(ठिकाण : चहाची टपरी, दोन मित्र चहा पीत बसलेले.)
व्यंकेंद्र : आज मला जायचंय, दिवट्यायला…
देवनाथ : गोप्याच्या इथं ना? मला बी येऊ दे! नाहीतर मीच येतो, साडेसहाला तुझ्या घरी, बरोबर जाऊ…
व्यंकेंद्र : (घाबरून) नेतो की मी! पण मीच येतो ना तुझ्या घरी.
देवनाथ : अरे इकडून पुण्याहून पुणतांबा का करतो? मी आलो असतो तर सरळ त्याच दिशेला जायचं होतं की! पण तुला गरकाच मारायचा असंल तर ये…!
व्यंकेंद्र : (विषय बदलत) गोप्याच्या भावानं पाववड्याची गाडी टाकली म्हणी?
देवनाथ : नाही रे! समोशे देणार आहे तो! इंजिनेर झाला, बसून र्हायचा तर करतो काही.
व्यंकेंद्र : माह्याकडं बी हातगाडी पडेले धूळखात. मागं तो पाणीपुरीवाला उसन्या पाच हजारच्या बदल्यात सामानसुमान सोडून बिहारला गेला, तो आला कुठं?
देवनाथ : असंल अजून तर देतो का मला? चहाची टपरी टाकून बघतो, फाट्यावर.
व्यंकेंद्र : मंग साईड बिझनेस पाह्यजेलच, एका धंद्यावर होतंय का?
देवनाथ : येऊ का आज मग?
व्यंकेंद्र : (एकदम गडबडतो.) नको, नको!
देवनाथ : का रे? इतक्या वेळ तयार होता ना द्यायला? आता तूच टाकतो की काय?
व्यंकेंद्र : नाही. मी मोठा बिझनेस टाकणारे.
देवनाथ : काही लोनबिन करणारे की काही स्कीम लागली हाताला?
व्यंकेंद्र : (घाईने विषय बदलत) का रे पम्याच्या म्हातार्याचं किडनीचं ऑपरेशन झालं का?
देवनाथ : हा स्कीमची कागदं वर्षभर दाखवत फिरला, म्हणायचा याच्यात एवढे भेटतील, तेवढे खर्चायला कामं येतील. त्याचा कुणी पाव्हणा शिवील हास्पिटलात पावत्या मारायला आहे. त्याच्या जीवावर लै उड्या हाणायचा…
व्यंकेंद्र : मग तेंनी मदत केली नाही का?
देवनाथ : तो मदत करतोय व्हय?
व्यंकेंद्र : मग झालं का नाही ऑपरेशन?
देवनाथ : झालं ना! त्याच्यासाठी बैलजोडी इकली. ती खटारा मार्शल उभी व्हती ना? ती इकली भंगारात. पाव्हण्यारावळ्याकडून काही उधार-उसनवार घेतली. अन् केलं आपरेशन.
व्यंकेंद्र : आजारपण लै अवघड बाबा!
देवनाथ : (काहीतरी आठवत) तू पण तुझ्या म्हातार्याला घेऊन शिवीलात दिसला होता. कशासाठी गेल्था?
व्यंकेंद्र : ते त्यांच्या दातात हिरे बसवायचे होते. म्हणलं हिर्याचीच कवळी बनवून घ्यावा म्हणून गेल्थो. बाकीकडं पैसा लागतो, तिथं कसं फुकटात काम करून मिळतं.
देवनाथ : मग काय झालं? बसवले का नाही दात?
व्यंकेंद्र : नाही.
देवनाथ : (कानाजवळ पुटपुटतो.) काय चिरीमिरी मागितली का?
व्यंकेंद्र : नाही, पण होईल एवढ्यात!
देवनाथ : कसं काय?
व्यंकेंद्र : एक सिक्रेट स्कीमे…
देवनाथ : मला पण सांग ना! काही जुगाड असल तर. सासर्याचं मूळव्याधचं ऑपरेशन सांगितलंय. झालं तर मग बरं होईल. असं करतो मी येतोच काम उरकून तुझ्या घरी संध्याकाळी!
व्यंकेंद्र : (एकदम किंचाळत) नको, नको! नको येऊ तू!
देवनाथ : अरे काय बाईमाणूस आहे काय तू? किंचाळत नाही म्हणू राहिला ते?
व्यंकेंद्र : (थोडा सावरत) अरे काही असलं तर सांगेन की मी. तेच्यासाठी घरी यायची गरज काय?
देवनाथ : मी मघापासून बघतोय, तुला घरी येतो म्हंटलं रे म्हंटलं का तू डायरेक उसळतोय ते? काय खून करून बॉडीबिडी लपवून ठुलीय का गुप्तधन गावलं तुझ्या म्हातार्याला?
व्यंकेंद्र : (अजीजीने) नाही रे! असं नाहीय काही…
देवनाथ : मग शिक्रेट काये तुझं? बिझनेस टाकू र्हायला, वर म्हातार्याला हिर्याच्या कवळ्या बसवतोय ते? खरं सांग! नाहीतं अख्खे मळ्यातले पोरं घेऊन येतोच तुझ्या घरी मुक्कामाला.
व्यंकेंद्र : अरे भाऊ ये ना! (लाजत) पण एवढ्यात नको येऊ.
देवनाथ : मग एव्हढा लाजत का बोलतोय?
व्यंकेंद्र : ते जाहिरात येतीय ना? शासन आपल्या दारी? त्याच्यात ती प्राजक्ता अन् बाकीचे हिरो-हिरोईनी म्हणत्याय ना, का ते डायरेक घरी येणार म्हणून…?
देवनाथ : हां मग त्याचं काय?
व्यंकेंद्र : मग ते आज-उद्यात घरी आले का त्यांच्याकडून एक बिझनेस टाकून घेतो, म्हातार्याच्या कवळ्या बसवून घेतो, घर बी जुनंच झालंय, नवीन बांधून घेतो. ते म्हणत्याय तसं शेताची अवजारं कमी किमतीत भेटली तर तीबी घेतोच, आणि…
देवनाथ : आणि काय आता?
व्यंकेंद्र : ती प्राजक्ता आली तर लग्नाचं ईचारून घेईल, आता एवढं सगळं मिळालं तर शिरमंती कमी व्हईल का आपली तिच्यापेक्षा??
देवनाथ : यायचं यंटम तेचे तर्र! येडंचे! महाराष्ट्राची लोकसंख्या दहा-बारा कोटीये! प्रत्येकाच्या घरी जात बसले व्हय ते? आणि ते लबाड जोडगोळी? ते दुसर्याच्या ताटातलं पळवता पळवता देयला कधी लागले? शासन आपल्या दारी म्हणी? आणि सकाळपासून विचारीन म्हणतो व्हॉट्सअप स्टेटस काय ठेवलाय? तो शेर बराय, पण तो बाबा मुघल वाटतोय, डिलीट मार! नाहीतं बाकी सांगता येयचं नाही, त्यांचं पण ‘दंगल आपल्या घरी’ स्कीम जोरात चालुय त्यांची! मला कवाचा अडवतोय तू, पण लोकं जाऊन घर जाळून जायचे…