तिथीप्रमाणे २ जूनला व तारखेप्रमाणे ६ जूनला शिवरायांचा ३५०वा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. शिवरायांच्या रोमांचकारी आठवणी जागविल्या गेल्या. ४-६ रोमांचकारी घटना सांगून शिवचरित्र सांगितले गेले. शिवाजी महाराज स्त्री-पुरुष समानता आचरण्यासाठी दक्ष होते, अशी उदाहरणे सांगितली गेली. व्यापक लोकशाहीचा त्यांनी पाया घातला. जगात ३५० वर्षांपूर्वी राजेशाही थैमान घालत असताना शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ नेमून लोकशाहीचा दीपस्तंभ उभारला. आपल्या मावळ्यांना युद्धभूमीवर व अन्यत्र पर्यावरणाचे धडे दिले. एक आदर्श, लोककल्याणकारी, रयतेचा राजा म्हणून इतिहासकार शिवाजी महाराजांची नोंद घेतात. राज्याचा विश्वस्त अशी भूमिका घेऊन शिवरायांनी वर्तणूक केली. थोडक्यात लोकानुनयी प्रशासन उभे केले. काही मोजकेच इतिहासकार, चिकित्सक या आगळ्यावेगळ्या पैलूकडे अभ्यासकांचे लक्ष वेधतात.
सर्वसाधारणपणे रोमांचकारी ४-६ घटना म्हणजेच शिवचरित्र अशी शिवरायांची माहिती सांगतात, लिहितात, महानायकी कारभार टाळतात. लपवितात. शिवराय म्हणजे ‘मॅनेजमेंट गुरू’, उत्तम प्रशासक अशी व्यवस्था, आबासाहेब, काकासाहेब करतात. खरंच शिवाजी महाराज असेच होते काय? ते गोब्राह्मण प्रतिपालक होते काय? ‘मुद्रा भद्राय राजते’ असे ब्रीदवाक्य शिवपताकेवर कसे काय आले?
समुद्रमंथनातील विषप्राथन करणारा शंकर शिवाजी राजांचा देव कसा काय झाला? शिवरायांच्या मृत्यूनंतर रायगडावरील खजिन्यात ९ कोटी किमतीची संपत्ती होती. दर घरटी किमान एक रुपया एक तारखेला पोहोचत होता. शिवाजी राजे हे उत्तम नियोजनकार होते. महाराष्ट्राचा खजिना ‘नेटका’ आणि शिलकीचा ठेवत होते. हे मावळ्यांनी समजून घेण्याची संधी दरवर्षी शिवजयंतीला येते. बहुजन समाजातील मावळ्यांनो आता तरी खरे शिवचरित्र वाचा, लिहा, सांगा.
जागतिक क्रांतिकारकांच्या हाती शिवाजी महाराजांनी एक शस्त्र दिले. कोणते? ‘गनिमी कावा’.
जानेवारी १९७५ला एक मोठा सत्कार समारंभ शिवतीर्थावर झाला. प्रमुख सत्कारमूर्ती होत्या मॅडम बिन्ह. कोण मॅडम बिन्ह? परराष्ट्रमंत्री. व्हिएतकाँगच्या अज्ञातवासातील सरकारच्या त्या परराष्ट्रमंत्री होत्या. आयोजकांना त्यांनी विचारले की शिवाजी महाराजांचा पुतळा कोठे आहे? ‘संरक्षण कडा’ तोडून त्यांनी शिवाजीला पुष्पचक्र अर्पण केले. ३१ मे १९७५ रोजी व्हिएतनाम या एका चिमुकल्या आशियाई देशाने व्हिएतकाँगच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचा लष्करी पराभव केला. आजही हनोई शहराच्या मध्यभागी डॉ. हो. चि. मिन्ह यांच्या पुतळ्याशेजारी एक शिल्पावर संदेशशीला डौलाने उभी आहे. त्यावर मजकूर आहे, ‘आम्ही व्हिएतकाँगी क्रांतीकारक अमेरिकेचा लष्करी पराभव करू शकलो. कारण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा शिकवला.’ या शिल्पावर सही आहे डॉ. हो. चि. मिन्ह व मॅडम बिन्ह यांची. कंबोडियाचे राजे सिंहनौक यांच्या राजदरबारात शिवरायांचा पुतळा दिमाखाने स्थानापन्न झाला आहे. व्हिएतनाम, लाओस, कंबोडियातील एकत्र क्रांतिकारकांची फौज म्हणजे व्हिएतकाँग.
माओ-त्से-तुंग यांच्या नेतृत्त्वाखाली ६००० किलोमीटरचा लाँगमार्च जगाने पाहिला आहे. ऐकला आहे. वाचला आहे. एडगर स्नो यांच्या ‘रेड स्टॉर ओव्हर चायना’ या ग्रंथात शिवरायांचा उल्लेख आहे. ‘गनिमी युद्धाचा जन्मदाता’ असा या ६००० किलोमीटरच्या अवघड प्रवासात ‘रेड आर्मी’ला सावली होती शिवरायांची! १९३९ला स्टॅलिन व हिटलरमध्ये अनाक्रमणाचा तह झाला. १९४२चा स्टॅलिनग्राडचा लढा इतिहासात अजरामर झाला. स्टॅलिनग्राडच्या घराघरात लढाई लढली गेली. ‘मोलोटोव्ह’ बॉम्बची निर्मिती व प्रभावी वापर सामान्य नागरिकांनी केला. हिटलरचा पराभव झाला. शिवरायांचे गनिमी युद्धतंत्र वापरून!
यासर अराफतचे पी.एल.ओ सैनिक (पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मी) लेबनॉनमध्ये कसे लढले? अवघी ६००० फौज घेऊन यासर अराफत युद्ध नेतृत्त्व करत होते. ४० दिवस लॅबनॉनची वीज, पाणी तोडले होते. तेथेही शिवाजींच्या युद्धतंत्राचा वापर करून पी.एल.ओ. जिंकली.
लॅबनॉनचा वेढा तोडून यासर अराफत भारतात आले आपल्या भगिनीना भेटण्यासाठी. त्यांचे आभार मानण्यासाठी. कोण होत्या त्या भगिनी? इंदिरा गांधी! दक्षिण अमेरिकेतील पेरू, चिली, क्युबा इ. मुक्ततेचा ध्यास घेऊन हुतात्मा झालेला चे गव्हेरा आज जागतिक क्रांतिकारक तरुणांचा ‘आयकॉन’ झाला आहे. अमेरिकेच्या मुख्य भूभागापासून फक्त ८९ किलोमीटर लांब असलेला क्युबा आजही अमेरिकेस आव्हान देत आहे. त्यांचेही प्रेरणास्थान आहे शिवाजी महाराज आणि त्यांचा गनिमी कावा!
जागतिक परिघावरील या योद्ध्याला मानाचा मुजरा!!