नरेंद्र मोदी
नऊ वर्षे कशी गेली
माझे मलाच कळले नाही
एकेक राज्य गळत गेले
आसन माझे ढळले नाही
नऊ वर्षांत किती माराव्या
थापा त्यांची गणती नाही
विझत चालली ज्योत तरीही
विझणारी ही पणती नाही
आता मात्र भीती वाटते
निवडणुकांत काय होईल?
सत्तेच्याच लोण्याबरोबर
तेल आणि तूपही जाईल?
—– —– —–
अमित शहा
जिकडे तिकडे मोदीभक्त
आपली कामे करतात चोख
मतदारांना मुर्ख समजून
गाठतात लोणकढ्यांचे टोक
मोदी-गुणगान करताना तर
चालते त्यांची बुद्धी कमाल
खोटे बोला, ठासून बोला
मंत्र जपून करती धमाल
बुद्धीभेद किती करावा
याची त्यांना नाही सीमा
मोदींसाठी जनतेचा ते
करू पाहती अगदी मामा
—– —– —–
कुस्तीपटू महिला
ब्रिजभूषण की राष्ट्रदूषण
भाजपाने पाळला साप
दंश केला कितीजणींना
अत्याचारांचा ठरला बाप
अट्टल गुंड असताना तर
खासदारकीचा चढला माज
भाजपाच्या पंखाखाली
झाकून गेली सगळी लाज
भाजपाला पुढे करून
निष्पापाचे आणले सोंग
अस्मान दाखवू भुजंगाला
उघडे पाडू सगळे ढोंग
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
लोका सांगतो ब्रह्मज्ञान
कोण म्हणतो बोलबच्चन
पदासाठी नाही हावरा
सीएम पदी नाही लोचन
विचारार्थ केला त्याग
तरीही खुणवी सीएम सीट
गृहमंत्री असलो तरीही
कारभार नाही चालत नीट
मुंबईतच किती हत्या
महिला सुरक्षेला धोका
कळूनसुद्धा वळत नाही
कधी होईल यातून सुटका
—– —– —–
केदार दिघे
धर्मवीरांचे नाव घेऊन
शिंदे भाजतात आपली पोळी
धर्मवीरांच्या विचारांची
केली त्यांनी पुरती होळी
अकरा महिने आहे सुरू
स्वार्थासाठी राजकारण
धर्मवीरांना मान्यच नव्हते
फितुरी आणि गद्दारीपण
सरकत चालली पायाखालची
वाळू त्यांच्या बदकर्माची
शेवट येतोय जवळ त्यांचा
मिळतील फळे कुसंगतीची