मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सहपरिवार पंतप्रधानांच्या दिल्ली निवासस्थानी भेट घेतल्यामुळे महाराष्ट्राचे नव्याने झालेले उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार हवालदिल झाले आहेत. हे समजल्यावर माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या खूप अस्वस्थ झाला आणि तडक अजितदादांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची मुलाखत घेऊन आला. ऐका.
– नमस्कार अजितदादा. अभिनंदन अर्थमंत्री झाल्याबद्दल.
– केल्याबद्दल म्हणा.
– पण खरं तर त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं. जरा आणखी जोर आला असता.
– मला काय धाड भरलीय. सीएम पदापेक्षा हे खातं जास्त महत्त्वाचं आहे आणि शेवटी सीएम काय आपलेच आहेत. निमूटपणे सह्या करतात. शेवटी आपल्याला लोकसेवा करायची आहे.
– हो ना… तुम्ही आमदारांना आणि मंत्र्यांना केलेल्या भरघोस निधीवाटपातूनच दिसलं ते.
– जनतेचेच प्रतिनिधी आहेत ना ते. त्यांना विकासकामासाठी निधी दिला, म्हणजे जनतेलाच दिल्यासारखा आहे तो.
– ते बरोबरच आहे. पूर्वीचे अर्थमंत्री फडणवीसही मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही कामासाठी कितीही कोटीचा, लाखाचा निधी जाहीरपणे घोषित केला तरी त्याला हसत हसत मंजुरी देत. ‘सीएम वाक्यं प्रमाणम’ असा कारभार होता. आता ‘अजितं वाक्यं प्रमाणम’. छान. पैसा धो धो वाहतोय पावसासारखा.
– वाहणारच. कुणालाही नाखूश ठेवणार नाही. मंत्री, आमदार खूश तर जनता खूश.
– तरीही मंत्री, आमदार तुपाशी आणि जनता मात्र उपाशी.
– नाही, नाही. जनतेलाही खूश करणार आम्ही. निवडणुका येऊ द्या.
– तेव्हा तुम्ही तीन तिघाडा एकत्र कुठे असणार आहात? प्रत्येक बिघाडा स्वतंत्रपणे जागा लढणार ना!
– पण त्या आम्ही आपापसात वाटून घेतलेल्या असणार ना.
– पण एकमेकांच्या जागा पाडण्यासाठीच तर खरी चुरस लागणार तुम्हा तिघांच्यात. ‘पळा पळा पुढे कोण पळे तो’ अशी चुरस लागल्यावर दुसरं काय होणार! कशात काही नसलेले ते मुख्यमंत्रीही सर्व जागा जिंकण्याच्या वल्गना करताहेत. पण पालापाचोळा करेल जनता.
– तेच तर मला आणि फडणवीसांना हवं आहे.
– आणि फडणवीस म्हणतात, शिंदे आणि आम्ही अजितदादांच्या नकली राष्ट्रवादीचा कसा काटा काढतो ते बघाच तुम्ही. घराचे वासे फिरले की घड्याळाचे काटे पण फिरतात.
– आता माझंच डोस्कं फिरायचं बाकी आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. शेवटी अजितदादा म्हणतात मला. काकांना घाम फोडला मी. हे तर अगदीच कच्चेबच्चे.
– अशाने भाजपसकट तुम्ही सगळे तिघाडे खड्ड्यात जाल असं वाटतं. लोकांना वीट आलाय तुमच्या सर्वांच्या सत्तालोलूप राजकारणाचा. काकांपुढे लोटांगण घालायला तीनवेळा कशाला गेला होता त्यांच्याकडे?
– ते वेगळं पॉलिटिक्स आहे. काकांचं आणि माझं. तुम्हाला नाही कळणार. आम्ही दोघे एकत्र आलो तर काय करू शकतो, ते पाहालच तुम्ही.
– म्हणजे काका?
– ते फार बोलत नाहीत, पण करून दाखवतात. ते काहीही करू शकतात.
– म्हणजे, भाजपाशीही तात्पुरती हातमिळवणी करू शकतात?
– काय ते समजा तुम्ही.
– पण ते करून तुमचाच काटा काढला तर?
– मी खूप मुरलोय राजकारणात. कोणत्या वेळी सर्वांना अंधारात ठेवून कोणती खेळी खेळायची यात वाकबगार आहे मी.
– पण तिथे ते सीएम तर मोदींना सहकुटुंब भेटून आसन पक्कं करून आलेत. किती कौतुक केलं पीएमनी सीएमचं.
– लक्षात ठेवा, ते ज्यावेळी कौतुक करतात, त्यावेळी त्यांच्या मनात दुसरं काहीतरी शिजत असतं. वर्षापूर्वी त्यांनी फडणवीसांचंही असंच कौतुक केलं होतं शिवसेनेतून गद्दारांना आणल्याबद्दल. तेव्हा फडणवीस सीएमपदाची गाजरं मनातल्या मनात खात होते. पण दिपोटी सीएम व्हायला सांगितल्यावर कसे पडलेल्या चेहर्याने वावरत होते.
– पण आता खुलासा केलाय त्यांनी. मी तेव्हाही नाराज नव्हतो, आताही नाही आणि पुढेही असणार नाही. पक्षाने चपराशाचं काम दिलं तरी मी ते आनंदाने करीन, असंही सांगितलं त्यांनी.
– मग मी पुन्हा येईन, पुन्हा येईन अशा आरोळ्या सारखे का देत होते?
– ते त्यांचं त्यांना माहीत. पण आता आमच्यातले एकमेकांबद्दलचे समज-गैरसमज साफ मिटलेत.
– तरीही मोदींना भेटून तुम्हाला योग्य तो इशारा दिलाय सीएमनी.
– नशिबात असेल तर उद्या ते पदही मिळेल. पण सध्या अर्थखात्यावर मी अत्यंत समाधानी आहे. शेवटी पैसा महत्त्वाचा.
– परंतु जनता नाराज आहे तुमच्यावर. तुमच्यासारखा महत्त्वाकांक्षी मासा जाळ्यात सापडला की त्याला हवी ती पंचपक्वान्नं खायला देणार. धष्टपुष्ट व्हायला देणार आणि स्वार्थ साधून झाला की जमिनीवर सोडून देणार भाजप.
– देऊ देत ना. स्वत:ला सुरक्षित राखण्यासाठी मोदी, शहांची साष्टांग नमस्कार घालून पूजा करायला सांगितली तरी करीन मी. फक्त माझं ‘अजितदादापण’ कायम ठेवून.
– ज्या पवारसाहेबांनी तुम्हाला मोठं केलं, त्यांना एकटं सोडून जाताना अजिबात काहीच वाटलं नाही तुम्हाला?
– मुळीच नाही. ईडीच्या जाळ्यातून, भ्रष्टाचाराच्या आरोपांतून, साखर कारखान्याच्या घोटाळ्यांतून काही पवारसाहेब माझी सुटका करून देणार नव्हते. भाजपाशी जुळवून घेण्याशिवाय मला पर्याय नव्हता. आपलं जीवन आपणच घडवलं पाहिजे हे मला उशिरा कळून चुकलं आणि मी चूक सुधारली.
– पण ही चूक उद्या महागात पडणार नाही ना?
– मुळीच नाही. माझा स्वभाव तापट आाfण तोंड फटकळ आहे, पण तीच माझी खासियत आज मला या पदाला घेऊन गेलीय.
– म्हणजे काल भाजप आणि मंडळी तुमच्या ब्लॅकलिस्टमध्ये होती आणि आज तीच तुमच्या गुडबुकात आहेत. मानलं तुमच्या चालूगिरीला!