□ महाराष्ट्रद्वेष्ट्या उपर्या दलालाच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेवर छापे.
■ न्यायालय दरवेळी दोनपाच रट्टे हाणतं, तरी निलाजरा दिल्लीत सोय लागण्याच्या आशेने रोज मातोश्रीकडे तोंड करून भुंकत असतो!
□ भाजपविरोधात एकीची वज्रमूठ; पाटण्यात महत्त्वाची बैठक.
■ एकीची बेकी होऊ न देण्याचं पथ्य पाळलं तर भाजपची खोकी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही.
□ निष्पक्षपाती तपास करा; हायकोर्टाचे एसीपींना आदेश.
■ असा आदेश देण्याची वेळ येते, यातच शोभा झाली.
□ अकोला, अमरावती, कोल्हापूरच्या दंगली भाजपने घडवल्या- काँग्रेसचा आरोप.
■ निवडणुका जिंकण्यासाठी आता आगी लावण्याशिवाय दुसरा काहीही मार्ग राहिलेला नाही त्यांच्याकडे.
□ वेदांता घालवलात, आता मायक्रॉन प्रकल्प तरी महाराष्ट्रात आणा- नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.
■ त्यांना पावर नाय! दिल्लीश्वर सांगतील त्यावर हे डोकं हलवणार आणि तेच कसं महाराष्ट्राच्या हिताचं आहे, हे रेटून सांगणार.
□ अंगणवाडी सेविकांना मोबाईल हॅण्डसेट देण्यास टाळाटाळ; हायकोर्टाने राज्य सरकारला झापले.
■ अंगणवाडीच्या माध्यमातून गरीबांची मुलं शिकून पुढे येतील, आपला न्याय्य अधिकार मागतील, याची भीती असलेल्या जुनाट विचारधारेला शरण गेले आहेत ते.
□ मंत्री संदीपान भुमरेंची तरुणाला जिवे मारण्याची धमकी; मिंधे माजले.
■ ये पब्लिक है, ये सब जानती है और वक्त आने पे हिसाब भी करती है…
□ वांद्र्यात मिंधेंच्या शाखेला अभय, शिवसेनेच्या शाखेवर कारवाई.
■ बनावट शाखा उभ्या करून, भाड्याची गर्दी जमा करून निष्ठा विकत घेता येत नाही, गद्दारीचा कलंक पुसता येत नाही.
□ एक कोटी रोकडा मोजा… मुख्य गुणवत्ता नियंत्रक व्हा! – कृषी विभागात बदल्यांचा बाजार.
■ नंतर आयुष्यात संधी मिळणार नाही, म्हणून आताच ओरपून घेतायत!
□ कल्याणमध्ये प्रल्हाद शिंदेंच्या स्मारकाची दुर्दशा; लाद्या उखडल्या, भिंतींना तडे.
■ प्रल्हाद शिंदे म्हणून गेले आहेत, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर! हे दुर्लक्ष करणार्यांना त्याचे फळ मिळेलच.
□ मुख्यमंत्र्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत – राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा सल्ला.
■ नका काहीतरी सांगू… ते वेडे व्हायचे हो!
□ चिंधी सरकारचे घोटाळे बाहेर काढत राहणार – आदित्य ठाकरे.
■ मग पिसाटून ते व्यक्तिगत पातळीवर हल्ला चढवत राहणार. जनतेच्या मनातून आणखी उतरत जाणार.
□ बीआरएसकडून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर.
■ अजून मुलाच्या बारशाच्या घुगर्या वाटून झाल्या नाहीत तोच त्याच्या लग्नाच्या अक्षता वाटण्याची घाई कशाला करतायत केसीआर? थांबा, चांगलं काम करा, जम बसवा, नाराज नेत्यांची कमतरता नाही.
□ निधीअभावी गिरगावचे ‘मराठी नाट्यविश्व’ रखडले; मिंधे सरकारचा नाकर्तेपणा.
■ ‘नाटकां’च्या बाबतीत आपणच सरस आहोत, असा त्यांना अभिमान असेल, तर तो रास्तच आहे की!
□ गणेशोत्सवातील रेल्वेगाड्यांचे बुकिंग फुल्ल होण्यात दलालांचा हात.
■ असे होणार, याची कल्पना रेल्वेला नव्हती? नंतर कसल्या बातम्या देता, आधी हे रोखायला हवं होतं…
□ मेट्रो ट्रेनमध्ये मराठी भाषेची गळचेपी.
■ मराठी माणसांची एकजूट भंग पावली अशी गैरसमजूत झाली आहे काही परप्रांतीयांची. ती दूर करण्याची जबाबदारी मराठी माणसांवरच आहे!
□ पालघर, रायगडमधील हजारो विद्यार्थ्यांना अजून पाठ्यपुस्तके मिळालीच नाहीत.
■ आता मिळतील तेव्हा सुकी आहेत का ते बघून घ्या… भिजली असतील वाटेत!
□ ठाण्यात मिंधे गटाच्या कुणाला संरक्षण दिले? – माहिती देण्यास पोलिसांचा नकार.
■ सामान्य माणसाला संरक्षण देण्यास नकार, कुणाला दिलं त्याची माहिती देण्यास नकार… अजब ईडी सरकार!
□ हिंमत असेल तर ठाणे पालिकेतील घोटाळ्यांची चौकशी करा, पीएम केअर फंडाचा हिशोब द्या.
■ आता कानदुखी परत सुरू झाली असणार, काही ऐकायला जात नसणार!
□ पुतीनविरोधात त्यांनीच मोठे केलेल्या खासगी लष्कराचे बंड, मॉस्को सोडून पलायन.
■ स्वत:ला देशाचे भाग्यविधाते वगैरे समजायला लागणार्यांचे हेच होते!