सलग दुसर्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचा सहभागाचा मार्ग खंडित झाला आहे. हे तसे नियमानुसारच घडले असले तरी त्याकडे भूतकाळातील यश, वर्तमानातील कामगिरी आणि भविष्यातील आशा या दृष्टिकोनातून पाहावे, ही मागणी जोर धरू लागली तरी ती वास्तवात येणे अवघड आहे.
– – –
भूतकाळातल्या सोनेरी आठवणी गाठीशी आहेत. भविष्यकाळाची साद आशादायी वाटते आहे. पण वर्तमानकाळ हा नियमांच्या कचाट्यात अडकलाय. अशीच काहीशी स्थिती झाली आहे, भारतीय फुटबॉल क्षेत्राची. त्यामुळे सलग दुसर्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत फुटबॉल संघ सहभागी होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. भारतीय फुटबॉल संघाचे आशियाई स्वप्न हुकले का? तर मुळीच नाही. जे त्यांच्या बाबतीत घडले आहे, ते १०० टक्के नियमानुसारच आहे. त्यात अन्याय झाला वगैरे म्हणायला मुळीच थारा नाही. याचप्रमाणे फुटबॉलला नियम डावलून संधी दिली, तर अन्य अनेक खेळ आम्हाला संधी का नाही, असा प्रश्न उपस्थित करतील, हेही तितकेच सत्य.
आधी काय घडले आहे ते पाहू.
चीनमधील हँगझो येथे २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होणार्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉलला अडचणीचा ठरला, तो केंद्रीय क्रीडा खात्याने निश्चित केलेला नियम. आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक क्रीडा प्रकारांत सहभागी होण्यासाठी त्या खेळात आपल्या संघाचे अव्वल आठ क्रमांकांमध्ये स्थान असावे, हीच अट भारतीय फुटबॉल संघाची वाटचाल रोखणारी ठरली. यासंदर्भातील पत्रे क्रीडा खात्याकडून १५ जुलैलाच सर्व संघटनांना पोहोचली होती. पण तरीही नियम तो नियमच. पुरुषांच्या फुटबॉलमध्ये आशियाई क्रमवारीत भारताचे स्थान १७वे. ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या आशियाई फुटबॉल महासंघांच्या (एएफसी) यादीत हे स्थान १८वे. महिलांच्या यादीत भारताचे स्थान १०वे, तर ‘एएफसी’मध्ये ते ११वे. इतक्या दूरवरचे अंतर कोणत्या निकषांत माफ करावे? स्वातंत्र्यानंतरच्या दोन दशकांमधील भारताची आशियाई स्पर्धेतील संस्मरणीय कामगिरी या निकषावर की सहानुभूतीच्या?
स्वातंत्र्यानंतरचा प्रारंभीचा काळ विकासाची स्वप्न दाखवणारा होता. १९५१मध्ये प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेच्या गौरवशाली अध्यायाला प्रारंभ झाला आणि त्या पहिल्या वहिल्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला. तेच पहिले पर्व भारतीय फुटबॉलसाठी महत्त्वाचे ठरले. महान मुख्य प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांनी आक्रमणाचे अस्त्र भारतीय संघाला दिले आणि सुवर्णपदकाचा ऐतिहासिक अध्याय लिहिला गेला. रहीम यांनी १९४८मध्ये राष्ट्रीय संघाच्या मार्गदर्शनाची जबाबदारी सांभाळली. सेलिन मन्ना, साहू मेवालाल आणि अहमद खान यांना त्यांनी कायम ठेवले. यात पानसांतोम वेंकटेश, थुलुखानम षण्मुगम आणि अब्दुल रझाक सालेह यांचा समावेश केला. यापैकी मन्ना यांचा बचाव अभेद्य मानला जायचा. कोणताही प्रतिस्पर्धी संघ भारताविरुद्ध गोल झळकावू शकला नाही, हे या यशाचे वैशिष्ट्य ठरले. उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियावर ३-० असा दणदणीत विजय मिळवल्यानंतर अफगाणिस्तानला तितक्याच फरकाने नामोहरम करण्याचा पराक्रम उपांत्य फेरीत भारताने दाखवला. अंतिम सामन्यात इराणने कडवी झुंज दिली. पण गोलरक्षक बी अँथनीने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे १-० असे यश भारताला मिळवता आले. या तिन्ही सामन्यांत मेवालाल यांनी प्रत्येक एकेक गोल झळकावला होता. दिल्लीच्या नॅशनल स्टेडियमवर घरच्या क्रीडारसिकांच्या साक्षीने भारताने हे जेतेपद उंचावले. त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियममध्ये उपस्थित होते.
पुढील पर्वात म्हणजे १९५४मध्ये बलायदास चॅटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे जेतेपद टिकवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. भारताला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. १९५८च्या टोक्यो आशियाई स्पर्धेत पदकाचे प्रयत्न एका विजयाच्या अंतराने हुकले. टी. शोम यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाने उपांत्य फेरीत कोरियाकडून १-३ आणि कांस्य पदकाच्या लढतीत इंडोनेशियाकडून १-४ अशी हार पत्करली. भारताच्या अभियानात गोलरक्षक पीटर थांगाराज यांचे योगदान महत्त्वाचे होते. त्यामुळेच आशियातील सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
१९६२च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत प्रशिक्षक पदावर पुन्हा रहीम यांची नियुक्ती करण्यात आली आणि पुन्हा भारताची यशोपताका डौलाने फडकू लागली. एकीकडे कर्करोगाशी सामना करणार्या रहीम यांनी एक असामान्य संघ घडवला. त्यांच्या मार्गदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संघ ४-२-४ अशा व्यूहरचनेसह खेळणारा पहिला आशियाई संघ ठरला होता. चुनी गोस्वामी, पी. के. बॅनर्जी आणि तुलशीदास बलराम ही त्रिमूर्ती या यशाची शिल्पकार. भारतीय फुटबॉलमध्ये त्यांना ‘ब्रह्मा, विष्णू आणि महेश’ म्हटले जायचे. चुनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोरियाविरुद्ध सलामीला हार पत्करली. पण थायलंड आणि जपानला हरवण्याची किमया साधली. मग उपांत्य फेरीत दक्षिण व्हिएतनामला हरवल्यानंतर अंतिम फेरीत बॅनर्जी आणि जर्नेल सिंग यांच्या कामगिरीच्या बळावर भारताने कोरियाविरुद्धच्या पराभवाचा २-१ असा वचपा काढला. १९६३मध्ये रहीम यांच्या निधनामुळे भारतीय फुटबॉलचे अतोनात नुकसान झाले. परिणामी १९६६मध्ये भारताची पुन्हा आठव्या क्रमांकावर घसरण झाली.
१९७०च्या बँकॉक एशियाडमध्ये भारताने पुन्हा एकवार जोरदार मुसंडी मारली. शुभाष भौमिक, सुधीर कर्माकर, मोहम्मद हबीब, श्याम थापा आणि कर्णधार सय्यद नईमुद्दीन यांनी भारताच्या कांस्यपदकात मोलाचा वाटा उचलला. यावेळी बॅनर्जी हे संयुक्त प्रशिक्षकाच्या भूमिकेत होते. सत्तरीच्या उत्तरार्धातील ते भारताचे अखेरचे आशियाई पदक. त्यानंतर गेल्या पाच दशकांहून अधिक कालावधीत पदकांचा दुष्काळ भारताला भेडसावतो आहे. १९८२च्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सहाव्या क्रमांकापर्यंत कामगिरी उंचावली, हीच या कालावधीतील सर्वोत्तम मजल म्हणता येईल. भारतीय महिला संघाने दोनदा आशियाई स्पर्धेत भाग घेतला. यापैकी १९९८मध्ये आठवे आणि २०१४मध्ये नववे स्थान मिळवता आले.
ही झाली भूतकाळाची पुंजी. पण क्रीडा खात्याच्या नियमामुळे २०१८मध्येही भारताचा मार्ग रोखला होताच. यावेळी मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनी समाजमाध्यमांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मध्यस्थीसाठी जोगवा मागितला. अगदी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांच्याशी फुटबॉलच्या समावेशासाठी वाद घातला. पण हे प्रयत्न फलदायी ठरलेले नाहीत.
गेल्या काही दिवसांत भारतीय फुटबॉलची कामगिरी उंचावत चालली आहे. लॅबेनॉन आणि कुवेतचा समावेश असलेल्या बंगबंधू ‘सॅफ’ अजिंक्यपद जिंकल्यामुळे ताज्या ‘फिफा’ क्रमवारीत भारताने अव्वल १०० क्रमांकांमध्ये मुसंडी मारली. याशिवाय हिरो आंतरखंडीय चषक स्पर्धेतही भारताची कामगिरी उत्तम होती. पण ती पुरेशी नव्हती.
२००२पासून एशियाड फुटबॉलमध्ये २३ वर्षांखालील युवकांवर लक्ष केंद्रित केले जाते. फक्त तीन २३ वर्षांखालील खेळाडूंना खेळण्याची मुभा दिली जाते. १९१७मध्ये देशात झालेल्या १७ वर्षांखालील वयोगटाच्या ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारेच बहुतांश खेळाडू आता खेळू शकले असते. यात कर्णधार सुनील छेत्री, गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधी आणि बचावपटू संदेश झिंगम या अनुभवी खेळाडूंची भर पडू शकली असती. या चमूला ७ ते १० सप्टेंबर या कालावधीत थायलंडमध्ये होणार्या किंग्ज चषक स्पर्धेतही आजमावण्याची संधी होती.
फुटबॉलला एशियाड समावेशाच्या असलेल्या अंधुकशा आशांना न्याय मिळाला, तरी मार्ग इतका सोपा नाही. कारण खेळाडूंना या स्पर्धेत सहभागासाठी भारतीय फुटबॉल महासंघाला ‘आयएसएल’ आणि आय-लीगच्या क्लबची मनधरणी करावी लागेल. तूर्तास, सत्य स्वीकारून भविष्यकाळाच्या दृष्टीने कामगिरी आणखी उंचावणे, हेच एक आपल्या हाती आहे.