हिंदू धर्मशास्त्रांनुसार, ब्रह्मदेवाने प्रबोधिनी एकादशीचे महत्त्व आणि त्या दिवशी करण्याची पूजा विधी नारदाला सांगितली. ब्रह्मदेवाने नारदाला कार्तिक महिन्यातील या एकादशीचे व्रत करायलाही सांगितले होते. यंदा ही प्रबोधिनी एकादशी २५ नोव्हेंबर २०२० रोजी म्हणजे बुधवारी साजरी केली जाणार आहे. या दिवसाचे महत्त्व आणि त्या दिवशी केल्या जाणार्या पुजेविषयी जाणून घेऊया…
हिंदू धर्मात प्रबोधिनी एकादशीचे महत्त्व अगाध आहेच. म्हटले जाते की, प्रबोधिनी एकादशीच्या व्रताची कथा ऐकली किंवा वाचली तर १०० गायी दान दिल्याचे पुण्य मिळते. या दिवशी सूर्योदय होण्यापूर्वी उठून नित्य कर्मे, स्नान आदी आटोपून घ्यायला हवे. सूर्योदयापूर्वीच प्रबोधिनी एकादशीच्या व्रताचा संकल्प घेऊन देवाची पूजा करून सूर्योदय होताच भगवान सूर्यदेवाला अर्ध्य द्यायला हवे.
प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी स्नान करण्यासाठी नदी किंवा विहिरीवर जाणे अती उत्तम ठरते असे हिंदू धर्मशास्त्रात म्हटले आहे. या दिवशी उपवास करणेही चांगले मानले गेले आहे.
दुसर्या दिवशी प्रबोधिनीची पूजा केल्यानंतर हे व्रत पूर्ण झाले असे मानले जाते. त्यानंतरच भोजन ग्रहण करता येते.
प्रबोधिनी एकादशीला देशात अनेक ठिकाणी देवोथ्थन एकादशी असेही म्हणतात. अनेक लोक प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने जागरण करत हसत खेळत आणि भजन करत वेळ व्यतीत करतात. या दिवशी बेलपत्र, शमी पत्र आणि तुलशीपत्र अर्पण करण्याला जास्त महत्त्व आहे.
प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या लग्नालाही खूप महत्त्व दिले गेले आहे. याच दिवसानंतर लग्नकार्याचे शुभ मुहूर्त सुरू होतात. अनेक भाविक या दिवशी ऊसाच्या दांड्यांनी झोपडी बनवून पूजा करतात. या सीझनमध्ये जेवढी फळे येतात त्या सर्वांचीही पूजा करून ती फळे प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी अर्पण केली जातात.