मंदिराच्या दारात हजारो वर्षांपासूनच्या परंपरेतून चालत आलेला उत्सव व्हायचा. लाखोंनी लोक लोटायचे. तीन दिवस जत्रा भरलेली असायची. सगळ्यात मोठा सोहळा असायचा खलिताप्रदानाचा. साक्षात परमेश्वराने हा खलिता पहिल्या धर्मपीठाधीशांच्या हाती सोपवला होता, अशी श्रद्धा होती. तो हिरेजडित, रत्नमंडित खलिता दरवर्षी ठरल्या दिवशी जुने पीठाधीश नव्या पीठाधीशाच्या हाती सोपवायचे.
साक्षात देवाचं आज्ञापत्रच नव्या पीठाधीशाकडे सोपवलं जातंय, असा त्याचा अर्थ असायचा.
हजारो वर्षं हा सोहळा चालला होता. तो धर्माचा प्रमुख सोहळा बनला होता. आठदहा दिवसांचा जल्लोष त्याच्या आगेमागे साजरा होऊ लागला होता. पण, आजवर कोणी खलिता उघडून पाहिला नव्हता. विद्यमान पीठाधीशांना मात्र ती उत्सुकता होती. त्यांनी माजी पीठाधीशांच्या संमतीने तो उघडण्याचा निर्णय घेतला. सोहळ्यात जुन्या पीठाधीशांनी खलिता सोपवला, विद्यमान पीठाधीशांनी तो स्वीकारला आणि परंपरेप्रमाणे तो पवित्र पेटीत परत न ठेवता हलक्या हातांनी उघडला. त्याच्या जीर्णशीर्ण होत चाललेल्या कागदावर जुन्या लिपीतले काही शब्द आणि आकडे होते. भिंग मागवण्यात आलं. दोन्ही पीठाधीशांनी खलिता वाचला आणि कपाळावर हात मारून ते आसनस्थ झाले…
पहिल्या धर्मपीठाधीशांनी कारकीर्दीच्या अखेरच्या वर्षी साजऱ्या केलेल्या उत्सवात झालेल्या खर्चाचं ते बिल होतं… त्यांनी त्यांच्यानंतरच्या पीठाधीशांना ते सोपवलं होतं, आता हे तुम्ही भरा म्हणून… त्यांना तो प्रतीकात्मक सोहळा वाटला, त्यांनी ती परंपरा पुढे चालवली, बिल कोणीच भरलं नाही आणि ते मागच्याने पुढच्याला देण्याचाच मोठा सोहळा होऊन बसला!!!