माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या भारतीय चंद्रयान मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान मोदींनी कारण नसताना केलेली चमकोगिरीची लुडबूड पाहून इतका वैतागला की दोन दिवसांनी तडक मोदींना जाब विचारायला दिल्लीला गेला. त्याची मोदींशी झालेली ही प्रश्नोत्तरं…
– नमस्कार मोदीजी.
– नमस्कार. आत्ताच चंद्रावरच्या त्या आपल्या जागेचं नामकरण करून आलो. म्हणजे उद्या त्या जागेवर कुणी हक्क सांगायला नको. चंद्रयान ज्या ठिकाणी उतरलं त्या जागेचं ‘शिवशक्ती’ असं नामकरण केलं आणि गेल्या वेळी ज्या ठिकाणी ते कोसळलं होतं, त्या जागेचं ‘तिरंगा पॉइंट’ म्हणून नामकरण केलं. २०२४ला आमचं सरकार आल्यावर मी, अमित शहा माझ्या नावाच्या चंद्रयानातून चंद्रावर जाऊन तिथे नामकरणाचा भव्य जाहीर समारंभ करणार आहोत. त्यावेळी होणारं प्रक्षेपण तुम्हाला घरात टीव्हीवर पाहाता येईल.
– पण मुळात तुम्ही दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्गला असूनही शेवटच्या काही मिनिटांत त्या टीव्ही प्रक्षेपणात कशासाठी थडकलात?
– ते या राष्ट्राचा पंतप्रधान म्हणून माझं आद्यकर्तव्यच होतं. मी त्यांना प्रोत्साहन द्यायचं नाही तर काय पाकिस्तानच्या पंतप्रधानाने द्यायचं?
– मग भारतात राहूनच काय ते करायचं होतं.
– हे बघा, आमचे विदेश दौर्यांचे कार्यक्रम आधीच ठरलेले असतात.
– मोदीजी, चंद्रयान मोहिमेची तारीखही आयत्या वेळी ठरवलेली नव्हती. आपल्यालाही ती तारीख माहीत असणार. त्या मोहिमेच्या नियोजित यशस्वी क्षणाच्या वेळी आपण देशाबाहेर कसे असू शकता? तिथून टीव्ही प्रक्षेपणातून स्वत:ची प्रसिद्धीही कशी करून घेऊ शकता? याचं सगळं प्लानिंग तुम्ही पूर्वीच केलं असणार.
– हे खरं नाही, झूठ है ये. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी भारताच्या या देदीप्यमान यशाचे मानकरी असलेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचं त्या क्षणीच कौतुक करणं माझं कर्तव्यच होतं.
– ती मोहीम फत्ते झाल्यानंतर काही क्षणांत तुम्ही त्या शास्त्रज्ञांच्या आनंदात थेट प्रक्षेपणाद्वारे सामील झाला असता, तिथे लंबेचौडे भाषण ठोकलं असतं तर काही बिघडलं नसतं. पण चंद्रयान चंद्रावर उतरण्याआधीच त्या टीव्ही प्रक्षेपणात अवतरून त्या शास्त्रज्ञांची एकाग्रता भंग पावेल असा उपद्व्याप केलात तो अक्षम्य आहे. इस्रो केंद्रातील त्या शास्त्रज्ञांचं लक्ष सेकंदभर जरी विचलित झालं असतं तर केवढा मोठा अनर्थ घडला असता, याची कल्पना आपल्याला असायला हवी होती. तुमच्या भक्तांना कौतुक वाटलं असेल, पण बहुतेक भारतीयांना तुमच्या या नको तिथे घुसखोरीचा रागच आला होता.
– ऐसी कोई बात नहीं. वो तो हमारी जिम्मेदारी थी.
– अहो, आजपर्यंत भारताने इतक्या यशस्वी अंतराळ मोहिमा केल्या, पण भारताच्या कोणत्याही पंतप्रधानांनी, राष्ट्रपतींनी, इतर मंत्र्यांनी त्यांच्या कामात व्यत्यय आणला नव्हता आणि त्यांचं लक्षही विचलित केलं नव्हतं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताचा अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात गेल्यावर त्याला पृथ्वीवरून विचारलं होतं, ‘वहां से आपको भारत वैâसा दिखता है?’ राकेश शर्माने उत्तर दिलं होतं, ‘सारे जहां से अच्छा…’ ते ऐकून सार्या भारतीयांचा ऊर भरून आला होता. ती अंतराळ मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला होता, आधी नाही.
– उस समय हमारे घर में टीव्ही नहीं था और मैं चाय बेचने में व्यस्त था. मुझे मालूम है कि वो सब बातें प्रीप्लान थी. मुझे ये सुनने में इंटरेस्ट नहीं है.
– पण या पदावर असताना इतका अतिउत्साह अशा गांभीर्यपूर्ण मोहिमांमध्ये नको तेव्हा दाखवू नका, असं जनतेचं मत आहे, ते तुम्ही आता तरी मनावर घ्या.
– आम्ही म्हणजेच जनता आहोत. आमच्या पक्षाचं नावच मुळी ‘भारतीय जनता पक्ष’ आहे. चंद्रावरसुद्धा आम्ही आमच्या पक्षाची सत्ता स्थापन करू. इथे पूर्ण झालं नाही तर ते तिथे पूर्ण करू. तिथे गुरुत्वाकर्षण निर्माण करण्यासाठी आमचे गुरू रामदेवबाबा यांनाही तिथे घेऊन जाऊ. सध्या चंद्रावरील खड्डे बुजवून तिथे सपाट आणि गुळगुळीत रस्ते बांधण्याची, मोठमोठे पूल उभारण्याची खरी गरज आहे. त्यासाठी तिथे आमच्या नितीन गडकरींना घेऊन जाण्याची आमची इच्छा आहे.
– म्हणजे त्यांचा भारतातील पत्ता कट करून त्यांना चंद्रभूमीचं आमिष दाखवण्यासारखं झालं.
– गलत सोच रहे हो तुम…
– त्यांना नका नेऊ. सध्या त्यांचं वजन तुमच्या आणि अमित शहांच्या डोळ्यात खुपतंय. म्हणून तर त्यांची एकेक पदं काढून घेतलीत तुम्ही. येत्या निवडणुकीत तुम्ही त्यांना तिकीट द्याल की नाही याचीच शंका वाटतेय.
– वैसा कुछ नहीं होगा. वाटल्यास चंद्रावर वस्ती आढळल्यावर संपूर्ण चंद्रावर कब्जा करून पक्ष त्यांना चांद्रभूमीचा पंतप्रधानही करू शकेल.
– या जर-तरच्या गोष्टी आहेत. आणि समजा तोपर्यंत तुमची भारतातलीच सत्ता गेली तर ती चंद्रावर तरी कशी असू शकेल? घंटा वाजवण्याशिवाय तुमच्या हातात दुसरं काही शिल्लकच राहणार नाही.
– बहोत बोलते हो तुम…
– ती तर माझी सवयच आहे, हे तुम्हालाही माहीत आहे. मेरा नाम है पोक्या और आज तक मैंने कितने नेताओं को ठोक्या, ये भी आपको मालूम है. आपला नमक खाया है, झूठ नहीं बोलूंगा. सच के सिवा कुछ नहीं बोलूंगा.
– बस कर ये बकबक. आम्ही तर संपूर्ण चंद्रावर आमचा मालकी हक्क स्थापन करण्याची स्वप्नं बघत आहोत. तिथे म्हाडाचं महाकार्यालयही उभारायचं आहे. तिथे वस्ती वाढण्यासाठी सुरुवातीला म्हाडाची स्वस्त घरं देण्याची कल्पना तुमच्या फडणवीसांनी सुचवली आहे. चंद्रयानाला चंद्रकांत यान म्हणणार्या अजितदादांनाही चंद्रकांत पाटलांसह बरोबर घेऊन तिथले पालकमंत्री करण्याचा विचार आहे. एकदा का तिथे जम बसला की मग भारताची चिंता करण्याची गरज नाही.