महाराष्ट्रात राजकीय पक्ष कितीही असले तरी राज्याचा कानाकोपरा ओळखतो असे खरेखुरे लोकनेते राज्यात नजिकच्या काळात तरी दोनच आहेत… एक हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात साठ वर्षांत ज्यांच्या छातीवर वार करून त्यांना कोणी पराजित करू शकले नाही, शरद पवार यांच्या पाठीत, पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केलेल्या सख्ख्या पुतण्याने खंजीर खुपसला. इतकेच नव्हे, तर आजवरचे त्यांचे उपकार विसरून जाहीरपणे त्यांचे वाभाडेही या कृतघ्न पुतण्याने काढले… शरद पवार व प्रतिभा पवार हे वृद्ध दांपत्य या भ्याड हल्ल्यानंतर भावनाविवश आणि व्यथित झालेले दिसले. या दांपत्याने आजवर शेकडो राजकीय चढउतार पाहिले आहेत. त्यामुळेच त्यांचे डोळे राजकीय कलहामुळे नक्कीच पाणावले नसणार. बंधू अकाली निधन पावल्यानंतर या दाम्पत्याने त्यांच्या मुलावर, या पुतण्यावर पुत्रवत् प्रेम केले. त्याला नुसता राजकारणात नव्हे, तर आयुष्यात उभा केला. त्याला जे जे शक्य होतं ते सगळं दिलं. त्याच पुतण्याने जाहीरपणे आम्ही तुमच्या पोटी जन्मलो नाही, यात आमचा काय दोष, असे उन्मत्तपणे विचारणे त्या वयोवृद्ध दांपत्याला नक्कीच क्लेष देऊन गेले असेल.
महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी आणि आघाडीशी प्रतारणा करून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा मिंधे गट यांच्या खोकेबहाद्दर ईडी सरकारसोबत जायचा निर्णय घेतला, हा त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. तो क्षम्य आहे. असेही ते याआधीही गुडघ्याला बाशिंग बांधून तिकडे जाऊन आलेच होते. तेव्हापासून त्यांचा स्वत:चाही स्वत:वर विश्वास राहिला नसेल. अर्थात त्यांनी कोणत्याही कारणाने बंड करणे एकवेळ क्षम्य आहे, पण जाहीर भाषणात आपल्या वडिलांच्या जागी असलेल्या शरद पवारांना ‘तुम्ही घरी बसा’ हे सांगण्याचा अजित पवार यांना ना वयाचा अधिकार आहे, ना कर्तबगारीचा- पुतण्याच्या नात्याचा जो अधिकार असेल, तो तर त्यांनी स्वेच्छेनेच गमावला आहे.
मुळात शरद पवार आणि अजित पवार यांची बरोबरी आहे का? वयाच्या ३७व्या वर्षी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषविणारे सिनियर पवार हे अंगभूत गुण, माणसं जोडण्याची क्षमता, राजकीय डावपेच या सगळ्यांच्या संयोगातून, कर्तबगारीतून पुढे आलेले आहेत. अजित पवार हे मात्र कायम काकांच्या आधारानेच पुढे येत गेले, हे तेही नाकारू शकत नाहीत. त्यांना जे मिळालं ते त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळलं असेल, आपली काही छबी, छाप, प्रभाव निर्माण केला असेल, त्यात त्यांची कर्तबगारी आहेच. पण, ते पवारांचे पुतणे नसते, तर आज जिथे आहेत तिथे नसते आणि इतकी वर्षं जिथे जिथे होते, तिथेही असले नसते… पवारांच्या पोटी जन्माला आले नाही, म्हणून पवारांनी त्यांना काही द्यायचे ठेवले आहे, अशातला भाग नाही. एखाद्या सर्वसामान्य घरातल्या कर्तबगार नेत्याच्या तोंडी जी शोभेल ती रडकी आणि चिडकी भाषा दादांच्या तोंडी शोभत नाही.
वयाच्या ८३व्या वयात देखील शरद पवार संपूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत, याचे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला कौतुक आहे. हे आयुष्य काही आरामदायी नाही, त्यात कमालीचे संघर्ष आहेत. व्यक्तिगत पातळीवर दुर्धर आजारापासून ते राजकारणात अनेकदा शून्यापर्यंत ढकलले जाण्यापर्यंतच्या संकटांना पुरून उरलेले पवार हे आयुष्यात जगायचे कशाला अशी निराश असलेल्या प्रत्येकाला जगण्याची प्रेरणा देतात. तुम्ही किती काळ काम करणार आहात, या विचारणेत पुतण्याची माया असती, तर समजू शकलं असतं. पण, अजितदादांना काकांचे या वयातही आपल्यापेक्षा सर्व बाबतीत सरस असणे अडचणीचे वाटते. अजितदादांच्या अंगात एवढे पाणी होतेच तर त्यांनी काकांच्या सावलीतून बाहेर पडून स्वत:चा वेगळा पक्ष उभा केला असता. आदरणीय काकांचा चेहरा न वापरता, मूळ पक्षावर दावा सांगण्याचा हुच्चपणा न करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांच्याप्रमाणे स्वत:च्या हिंमतीवर नवी मांडणी केली असती. पक्षाची इस्टेट आता माझ्या नावावर करून द्यायला हवी होती, असले बालहट्ट धरून काकांचा वार्धक्यात छळ मांडला नसता. अजित दादा एक राजकारणी म्हणून तर फसले आहेतच, पण एक पुतण्या म्हणून देखील नक्कीच चुकले आहेत.
दिल्लीपतीने अजितदादांना उपमुख्यमंत्रीपदाचे व त्यांच्यासोबत इतर आठ जणांना मंत्रीपदाचे बक्षीस दिले तसेच त्यांना विविध घोटाळ्यातील जाचक चौकशीतून, कारवाईतून अभय दिले. ते भाजप आणि मिंधे गटासोबत गेले आहेत ते फक्त यासाठी. एखाद्याने ताकदीबाहेर काही खाल्ले असेल आणि ते पचवायचे असेल तर पक्ष नव्हे पाचक काढाच बनलेल्या भाजपसोबत खुशाल जावे, उगीच ओढून ताणून फार तात्त्विक, नैतिक कारणे सांगून स्वतःचे हसे कशाला करून घ्यायचे? जनता काय खांद्यावर डोक्याएवजी टरबूज घेऊन फिरते आहे, असे वाटते की काय या आयाराम गयाराम छाप नेत्यांना?
शरद पवारांना एकीकडे स्वतःचे दैवत म्हणायचे, मग त्या देवाला रिटायर करायची भाषा देखील वापरायची. काय तर म्हणे, त्या दैवताचे आता वय झाले तर त्यांनी आता फक्त आशीर्वाद द्यावा. उकिरडे फुंकायला आशीर्वाद कशाला लागतो? आजवर सर्वात जास्त आशीर्वाद तुम्हालाच मिळाले, त्यांच्या आधारे तुम्ही नक्की कशाचे सिंचन केले ते महाराष्ट्र जाणतो. कमळ खुडायला जाऊन स्वतःला चिखलात घालून घेण्याची हौस तुमची, त्यात त्यांचा आशीर्वाद कशाला हवा आणि कसा असेल?
शरद पवारांनी वाढवलेली काही उसाची कांडे भाजपने स्वतःच्या रसवंतीगृहासाठी घेतली आहेत. रस निघाला की चिपाड फेकले जाईल आणि त्यावर फक्त माशा घोंघावतील. भाजपाच्या राजवटीत स्वर्ग अवतरल्याने आणि विश्वगुरूंच्या तेजःपुंज कार्याने दिपून गेल्याने म्हणे यानी कोलांटीउडी मारली. मग ईतके प्रभावित झाले असाल तर सदेह स्वतःला विश्वगुरूंच्या पक्षात विलीन करा. काकांच्या पक्षावर अधिकार सांगणारे तुम्ही कोण? आज जे भाजपाची हवा आहे म्हणत आहेत त्यांनी बाजारात जाऊन पाव किलो टोमॅटो विकत घेतले तर त्यांना जमिनीखालचे देखील दिसू लागेल. भाजपाशासित मणिपूर, मध्य प्रदेश इथे काय घडतंय त्याकडे मीडियाने कितीही डोळेझाक केली तरी समाजमाध्यमांवर त्या बातम्या येतातच. त्यांनी जगात जी अब्रू जायची ती जातेच. भाजपचे सरकार असलेल्या मध्य प्रदेशात एका टुकार भाजप नेत्याने (ही द्विरुक्ती झाली) एका आदिवासी व्यक्तीवर लघवी केली. ती बातमी दाबायचा प्रयत्न झाला पण त्या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर जो संताप देशभरातून व्यक्त झाला, त्याच्या परिणामस्वरूप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना त्या आदिवासीचे पाय धुवून ते पाणी प्राशन करावे लागले. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने आणि त्यांच्या गोठ्यात जाऊन दावे बांधून घेतलेल्या भ्याड गद्दारांनी आज संविधानात्मक, बहुपक्षीय, सकस लोकशाहीवर जी लघुशंका करून ठेवली आहे, त्याचे प्रायश्चित्त कसे घेणार? छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार यांच्या महाराष्ट्राला गायपट्ट्यातील बिमारू राज्यांच्या पंक्तीला नेऊन बसवणे महाराष्ट्राने का सहन करायचे? भाजपची आता महाराष्ट्रात प्रायश्चित्ताने मुक्तता होणार नाही, तर त्यांच्यासाठी आता दक्षिण भारताने ठोठावलेली राजकीय हद्दपारीची शिक्षाच योग्य आहे. जनतेने आगामी निवडणुकीत हेच ठरवलेले आहे, याची पुरेपूर कल्पना भाजपला आहे. त्यामुळेच सध्याच्या घडामोडी होत आहेत.
हातात वेळ कमी आणि भाजपसाठी महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या असुरक्षित याने दिल्लीची झोप उडाली आहे. भाजपकडे आज जी खासदार संख्या महाराष्ट्रातून आहे (२३) त्यात एकाने देखील घट परवडणारी नाही, दहा ते बाराची भरच हवी आहे. त्यात मिंध्याचा उपयोग होत नाही. पंतप्रधान मोदी हे आज देखील काही मतदारांवर प्रभाव टाकू शकत असले तरी त्यांच्या एकट्याच्या नावावर निवडणूक जिंकणे यानंतर अशक्य आहे हे भाजप आता पुरता ओळखून आहे. २०२४ला मतदारांनी मोदींना नाकारले तर राष्ट्रीय राजकारणात भाजप दहा ते वीस वर्ष मागे जाईल हे देखील भाजप ओळखून आहे. त्या भयानेच भाजप एका मांडीवर मिंधे आणि दुसर्या मांडीवर एकेकाळचे भ्रष्टवादी घेऊन अनैतिक मार्गाने सत्तेत बसला आहे.
अक्कलगहाण मोदीभक्तांना वाटते की विश्वगुरूंचे झगमगाटी रोड शो झाले की २०२४ला महाराष्ट्रातील भाजपचे सर्व खासदार निवडून येतील. कर्नाटकात काय झालं? पुढची निवडणुक इतकी सोपी असती तर भाजपला आज अजितदादा व इतरांना सत्तेची खिरापत वाटून, पायघड्या घालून सोबत घ्यावे लागले नसते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा प्रचाराचा झंझावात सुरू झाल्यावर भाजपने इथून तिथून गोळा केलेला पाचोळा उडून जाईल, याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे.
भाजप आणि मिंधे गटाने मिळून बेकायदा सरकार बनवले, पण त्या सरकारवर जनता अजिबात समाधानी नाही. सतत अपात्रतेची टांगती तलवार मिंध्यांना अस्वस्थ करत आहे, त्यात अजितदादा आत आल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू झाला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस काढल्याने अपात्रतेवर निकाल कधीही येऊ शकतो. मिंधे गटाचा धोंडा आधीच गळ्यात असताना अजितदादाही आल्याने भाजपमध्ये देखील फार मोठा अंतर्गत असंतोष आहे. भाजपमध्ये जाण्याएवजी फुटीरांकडे गेलो असतो तर मंत्री तरी झालो असतो, ही भावना मनात ठेवून भाजपवासी आमदार दिवस ढकलत आहेत.
भाजपने खरेतर २०१९ साली शिवसेनेला मांडलिक न समजता सन्मानाने मुख्यमंत्रीपद दिले असते, तर या भिका मागत फिरायची वेळ भाजपवर आलीच नसती. पण शरद पवार आणि काँग्रेस यांच्याबरोबर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन केली, अचानक स्वीकारावे लागलेले मुख्यमंत्रीपद उत्तम प्रकारे सांभाळले, तेव्हाच भाजपच्या पायाखालची वाळू सरकली होती. मविआ सरकारने कार्यकाल पूर्ण केला, तर महाराष्ट्रात पन्नासचा आकडा गाठणं कठीण होईल, हे लक्षात घेऊन आणि पवार-ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी सुडाचे क्रूर राजकारण केले गेले. ईडीभीतांची मांदियाळी गोळा केली गेली. ज्यांना लोक मावळे समजले, ते दिल्लीच्या सल्तनतीचे पाय चाटणारे गुलाम बनून बसले. या पक्षाचे आज तीनेकशे खासदार आहेत, पण एकालाही स्वत:चा आवाज नाही, इमान नाही, सगळे मोदी-शहांचे रोबोट. चावीचे बाहुले. राज्यातले एकशे पाच आमदारही त्याच माळेतले मुखदुर्बळ हतवीर्य नमुने. एखाद्या थैलीबाजाने अनोळखी रमणीच्या देहावरून लोचट, पापी नजर फिरवावी तशी आज परक्या सत्तांधांची नजर या रूपवान, समृद्ध महाराष्ट्रावरून फिरते आहे, हे महाराष्ट्रप्रेमी जनतेने ओळखले आहे. त्यामुळेच, महाराष्ट्रात बुडत्या भाजपने मिंध्यांच्या आणि अजितदादांच्या काडीचा आधार घेतला तरी जलसमाधी हेच विधीलिखित आहे.