स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशाला दिशा देणारे, अराजकीय भाषण करावे, असा संकेत आहे. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच धुडकावला आहे. त्यांनी संसदेचं रूपांतरही राजकीय आखाड्यात करून टाकलेलं आहे. त्यातही ते आपल्या सोयीनेच उतरतात, हे देशाचं दुर्भाग्य. यावेळी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात त्यांनी दरभंगा एम्ससारखे अनेक हास्यास्पद दावे केले, ते बोलताना अनेक ठिकाणी अडखळले आणि मी, मी, मी, मी यातच त्यांची टेप अडकली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कसलाही धडा न शिकता त्यांनी लाल किल्ल्यावरून मी पुन्हा येईन, अशी गर्जनाही केली. पंतप्रधान तिथे आत्ममग्नतेचा झेंडा फडकवत होते, तेव्हा अनेकांना बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेल्या या बोचर्या व्यंगचित्राची आठवण झाली असेल. हे व्यंगचित्र १९७३चे, बरोब्बर ५० वर्षांपूर्वीचे, म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अवघ्या २५ वर्षांनंतरची परिस्थिती दाखवणारे. पण, तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झालेल्या झेंडावंदनाला देशाची दुरवस्था दाखवणार्या घटनांची जी पार्श्वभूमी ती जशीच्या तशी स्वातंत्र्याच्या अमृतकाळातही असावी! आधीच्या ६० वर्षांत सगळे नेते, पंतप्रधान अयोग्य आणि वाईटच होते हो, पण मग गेल्या १० वर्षांत अवतारपुरुष विश्वगुरूंनी काय केले!