मानव आणि वन्यजीव संघर्ष हा काही नवीन विषय नाही. गेल्या काही दशकांत औद्योगिकीकरणाच्या परिणामांनी हिरव्या जंगलांचा आकार रोडावत जाऊन काँक्रीटची जंगल वाढली. मानवाला राहायला जागा कमी पडू लागल्यामुळे तो जंगलाच्या दिशेने सरकू लागला आणि वन्यप्राण्यांना शिकार मिळत नसल्याने ते जंगलाबाहेर पडू लागले. ब्रिटिश राजवटीत शिकारीचा शौक, श्रीमंती प्रदर्शन आणि औषधी उपयोगासाठी वाघ मारण्याची अहमहमिका वाढली होती. देश स्वतंत्र झाल्यावर निसर्गसाखळीतील वाघाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन सरकारने ठोस उपाययोजना केल्या आणि परिणामी आज भारतात वाघांची संख्या वाढतेय. पण याचा आनंद मानायचा की संख्या वाढल्याने वाघ नवीन टेरीटेरीच्या शोधात मानवी वस्तीत येऊन पोहचतोय याची काळजी करायची, हा टेरिटेरी सिनेमाचा विषय.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर जंगलाच्या टेरीटेरीमध्ये या सिनेमाची गोष्ट घडते. जंगलाच्या वेशीवर एक पांढरकवडा गाव वसलेलं आहे. गावातली मंडळी सरपण, तेंदुपत्ता गोळा करायला, गुरं चारायला जंगलात जातात. एके दिवशी एका गावकर्यावर वाघ हल्ला करतो. वाघाने माणसावर हल्ला करून त्याला जखमी केलं अथवा ठार मारलं तर सरकारी मदत मिळते. यामुळे काही वेळा खोटी माहिती देखील दिली जाते. या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी वन अधिकारी दरोगा जिड्डेवर (किशोर कदम) तपासासाठी गावात येतो. याच दरम्यान एक वाघ गायब होतो. त्यात हात असल्याच्या संशयावरून काही गावकर्यांना वनाधिकारी ताब्यात घेतात. पुढील दोन दिवसांत अजून एक वाघ गायब होतो. केंद्र सरकारकडून पुढील तपासासाठी कर्तव्यदक्ष सीबीआय अधिकारी देशमुख (संदीप कुलकर्णी) यांना घटनास्थळी पाठवण्यात येतं. तपास सुरू असताना वाघ आणखी काही माणसांवर हल्ला करतो. यामुळे जनतेत रोष निर्माण होऊन आंदोलन केलं जातं. जनतेच्या दबावाखाली या नरभक्षक वाघाला जेरबंद करा असं फर्मान सरकारकडून जाहीर होतं. मग सुरू होतो वाघ पकडण्याचा थरार. दुसर्या बाजूला वाघाची शिकार करून त्यांचे कातडे, नखे आणि अवयव यांची तस्करी एक टोळी टिपेश्वर जंगलात वावरतेय. वाघ गायब करण्यात गावकर्यांचा सहभाग आहे का? गायब झालेले वाघ पुन्हा दिसतात का? त्या तस्करांच काय होतं? या सर्व प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळतील.
या चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन ही जबाबदारी सचिन श्रीराम या तरुण दिग्दर्शकाने उचलली आहे. जंगलातील गोष्ट पडद्यावर मांडताना ती माहितीपटाचा आकार घेईल ही भीती असते. पण सचिन यांनी कथेचे आशयमूल्य वाढविण्यासाठी त्यांनी जगलेले, पाहिलेले काही पैलू, प्रसंग कथेत पेरले आहेत. जंगलातील सीन्समध्ये प्रेक्षकांना सिनेमाचा थरार अनुभवता यासाठी मध्ये मध्ये धक्कातंत्र वापरले आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहताना आपण त्या जंगलाचा भाग बनून जातो. या विषयावर आधी आलेले सिनेमे फक्त वन्यप्राण्यांच्या दृष्टिकोनातून दाखवले गेले होते, पण हा सिनेमा आदिवासी लोकांच्या अस्तित्वाची बाजू देखील मांडतो. त्याचबरोबर वाघतस्करी, जंगलतोड, आदिवासी जीवन, एका विशिष्ट समाजावर बसलेला गुन्हेगारी ठपका या मुद्द्यांनाही स्पर्श करून जातो. चित्रपटात स्थानिक आदिवासी भाषेचा वापर केला आहे, त्यामुळे हा चित्रपट वास्तवदर्शी झालाय. कथेत अनेक त्रुटी आहेत, स्त्रीवरील अतिप्रसंग आणि त्यातून सुटका अशा काही प्रसंगांची संगती लागत नाही. पटकथा अनेक ठिकाणी विस्कळीत आहे. पण, विस्कळीत मांडणी हीच या सिनेमाची जमेची बाजू आहे. छायालेखक कृष्णा सोरेन जंगलाची नयनरम्य आणि उत्कंठावर्धक सफर घडवतात. संकलक मयूर हरदास आणि पार्श्वसंगीतकार यश पगारे सिनेमांच्या निर्मितीमूल्यांत भर घालतात.
स्थानिक भाषेवर पकड आणि मोकळी ढाकळी देहबोली यांच्या जोरावर किशोर कदम यांचा फॉरेस्ट ऑफिसर त्याच आदिवासी भागातील रहिवासी भासतो. अनेक वर्ष जंगलात काढलेला, जंगलाची इत्थंभूत माहिती असणारा आणि जंगल वाचायला हवं हे प्रेम बाळगणारा दरोगा जिड्डेवर आपल्याला भेटत राहतो. बक्षिसाची लालसा असली तरी हा दरोगा काही चुकीचे काम करणार नाही हा सच्चेपणा किशोर कदम यांच्या अभिनयात दिसतो. शहरातील गुंडांशी सामना करणार्या सीबीआय अधिकार्यावर जंगलात जाऊन तपास करायची वेळ येते, तेव्हा त्यांना वाटणारी भीती चेहर्यावर दिसते, पण त्याचवेळी तपासकामात वनाधिकारी दरोगावर वचक ठेवण्यासाठी ती भीती न दर्शवता ते निर्भयतेने जंगलात वावरतात. संदीप कुलकर्णी यांनी हा अधिकारी साकारताना वर्दीतला माणुसकी जपणारा माणूस दाखवला आहे. अनेक स्थानिक कलाकारांनी आपापली कामे चोख पार पाडली आहेत.
प्राणिसंग्रहालयातील पिंजर्यातील वाघ पाहणं आणि जंगलातील मोकळा वाघ पाहणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. शहरातील काँक्रिटच्या जंगलातील विषयांवरील चित्रपट पाहून कंटाळा आला असेल तर ही घनदाट जंगलातील वाघाची टेरिटेरी पाहायला तुम्हाला निश्चित आवडेल.