कोल्हापूरची माती कसदार असे म्हटले जाते. कोल्हापूर शहराच्या आसपास छोटी छोटी शहरे पण आहेत. प्रत्येकाने स्वतःचे वेगळेपण जपले आहे. इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग, मिरजेमध्ये विविध वाद्यांची निर्मिती, सांगली तशी शिक्षणाकरता चांगली. शिवाय गडहिंग्लज, आजरा, इस्लामपूर, विटा या प्रत्येक गावातून कोणीतरी नामवंत झालेला आहे. यातीलच एका गावी गणेशचा जन्म झाला. चौथीपर्यंतचे शिक्षण गावात झाल्यावर माध्यमिक शाळेसाठी मोठ्या शहरात पाठवणी झाली. शाळेमध्ये व नंतर कॉलेजमध्ये विविध उपक्रमामध्ये गणेशचा छान सहभाग असे. मित्रपरिवारसुद्धा भरपूर जमवला होता. कॉलेजमध्ये सायन्स शाखेत प्रवेश घेतल्यानंतर त्या दशकातील सार्यांच्या आकर्षणानुसार गणेशलाही कॉम्प्युटरने झपाटले. बारावीला चांगले मार्क मिळवून कॉम्प्युटर सायन्ससाठी त्याने प्रवेश घेतला. यथावकाश कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झाले. लगेच एम.टेक पण त्याने छान मार्कांनी पूर्ण केले. एका आयटी कंपनीमध्ये नोकरी मिळाली. यापुढचा सारा प्रवास कसा आता आयटीमध्ये ऐटीत जाणार किंवा तो यथावकाश अमेरिकेचा रस्ता पकडणार, असे सार्यांना वाटत असताना गणेशच्या मनात काही वेगळेच होते. शाळेपासून अवांतर वाचनाची खूप आवड असलेला गणेश विविध सामाजिक विषयांबद्दल स्वतः विचार करत होता. राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थितीवर विविध नामवंतांची भाषणेही तो ऐकत होता. भारतातील राजकीय घुसळणीचे ते २०१०चे दशक होते. राज्यातील व केंद्रातील सरकारे बदलली होती. अनेक विचारवंतांचे, भल्या भल्या जाणकारांचे राजकीय अंदाज चुकत होते. सामाजिक कार्यकर्ते भांबावलेले होते. चळवळी थांबल्यात जमा होत्या. मात्र याच वेळेला सोशल मीडियाचा उदय होत होता. सोशल मीडियावर यूट्यूब चॅनल नावाचा प्रकार हळूहळू प्रत्येकाच्या मनाची पकड घेत होता. टिक टॉक, रील्स, जोक्स, यांच्या जोडीला स्वत:च्या नावाचा यूट्यूब चॅनल असणे असा एक वेगळा प्रकार सुरू झाला होता. तोपर्यंत फक्त गेमिंग या प्रकाराने सर्वांना वेड लावले होते.
बसल्या बसल्या एखादा नवीन गेम ऑफलाइन खेळायचा व हातातील फोनवर वेळ घालवायचा, हा प्रकार डेटा स्वस्त झाल्यापासून यूट्यूबकडे वळू लागला होता. एक प्रकारची क्रांती म्हणावी इतका मोठा बदल गणेशच्या लक्षात आला नसता तरच नवल! यूट्यूबबद्दल आजही चर्चा करणारे तुम्हाला सरसहा लोक भेटतील. तिथे पैसे कमावता येतात असे पण सांगतील. कसे व कधी मिळतात हे सांगणारा मात्र भेटत नाही. यूट्यूबवर नेमके काय करायचे याबद्दलचा असा संभ्रम भल्याभल्यांच्या मनात होता, त्या वेळेला या माध्यमातून काही सामाजिक बदल घडू शकेल काय? त्यातून आर्थिक फायदा होईल काय? करिअरसाठी तो एक नवीन मार्ग असेल काय? यावर गणेशचा रोजचा गंभीर विचार चालू होता.
एकूणात माध्यम हा प्रकार काय आहे, याविषयी रीतसर प्रशिक्षण नसल्यामुळे गणेशची त्याकडे पाहण्याची दृष्टी अजिबात बंदिस्त नव्हती. माध्यमविचार म्हणजे नियतकालिके, वृत्तपत्रे, न्यूज चॅनल्स आणि ब्लॉग्स अशा पठडीच्या बाहेर जाऊन गणेश या सार्यावर गंभीर विचार करत होता. एकीकडे नोकरीमध्ये आयटी नावाच्या प्रचंड ऑक्टोपसमध्ये काय काय चालते, याचे कामानिमित्त प्रशिक्षण चालू होते. स्वत:चे घर आणि गाव सोडले की लागणारी किमान मिळकत खर्च भागवून गणेशच्या हातात फारशी पुंजी उरत नव्हती. बरोबरचे पदवीधर विविध वाटा धुंडाळून कुठे कुठे पळत होते. कोणी स्पर्धा परीक्षांचा रस्ता पकडला, तर कोणी अमेरिकेचा. काहींनी एमबीएला प्रवेश घेऊन नोकरीत प्रगतीचा वेग धरला.काहींनी रीतसर आयटीच्या जोखडाला स्वत:ला जुंपून घेतले व मिळणार्या वाढत्या पगारात समाधान मानायला सुरुवात केली.
त्या काळात सामान्य आयटी पदवीधराला पहिल्या नोकरीत किमान तीन लाखापासून तेरा लाखापर्यंत वार्षिक पॅकेज मिळत होते. ही तफावत फार मोठी होती. या सार्याबद्दल कुरकुर करणार्यांची संख्या ९० टक्के होती. पण इथे काय काय कामे करून घेतली जातात यावर गणेशने लक्ष केंद्रित करून घेतले. जमवलेल्या डेटाचा वापर कसा कसा केला जातो? तसेच डेटा मिळवायचा कुठून? अशा कंटाळवाण्या पण सार्या जगातील नामवंतांचे लक्ष वेधून घेणार्या गोष्टीवर त्याचा अभ्यास चालू होता. जोडीला डिजिटल मार्केटिंगचा फंडा हातपाय पसरत होता, तोही त्याने शिकून घेतला.
नोकरीला केला रामराम
मनाशी काही आडाखे बांधून एके दिवशी त्याने स्वत:ची आयटी कंपनी सुरू केली. हे खरे तर मोठेच धाडस होते. जेमतेम वयाच्या पंचविशीत हातात फक्त काही लाख रुपये असताना असा विचार करणे धोक्याचे होते. हा धोका पत्करताना नक्की काय साध्य करायचे आहे, त्याचे साधन म्हणून ही आयटी कंपनी आपण काढत आहोत हे गणेशच्या मनात पक्के होते.
ह्याचवेळी कोल्हापूरमध्ये दरवर्षी एक वैचारिक प्रबोधनपर भाषणमाला आयोजित करण्याचे त्याचे काम सुरू झाले. या वैचारिक भाषणमालेला भरघोस प्रतिसाद मिळत गेला तोही युवा वर्गाकडून. गणेशाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही गोष्ट खूप पूरक ठरली. पारंपारिक राजकारणाचा बोलबाला चालू असताना नवीन युवा वर्गाला आकर्षित कसे करून घ्यायचे असते याचा एक आराखडा त्याचे मनात ठरत होता. नवीन आयटी कंपनी काढली पण त्या कंपनीला काम कुठून व कोणते आणायचे, यावर त्याने इतके दिवस केलेल्या माहिती गोळा करत, विश्लेषण करून त्याचा वापर करण्यावर भर द्यायचे ठरवले. मोजकीच माणसे, पण त्यांचे व्यवस्थित प्रशिक्षण देऊन कंपनीचा श्रीगणेशा झाला. विविध वृत्तपत्रांत लेख लिहून व काही चॅनलवर मुलाखती देत असताना संवादक या भूमिकेतून लोकांपर्यंत स्वत:चे विचार व नाव पोचवण्यात गणेश यशस्वी झाला.
काही कंपन्यांची ‘ब्रँड व्हॅल्यू’ वाढवण्याकरता सुरुवातीची कामे मिळत गेली. काही साध्या सोप्या पण आकर्षक शब्दांतून मोठमोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांना त्याने आपल्या कंपनीला काम देण्यामध्ये यश मिळवले. उदा. तुमच्या कंपनीची डिजिटल पॉलिसी अशी काही आहे का? तशी नसेल तर त्याची संपूर्ण आखणी, नियोजन व भविष्यवेध करण्याचे ए टू झेड काम आम्ही करून देतो. अशा पद्धतीचे शब्द कधीच न ऐकलेल्या मोजक्याच पण महत्त्वाच्या कंपन्यांचे काम खिशात टाकल्यानंतर त्या अनुभवावर त्याने रीतसर एक पुस्तकच लिहून टाकले. ते पुस्तक वाचून गणेशला व्याख्याने देण्यासाठी निमंत्रणे येऊ लागली. सरकारी-निमसरकारी संस्थासुद्धा जाऊन त्याने अनेक व्याख्याने दिली. ‘सोशल मीडियावर वास्तवात राहून विवेकाने कसे वागायचे’, या विषयाचे अंगाने तो आता हक्काचा वक्ता बनला होता. कोल्हापूरमधील एका एफएम चॅनलने त्याला आपला आरजे कन्सल्टंट म्हणून नियुक्त केला. या सार्या वाटचालीमध्ये काही छानसे पुरस्कारसुद्धा त्याच्याकडे चालत आले.
एव्हाना गणेशच्या कंपनीचे आता पुण्यात बस्तान बसल्यात जमा होते. कामात एक प्रकारची सफाई पण तोचतोचपणा आलेला होता. आर्थिक चणचण मिटली होती. मनातील जुन्या कल्पना जुने विचार आता परिपक्व होऊन वर उफाळत होते.
विचार-धन लाइव्ह
गणेशने पुन्हा एक मोठी उडी घेण्याचे ठरवले. आपल्या आयटी कंपनीसाठीची जागा एका मजल्यावर तर दुसर्या मजल्यावर एक परिपूर्ण स्टुडिओ व छोटेसे ऑफिसची योजना त्याने आखली. ज्या दिवशी स्टुडिओचे काम पूर्ण झाले, त्या दिवशीच विचार-धन लाईव्ह या यूट्यूब चॅनलचा जन्म झाला.
वेगळेपण ते कोणते?
यूट्यूब चॅनेलवर काय पाहायला मिळते? साधारणपणे स्वतःचीच मते ठामपणे लोकांपर्यंत पोहोचवणार्या राजकीय विश्लेषक वा अनुभवी पत्रकारांना मागणी सुरू होण्याचे ते दिवस होते. ज्या पत्रकारांना नामांकित चॅनलवर चालणार्या चर्चांमध्ये सहभागी व्हायची संधी मिळत नव्हती किंवा संवादक/ अँकर बनता येत नव्हते त्यांनी असे चॅनल काढले होते. दुसरा प्रकार म्हणजे खाण्यापिण्याचे पदार्थ व त्याच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया सांगणारे चॅनल. अगदी भातपिठले कसे बनते, थालीपीठ कसे लावायचे इथपासून घरी पिझ्झा कसा बनवायचा इथपर्यंत हौशे, नवसे आणि गवसे यांची प्रचंड गर्दी आता युट्युबवर पाहायला मिळते. या सार्यापासूनचे वेगळेपण पहिल्या दिवसापासून विचार-धन लाईव्हने जपले आहे. विविध क्षेत्रातील जाणकार, नामवंत, अनुभवी, वेगळे काम करणारे अशा निरनिराळ्या व्यक्तींना शोधून बोलते करण्याचे काम गणेशने सुरू केले. अशी व्यक्ती काय काम करते, त्याचा समग्र आलेख गणेशकडे तयार असतो. त्या व्यक्तीच्या कामाच्या परिघावर राहून त्यांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचे काम गणेश नाजूकपणे करतो. सहज गप्पा वाटतील अशा पद्धतीत छोट्या छोट्या प्रश्नातून समोरच्याला बोलके करण्याचा त्याचा हातखंडा वाखाणण्याजोगा आहे. प्रश्नांच्या मार्याने समोरच्याला गारद न करता हलकेच फुलवायचे कसे ते गणेशकडून शिकावे. गणेशने घेतलेल्या अनेक मान्यवरांच्या मुलाखतीतून हे सहज उलगडते.
डिजिटल मार्वेâटिंगमधे हातखंडा असलेला अनुभव गणेशच्या आयटी कंपनीकडे होताच. युट्युबवरच्या विविध प्रचार व प्रसारपद्धतींचा वापर करत विचार-धन लाईव्हचे सबस्क्रायबर्स वाढायला सुरुवात झाली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हे नुसते ऐकण्यापुरते न राहता एखाद्या नामवंत व्यक्तीची मुलाखत घेतल्यानंतर जेमतेम २४ तासांत काही हजार प्रेक्षक कसे मिळतील याचेही त्याने काही आडाखे बसवले. प्रत्येक मुलाखतीला आकर्षक मथळा देण्यात त्याने हातखंडा कायम राखला आहे. कोणाची मुलाखत, कोणत्या विषयावर व ती कधी घ्यायची याचेही त्याचे आडाखे सहसा चुकत नाहीत. चॅनल आपला, स्टुडिओ आपला, प्रश्नकर्ता व मुलाखतकार स्वत:च, कोणाला बोलवायचे तोही निर्णय गणेशचाच. त्यामुळे कोणाचे लागेबांधे आहेत वा खास वशिला आहे म्हणून त्याला बोलावले असे घडत नाही. किंवा कोणाच्या दडपणाखाली एखादी मुलाखत घेतली किंवा नाकारली जाण्याची शक्यता उरत नाही.
पहिले वर्ष संपतानाच गणेशच्या चॅनलचा बोलबाला सुरू झाला होता. महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रातील नामवंत, विचारवंत, प्रसिद्ध व्यक्ती चॅनलवर येऊन गेली होती. दर आठवड्याला तीन अशा पद्धतीत नवीन मुलाखती लोकांना सादर केल्या जात होत्या. चॅनलच्या सबस्क्रायबर्सची संख्या पाहता पाहता लाखाचे आकडे ओलांडून गेली. अनेक मुलाखतीना लाखभर प्रेक्षक मिळणे ही पण दुसरे वर्ष संपताना नाविन्याची बाब राहिली नव्हती.
गणेशचे शिक्षण पूर्ण होऊन जेमतेम दहा वर्षे होत आहेत. यंदाच वयाची तिशी ओलांडणारा गणेश आज तीस पस्तीस वर्षांपेक्षा जास्त अनुभवी असलेल्या अनेक नामवंत विश्लेषकांच्या मांदियाळीत जाऊन बसला आहे. कोणतीही मुलाखत ऐकताना, पाहताना गणेशच्या हातात एकही चिट्ठीचपाटी दिसत नाही. अर्थशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र, पर्यावरण, तंत्र ज्ञान, संगणकीय प्रगती, आंतरराष्ट्रीय संबंध या विषयातील तज्ज्ञांना सहजपणे बोलते करण्याचे गणेशचे कौशल्य चकित करणारे आहे. असे यश मिळवूनही गणेश साधासुधा कोल्हापुरी माणूस वाटतो हेच खरे यशाचे गमक.
तात्पर्य : खरे तर या करिअर कथेचे तात्पर्य सांगायची गरज नाही इतके ते सुस्पष्ट आहे. कळत्या वयापासून सखोल विचार करण्याची, भरपूर वाचन करून विविध क्षेत्रातील ज्ञानप्राप्ती करून घेण्याची जिद्द आणि चिकाटी तंत्रज्ञानाच्या जोडीने एखाद्याला कशी यशाच्या शिखराकडे नेते त्याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे गणेशची विचार-धन लाइव्ह चॅनल.