सकाळचे दहा वाजले होते… समीर लगबगीने ऑफिसात दाखल झाला. आपल्या केबिनमध्ये बॅग टाकत तो लगेच मीटिंग रूममध्ये दाखल झाला. एव्हाना मीटिंग सुरु झाली होती.. दार नॉक करत ‘मे आय कम इन सर’ असे विचारून समीर आत गेला. कंपनीच्या नव्या प्रोजेक्टबद्दलची ती मीटिंग होती. समीरचा बॉस उमेश कोल्हटकर प्रेझेंटेशन करत होता. आपले नवे प्रोजेक्ट कोणते आहेत, आपल्यापैकी कोण यातल्या कोणत्या ठिकाणी काम करणार आहे, यांची माहिती उमेश सगळ्यांना देत होता. तासाभराने मीटिंग संपायला आली तेव्हा उमेशने एक अनाऊन्समेंट केली. तो हसत हसत म्हणाला, आपला कलीग समीर हा वर्षभरासाठी आपल्या कंपनीतर्फे अमेरिकेत जाऊन काम करणार आहे. ही सुखद धक्का देणारी बातमी ऐकून समीरही आश्चर्यचकित झाला. त्याच्या फील्डमध्ये किंवा खरंतर कोणत्याही फील्डमध्ये विदेशात जाऊन काम करण्याची संधी फारच महत्त्वाची, प्रतिष्ठेची आणि आर्थिक लाभाची असते. त्यात अमेरिकेत जाण्याची संधी म्हणजे सोन्याहून पिवळे. समीरचा आनंद चेहर्यावर झळकत होता.
मीटिंग संपल्यावर बाकीचे आपापल्या वर्क स्टेशनला निघून गेले. उमेश आणि समीर मात्र समीरच्या अमेरिकावारीचे नियोजन करण्यासाठी त्याच रूममध्ये बसले होते. समीरच्या अगोदर उमेश पण अमेरिकेला जाणार होता. त्यामुळे तिथले नियोजन काय असणार, कामाची जबाबदारी कशी राहणार अशा अनेक विषयावर त्यांची सविस्तर चर्चा झाली.
दुसर्या दिवशीच उमेश अमेरिकेला जायला निघणार होता. त्यामुळे ऑफिसमधल्या काही कामांची जबाबदारी त्याने समीरकडे दिली. उमेश निघाला असेल त्या सुमाराला समीरला व्हॉट्सअपवर उमेशचा मेसेज आला. अमेरिकेला पोहोचल्यावर दोन दिवस मी मीटिंग आणि कामामध्ये राहणार आहे, त्यामुळे तू मला फोन करू नकोस, मी तुला व्हॉट्सअपवर ज्या सूचना देईन, त्यांचे पालन कर. बॉसचा आदेश समीरने वाचला आणि त्यानुसार काम करण्याचे ठरवले.
दुसर्या दिवशी समीरच्या मोबाईलवर पुन्हा एक मेसेज आला, मी अत्यंत महत्वाच्या एका बैठकीत आहे, त्यामुळे मला कोणाचे फोन घेता येत नाहीत. एक महत्वाचे काम आहे. मला अमेरिकेतील आपल्या कामाच्या माणसांना अमेझॉनची गिफ्ट कार्ड द्यायची आहेत. प्रत्येकी १० हजार रुपये किमतीची अशी ३४ कार्ड द्यायची आहेत. तू ती तातडीने खरेदी कर आणि माझ्या व्हॉट्सअपवर पाठव. समीरला हे गिफ्ट कार्ड कसे खरेदी करायचे हे माहित नव्हते, म्हणून त्याने मित्राच्या मदतीने काही कार्ड बँक अकाऊंटच्या माध्यमातून तर काही क्रेडिट कार्डवरून कार्ड खरेदी करून बॉसला पाठवली. त्यानंतर पुन्हा दोन तासांनी एक मेसेज आला, मला अजून ५० कार्ड हवी आहेत, ती तात्काळ पाठवा. आपले प्रमोशन बॉसच्या हातात आहे, त्यामुळे कोठे आढेवेढे न घेता समीरने ती कार्ड पाठवण्याचे ठरवले. आपण ही कार्ड पाठवली नाहीत तर बॉसची नाराजी ओढवून घेऊ, हे समीरला परवडणारे नव्हते. त्यामुळे त्याने इकडून तिकडून पैसे जमा करून पाच लाख रुपयांची कार्ड बॉसला पाठवून दिली.
दुसर्या दिवशी पुन्हा सकाळी आपल्याला अजून काही कार्ड हवी असल्याचा मेसेज समीरला आला. तो पाहून समीर वैतागला आणि बॉसला ‘सॉरी आपण तुम्हाला काही मदत करू शकत नाही, कारण माझ्याकडचे पैसे संपले आहेत, असा मेसेज केला. त्यावर बॉसने तू आपल्या कंपनीच्या अकाउंट्स विभागाकडून पैसे घे आणि कार्ड पाठव, असा मेसेज केला. समीरने त्याबाबत ऑफिसमध्ये चौकशी केली, तेव्हा कंपनीतल्या अनेकजणांना हा मेसेज गेल्याचे समोर आले. तेव्हा हा सगळा प्रकार गडबडीचा असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने बॉसशी संपर्क साधला आणि घडलेल्या सगळ्या प्रकारची कल्पना दिली.
हा सगळा प्रकार ऐकून उमेशच्या पायाखालची वाळूच सरकली होती. कंपनीत देखील या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. समीरने आपल्याकडील पैसे संपले आहेत, असे कळवल्यावर कंपनीतल्या अन्य लोकांना गिफ्ट कार्डचा मेसेज गेला होता. आतापर्यंत उमेश फक्त समीरच्याच संपर्कात होता.
त्यानंतर उमेशने या सगळ्या प्रकाराची अमेरिकेतल्या पोलिसांकडे तक्रार केली. तेव्हा वेगळीच माहिती उजेडात आली होती. उमेशचे व्हॉट्सअप अकाउंट हॅक करून हा सगळा उद्योग करण्यात आला होता. हॅकरने समीरच्या कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार्या माहितीचा आधार घेऊन बनावट व्हॉट्सअप अकाउंट तयार करून हा फसवणुकीचा प्रकार केला होता. व्हॉट्सअपवर हॅकरने बॉसचा खर्या डीपीसारखा डीपी ठेवला होता, त्यामुळे सगळ्यांना, विशेष म्हणजे समीरला हा मेसेज खरा वाटला होता. अज्ञात चोरट्याने हा सगळा प्रकार केला होता, त्यामध्ये लाखो रुपयांचा गंडा घातला गेला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात हा सगळा प्रकार आफ्रिकेतून झाल्याचे निष्पन्न झाले होते, त्यामुळे त्यात फार काही करता आले नाही. गिफ्ट व्हाऊचर स्वरूपात हा गंडा घातला गेल्यामुळे ती रक्कम पोलिसांना पुन्हा मिळवता आली नाही. या सगळ्या प्रकारामुळे समीरवर मात्र कंगाल होण्याची वेळ ओढवली होती.
हे लक्षात ठेवा…
व्हॉट्सअप, फेसबुक किंवा अन्य माध्यमातून अशा प्रकारचे मेसेज येतात, तेव्हा खरंच त्याच व्यक्तीने ते पाठवले आहेत का याची शहानिशा करा. कोणत्याही प्रकारे पैसे देण्याची घाई करू नका. त्या व्यक्तीबरोबर काही कारणाने संपर्क होत नसेल तर ईमेल किंवा अन्य कोणत्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधून त्याने खरोखरच त्याची मागणी केली केली आहे का याची खात्री करून घ्या. गिफ्ट कार्डचा वापर कुठेही करता येतो त्यामुळे गुन्हेगार अशा प्रकारच्या कार्डची मागणी करतात हे कायम लक्षात ठेवा. बर्याचदा आपण आपल्या साहेबांना मदत केली तर आपल्याला त्याचा फायदा होईल, असा विचार अनेकजण करतात आणि न विचार करता मदत करतात. त्यामधून देखील अशा प्रकारची फसवणूक होऊ शकते, त्यामुळे थेट विश्वास न ठेवता त्याची खात्री करून मगच कृती करा.
सायबर सुरक्षेच्या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सायबर कथा’ हे सादर सुरु करण्यात आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात सायबर सेल विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी सांगितलेल्या अनुभवाच्या आधारे या कथा तयार करण्यात आलेल्या आहेत. यामधील पात्रांची नावे बदलण्यात आली असून त्याच्याशी कुठे साधर्म्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा.