गेल्या काही वर्षांत कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे अंतिम सामने किंवा यजमानपद हे गुजरातच मिळाले आहे. त्यामुळे जशी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असा लौकिक गेली अनेक दशके मिरवते, तसाच गुजरात देशाची क्रीडा राजधानी म्हणून जागतिक क्रीडा नकाशावर झळकवण्याचा प्रयत्न दिसतो आहे. गुजरातमध्ये वातावरणनिर्मिती केली जात आहे. त्यातून क्रीडा संस्कृती घडेल का? हा प्रश्न ऐरणीवर आहे.
– – –
भारतात होणार्या ५० षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा इंग्लंड-न्यूझीलंड उद्घाटनीय सामना, भारत-पाकिस्तान महामुकाबला, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामना, दक्षिण आफ्रिका -अफगाणिस्तान सामना आणि अंतिम सामना कुठे होणार आहे, हे एव्हाना जगजाहीर झाले आहे… अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर! तसे ते अपेक्षितच होते. गेल्या काही वर्षांत कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे अंतिम सामने किंवा यजमानपद हे गुजरातच मिळाले आहे. त्यामुळे जशी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असा लौकिक गेली अनेक दशके मिरवते आहे, तसाच गुजरात राज्य देशाची क्रीडा राजधानी म्हणून जागतिक क्रीडा नकाशावर दिसावे, असा ठळक प्रयत्न दिसतो आहे.
अगदी ताजे उदाहरण म्हणजे इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) पावसामुळे तिसर्या दिवसापर्यंत लांबलेला गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील महाअंतिम सामना. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. आठशे कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या स्टेडियमचे फेब्रुवारी २०२०मध्ये नूतनीकरण पूर्ण झाले. २४ फेब्रुवारी २०२०ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रमही याच स्टेडियमवर आयोजित करण्यात आला. एक लाख, ३२ हजार प्रेक्षकक्षमतेच्या, जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमची चर्चा साता समुद्रापार झाली. २४ फेब्रुवारी २०२१ला सुरू झालेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील देशातील पहिल्यावहिल्या प्रकाशझोतातील म्हणजेच गुलाबी कसोटी सामन्याचा मानही याच स्टेडियमला मिळाला. याच दिवशी नरेंद्र मोदी स्टेडियम असे त्याचे नामकरण करण्यात आले. त्याचे आधीचे नाव होते सरदार पटेल गुजरात स्टेडियम. परंतु मोटेरा हीच त्याची ओळख होती. टीका होऊ नये म्हणून एकंदर क्रीडा परिसराला सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल असे नाव देण्यात आले. पण गेल्या काही वर्षांत या स्टेडियमचे वैभव स्पष्टपणे जाणवते. याच वर्षी नव्हे, तर गतवर्षीच्या ‘आयपीएल’चा अंतिम सामनासुद्धा गुजरातला झाला होता. त्यावेळी १,०१,५६६ प्रेक्षक हजर राहिले होते. त्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये प्रेक्षकसंख्येचा विश्वविक्रमही नोंदला गेला. त्यावेळी राजस्थान रॉयल्सला हरवून गुजरातचा सुपुत्र हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात जेतेपद मिळवून दिले होते. गुजरातच्या क्रिकेटमधील भौगोलिक क्षेत्रफळात सौराष्ट्र आणि बडोदा हेसुद्धा समाविष्ट होतात. चेतेश्वर पुजारा, पार्थिव पटेल, रवींद्र जाडेजा, इरफान आणि युसूफ पठाण बंधू, हार्दिक आणि कृणाल पंड्या बंधू, जसप्रित बुमरा आणि अक्षर पटेल हे या भागांमधील प्रथितयश क्रिकेटपटू. आता ही राज्येही रणजी करंडक, मुश्ताक अली अशा क्रिकेट स्पर्धांमध्ये अस्तित्व दाखवू लागली आहेत.
पण गुजरातचा क्रीडात्मक विकास फक्त क्रिकेटपुरताच मर्यादित राहिलेला नाही. गतवर्षीच्या उत्तरार्धात पुनरुज्जीवित झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांनाही मुहूर्त मिळाला तो गुजरातचाच. २०१९ची प्रो कबड्डी लीग असो किंवा २०१६मध्ये झालेली पुरुषांची विश्वचषक कबड्डी स्पर्धा झाली ती दी इका एरिना बाय ट्रान्सस्टेडियावर. तसा गेल्या काही वर्षांत गुजरात फॉर्च्युन जायंट्सचा संघही प्रो कबड्डीत नावारूपास आला आहे. बॅडमिंटनपटू अमित घिया, टेबल टेनिसपटू हरमीत देसाई, टेनिसपटू अंकिता रैना आणि जलरणपटू माना पटेल हे काही क्रिकेटेत्तर क्रीडापटू चर्चेत आहे. पण १९६०च्या रोम ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणारे गोविंदराव सावंत यांच्यानंतर राज्यातून एकही ऑलिम्पिकपटू घडलेला नाही, ही वस्तुस्थिती.
एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करताना गुजरातचे महत्त्व उत्तमपणे जपले गेले. इंग्लंड-न्यूझीलंड उद्घाटनीय सामना असो किंवा अंतिम सामना यांचे यजमानपदच नव्हे, तर बहुप्रतिष्ठेच्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या आयोजनासाठी अहमदाबादची निवड झाली. अॅशेसची रंगत आणणारे ऑस्ट्रेलिया-इंग्लंडसुद्धा याच मैदानावर झुंजतील, तर वेगवान क्रिकेटमध्ये लक्ष वेधणारे अफगाणी आप्रिâकेचा सामना करतील. गुजरातची अस्मिता आणि ती जपता यावी म्हणून धडपडणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिवपद भूषवणारे जय शाह यांच्यासाठी अनुकूल असे घडले. ही अनुकूलता जगमोहन दालमिया यांच्यामुळे कोलकाताच्या ईडन गार्डन्सला आणि शरद पवार यांच्यामुळे वानखेडे स्टेडियमलाही लाभल्याचे दाखले मिळतात. इतकेच कशाला? शशांक मनोहर ‘बीसीसीआय’ आणि ‘आयसीसी’च्या गादीवरून दूर झाल्यावर नागपूरचे महत्त्व आपसुकच कमी झाले, हे आकडेवारीनेही सिद्ध करता येऊ शकते.
दी इका एरिना बाय ट्रान्सस्टेडिया हे जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल आहे, याविषयी कुणाचेच दुमत होणार नाही.
ऑलिम्पिक दर्जाच्या क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्याची क्षमता या ट्रान्सस्टेडियामध्ये आहे. एकंदरच राज्याचा विचार केल्यास गुजरातमध्ये क्रीडात्मक पायाभूत सुविधांची निर्मिती उत्तमपणे होते आहे आणि यजमानपदेही मुबलक मिळाली. पण त्यातून निष्पत्ती काय झाली? गुजरातचा क्रीडा विकास व्हावा, या हेतूने विविध राज्यांतील अनेक नामांकित क्रीडापटू तिथे मार्गदर्शन करीत आहेत. पण वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेता या राज्यातून घडला का? अगदी २०१६च्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा गुजरातचा खेळाडू नंतर कोणत्याच व्यासपीठावर दिसला नाही. गतवर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमान गुजरातचे स्थान १२वे होते.
गतवर्षी खेलो इंडिया योजनेंतर्गत निधी जाहीर झाला, त्यात भाजपाचे राज्य असलेल्या गुजरातला ६०८ कोटी आणि उत्तर प्रदेशला ५०३ कोटी रुपये देण्यात आले. पण बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे यजमानपद भूषवणार्या तमिळनाडूच्या वाट्याला फक्त ३३ कोटी आले, तर आकाराने मोठ्या महाराष्ट्राला फक्त ११० कोटी देण्यात आले. यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेत गुजरातचे स्थान होते १५वे, तर महाराष्ट्राचे पहिले. आकड्यातील तफावत ही अशी दिसते.
एकंदरीतच गुजरातमध्ये क्रीडा अनुकूल वातावरण निर्मिती केली जात आहे. पण, त्यातून क्रीडा संस्कृती घडेल का? हा प्रश्न ऐरणीवर आहे. अन्यथा, गुजरात क्रीडासोहळ्यांची राजधानी होईल. पण, क्रीडापटू घडण्याची मात्र वानवा असेल!
भाजपाचा क्रीडात्मक विकास!
भाजपाचा क्रीडात्मक विस्तारही गेल्या काही वर्षांत प्रकर्षाने जाणवतो. ‘आयओए’च्या अध्यक्षपदासाठी पी. टी. उषाचे नाव इतक्या सहजपणे आलेले नाही. ६ जुलै २०२२ या दिवशी उषाला सत्ताधारी भाजपाकडून राज्यसभेची खासदारकी बहाल करण्यात आली. त्याचवेळी या ‘उषा’कालाची प्रचिती अपेक्षित होती. काही महिन्यांपूर्वी भाजपने पश्चिम बंगालमधील नेते आणि माजी गोलरक्षक कल्याण चौबे यांना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्षपद सुपूर्द केले. त्यावेळी अध्यक्षपदाच्या लढतीत चौबे यांनी भारताचा माजी तारांकित फुटबॉलपटू बायच्युंग भुतियाला नामोहरम केले. अगदी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतही भाजपचे पाठबळ दिसून आले आहे. अमोल काळे यांनी विश्वविजेत्या भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना धूळ चारली.