बाळासाहेबांनी रेखाटलेलं हे मुखपृष्ठ आहे आणीबाणीनंतरच्या काळातलं… पंडित नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी जणू वारसा हक्काने पंतप्रधानपद मिळवले आणि त्याचा राजेशाही आनंद उपभोगला, असा अपप्रचार व्हॉट्सअप विद्यापीठांतून करण्यात येतो. या घराण्याच्या नेतृत्त्वाला काँग्रेसमध्ये मान्यता होती आणि लोकही त्यांच्याकडे पाहूनच त्या पक्षाला भरभरून मते देत, याचा हे संदेश पसरवणार्यांना विसर पडतो. शिवाय, नेहरूंनी तरी स्वातंत्र्याच्या नव्या उमेदीचा काळ पाहिला, काही पायाभूत सुविधा आणि संस्थांचा पाया घातला, मुळात भारताची सर्वसमावेशक, एकात्म आणि आधुनिक देश अशी मान्यता प्रस्थापित केली. त्यांच्या पुण्याईला, लोकप्रियतेला चीनच्या आक्रमणाने मोठा हादरा दिला. इंदिरा गांधी यांनी तर पाकिस्तानबरोबर युद्ध, बांगला देशाची निर्मिती, अराजकसदृश परिस्थिती, पंजाबमधील फुटीर चळवळ अशा अनेक उलथापालथी पाहिल्या… त्या एका विदेश दौर्यावरून परत आल्यावर रेखाटलेल्या या व्यंगचित्रात त्या मोकळ्या हवेतून स्वगृही आल्या आहेत, अशी कल्पना केली आहे आणि इथली हवा कितीएक प्रश्नांनी कशी कोंदटलेली, गढुळलेली आहे, हे दाखवलं आहे… इंदिराजींच्या डोळ्यांतले भाव किती बोलके आहेत… त्यांचा हात नाकावर आहे, तोंडावर नाही; देशातले प्रश्न सोडवण्याची त्यांची पद्धत चुकलीही असेल काही वेळा, पण त्यांनी त्याबद्दल कधी ना बोलणं टाळलं ना त्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष करून परदेशांत स्वप्रतिमा बळकट करत फिरण्याचा प्रमाद केला.