या सदरासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची अप्रतिम मुखपृष्ठचित्रे निवडताना त्यांचे द्रष्टेपण पाहून थक्क व्हायला होते, त्याचप्रमाणे कधी कधी खंतावायलाही होते. बाळासाहेबांनी ही व्यंगचित्रे काढली तेव्हा देश स्वतंत्र होऊन फार काळ लोटला नव्हता. अविकसित देशांच्या पंक्तीतच आपण होतो. नवी नवी घडी बसत होती, विस्कटत होती. त्या काळात भारतमातेच्या गळ्याभोवती फास आवळला जातो आहे, हे चित्र अनेकदा चित्रित झाले असेल. पण आज देशात जगातले सर्वात लोकप्रिय नेते सत्तेवर आहेत (अशी त्यांच्या भक्तगणांची समजूत आहे), देश वेगाने ट्रिलियन डॉलरची महासत्ता वगैरे होण्याच्या दिशेने निघाला आहे (असे गोदी मीडिया बोंबलून सांगतो आहे २४ तास), युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध थांबवणारे (प्रत्यक्षात युद्ध थांबलेलं नाहीच) विश्वगुरू आपल्याला लाभलेले असताना ईशान्य भारतात मणिपूर पेटलेले आहे… त्या बाबतीत मौन की बात चालू आहे… बाळासाहेबांनी ४३ वर्षांपूर्वी हे मुखपृष्ठ रेखाटले तेव्हा पूर्वनियोजित दंगली होत होत्या… आता केंद्र सरकारच्या अपयशाकडे लोकांचे लक्ष जाणार हे लक्षात आले की तेच घडवून आणले जात आहे… या बाबतीत तरी आपण द्रष्टे असायला नको होते, असेच बाळासाहेबांच्या आत्म्याला वाटत असणार!