महाराष्ट्रातल्या विद्यमान सरकारचे शिल्पकार (म्हणजे वडील-शिल्पकारपळव्या टोळीचे अध्यक्ष) आणि (तरीही) उपमुख्यमंत्री(च राहिलेले) देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी तीन पक्षांनी एकत्र येऊन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला तीन चाकी रिक्षा म्हणायचे. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ नेत्यांना सरकारमध्ये सामील करून घेतल्यानंतर यांना आता काय म्हणायचं, असा खवचट प्रश्न अनेकांनी विचारला होता. त्यावर असंही उत्तर आलं होतं की रिक्षाची तिन्ही चाकं समान असली, तर रिक्षा चालते, इथे तर यांनी रिक्षाला ट्रॅक्टरचं चाक आणून लावलेलं आहे, ही रिक्षा जागची हलली तरी पुष्कळ. या सरकारचं बिनचूक शब्दांत वर्णन काय करायचं, हा प्रश्न शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कायमचा सोडवून टाकला आहे. विदर्भाच्या झंझावाती दौर्यात त्यांनी ‘दोन फुल, एक हाफ’ अशा चार शब्दांत या सरकारचं फुल माप काढून टाकलेलं आहे.
दोन फुल, एक हाफ ही इराण्याच्या किंवा उडप्याच्या हॉटेलातली ऑर्डरची भाषा. दोन फुल चहा किंवा कॉफी आण आणि एक हाफ (कटिंग) आण हा त्याचा अर्थ. लोकसत्तेच्या रविवार पुरवणीत तंबी दुराई या लेखकाने अनेक वर्षे लिहिलेल्या खुसखुशीत आणि मार्मिक सदराचे शीर्षक म्हणून ‘एक फुल, दोन हाफ’ ही ऑर्डर मराठीत लोकप्रिय होतीच; आता उद्धव ठाकरे यांनी ती उलटी करून अजरामर करून टाकली आहे. इथून पुढे राज्य सरकारच्या जाहिरातीत किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या फोटोत एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा एकत्र फोटो पाहिला, उल्लेख वाचला की सगळ्या मराठीजनांच्या मनात हीच ओळ उमटेल, दोन फुल, एक हाफ!
इथली आणखी एक वेगळी गंमत आहे. पदानुसार पाहाल, तर ‘एक फुल (मुख्यमंत्री), दोन हाफ (उपमुख्यमंत्री)’ अशी रचना व्हायला हवी होती. पण अनुभव, ज्येष्ठता, राज्यभरातली ओळख आणि राज्यकारभारावरची पकड यांचा विचार करता, जे तांत्रिकदृष्ट्या हाफ आहेत, तेच खरे फुल आहेत आणि ज्यांच्याकडे फुल असलेलं पद आहे, त्यांची एकंदर उंची हाफ आहे. ठाण्याच्या एका छोट्याशा भागापुढे ना त्यांना ओळख, ना स्वीकारार्हता. ना ओजस्वी वक्तृत्त्व, ना लिहून दिलेलं प्रभावीपणे वाचण्याची क्षमता. जत्रेत हरवलेल्या लहान मुलासारखे भाव चेहर्यावर ठेवून ते सार्वजनिक जीवनात वावरतात. गेले वर्षभर नाट्य कलावंतांचा कार्यक्रम असो की नळकोंडाळ्याचं उद्घाटन असो की हळदी कुंकू समारंभ असो- प्रारंभीच्या दोन वाक्यांनंतर अमुक महिन्यांपूर्वी राज्यात आपण काय जोरदार भूकंप घडवला, यावर गाडी वळायची आणि नंतर घसरत घसरत जायची.
त्या तथाकथित भूकंपानंतर वर्षभराने आणखी एक भूकंप आपल्याच खुर्चीखाली होणार आहे, याची या नावापुरत्या मुख्यमंत्र्यांना कल्पनाच नव्हती. तो घडून आला आणि अलीबाबांबरोबर गेलेले चाळीस चोरांची टोळी बिथरली. माझ्याबरोबर या, मी तुम्हाला सत्तेचे पाणी आणि महाशक्तीची मलई चाखवतो, म्हणून या गद्दारांना सोबत घेतलं होतं. सुरत, गुवाहाटी, झाडी, डोंगार यांच्या पंचतारांकित सहलीपलीकडे अनेकांच्या हाताला काही लागले नाही, बहुतेक विश्वासघातकी बच्चूंचे तोंड कडू झाले. आता वर्षभरानंतर (अपात्रतेचा निर्णय होण्याच्या काही दिवस आधीपुरते का होईना) मंत्रीपद हाताशी आले, असं वाटत असताना हा बाँब फुटला आणि मिंध्यांना बोंब मारण्याची पण सोय उरली नाही. यांच्यामुळे आम्ही बाहेर पडलो, असं नाकाचा शेंबूड पुसत, रडक्या चेहर्याने रडणार्या शाळकरी पोरासारखे करवादत होते, आता त्यांनाच सोबत घेऊन आम्ही त्रिशूळ-त्रिशूळ म्हणून कौतुकं सांगण्याची वेळ आली आहे.
हे फार थोर बेरजेचं राजकारण आहे, अशी स्वघोषित चाणक्यांची समजूत आहे आणि सोशल मीडियावर निबंध प्रसावणारे सत्ताधारी पक्षाचे ट्रोलही मास्टरस्ट्रोक म्हणून भलामण करत आहेत. पण, मुळात शिंदे गटाबरोबर आकडेवारीत स्थिर सरकार असताना अजितदादांना फोडण्याची गरज काय होती? बाहेर पडण्याची गरज अजितदादांना होती तर आल्याबरोबर त्यांना मंत्रिपदं बहाल का केली गेली? या सगळ्यामध्ये जे पहिल्यापासून भारतीय जनता पक्षात आहेत आणि ज्यांनी गेल्या निवडणुकीतच सुखाने झोप लागावी म्हणून या पक्षात उडी मारली, त्यांच्या कुचंबणेचं काय? भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी इतर पक्षांमधल्या घराणेशाहीवर कितीही तोंडसुख घेतलं तरी त्यांच्या पक्षासह सर्वच पक्षांमध्ये नेते आणि त्यांची मुलंबाळंच सत्ता उपभोगतात, आणि कार्यकर्ते कायम सतरंजीउचलेच राहतात, हे उघड गुपित आहे. पण, या पक्षातल्या १०५ हुतात्म्यांचं दुर्भाग्य असं की राज्यातला सर्वात मोठा पक्ष, छोट्या चाणक्यांचा पक्ष आणि देशातल्या एकमेव महाशक्तीचा पक्ष असूनही या नेत्यांना आयारामांच्या सतरंज्या उचलत बसण्याची वेळ आलेली आहे. आजच्या या त्यागातून लवकरच देशात आणि नंतर राज्यात शतप्रतिशत भाजपचं स्वप्न पूर्ण होणार आहे, यावर विश्वास ठेवणार्यांचे मेंदू प्रयोगशाळेत तपासावे लागतील.
या पक्षाने इमानदारीत सकारात्मक विरोधी पक्षाची भूमिका खणखणीतपणे बजावली असती, तर जनतेलाही या पक्षावर विश्वास ठेवावासा वाटला असता. आता महत्त्वाकांक्षेच्या विस्ताराच्या प्रमाणात पक्षाचा संकोच करून घेण्याची वेळ आली आहे. राज्यात आपला आवाका एवढाच आहे, याची जणू कबुलीच भाजपने देऊन टाकली आहे. भविष्यात निवडणुका येतील तेव्हा जागावाटपाच्या वेळी दोन फुल एकमेकांना हाफ आणि एका हाफला क्वार्टर बनवण्यासाठी जंग जंग पछाडतील, तेव्हा किती मौज येईल! त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीत जनता हाफचं शून्य करून टाकणार आहे आणि सध्याच्या दोन फुलना आपण दोन फूल (इददत्) बनलो आहोत, हेही कळणार आहेच!