माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याच्या डोक्यात कधी काय येईल याचा नेम नाही. मुख्यमंत्री शिंदे लवकरच जनतेशी महिन्यातून दोनदा रेडियो आणि दूरचित्रवाणीवरून ‘मन की बात’प्रमाणे ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ म्हणून संवाद साधणार आहेत, ही बातमी वाचल्यापासून पोक्या अस्वस्थ आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मोदींची नक्कल करण्याची पाळी यांच्यावर का यावी? हे लोक जनतेशी संवाद साधण्याच्या नावाखाली स्वत:च्या विचारांची आणि भरताड आश्वासनांची टिमकी वाजवून देशभक्तीचे धडे जनतेला फुकटात देत असतात. स्वत: मात्र या लोकशाही प्रजासत्ताक देशात लोकशाहीची, जनतेच्या न्याय्य हक्कांची गळचेपी करून गद्दारीला प्रोत्साहन देत असतात. पोक्याकडे त्याच्या कॉम्प्युटर इंजीनियर मित्राने साबणाच्या छोट्या बॉक्समध्ये स्वत: तयार केलेला ट्रान्समीटर आहे. पिकअप लावून तो ट्रान्समीटर ऑन केला की पोक्या माईकवर बोलतो ते भाषण किंवा गाणी अथवा त्याचे विचार पन्नास मीटर परिघात स्पष्ट एकू येतात. आजूबाजूच्या परिसरातील लोकांना हे ‘पोक्या स्टेशन’ कसे लावावे याची माहिती आहे. त्याचे प्रक्षेपणाचे टायमिंग दुपारच्या तर कधी रात्रीच्या वेळचे असते.
पोक्याचं नव्याने पहिलं भाषण ‘मी पोक्या सातबंडे बोलतोय’ नुकतेच प्रक्षेपित झाले. त्याच्या भाषणातील काही भाग मी टेप करून घेतला. तोच नमुन्यादाखल तुम्हाला ऐकवत आहे.
एरियातील माझ्या बंधू-भगिनींनो, मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आज तुमच्या सुखदु:खात नेहमीच सहभागी असणार्या पोक्याचे तुम्हाला मनापासून नमस्कार. पंतप्रधान मोदींची कंटाळवाणी ‘मन की बात’ तुम्ही ऐकत असाल. यापुढे मुख्यमंत्र्यांचीही थापेबाजी तुम्हाला ऐकायला मिळेल. हे परके नेते आहेत. मी तुमच्यातलाच आहे. त्यामुळे मी त्यांच्यासारख्या थापा मारणार नाही किंवा नको ती आश्वासनंही देणार नाही. मी तुमच्यातलाच आहे. इथेच जन्मलो, वाढलो. हवे ते आणि नको ते धंदे केले, राडेबाजी केली, गँगवॉर केलं, आपल्या एरियातील पोरीबाळींवर वाईट नजर ठेवणार्या आजूबाजूच्या दादांना बदडून काढलं, पोलीस स्टेशनचा पाहुणचार घेतला, मटक्याची बेटिंग सुरू केली, स्वकष्टाने खूप पैसा कमावला. ‘नगरसेवकांनी केली नसतील इतकी आपल्या परिसराच्या विकासाची कामं नगरसेवक, आमदार, खासदारांकडून फंड मिळवून करवून घेतली. नाईलाजास्तव भाजप नेत्यांचा विश्वास संपादन केला. मी भाजपाचा सदस्य नसलो तरी ते मला हाताशी धरून असतात. त्यांच्या गुप्त बैठकांना मी वेश पालटून हजर असतो. त्यांचे काही निर्णय आणि बेताल वागणे पसंत पडत नसल्यामुळे मी त्यांना वेळोवेळी सुनावतो. पण डोळ्यावर सत्तेची धुंदी असल्यामुळे त्या नेत्यांनी आता सर्वच बाबतीत शहाणपणाची हद्द ओलांडली आहे. त्याचे परिणाम त्यांना पुढील काळात भोगावे लागणार आहेत. त्याची स्पष्ट कल्पनाही मी त्यांच्या धुरंधर नेत्यांना दिली आहे. तरी ते डोळ्यांवर झापडे बांधून बसले आहेत. नोटबंदीपासून मणिपूरमधील अत्याचारांपर्यंत जनतेला जे भोगावं लागलं त्याची त्यांना थोडी तरी शरम वाटेल असं वाटलं होतं. पण ‘निर्लज्जम सदासुखी’ असंच त्यांचं वागणं आहे. देशात सगळीकडे बजबजपुरी माजली आहे, जनता भाववाढीने त्रस्त आहे, स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहेत.
महाराष्ट्रात तर यांनी इतकी मोठी वॉशिंग मशीन आणली आहे की त्यात आपल्या पूर्वीच्या विरोधकांना कोंबून त्यांची पापं, भ्रष्टाचार ते धुवून टाकत आहेत. ईडीपासून त्यांना मुक्ती देत आहेत. ज्या अजितदादांनी विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचे पुरते वाभाडे काढले त्यांनाच त्यांनी उपमुख्यमंत्री बनवले आहे. दुसरे गद्दार अलिबाबा आणि चाळीस चोरांना हरभर्याच्या झाडावर चढवलं आहे. यांच्या भूलथापांना बळी पडू नका. निवडणुकीत तर त्यांना आणि त्यांच्या मित्र टोळक्याला अजिबात निवडून देऊ नका. आपल्या एरियातून माझा मित्र टोक्या आमदारकीला आणि मी पोक्या स्वत: नगरसेवकपदाच्या निवडणुकीला उभे राहणार आहोत. तुमच्या आशीर्वादाने एकदा का निवडून आलो की बघाच तुम्ही!
या एरियाने आम्हाला मोठं केलं त्या एरियातल्या माणसांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी आम्ही अशा काही योजना आखू की सरकारचे डोळेही पांढरे होतील. आम्ही फारसे शिकलो नाही. पण, आज कोणाशीही दोन हात करण्याची आणि त्यांना दोन शब्द सुनावण्याची धमक अंगात आहे. माझा मित्र टोक्या चांगला शिकलेला आहे. तो नेहमीच चांगले काम करण्यासाठी मला प्रोत्साहन देतो. मला पुढे करतो आणि तो माझ्यामागे राहातो. त्याच्या या स्वभावामुळेच तो कुणाचंही मन जिंकू शकतो. त्याचाही मोठा बिझनेस आहे. नि:स्वार्थ वृत्तीमुळे तो अगदी पंतप्रधानांपर्यंत पोहोचला. त्यांच्याकडून त्याच्या जनतेसाठी काही अपेक्षा होत्या. पण त्यांचेही पाय मातीचेच निघाले आणि त्यामुळे तो निराश झाला. मी म्हटलं, टोक्या, तू आणि मी आपण दोघे नवा इतिहास घडवू आणि आपल्या एरियाचं नाव देशात नव्हे तर जगात मोठं करू. टोक्या नुकताच इस्रायलला त्याच्या मित्राकडे जाऊन आला. तिथून हजारो तरुणांना, स्त्रियांना घरबसल्या भरपूर कमाई मिळेल, असं नवं तंत्रज्ञान त्याने आणलं आहे. बेकारी, बेरोजगारी हा या देशाला मिळालेला मोठा शाप आहे आणि त्याचं उ:शापात रुपांतर करण्यासाठी मराठी माणूस उद्योजक कसा बनेल यासाठी त्याने आकर्षक योजना आणल्या आहेत. आपल्या एरियातील लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही अशिक्षित आणि बेरोजगार राहू नये, वाईट मार्गाकडे वळू नये यासाठी त्याच्या नेतृत्वाखाली मी आणि माझे सहकारी काम करणार आहोत.
मित्र-मैत्रिणींनो आणि बंधू भगिनी, भाजपवाल्यांच्या नादाला लागू नका, समाजकार्य करणार्यांच्या पाठिशी उभा राहा. स्वस्त किमतीत अन्नधान्य, भाजी, जीवनावश्यक वस्तू, अगदी स्वस्त किमतीच्या टोमॅटोंसह तुम्हाला आपल्या विभागातील तरुण-तरुणींच्या स्टॉलवर बघायला मिळतील. त्यानंतर रेडिमेड कपडे, साड्या आणि नेहमी लागणार्या वस्तू आणि पदार्थांचेही स्टॉल येत्या पंधरा दिवसांत एरियात पाहायला मिळतील. माझे आपल्या एरियातील सर्वांना आवाहन आहे की, आपण माझ्याकडील फॉर्म माझ्या घरी येऊन माझ्या स्टेनोकडून घेऊन जा आणि त्वरित स्वत:च्या स्टॉलचे मालक बनवा. पालिकेपासून वरपर्यंत ओळख असल्यामुळे प्रत्येकाला स्वत:च्या पायावर उभं करण्याचं व्रत आम्ही अंगिकारलं आहे. त्याला साथ द्या. पुन्हा भेटू. जयहिंद, जय महाराष्ट्र.