स्वप्न असेल तर ती समाजाची बनते. आता आपण या कथेतील सगळ्या पात्रांचा नीट परिचय करून घेऊयात.
मानसला दोन मोठ्या बहिणी. सगळ्यात मोठी सुंदर अशी मनाली. ती बी.ए. झाली आणि मागणी घालून तिचे लग्न झाले. १९८०च्या दशकातील ती गोष्ट कालानुरूप घडली. पंधरा दिवसांकरता अमेरिकेहून आलेला अजित त्याचे आईने बघून ठेवलेल्या पाच मुलीतील पहिलीच पसंत करून लग्न करून लगेच परतला. त्याच्या आईचा व आत्याचा खूप आग्रह होता, उरलेल्या चौघी बघ तरी. पण त्याने मनालीला बघितले आणि तातडीने लग्नाचा ठराव केला. अशा प्रकारे मनाली कायमची अमेरिकेत स्थायिक झाली. तिच्या पाठची मीरा. मोठीसारखीच देखणी व लाघवी. अजितच्याच लग्नातील फोटो बघून त्याच्या अमेरिकेतील मूळ मुंबईकर मित्राने तिलाही मागणी घातली. खरे तर मीराला खूप शिकायचे होते व प्राध्यापक व्हायचे होते. पण तिचा विरोध बहिणीच्या आग्रहापुढे टिकला नाही. एम.ए.ला पहिल्या वर्षाला असतानाच दिवाळीमध्ये तिचे लग्न झाले आणि ती अमोलची बायको बनली. हे चौघेजण मिशिगन आणि शिकागो या अमेरिकेतील शहरांमध्ये स्थायिक झालेले होते. सॅन होजेचा त्यावेळेला बोलबाला झाला नव्हता आणि आयटीची पहाट अजून उजाडायची होती.
मध्यमवर्गातली पिढी
आता मानस व मानसीकडे वळण्यापूर्वी या दोघांच्या आधीच्या पिढीची थोडीशी माहिती घेऊयात. मानसचे वडील पुण्यात टाटा मोटर्समध्ये होते. आई एका माध्यमिक शाळेत शिक्षिका. निवृत्तीच्या आधी पाच वर्षे जमलेल्या पुंजीतून बाणेरला एक प्रशस्त तीन बेडरूमचा फ्लॅट त्यांनी घेऊन ठेवला होता. मात्र ते राहत होते पिंपरीलाच कंपनीने दिलेल्या फ्लॅटमध्ये भाड्याने. मनाली व मीरा या दोघींची लग्न झाल्यानंतर मानसच्या आईने लवकर निवृत्ती घेतली व तिघेजण बाणेरला राहायला आले. त्या काळामध्ये बाणेर तसे खूपच शहराबाहेर वाटत होते. या सुमाराला मानसचे मेकॅनिकल इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आणि पिरंगुटच्या एका जर्मन कारखान्यात चांगली नोकरीही मिळाली. बाणेरहून पिरंगुटला जाणे तसे सोयीचे असल्याने मानसच्या आई-वडिलांचे निवांत निवृत्तीचे आयुष्य सुरू झाले.
जर्मन कारखान्याच्या शेजारील एका छोट्या इंडस्ट्रीमध्ये मानसीचे वडील मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांची नजर मानसकडे गेली व त्यांनी चौकशी करून घरात मुलीकरता चांगले स्थळ म्हणून प्रस्ताव मांडला. मानसी त्या सुमारास द्विपदवीधर होऊन एका ज्युनियर कॉलेजमध्ये नुकतीच शिकवायला लागली होती. तिचा मोठा दादा अमर हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होऊन एम.एस. करायला अमेरिकेत गेला होता. त्याचे शिक्षण संपत आले होते. अमरच्या शिक्षणाकरता काढलेले तीस लाखाचे कर्ज जेमतेम निम्मे फिटले होते. त्यामुळे आता मानसीच्या लग्नाचा खर्च आपल्याला कसा झेपेल ही तिच्या आईला पडलेली काळजी होती. मानसीची आई गृहिणी असल्यामुळे तिला घरासाठी फारसा आर्थिक हातभार लावण्याची संधी कधीच मिळाली नव्हती. म्हणून तिला ही चिंता रास्त वाटत होती. याउलट अमरचे शिक्षण यंदा संपेल, त्याला नोकरी लागेल व उरलेले कर्ज तो फेडेल याची वडिलांना खात्री असल्याने त्यांनी हा प्रस्ताव रेटला. बाणेरचे तीन बेडरूम फ्लॅटचे प्रशस्त घर पाहून मानसीने पटकन पण एका अटीवर होकार दिला. माझी कॉलेजची नोकरी मी सोडणार नाही. लांब असले तरी मी ते घरातील जबाबदारी सांभाळून जमवीन या वाक्यावर मानसच्या आईने लगेच होकार दिला. कारण त्यांना शिक्षिकेची नोकरीचा तीन दशकांचा छान अनुभव होता. मानस व मानसीचे थाटात लग्न झाले. मानसीची नंतर प्रगती चांगली झाली. ती एका नवीन सीनियर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून दाखल झाली. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे हे कॉलेज औंधमध्ये जवळच होते. मानस मध्यंतरी दोन महिने जर्मनीत प्रशिक्षण घेऊन आला व त्याचीही सीनियर इंजिनियर म्हणून प्रगतीची घोडदौड सुरू झाली होती.
यूएसमध्ये सुबत्तेतली तिघे
अमेरिकेत शिकागोला अजित-मनालीला एक मुलगी झाली. मिशिगनच्या मीरा-अमोलला दोनही मुले पाठोपाठ झाली होती. मानसीचा दादा अमर याने एका अमेरिकन मुलीशी लग्न केले होते आणि त्या दोघांनाही एक मुलगा होता. कॉलेजची नोकरी सांभाळून मुलांची जबाबदारी कशी पेलता येईल या विचारामुळे मात्र मानस-मानसीचा विचार या दिशेला फार जात नव्हता. मध्यंतरी सहा महिने मानसचे आईवडील दोन मुलींकडे तीन-तीन महिने म्हणून रवाना झाले. या आधी मनालीच्या व मीराच्या बाळंतपणाच्या निमित्ताने त्यांच्या आईच्या एकटीच्याच चकरा झाल्या होत्या. पण तेथील घरकामापलीकडे त्यावेळेला काहीच घडले नव्हते. मुलींच्या कौतुकामुळे प्रत्येक भारतीय माता मुलीचे बाळंतपणात जशी वागेल, राबेल तसे त्यांनी ते आनंदाने घेतले होते. यावेळी मात्र सहा महिन्यात निम्मी तरी अमेरिका पाहून यायची असे ठरवून ते दोघेजण तिकडे गेले होते. सहा लाखाचा खर्च मनात धरून ते तिकडे पोहोचले… आणि मानसीला येथे दिवस राहिले. अशा प्रकारे राहुलचा जन्म १९९२ साली झाला.
राहुल पाच वर्षांचा झाला आणि औंधच्याच एका मोठ्या शाळेमध्ये पहिलीत दाखल झाला. एके दिवशी अचानकच राहुलचे आजोबा हार्ट अटॅकनी वारले. घरात एकदम पोकळी निर्माण झाली. मानसची आई खचून गेली होती. कारण लवकरच राहुल शाळेत, मानसी कॉलेजात, मानस सकाळपासून रात्रीपर्यंत कारखान्यात. यामुळे बाणेरचे भले मोठे घर मानसच्या आईला खायला उठत असे. खरे तर दुसर्या मुलाचा विचारसुद्धा मानसीच्या मनात नसताना आईसारख्याच प्रेमळ सासूच्या आग्रहास्तव राहुलला भावंड आणायचा निर्णय झाला. दोन मुलात जास्त अंतर आहे हे लक्षात घेऊन पण मानसीने याला होकार दिला. राहुल दुसरीत जात असताना घरात राघवचे आगमन झाले. आजीने कौतुकाने राघवचा ताबा घेतला व मानसी कॉलेजमध्ये रुजू झाली. तशीही आजीच्या मदतीला दिवसभराची मदतनीस आधीपासून होतीच.
चार शहरातील सहा मुले
अमेरिकेतील चार भारतातील दोन असेही सहा राजपुत्र आपापल्या घरात वाढत होते. नाही नाही, सहा राजपुत्र नाही तर पाच राजपुत्र आणि एक राजकन्या वाढत होती. अजित मनालीची एकुलती एक राजकन्या हिचे कौतुक खासच होते. एकमेकांच्या मुलांचे फोटो, कुटुंबीयांचे साजिरे गोजिरे फोटो दर आठवड्याला एफबीवर झळकत असत. मुले वयात येण्याच्या सुमाराला इंटरनेट वरून स्काईपने मुलांच्या आपापसात गप्पा सुरू झाल्या होत्या. या सगळ्यांमध्ये राघव हे कुक्कुले बाळ समजले जाई. पण स्क्रीनमध्ये घुसून त्याच्याही बालसुलभ प्रश्नरूपी गप्पांना इतर भावंडे वेळ देत असत. खरे तर हा असा प्रकार कोथरूड, कर्वेनगर, औंध, बाणेर, पार्ले, डोंबिवली, मुलुंड, ठाणे, बोरिवली येथे स्थिरावला होता. कुलाबा, पेडर रोड, दादर येथे जुनाट झाला होता. घरटी एक पोर तिकडे असण्याचे दशक सुरू झाले होते. अमेरिका नाही जमली तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा हेही दरवाजे आता सताड उघडले गेले होते. सुबत्तेतील घरातील आईवडील व एकुलत्या लेकाची युरोपची चक्कर हेसुद्धा नाविन्य राहिले नव्हते. शाळांच्याही परदेशी ट्रिपा सुरू होण्याचा तोच काळ होता.
राघव सोडला तर बाकीच्या सगळ्या समवयस्कांचे बालपण लवकरच संपले. मनालीच्या मुलीने ह्युमॅनिटीजमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मात्र पदवी घेत असतानाच ती या ग्रुपपासून थोडीशी अलग झाली होती. उरलेल्या चौघांचा स्काईपवर धांगडधिंगा नेहमीप्रमाणे चालू असे. मानसने मनालीला कधी तिच्याबद्दल काही विचारले, तर फारसे उत्तर येत नसे. तुटकपणे विषय थांबवला जाई. इतर सर्व विषयांबद्दल बहीणभावाची चर्चा, गप्पा भरपूर होत असत, पण हा विषय मात्र तिथेच थांबे. हे लक्षात येऊन एक दिवशी मानसीने मानसला सांगितले, ‘तिच्या मुलीचे लग्नाचे वय झाले आहे. यासंदर्भातील आईच्या व मुलीच्या वादावादीमध्ये मामाने का पडावे? तू जरा हा प्रश्न विचारत जाऊ नकोस’. मामाने मात्र जोरदार उत्तर दिले, ‘माझ्याशिवाय तिचे लग्न कसे होईल बरे? मीच तर तिला मांडवात नेणार ना?’. यावर मानसीने पुन्हा कधी विषय काढला नाही.
मात्र एक दिवशी मंगळवारी अचानक कामाच्या वेळी धाकटीचा म्हणजे मीराचा फोन मानसच्या ऑफिसमध्ये आला. तो फोन ऐकून मानसला कळेना काय झाले ते? उत्तर काय द्यावे ते? फोनची बातमी अशी होती, मनालीची मुलगी गेले दीड वर्ष एका डच मुलाबरोबर लिव्हइनमध्ये राहात होती. ती दोघेजण न सांगताच कायमची हॉलंडला निघून गेली आहेत. यावर बोलण्याजोगे काहीच नव्हते व कोणाचे सांत्वन करण्याचीही शक्यता नव्हती. घरी आल्यावर मानसने आईला ही बातमी सांगितली आणि थकलेल्या आईने सगळ्यातून मन काढून घेतले. नुकतीच जन्मलेली तान्ही नात तिच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत राहिली. तिची आठवण काढतच दोन महिन्यात तिने सगळ्यांचा निरोप घेतला.
मीराची दोघे आता नोकरीला लागली होती. त्यांनी घर सोडून सुमारे दोन वर्षे झाली होती. इकडे अमरचा मुलगा मनाजोगती नोकरी मिळत नाही म्हणून कॅनडामध्ये मायग्रेट झाला होता. मात्र तेथूनही तो सगळ्यांशी संपर्क साधत असे. पुण्यात राहुलने वडिलांच्या पायावर पाय टाकून मेकॅनिकल इंजीनिअरिंग पूर्ण केले. खरे तर त्याची तीव्र इच्छा कॉम्प्युटर सायन्सला जाण्याची होती. पण मार्क कमी पडले व १५ लाखाची डोनेशन द्यायला वडिलांनी नकार दिला. पहिल्या वर्षी जेमतेम नोकरी केल्यानंतर त्याला एका चांगल्या आयटी कंपनीमध्ये बिझनेस अॅनालिस्ट म्हणून नोकरी मिळाली. पगार वाढत गेला. मात्र जवळच्या नात्यातील सगळीजण परदेशात आहेत ही बोच त्याला स्वस्थ बसू देईना. तो मनापासून काम करत होता हे खरे, पण कामात मन कधीच नव्हते. एव्हाना राघवनेही इंजीनिअरिंगला प्रवेश घेतला. लहानपणापासून स्काईपवर त्याने पाहिलेले स्वप्न भंगले होते. बारावी सायन्स झाल्यावर इथल्या फडतूस कॉलेजमध्ये इंजीनिअरिंग करण्याऐवजी थेट अमेरिकेला जायचे. त्यासाठी मामा किंवा दोन आत्या आपल्याला बोलावणे पाठवणार, अशी त्याची भ्रामक कल्पना झाली होती. मात्र याविषयी राहुलशी त्याचे फारसे बोलणे कधीच होत नसे. राघवचे दुसरे इंजीनिअरिंगचे वर्ष पूर्ण झाले. त्याच दिवशी राहुल पहिली कंपनी बदलायचं ठरवून नवीन कंपनीत दाखल झाला होता. हायवेवरच्या सयाजी हॉटेलमध्ये त्याचे सेलिब्रेशन दोघांनीच करायचे ठरवले. मानस-मानसीला याच जरा आश्चर्य वाटले. आजवर एखादे सेलिब्रेशन आईवडिलांना न घेता मुले पहिल्यांदाच करत होती. पण नाराजी न दाखवता मानसीने त्यांचे कौतुकच केले. रात्री उशिरा दोघेही मुले आली, तेव्हा मानसला दार उघडतानाच एक भपकारा आला. जर्मनीत जाऊनसुद्धा बियर न पिणार्या मानसला तो वास झोप उडवणारा ठरला. आपली दोन्ही मुले दारू पिऊन घरी आली आहेत, हे दु:ख काय असते ते दारू कधीही न पिणार्यालाच कळू शकेल.
जेमतेम आठच दिवसांनी राघवनी आपल्या मोठ्या भावाचे गुपित आईला हळूच सांगितले. गेले वर्षभर ‘स्टेडी गोइंग’ असलेली राहुलची आवडती गर्लफ्रेंड राहुलला नकार देऊन अमेरिकेतून आलेल्या एकाबरोबर लग्न करून निघून गेली होती. आश्चर्यचकित झालेल्या मानसीने राघवला याबद्दल तुझे मत काय असे विचारले. त्या वेळेला त्याचा साचलेला गेल्या दोन वर्षातील राग उफाळून आला. ‘दादाला एम.एस. करायला तुम्ही पाठवले नाहीत. मला बारावीनंतरच आत्याकडे जायचे होते तेही पाठवले नाहीत. एवढाले पैसे मिळवता आणि मुलांवर खर्च करायला चिक्कूपणा करता? दोघांच्याही आयुष्याचे नुकसान केले आहेत तुम्ही.’ आपल्या शिकणार्या. मुलाचे हे बोल ऐकून मानसी सुन्न झाली. यावर उत्तर द्यायलाही काही राहिले नव्हते. हे होते धाकट्याचे बोल. मोठ्याचा ज्वालामुखी अजून उफाळून यायचा होता. जेमतेम पंधरवडा गेल्यानंतर एका रविवारी सकाळी चहानंतर राहुलने घरातील तिघांना समोर बसायला सांगितले. मानस मानसीला कारण कळेना, तर राहुलची व राघवची नजरानजर झाली होती. शांत बर्फासारख्या थंडगार आवाजात राहुलने सुरुवात केली. ‘आमच्या दोघांचे जे प्रचंड नुकसान तुम्ही केले आहेत ते भरून काढण्याचा एक छानसा उपाय आहे’, आता मानस संतापून काही बोलणार तोच मानसीने त्याला हाताने शांत केले. गप्प बसवले. कारण राघवने राहुलच्या झालेल्या ब्रेकअपची सांगितलेली बातमी मानसला तिने सांगितलेलीच नव्हती.
संतापाचा ज्वालामुखी उफाळला
राहुलने पुन्हा बोलायला सुरुवात केली, ‘मी पुण्यातील तीन मोठ्या इस्टेट एजंटला भेटून आलो आहे. आजोबांनी विकत घेतलेला आणि त्यांनी मृत्युपत्र न केल्यामुळे वारसाहक्काने आपण राहतो तो फ्लॅट आपल्या तिघांच्या नावाचा आहे. तो आत्ता दोन कोटीला विकला जाईल. आपल्याच सोसायटीत दोन बेडरूमचा एक फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे. एक कोटीला तो आपण विकत घेऊ. उरलेले एक कोटी आम्हा दोन भावांना तुम्ही देऊन टाका. आम्हाला एक तर तुमच्याबरोबर किंवा भारतात पण राहण्याची, नोकरी करण्याची इच्छा नाही.’ आकाशातून वीज कोसळावी तशी अवस्था मानस आणि मानसीची झाली होती. याआधी मानसी आडून आडून नातेवाईकांचे टोमणे खात आली होती. गेली तीन-चार वर्षे राहुलसाठी मुलगी शोधण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा पगार ऐकल्यावर मुलीचे आईवडील वा मुलगी उत्तरसुद्धा देत नसत, हेही तिच्या अंगवळणी पडले होते. मात्र कामात गर्क असल्यामुळे मानसचे याकडे दुर्लक्ष झाले होते.
मानस मानसीला आपापसात बोलण्याजोगे काही राहिलेले नव्हते. मात्र मानसीने प्रथम अमरला म्हणजे भावाला विश्वासात घेऊन हे सारे सांगायचा प्रयत्न केला. तर त्याने पटकन तिला झटकून टाकले. तो म्हणाला राहुल म्हणतो, त्यात शहाणपणा आहे. योग्य तो निर्णय लगेच घेऊन टाका. मध्यंतरी राखीचा सण आला. दोन्ही बहिणींनी त्या दिवशी नेहमीप्रमाणे मानसला स्काईपवर फोन केला तर त्याला चक्क रडू फुटले. मानसी एव्हाना भावाशी बोलून सावरली असल्यामुळे तिने मानसला शांत करता करता दोन्ही नणदांना काय घडले ते थोडक्यात सांगितले. मुले म्हणतात त्यात वावगे काहीच नाही. तुम्हाला आता जागेची गरज पण राहिलेली नाही. तेव्हा योग्य तो निर्णय लवकर घेऊन टाका असे अमेरिकन शहाणपण सांगून त्यांनी हात झटकले. मानस मानसीचे सारेच दोर तुटले होते.
तात्पर्य : करियर कथेचा शेवट ज्या त्या वाचकाने आपापल्या कुवतीप्रमाणे करावा. अमेरिकेबद्दल जे अतिसमाधानी असतील त्यांचा शेवट पूर्णपणे वेगळा असेल. ज्यांचे अमेरिकेला जाण्याचे आकर्षण पूर्ण झाले नसेल त्यांचा शेवट अर्थातच राहुलसारखा अपेक्षित असेल. मानस-मानसीबद्दल खूप सहानुभूती वाटणारे पन्नाशीच्या आतील कोणी निघतील तर ते साहजिकच अत्यंत अल्पसंख्यांकातील निघतील. मग पुढच्या वयस्करांना विचारतो कोण? एक मात्र खरं, हा सार्या समाजाचा प्रश्न बनत आहे. म्हणून ही कथा समाजाची.