माझे एका मुलीवर प्रेम आहे, पण तिच्या वडिलांना आमचे प्रेम अजिबात मंजूर नाही. मी काय करू?
– रोहन बारटक्के, पंढरपूर
दुसर्या मुलीचे वडील शोधा…
माझ्याकडे एक रुपयाचे खोटे नाणे आहे. ते मी बाजारात कसे चालवू?
– संदेश तुलालवार, ठाणे
खिशात ठेवा आणि तुम्हाला हवं तसं चाला… आपोआप नाणं सुद्धा चालेल. (नाहीतर थोडे दिवस वाट पाहा… उरलेल्या नोटा बंद झाल्या की नाण्याची वेळ येणार आहे… तेव्हा खोटी नाणी रिझर्व बँकेत पण चालतील).
तुमच्या मते लग्न करणं शहाणपणा आहे की वेडेपणा?
– रोशन अब्बास, वसई
आगाऊपणा… लोक नको नको म्हणताना जो ‘शानपणा’ करून लग्न करण्याचा ‘वेडे’पणा करतात ना, तो आगाऊपणाच असतो…
बायकोसमोर डोकं झुकवून उभे राहण्याची वेळ तुमच्यावर कधी येते का?
– पांडुरंग दिवेकर, रोहा
रात्री… ती माझ्या डोक्याला तेल लावते तेव्हा.
गौतमी पाटीलने राजकारणात प्रवेश केला तर ती कोणत्या पक्षात गेलेली आपल्याला दिसेल? भाजपमध्ये की शिंदे गटाच्या पक्षात?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
तिने स्वतःचा पक्ष काढावा… सगळ्याच पक्षातील साहेबांच्या इशार्यावर नाचणारे नाचे, साहेबाची री ओढणारे झिलकरी, साहेबांचं तुणतुणं वाजवणारे, सतरंज्या घालणारे तिच्या पक्षात येतील…
‘शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड’ असे म्हणणे हा शाकाहारी माणसांवर अन्यायच नाही का?
– रमेश शिवदास देवकर, हडपसर, पुणे
फोडणीचा भात बिर्याणीसारखा मानून खाणारे शाकाहारी मांसाहारी माणसाला न्याय देतात का??
मी तुमच्या नाटकांची, अभिनयाची, हजरजबाबीपणाची चाहती आहे. मला तुम्हाला भेटायचंय, पण तुमच्या बायकोची भीती वाटते, आपली भेट कशी होईल?
– शिल्पा माळी, डोंगरगाव
आणि मला तुमच्या नवर्याच्या ताकदीची भीती वाटते… मरू देत ते आपला भेटणं!!
पतीच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस कोणता असतो?
– अमित म्हात्रे, भायंदर
नवरा फोन घरी विसरून जातो आणि बायको फोन करून पासवर्ड विचारते, तो दिवस नवर्यासाठी वाईट असतो… म्हणूनच एकही दिवस फोन विसरून जात नसणार तुम्हीसुद्धा… बरोबर ना?
भिकारी आणि नेता यांच्यात फरक काय?
– शशिकांत शिऊरकर, नाशिक
भिकारी पैसे मागतो… नेता मत मागतो… तुम्हाला यात साम्य वाटलं तरी माझ्या मते हा एवढाच फरक आहे…
तुमच्या देहांतानंतर तुम्हाला कळलं की तुमची बायको आधीपासून स्वर्गात आहे, तर तुम्ही कुठे जाल?
– आनंद खैरनार, मुलुंड
तुमची बायको तेव्हा कुठे असेल ते सांगा… म्हणजे मी तिकडे जाणार नाही.. बाकी कुठेही जाईन.. तुम्ही टेन्शन घेऊ नका.
तुमची बायको आणि प्रेयसी या दोघी एखाद्या नाल्यात पडल्या तर तुम्ही काय कराल?
– अप्पा राणे, पालघर
मी जपून नाला ओलांडेन…
म्हैस दूध का देते?
– अनया गंधे, कोल्हापूर
रेडा देत नाही म्हणून!
माझी गर्लफ्रेंड काही दिवसांपूर्वी पळून गेली होती, आता ती परत आली आहे, मी काय करू?
– विवेक कांबळे, ठाणे
काय करू, असं विचारणारा प्रियकर मिळाल्यावर प्रेयसी पळूनच जाणार.. तिला सांगा, काय करू हे मी अजून दुसर्यांना विचारतो म्हणून…यावेळी ती कायमची जाईल… डोन्ट वरी!
तुम्हाला वाटेत राखी सावंत भेटली तर तुम्ही काय कराल?
– चेतन बोकेफोडे, चांदा
म्हणजे नंतर तुम्ही पुरावा म्हणून व्हिडीओ मागायला मोकळे.