टीव्हीवरील भाषण : हमारा देश सबसे महाशक्तिमान देश है. इसका प्रत्यय आपको हर क्षेत्र में आ रहा है. अमेरिका, चीन, रशिया, इंग्लंड, फ्रान्स जैसे सामर्थ्यशाली देशों में हमारी गणना होती है…
(महाराज अनुराग टीव्हीवरील हे प्रेरणादायी भाषण ऐकून हरवून गेले. स्वप्नं पाहा, ती पूर्ण होतात, हे महान फलंदाज सचिन तेंडुलकरचं वाक्य त्यांच्या मनावर कोरलेलं होतंत. तितक्यात प्रधानजींचं आगमन होतं.)
प्रधानजी : महाराज, महाराज, दिल्लीत हाहाकार माजलाय. पावसामुळे सर्वत्र गुडघ्याएवढं पाणी साचलंय.
अनुराग : अरे थांबा, थांबा. थोडा धीर धरा!… छानच की मग. पावसाळी जलतरण स्पर्धा घेऊया सर्वसामान्यांसाठी. खरी गुणवत्ता येथूनच मिळेल…
प्रधानजी : हाहाकार हा एवढाच नाही… ते एक कुस्तीचं घोंगडं भिजतंय…
अनुराग : मातीवरची आणि गादीवरची कुस्ती ऐकलेली. घोंगड्यावरची पण असते का?
प्रधानजी : नाही राजे. कुस्तीपटूंचं बृजभूषणविरोधातलं आंदोलन…
अनुराग : अच्छा ते… ते पक्षश्रेष्ठी हाताळतायत. आपल्याला टेन्शन घ्यायची मुळीच आवश्यकता नाही. बृजभूषण हे मलाही सीनियर आहेत. त्यामुळे हा आता आपल्या अखत्यारीतला प्रश्न नाही. तसंही निवड चाचणीवरून आपापसातच त्यांची जुंपली आहे.
प्रधानजी : राजे हे बाकी बेस्ट झालं.
अनुराग : मी टीव्हीवरचं भाषण ऐकून इन्स्पायर झालोय.
प्रधानजी : एक्स्पायर न व्हावं, यासाठी इन्स्पायर होणं कधीही चांगलं.
अनुराग : नस्ते विनोद करू नकोस. ऐक, माझं एक स्वप्न आहे. देशात ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा व्हाव्यात. पदकतालिकेत देशाचं स्थान अग्रेसर असावं. देश क्रीडाराष्ट्र व्हावं.
प्रधानजी : महाराजांचा विजय असो! हे स्वप्न स्वतंत्र राष्ट्राच्या पंच्याहत्तर वर्षांच्या इतिहासात कोणत्याही क्रीडामंत्र्यानं पाहिलं नाही. सर्वत्र आपला जयजयकार असो! पण कोणत्या राज्यात घेणार ऑलिम्पिक राजे?
अनुराग : अर्थात, गुजरातेत!
(इतक्यात समोरील टीव्हीवर ब्रेक येतो… उघडा डोळे बघा नीट. प्रधानजी महाराजांच्या डोळ्यांकडे पाहतो.)
प्रधानजी : महाराज, एशियाड, कॉमनवेल्थ नव्हे, तर थेट ऑलिम्पिक…?
अनुराग : काय हरकत आहे? तू मराठी माणूस ना? मग तू छोटीच स्वप्नं पाहणार. डेव्हिड जे श्वार्ट्झ यांचं ‘बडी सोच का, बडा जादू’ हे पुस्तक वाच. मोठा विचार करायला शिकशील.
प्रधानजी : महाराज, मराठी माणूस आपला खिसा पाहून स्वप्न पाहतो (दोन्ही हात खिशात घालून रिकामे खिसे बाहेर काढतो). खर्च परवडेल का?
अनुराग : का नाही?
प्रधानजी : गेल्याच आठवड्यातली एक घटना पाहा. व्हिक्टोरिया हे ऑस्ट्रेलियातलं एक मोठ्ठं राज्य. त्याची कीर्ती सर्वदूर पसरलेली. पण २०२६च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा आपल्याला झेपणार नाहीत, हे स्पष्ट करून माघार घेतली.
अनुराग : ती कशासाठी?
प्रधानजी : (जागीच उडी मारून) खिस्सा. म्हटलं ना मी. कॉमनवेल्थचा अपेक्षित खर्च हा आधी १.७ अब्ज डॉलर इतका होता. त्यात आता आणखी पाच अब्ज डॉलर्सची वाढ झाली. हा खर्च परवडणार नसल्याची खात्री पटल्यानं त्यांनी हा निर्णय घेतलाय. प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी क्रीडानगरी उभारावी लागते. त्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतावा लागतो. करोनाची साथ आणि रशिया-युक्रेन युद्ध यांच्यासारख्या अनेक घटनांनी जगातील बहुतांश राष्ट्रांची अर्थव्यवस्था कोलमडलीय.
अनुराग : पण भारताला कमी लेखू नकोस. पहिले तिन्ही क्रिकेटचे विश्वचषक इंग्लंडमध्ये झाल्यानंतर चौथ्या विश्वचषकाचं भारतानं यजमानपद सांभाळलं होतं. हा इतिहास विसरलास का?
प्रधानजी : इतिहास पक्का ठाऊक आहे. पण महाराज, क्रिकेटची तुलना ऑलिम्पिकशी होऊ शकत नाही? क्रिकेटच्या विश्वचषकात १६ देशांच्या पलीकडे अद्याप आकडा गेला नाही. पण ऑलिम्पिकमध्ये २०५ देशांचा सहभाग असतो. तुमच्या क्रिकेटचा तरी ऑलिम्पिकमध्ये कुठे आहे समावेश?
अनुराग : त्सुनामी आणि फुकुशिमाच्या आण्विक आपत्तीला सामोरा गेलेल्या जपाननं टोक्यो येथे ऑलिम्पिक आयोजित करून दाखवलं. मग आपल्याला काय कठीण आहे?
प्रधानजी : कठीण, कठीण, कठीण किती?….
अनुराग : प्रधानजी, आपण इतक्या मोठ्या गंभीर विषयावर चर्चा करतोय आणि तुम्ही गाणी कसली गाताय?
प्रधानजी : माफी असावी महाराज. टोक्यो ऑलिम्पिकविषयी तुम्हाला इत्थंभूत माहिती सांगतो. २०१३मध्ये टोक्यो शहराला ऑलिम्पिकचं यजमानपद बहाल करण्यात आलं, तेव्हा ७ अब्ज, ५० कोटी डॉलर अंदाजित खर्च अपेक्षित होता. हाच खर्च करोनापूर्व कालखंडात १२ अब्ज, ६० कोटी डॉलरपर्यंत वाढला. परंतु खर्चाच्या आकड्यानं नंतर २६ अब्ज डॉलरचा आकडा पार केला. त्यामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसलाय.
अनुराग : अच्छा, इतकं आव्हानात्मक असतं.
प्रधानजी : तुम्हाला इतिहासाचाच दाखला देतो. ऑलिम्पिकनंतर बर्याचशा यजमान देशांची दिवाळखोरी झाल्याचेही इतिहास सांगतो. १९७६च्या माँट्रियल ऑलिम्पिकनंतर दीड अब्ज डॉलरचा तोटा भरून काढण्यासाठी कॅनडाला तीन दशकं वाट पाहावी लागली. २००४च्या ऑलिम्पिकमुळे ग्रीसला १४ अब्ज, ५० कोटी डॉलर तोटा झाला. त्याचे परिणाम आजही त्यांच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येतात. २०००च्या सिडनी ऑलिम्पिकला जवळपास तिप्पट खर्च झाला होता…
अनुराग : पुरे पुरे… खामोश. आपली अर्थव्यवस्था भक्कम आहे. आत्ताच्या आता निर्मलादीदींना मोबाइल लावा.
प्रधानजी : जी सरकार बोला. (मोबाइल अनुराग यांच्याकडे देतो.)
अनुराग : निर्मलादीदी, देशोदेशीच्या क्रीडापटूंना ‘याचि देही, याचि डोळा’ पाहता यावे, म्हणून जगातील सर्वात भव्य-दिव्य क्रीडा स्पर्धेचं म्हणजे ऑलिम्पिकचं आयोजन देशानं करावं, अशी आमची महत्त्वाकांक्षा आहे. तुमचं यावर काय मत आहे.
निर्मलादीदी : (एक सुस्कारा सोडत) थेट ऑलिम्पिक?
(प्रधानजी मनात स्वत:शी पुटपुटतात : इच्छा, आकांक्षा, स्वप्न नव्हे, तर थेट महत्त्वाकांक्षा?)
अनुराग : होय, ऑलिम्पिक स्पर्धा गुजरातेत यशस्वीपणे घेऊ असं आम्हाला वाटतंय.
निर्मलादीदी : कल्पना उत्तम; पण वास्तवात अवतरणे कठीण. (कठीण शब्द येताच महाराज प्रधानजींकडे तिरका कटाक्ष टाकतात.)
अनुराग : दीदी विस्तृतपणे सांगाल का? नेमकी कुठे अडचण येतेय.
निर्मलादीदी : तुम्हाला काही महिन्यांपूर्वी सादर झालेला अर्थसंकल्प ठाऊकाय? केंद्र सरकार आपल्या महसुलाचा, उत्पन्नाचा मोठा हिस्सा हा कर्जावरील व्याजासाठी खर्च करते. केंद्र सरकार, उत्पन्न आणि खर्चातील तफावत दूर करण्यासाठी लवकरच १५.४ लाख कोटींचे कर्ज घेण्याची शक्यता आहे. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण कर्ज १४.२१ लाख कोटींहून अधिक आहे. मग आणखी कर्ज घेऊन एवढ्या मोठ्या स्पर्धेचं शिवधनुष्य आपल्याला पेलेल का?
(आकड्यांची कोटी कोटी उड्डाणे ऐकून अनुराग यांचा चेहरा आता पूर्णपणे उतरला होता, तर प्रधानजी तुरेवाल्या कोंबड्याप्रमाणे ऐटीत उभा होता.)
अनुराग : बरं दीदी. आपने मेरी आँखें खोल दी. (मोबाइल ठेवतो.)
अनुराग : प्रधानजी, मी तर नोएडातली क्रीडांगणं पाहून ऑलिम्पिक स्पर्धेची घोषणा करून बसलोय. आत्ता काय?
प्रधानजी : (स्वत:शीच : अब आया ऊंट पहाड के नीचे) चिंता नसावी. (बिरबलाच्या अविर्भावात)
अनुराग : मला इथे घाम फुटलाय आणि तुम्ही म्हणता चिंता नसावी.
प्रधानजी : महाराज, तुम्ही भाषणात ‘भविष्यात’ हा शब्द आवर्जून वापरलेलात. भविष्यात ऑलिम्पिक भारतात होईल, हाच तो आशावाद. भविष्यकाळ हा अनादि अनंत काळ असतो. म्हणूनच म्हणतो चिंता नसावी.
अनुराग : (चेहर्यावर पुन्हा स्मितहास्य उमटतं) शाब्बास, तुम्ही हुशार महाराजांचे चतुर प्रधानजी आहात.
प्रधानजी : तसंही तुम्ही पुढारी माणसं. आश्वासनं द्यायची असतात. ती पाळायची थोडीच असतात!
(हे वास्तववादी वाक्य म्हटल्यानंतर महाराज पुन्हा गंभीर झाले.)
अनुराग : चला, कामाला लागा. आज आणखी एका उद्घाटनाला जायचंय. तिथेही भाषण करायचंय.