साहसी क्रीडा प्रकाराचे शासकीय पाठबळ घेत वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल बंदिस्त स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या प्रो-गोविंदात जोगेश्वरीच्या जय जवानने विजेतेपद पटकावले. प्रो-कबड्डीच्या धर्तीवरील हे व्यावसायिकरण मनोहारी असले तरी त्यात त्रुटी आहेत. त्यांच्यावर मात करीत येत्या काही वर्षांत हा खेळ मोठी उंची गाठू शकतो. पण त्यातील काही कळीच्या मुद्द्यांवर ऊहापोह होणे अनिवार्य आहे.
– – –
आकाक्षांपुढती गगन ठेंगणे, हे सार्थ ठरवणारा गोविंदा म्हणजे मानवी मनोरे. एकावर एक थर रचून दहीहंडीपर्यंत पोहाचण्यासाठी केलेली एक शास्त्रशुद्ध रचना हे मानवी इच्छाशक्तीचे यथार्थ दर्शन. भारतीय गोविंदाचा इतिहास पूर्वापार, म्हणजे अगदी श्रीकृष्णापर्यंतचा. ही परंपरा देशात गेले अनेक वर्षे जपली जातेय. स्पेनमध्येही कॅटालोनिया भागात मानवी मनोर्यांचा म्हणजे ‘ह्युमन पिरॅमिड्स’चा खेळ उत्सवाप्रमाणे साजरा होतो, त्याला ‘कॅसल’ असे संबोधले जाते. त्याला प्रारंभ १७व्या शतकातला. म्हणजेच आपला इतिहास त्याहून अधिक जुना. साहसी क्रीडा प्रकाराचे शासकीय पाठबळ घेत वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल बंदिस्त स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या प्रो-गोविंदात जोगेश्वरीच्या जय जवानने विजेतेपद पटकावले. प्रो कबड्डीच्या धर्तीवरील हे व्यावसायिकरण मनोहारी आहे. पण, त्यात अनेक त्रुटी आहेत. त्यांच्यावर मात करीत येत्या काही वर्षांत हा खेळ मोठी उंची गाठू शकतो, अशी आशा नक्की व्यक्त होत आहे.
साधारण २०००च्या दशकाच्या उत्तरार्धात ठाण्याच्या राजकीय नेत्यांनी या सणाला इव्हेंट्सचे स्वरूप दिले. यात संघर्ष, संस्कृती आणि संकल्प यांची भूमिका महत्त्वाची. जय जवान क्रीडा मंडळ आणि ताडवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (माझगाव) या दोन मंडळांनी नऊ थरांचे आव्हान पेलले आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि सरावाद्वारे थरांचे समीकरण साधता येते, हे प्रथमच अधोरेखित झाले. २००८मध्ये जय जवान आणि ताडवाडी संघांनी रचलेले नऊ थर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये पोहोचले. २०१२मध्ये जय जवान मंडळाने नऊ थरांचा मनोरा रचत ४३.७७ फूट उंची गाठत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली. हे करताना त्यांनी स्पेनच्या जोसेफ-जोआन मार्टिनेझ लोझानो टीमचा ३९.१२ फुटांचा २१ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. त्याच वर्षी जय जवानने १० थरांचा विश्वविक्रम रचण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले. परंतु ते अपयशी ठरले. गेल्या १५ वर्षांत बोरिवलीचे शिवसाई गोविंदा पथक, जोगेश्वरीचे कोकण नगर गोविंदा पथक अशी नऊ थर रचण्याची क्षमता असलेली आणखी पाच ते सहा मंडळे तयार झाली. आठ थर रचणारी जवळपास २० मंडळे कार्यरत आहेत. तीन एक्के ही खासियत मागे टाकत शास्त्रशुद्ध पद्धतीने चार एक्के कसे लावायचे, हे माझगाव, ताडवाडी आणि शिवसाई पथकाने दाखवून दिले. मागील दशकात या उत्सवाचे क्रीडाप्रकारात रुपांतर करण्यासाठीच्या हालचाली तीव्र होऊ लागल्या. दहीहंडी समन्वय समितीच्या हालचालींना अखेरीस यंदा यश आले आणि साहसी क्रीडा प्रकाराच्या गटवारीत गोविंदाला स्थान मिळाले.
प्रो-गोविंदा : एक ऊहापोह
प्रो-कबड्डी लीगच्या धर्तीवर बंदिस्त स्टेडियममध्ये प्रो गोविंदाची उत्तम आखणी करण्यात आली. प्रक्षेपणासाठीचा इव्हेंट्स करण्याचा हा प्रयत्न यूट्युबपर्यंतच मर्यादित असला तरी उत्तमपणे साकारला. मातीतल्या खेळाची कक्षा रुंदावत मॅटपर्यंत गेला. मॅटवर ग्रिप राहील, ही काळजी घेण्यात आली. वेळेची सारणी, पंचांच्या सूचना, रिप्ले, समालोचन, निर्णय प्रक्रिया, ७५ हजार खेळाडूंचा विमा हे जरी प्रशंसनीय पद्धतीने सादर झाले तरी त्यातील काही मुद्दे प्रश्नांकित राहतात.
गोविंदाचे व्यावसायिकीकरण म्हणजे ‘प्रो-गोविंदाकरण’ करताना सर्वाधिक थर आणि नंतर उंची हे निकषच बाजूला करण्यात आले, याबाबत गोविंदाजगतात आश्चर्य प्रकट करण्यात येत आहे. कारण नऊ थर रचणारे आणि प्रयत्नशील असणारे तसेच दहा थरांचे स्वप्न उराशी बाळगणारे संघ अस्तित्वात असताना वेळेचे गणित आखून आठ थरांपर्यंतच स्पर्धा मर्यादित का ठेवण्यात आली? मागील वर्षापर्यंत उंच दहीहंडी फोडणे, हे या क्रीडाप्रकार होऊ पाहणार्या उत्सवाचे वैशिष्ट्यच नाहीसे झाले. जय जवानसह जोगेश्वरीतल्या चार गोविंदा पथकांनी उपांत्य फेरीत आठ थर लिलया लावले. आठ थर लावणे हे आता अप्रूप राहिलेले नाही. नऊ थर आणि मग किती उंची गाठली, हा निकष लावता आला नसता का? १० थरांचा विश्वविक्रम हा झाल्यास तो प्रो गोविंदातच व्हायला नको का? क्रीडा प्रकार म्हटले की नियम आणि विक्रम हे त्यात अपरिहार्य असायलाच हवेत.
कोणतेही थर रचताना चार मिनिटे हा कमाल कालावधी लागतो. मग वेळेचे निकष आखताना आणखी काही प्रश्न उपस्थित होतात. अंतिम टप्प्याच्या पहिल्या फेरीत दोन संघांची एकमेकांशी असलेली चढाओढ ही योग्य की अयोग्य? कारण जलद थर रचण्यासाठी समोरच्या संघाकडेही लक्ष राहते, हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे एका वेळी एकच संघ हीच परंपरागत मांडणी योग्य ठरली असती. यात पहिल्या फेरीत सहा थर रचताना विशिष्ट चौकोन आणि त्याला स्पर्श झाल्यास दोन सेकंद उणे हा नियम एकदा केल्यानंतर प्रत्येक थर वाढताना शिड्याही वाढतात. पण दुसर्या फेरीपासून एकावेळी एक गोविंदा मनोरा रचणे योग्य होते. पण आयताकृती आकाराचे मैदान उपलब्ध करताना दोन बाजू कायम ठेवून, दोन बाजू वाढवण्याचा निर्णय शिड्या रचताना काही प्रमाणात अडचणीचा ठरत होता. मैदानाची आखणी ही चौकोनी किंवा गोल कमाल थर (९ थर) रचनेनुसार कायम असायला हवी होती. याचप्रमाणे, राज्यात सहा थर रचणारी बरीचशी मंडळे आहेत, यापैकी बहुतांश मंडळे कमी वेळेत वेगाने थर रचतात. यापैकी काही हौशी पथकांचा वेग नऊ थर रचणार्या दिग्गज मंडळांपेक्षाही अधिक आहे. परिणामी दिग्गज मंडळे सहा थरांचे आव्हान पेलताना आधीच बाद झाली. त्यामुळे अंतिम १४ संघांची स्पर्धा ८ थरांपासून पुढे सुरू करायला हरकत नव्हती.
प्रो-गोविंदासाठी प्रत्येक गोविंदा पथकात कमाल २०० खेळाडूंचे बंधन होते. प्रो-गोविंदासाठी १४ पथके सहभागी झाली. म्हणजेच २८०० खेळाडू यात सामील झाले. यापैकी अंतिम फेरीत जोगेश्वरीच्या चार संघांनी वर्चस्व गाजवले. याशिवाय बोरिवली ते ठाण्यापर्यंतची मंडळे अंतिम टप्प्यात होती. त्यांचा दीड-दोन महिन्यांचा सराव दर वर्षी होत असला तरी त्यांच्या प्रवासाचा खर्च शासन किंवा संयोजकांनी उचलायला हवा होता. कारण दोनशे जणांच्या समूहाला प्राथमिक फेरी आणि अंतिम टप्प्यासाठी ठाणे आणि वरळीपर्यंत बसने पोहोचणे आणि मध्यरात्री एकपर्यंत स्पर्धा खेळणे, हे आव्हान सोपे नव्हते. पात्र झाले १४ संघ. यापैकी पहिल्या चार संघांना लक्षावधी रुपयांची (अनुक्रमे ११ लाख, ७ लाख, ५ लाख, ३ लाख) बक्षिसे मिळाली. पण उर्वरित १० संघांच्या वाट्याला आले, ते फक्त ५० हजार. या बक्षीस रकमेपेक्षा प्रवास खर्च अधिक झाला, हे अर्थकारण गोविंदाचे व्यावसायिकीकरण करताना महत्त्वाचे ठरते.
संयोजकांनी गोविंदाला ग्लॅमर देताना १००हून अधिक जणांचा समावेश असलेला शिवराज्याभिषेक सोहळा आणि सर्कसमय समूहनृत्य सादर केले. नृत्यावरील हा लाखो रुपयांचा खर्च वाचवून गोविंदा पथकांचे इनाम वाढवायला संधी होती. प्रो गोविंदाच्या व्यासपीठावर गोविंदाच अधिक आकर्षक असायला हवा, अन्य नृत्य नव्हे. प्रो गोविंदा सादर करताना त्याचा इतिहास, त्याचे उत्सवी स्वरूप, विक्रम हे सारे दाखवता आले असते. १४ संघ वरळीला दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत पोहोचले; पण प्रत्यक्ष स्पर्धा दुपारी चार वाजता सुरू होण्याऐवजी दोन तास दिरंगाईने सुरू झाली. पहिले थर उभे राहिले, तेव्हा बराच उशीर झाला होता. गोविंदा मोठा होत असताना माझगाव ताडवाडीचा संघ नसल्याची खंत गोविंदाप्रेमींना तीव्रपणे बोचली. दहीहंडी समन्वय समितीत फूट पडल्याची चर्चाही गेले काही दिवस ऐरणीवर होती. राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन हे विभाजन टाळून ‘समन्वय’ साधल्यास गोविंदाचा विकास ‘गुण्यागोविंदा’ने होईल.
राज्याच्या क्रीडा धोरणात अनेक क्रीडा प्रकार अस्तित्वात आहेत. यापैकी बरेचसे मारूनमुटकून, क्वचितप्रसंगी दोन खेळांचा समन्वय साधून तयार करण्यात आले आहेत. त्या तुलनेत गोविंदामध्ये क्रीडाप्रकार होण्याची पूर्ण क्षमता आहे. तिथे शारीरिक आणि मानसिक कस लागतो. काही दुखापती आणि अपघातांमुळे हा उत्सव काही प्रमाणात डागाळला. हे अपघात सरावाचा अभाव आणि दहीहंडीच्या दिवशी हौस म्हणून वर्षातून एकदा थर रचणार्या व्यक्तींचे मोठ्या प्रमाणात होतात. सराईत गोविंदांचे अपघात तुलनेने कमी होतात. कारण गोविंदाचे थर रचण्याचे शास्त्र आता उत्तम विकसित झाले आहे. येथे थर रचण्यात आणि खाली उतरण्यात केलेली चूक त्यांना भोवते. तशा कोणत्याही खेळात दुखापती अविभाज्य असतात. क्रिकेटमध्ये नेहमीच दुखापतींचे कारण देणार्या महारथींकडेही आपण कौतुकाने पाहतो. प्रो गोविंदाच्या पर्वात हा दृष्टिकोनही बदलेल, अशी आशा आहे. उत्तेजक द्रव्य पदार्थांची चाचणीसारखे व्यावसायिक क्रीडा प्रकारांचे नियमसुद्धा इथे भविष्यात राबवावे लागतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रो गोविंदाच्या व्यासपीठावर गोविंदांना नोकर्यांची घोषणा केली. अनेक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त राष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू नोकर्यांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ताजे आश्वासन देताना त्यांची पूर्तता करता येऊ शकते का, याचीही शहानिशा व्हायला हवी. हे प्रो गोविंदाचे पहिलेच पर्व. यातील उणिवांतून सावरत खेळ मोठा होताना पुढील वर्षी प्रो गोविंदाच्या दुसर्या पर्वात यात अधिक सुधारणेची अपेक्षा करूया!