शिवसेनेचे राज्यप्रमुख व संपर्कप्रमुखांचे देशव्यापी संमेलन २००१ साली दादरच्या वीर सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आले होते. देशातील विविध राज्यांतील शिवसेनेच्या प्रतिनिधींसमोर देशातील व काश्मीर समस्यांवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी सुमारे पाऊण तास रोखठोक व ज्वलंत विचार मांडले. ‘‘काश्मीर हे आमचेच आहे आणि आमचेच राहणार, हिंदुस्थानची फाळणी यापुढे कदापि होऊ देणार नाही,’’ असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
तडाखेबंद भाषणात शिवसेनाप्रमुखांनी पाक घुसखोरांवर कडाडून हल्ला चढविला. दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्ताचा हवाला देऊन शिवसेनाप्रमुख म्हणाले की, ‘‘आज काश्मीरमधील एक हजार कश्मिरी मुसलमान मुंबईत आले आहेत. उद्या पाच हजार येणार आहेत. पण येणार्या घुसखोर मुसलमानांची वाट बघू नका, तर आलेल्या घुसखोरांना आधी हाकलून लावा.’’ आपल्याच देशात आता आपणांस आश्रित बनून रहायची वेळ आली आहे. अशी खंत व्यक्त करीत शिवसेनाप्रमुख म्हणाले, ‘‘हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतरच्या ५० वर्षांत आमच्या काश्मीरचा एक इंच तुकडाही आम्ही घेऊ शकलो नाही.’’
इंडियन एअरलाइन्सच्या तेव्हा नुकत्याच घडलेल्या विमान अपहरणाच्या घटनेवर बोलतांना शिवसेनाप्रमुख थोडे गंभीर झाले. ते म्हणाले की, अतिरेक्यांना पकडून चार-चार, पाच-पाच वर्षे जिवंत ठेवण्याची काय गरज आहे? अतिरेक्यांचा एवढा पाहुणचार कशाला? तेव्हाच त्यांचा बंदोबस्त केला असता तर विमान अपहरणासारखे प्रकार कधीच घडले नसते. आता केंद्रात कॅबिनेटच्या बैठका होतात. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीरपणे चर्चा केली जाते. पण मी अटलबिहारी वाजपेयींना सांगितले की जो कोणी अतिरेकी किंवा घुसखोर हिंदुस्थानात येईल त्याचे सरळ एन्काऊंटर करा!
मुस्लिमांच्या इफ्तार पार्ट्यांबद्दल शिवसेनाप्रमुखांनी परखडपणे सांगितले की, आपले लोक त्यांच्या इफ्तार पार्ट्यांना जातात, इफ्तारचे जेवण जेवतात, परंतु जेवतांना त्यांच्या ‘टोप्या’ घालण्याची काय गरज आहे. हवे असेल तर टोपी भरून खा, पण टोप्या कसल्या घालता? ते लोक आमचे भगवे फेटे त्यांच्या डोक्यावर तुम्हाला कधी बांधू देतील काय? हा सर्व आपलाच मूर्खपणा आहे.
काश्मीरात ‘मार्शल लॉ’ पुकारा, हिंदूंच्या हत्या रोखा अन्यथा आम्ही उट्टे काढू! हिंदुस्थानात हिंदू मार खाणार असेल तर हा देश गहाण टाका. देशात आणीबाणी आणा. निदान फारूख अब्दुल्लांचे जम्मू-काश्मीरमधील सरकार तरी बरखास्त करून तेथे ‘मार्शल लॉ’ पुकारा असे ठणकावून सांगतानाच ‘यापुढे काश्मीरात हिंदू असेच मारले जाणार असतील तर आम्हालाही त्याच उट्टं काढावंच लागेल,’ असा निर्वाणीचा इशारा शिवसेनाप्रमुखांनी दिला.
जनरल मुशर्रफ यांची भारतभेट
दरम्यान, काश्मीर प्रकरणी चर्चा करण्यासाठी हिंदुस्थानचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले. ते निमंत्रण देताना त्यांनी जाहीर केले की मुशर्रफ यांना दिलेले निमंत्रण हा आमचा दुबळेपणा नसून ते आमच्या जबरदस्त आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. या निमंत्रणाचा स्वीकार करताना मुशर्रफ यांनी सांगितले की, ‘‘हिंदुस्थान भेटीचे निमंत्रण हे धाडसी व धोरणीपणाचे असून मी खुल्या मनाने हिंदुस्थानात जाणार आहे.’’ पण त्याचवेळी जम्मू-काश्मीरमध्ये चाललेल्या घातपाती कारवाया थांबविण्यासाठी पाकमधील अतिरेकी संघटनांना आवाहन करावयाला मुशर्रफ यांनी स्पष्ट नकार दिला.
शिवसेनाप्रमुखांना मात्र या भेटीतून काहीही निष्पन्न होणार नाही असे वाटले. मुशर्रफ आपली भूमिका सोडणार नाहीत याची बाळासाहेबांना खात्री होती. एका भरगच्च पत्रकार परिषदेत बाळासाहेब म्हणाले, ‘‘मुशर्रफ यांच्याशी चर्चा म्हणजे औरंगजेबापुढे शांतीपाठ वाचल्यासारखेच आहे.’’ त्यांनी अशी ही मागणी केली की, पाकव्याप्त काश्मीरवरसुद्धा चर्चा झाली पाहिजे. बाळासाहेबांनी आठवण करून दिली की, नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना हिंदुस्थानचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी लाहोरला बस घेऊन शांततेचा संदेश घेऊन गेले होते. पण त्यावेळी लष्करप्रमुख असलेले परवेझ मुशर्रफ यांनी वाजपेयींना सलामी देण्यास नकार दिला होता.
राष्ट्रपती भवनाच्या आवारात परवेझ मुशर्रफ यांचे औपचारिक स्वागत होत असताना, अध्यक्ष मुशर्रफ, हवाईदल प्रमुख अनिल टिपणीस यांच्यासमोर आले आणि टिपणीस यांनी त्यांच्यापुढे हस्तांदोलनासाठी हात केला. त्यांनी मुशर्रफ यांना सॅल्यूट केला नाही. टिपणीस यांनी दाखविलेला हा मराठी बाणा सर्वांना सुखावून गेला. त्यांच्या स्वाभिमानी बाण्याचे सर्वत्र स्वागत झाले. १५ जुलै २००१ रोजी आग्रा येथे शिखर परिषद झाली. ती यशस्वी झाल्याचा दावा देशाच्या परराष्ट्र खात्याने केला. पण हे बाळासाहेबांना पटले नाही. बाळासाहेबांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्टपणे सांगितले, शिखर परिषद निष्फळ आहे. कारण सीमेवरील गोळीबार, पाक दशतवाद्यांची घुसखोरी आणि आयएसआयच्या भारतविरोधी कारवाया त्वरित थांबायला हव्यात. अन्यथा जनरल मुशर्रफ यांचे निमंत्रण स्वीकारून जर वाजपेयी पाकिस्तानला गेले तर ती गोष्ट त्यांच्या विरोधात जाईल.
कारगिल युद्ध छेडून अनेक भारतीय जवान व निष्पाप नागरिकांचे बळी गेले. त्याला जनरल मुशर्रफच जबाबदार होते. त्यामुळे मुशर्रफ यांची ‘नहरवाली हवेली’ येथील भेट शिवसैनिकांना आवडली नाही. दिल्लीतील शिवसैनिकांनी ज्या ठिकाणी मुशर्रफ गेले ती जागा गंगाजलाने पवित्र केली.
काश्मीर प्रश्नावर बाळासाहेब नेहमीच आग्रही भूमिका मांडत राहिले. काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर ते संवेदनशील होते. काश्मिरी पंडितांचे काश्मीरमध्ये पुर्नवसन करा अशी सतत मागणी ते करीत होते. काश्मिरी मुला-मुलींचा महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास अडथळा येऊ लागला. तेव्हा काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळांने सर्व समस्या बाळासाहेबांजवळ मांडल्या. नेमके त्यावेळेस महाराष्ट्रात शिवसेनेचे शिवशाही सरकार होते. त्यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना बोलावून घेतले आणि महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर आदि कॉलेजमध्ये तसेच इंजिनियरिंग व मेडिकल कॉलेजमध्ये काही जागा काश्मिरी पंडितांच्या मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्यास सांगितले. त्यावेळी देशातील कुठल्याही राज्याने असा निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे आजही काश्मिरी पंडितांचे नेते, पत्रकार व साहित्यिक म्हणतात की बाळासाहेबांमुळे आमची मुले उच्च शिक्षण घेऊ शकली. बाळासाहेबांच्या मदतीचा ते उल्लेख कृतज्ञतापूर्वक करतात.
काश्मीरमधील ३७० कलम रद्द केले आहे. राज्य विधानसभा बरखास्त केली आहे. लडाख स्वतंत्र राज्य केले आहे, तरी दहशतवाद्यांचा उच्छाद कमी झाला नाही. काश्मीर पोलीस, हिंदू यांच्यावर हल्ले होतच आहेत. पाकचा संपूर्ण पाडाव हाच काश्मीर समस्येवरचा एकमेव उपाय आहे, हे शिवसेनाप्रमुखांनी ३५ वर्षांपूर्वीच सांगितले. पण राज्यकर्त्यांनी ते ऐकले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी २०२१ साली काश्मिरी पंडितांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्यांच्यावर होणार्या हल्ल्याचा निषेध केला होता. महाराष्ट्रात काश्मिरी मुलांना रोजगार मिळावा, स्वयंरोजगार मिळावा, त्यांना उद्योग-व्यवसायासाठी ‘महाराष्ट्र राज्य सहाय्य करेल, काश्मिरी पंडितांच्या कुटुंबांना संरक्षण शिवसेना देईल,’ असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत पान्नास हजार काश्मिरी हिंदूंनी काश्मीर खोर्यातून पलायन केले आहे. पण काश्मिरी पंडितांच्या पुर्नवसनाबाबत कुणीही गंभीर नाही. शिवसेनाप्रमुखांनी नेहमीच काश्मीरातील हिंदूंची बाजू घेतली आहे. जेव्हा जेव्हा शक्य झाले तेव्हा तेव्हा मदतीचा हात दिला आहे, संरक्षण दिले आहे. काश्मीर आमचेच आहे हे शिवसेनेने कृतीने दाखवून दिले. म्हणूनच काश्मीर पंडितांना इतर कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा शिवसेनेचा आधार मोलाचा वाटतो.