‘लहानपणी मी उत्सवांत सहभागी होत होतो, काही तीर्थक्षेत्रांना मी भेटीही देतो. मात्र, तरीही मी दैववादी नसून धार्मिक अंधश्रद्धेला, बुवाबाजीला विरोध करणारा विज्ञानवादी आहे,’ असे ठणकावून सांगणारे सुधारकी विचारांचे ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत, हे आजच्या काळात फार आश्चर्याचे झाले आहे. भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाला कट्टरतेची झूल चढवून ते निवडणुकांसाठी वापरण्याचे शस्त्र म्हणून बदनाम करून ठेवलेले असल्याने राजकारणात भले भले लोक सॉफ्ट हिंदुत्वाची कास धरताना दिसत आहेत. अशावेळी सिद्धरामय्या यांच्यासारखा धार्मिक अवडंबरविरोधी माणूस या पदावर असणे विशेष आहे.
सिद्धरामय्या यांचे वेगळेपण इथेच संपत नाही. कर्नाटकात भाजपने टिपू सुलतानला निव्वळ मुस्लीम असल्यामुळे हिंदूद्वेष्टा ठरवून आक्रमक मुघलांच्या पंक्तीत नेऊन बसवला. अशावेळी सिद्धरामय्या गरजले होते की टिपू सुलतान देखील कित्तूर राणी चन्नमा यांच्यासारखाच ब्रिटीशांविरूद्ध लढणारा प्रखर देशभक्त होता. धर्मावरून देशभक्ती ठरवू नका, असेही त्यांनी भाजपला बजावले.
एकदा भाजपाच्या मंत्र्यांनी मुद्दे भरकटवणारे लांबलचक भाषण विधानसभेत केल्यावर विरोधी पक्ष नेता म्हणून उभे राहिल्यावर सिद्धरामय्या ‘तुम्हाला राज्याचा कारभार जमत नाही’ असे एकच सणसणीत वाक्य बोलून शांतपणे खाली बसले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुजरात आणि उत्तर प्रदेशापाठोपाठ आपल्या कच्च्या, मुस्लिमद्वेष्ट्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा कर्नाटकात उघडली होती. त्यांची पोलखोल करून, त्यांच्याविरोधात जनमत तयार करून त्यांना जनतेच्या प्रश्नावर बोलण्यास भाग पाडून, मग त्यातही निरूत्तर करून सिद्धरामय्या यांनी या प्रयोगशाळेला टाळे ठोकले. शक्तिशाली आणि अजिंक्य भासणार्यात भाजपला ते पराभूत करणार, याबद्दल इतरांना खात्री नव्हती, तेव्हाच ‘मार्मिक’ने याच सदरातील ‘कमळासुराच्या नि:पाताची सुरुवात कर्नाटकातून’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखातून हे भाकीत केले होते, तेही निवडणुकीच्या तारखेच्या महिनाभर आधी.
एखादे राजकीय भाकित कधीही करणे धाडसाचेच असते, शेवटच्या टप्प्यात कोणता पक्ष कोणते राजकीय हत्यार अचानकपणे बाहेर काढेल आणि प्रचारातून काय हवा बदलेल हे सांगणे अशक्यप्राय असते. तरीदेखील हे धाडस आम्ही केले, कारण ही निवडणूक निव्वळ राजकीय पक्षांमधील लढाई राहिली नव्हती, ती लोकांची लढाई झाली होती, हे प्रस्तुत लेखकाचा कर्नाटकातील ग्रामीण जनतेशी थोडाफार संपर्क असल्याने प्रकर्षाने लक्षात येत होते. एकदा लोकांनी निवडणुकीची गदा हातात घेतली की ज्याच्यावर ते प्रहार करणार असतात, त्याला साक्षात बजरंगबली देखील वाचवू शकत नाहीत. विश्वगुरू बनल्याच्या भ्रमात असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा अनुभव घेतला असेल. त्यांचे बेगडी रोड शो, फुलांच्या पाकळ्यांचा स्वतःवरच करून घेतलेला वर्षाव, आपल्याला ९१ शिव्या दिल्याचे प्रचारकी रडगाणे, एकतर्फी रटाळ ‘मन की बात’, एकांगी गोदी मीडिया यातून पंतप्रधानांनी लवकर बाहेर पडावे, नाहीतर कर्नाटकातील ट्रेलरचे २०२४ लोकसभा निवडणुकीत सुपरहिट पिक्चरमध्ये रूपांतर होईल.
कर्नाटकाच्या निवडणुकांनी विद्वेषाच्या धगींपेक्षा घरगुती गॅसच्या किंमतवाढीची धग अधिक असते, हे मोदी कंपनीला दाखवून दिले आहे. निवडणूक जनतेने हातात घेतल्यानंतर इतिहास रचले जातात, तसाच एक इतिहास ह्यावेळी कर्नाटकात रचला गेला आणि गेल्या ३४ वर्षांतील विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक मताधिक्य काँग्रेस पक्षाने मिळवून दाखवले. काँग्रेसने अजून नीट नियोजन केले असते तर १९८९चा १७८ जागांचा उच्चांकी आकडा गाठणे अशक्य नव्हते, इतकी भाजपाविरोधातील असंतोषाची एक प्रचंड लाट होती. सत्तेत असलेल्या पक्षाच्या ३० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होते, म्हणजे काय!
जनतेने लाथ मारायची ठरवली तर भल्याभल्यांचे पेकाट ती मोडू शकते हे बिळात लपलेले भाजपाचे नेते आज अनुभवत आहेत. कर्नाटकात काँग्रेसने अहंकारी भाजपाला खाली खेचले यात राहुल गांधींचे आणि त्यांच्या भारत जोडो यात्रेचे मोठे योगदान आहेच. काँग्रेसने जनप्रिय आश्वासनांची खैरात केली, कर्नाटकातील जातीय समीकरणांची मोट बरोबर बांधली. मात्र, सर्वात जास्त चर्चा होती, ती डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या स्थानिक जोडनेतृत्वाची. ही जोडी कशी फोडण्यासाठी भाजप आणि गोदी मीडियाने निवडणुकीआधी आणि निकालानंतर देखील पुरेपूर प्रयत्न केले. डी. के. शिवकुमार नाराज असून ते फुटून भाजपासोबत सरकार बनवतील, अशा बातम्या शेवटच्या क्षणापर्यंत पेरल्या गेल्या. या पेरणीतज्ञांचा अभ्यास कच्चा असतो आणि त्यांना हे माहिती नसते की या जोडीने फक्त आत्ताच पराक्रम केलेला नसून या जोडीने एकत्र काम करून पराक्रम गाजवण्याची सुरुवात २००६ सालच्या चामुंडेश्वरी पोटनिवडणुकीतील विजयापासून झालेली आहे. सिद्धरामय्यांनी मतमोजणीच्या एकविसाव्या फेरीत मुसंडी मारत फक्त २५७ मतांनी जिंकलेली ती २००६ची निवडणूक कर्नाटकातील आजवरची सर्वात चुरशीची पोटनिवडणूक समजली जाते. हा विजय खेचून आणला होता डी. के. शिवकुमार यांनी. २०२३ला मुख्यमंत्री सिद्धरामय्या झाले, पण पक्षासाठी सत्ता आणि मुख्यमंत्रीपद खेचून आणले डी. के. शिवकुमार यांनी. १७ वर्षे ही शिवासिद्धाची जोडी विरोधकांना नामोहरम करते आहे, ती अभेद्य आहे. सत्तेच्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या महाराष्ट्रातील ईडी सरकारसारखी ती फुसकी जोडी नाही.
या जोडीतील मोठा कोण, छोटा कोण ठरवणे अशक्यच आहे. वयाच्या पंचाहत्तरीत तरूणाईला लाजवेल असा घणाघाती प्रचार करून, अमोघ वक्तृत्वाने कर्नाटकातील गोरगरीब जनतेला मनाला भिडणारी साद सिद्धरामय्यांनी घातली आणि स्थानिक प्रश्न, भ्रष्टाचार यांच्यावर आघात करत भाजपाची कोंडी केली. निकाल आल्यावर संपूर्ण देशाला, मोदी आणि अमित शहा यांचा विजयाचा अश्वमेध रोखणारा वीरयोद्धा अशी ज्यांची ओळख नव्याने झाली त्या सिद्धरामय्या यांचे योगदान मोठे की वयाच्या ६२व्या वर्षी, तब्येत साथ देत नसताना सतत बैठका घेऊन रणनीती आखणारे शिवकुमार यांचे योगदान मोठे, हे ठरवणे अवघड नव्हे, अशक्य आहे. कोणतीही अवघड, अशक्य अशी विधानसभेची जागा माझ्या हातात द्या, मी तिथे पक्षाचा आमदार निवडून आणेन, असा पैजेचा विडा शिवकुमार उचलत आलेले आहेत. विद्यार्थीदशेपासून काँग्रेस पक्षाशी इमान राखणारे, खोट्या आरोपात पन्नास दिवस तिहारचा तुरूंगवास भोगणारे, वयाच्या तेविसाव्या वर्षी माजी पंतप्रधान देवेगौडांविरूद्ध निवडणुकीत उतरणारे ‘सतनुरचे वाघ’ डी. के. शिवकुमार यांचे मोठेपण असे की व्यक्तिगत आशाआकांक्षाना त्यांनी या निवडणुकीत मुरड घातली. बलवान नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात काम करण्याऐवजी एकत्र काम केले, तर भीमपराक्रम गाजवणे अशक्य नाही, याचे जिवंत उदाहरण म्हणजे शिवासिद्धाची जोडी! आज सर्व विरोधी पक्षांसाठी हे एक पथदर्शक उदाहरण आहे. या जोडीचे आज नुसते अभिनंदन करून चालणार नाही, तर लोकशाही आणि संविधान धोक्यात आलेले असताना प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी देशासाठी एक आशेचा किरण जागवला, याबद्दल त्यांचे आपण ऋण देखील मानायला हवेत. लोकगीतावर तरूणासारखे थिरकणारे सिद्धरामय्या आणि डॅशिंग डी. के. शिवकुमार यांच्यात १४ वर्षांचे अंतर असले तरी दोघांचा राजकीय प्रवास जवळपास एकत्र म्हणजे ८०च्या दशकापासून सुरू झाला आहे.
म्हैसूर जिल्ह्यातील सिद्धरामनहुंडी या लहानशा खेड्यात एका सामान्य धनगर कुटुंबात जन्मलेल्या सिद्धरामय्या यांनी दहाव्या वर्षापर्यंत शाळाच पाहिली नव्हती. त्यांच्या घरातील दहावीपर्यंतचे शिक्षण घेणारे तेच पहिली व्यक्ती ठरले, इतके ते मागास कुटुंब. सिद्धरामय्या यांनी जिद्दीने शिक्षण घेतले व ते म्हैसूरच्या सारदा विलास महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी घेत पदवीधर झाले (इन्फोसिसचे नारायण मूर्ती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ शांतीस्वरूप भटनागर हे देखील याच महाविद्यालयाचे विद्यार्थी). त्यानंतर सिद्धरामय्या यांनी वकिलीची पदवी देखील घेतली. सामाजिक विषयांना वाचा फोडण्यासाठी अथवा गोरगरीबांची बाजू मांडण्यासाठी त्यांनी थोडा काळ वकिली देखील केली. पण चांगले वत्तृâत्व आणि भाषणाची आवड यामुळे ते सार्वजनिक, राजकीय कार्यक्रमातूनच जास्त रमू लागले, झळकू लागले.
आधी उजव्या विचारसरणीचे असलेले सिद्धरामय्या नंतर लोहियावादी विचारांचे झाले. १९८३ साली वयाच्या पस्तीशीत त्यांना भारतीय लोकदल पक्षातून चामुंडेश्वरी विधानसभेतून निवडणूक लढवायची संधी मिळाली आणि ते विजयी झाले. त्यानंतर गेली ४० वर्षे ते सातत्याने विधानसभेची प्रत्येक निवडणूक चांमुडेश्वरी व त्यातूनच नव्याने बनवलेल्या वरूणा विधानसभेतून लढवत आहेत. एकदा त्यांना परंपरागत मतदारसंघातून पराभवाची कुणकुण लागल्याने बदामी येथून निवडणूक लढवावी लागली. दोन अपवाद वगळता ते कायम जिंकले आहेत. अडीच दशके जनता दलात काढून नंतर ते काँग्रेसमध्ये आले आहेत. संविधान व लोकशाही मानणारा, निवडणुकीच्या रणांगणात सतत जोमाने लढणारा हा योद्धा आहे.
एकेकाळी सिद्धरामय्या यांना माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे राजकीय वारस म्हटले जायचे. देवेगौडा हे पुत्र कुमारस्वामी यांनाच राजकीय वारस करणार हे नक्की झाल्याने व त्यांनाच मुख्यमंत्रीपद दिले गेल्याने सिद्धरामय्या व देवेगौडा ह्यांच्यात टोकाचे मतभेद झाले. सिद्धरामय्यांनी मेहनतीने बांधलेला तो पक्ष २००६ साली सोडला आणि आमदारकी देखील सोडली. पक्ष सोडल्यावर लगेच त्यांनी राज्याचा दौरा केला व बहुजन समाजाच्या वीस लाख लोकांचे अहिंदा संमेलन भरवून त्यांनी देवेगौडांसमोर भव्य शक्तिप्रदर्शन केले. स्वतःचा वेगळा पक्ष काढायचा निर्णय सोनिया गांधीच्या विनंतीवरून त्यांनी रद्द केला आणि ते काँग्रेस पक्षात गेले. असे म्हणतात की सिद्धरामय्यांच्या काँग्रेस प्रवेशात डी. के. शिवकुमार यांचा सल्ला सोनिया यांनी प्रमाणभूत मानला होता. डी. के. शिवकुमार स्वत: कधीकाळी देवेगौडांकडून विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले आणि तेव्हापासून त्यांचे तहहयात राजकीय विरोधक बनले होते. सिद्धरामय्या देवेगौडांकडून पराकोटीचे दुखावले गेले होते. इथेच ह्या जोडीची नाळ जुळली.
त्या काळात देखील शिवकुमार सोनिया गांधी यांच्या थेट संपर्कात असायचे आणि २००६ साली देशाची सूत्रे सोनियाजींच्या हातात होती, तेव्हा त्या स्वत: सिद्धरामय्यांच्या बेंगळूरू येथील पक्षप्रवेश समारंभाला जातीने हजर राहिल्या होत्या, त्यातही शिवकुमार यांचाच मोठा वाटा होता. २००८च्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रचाराची धुरा वाहिली. २०१३ला ती धुरा सिद्धरामय्या यांनी वाहिली, पक्षाला सत्तेत आणले आणि २०१३ ते २०१८ या काळात ते मुख्यमंत्रीपदी राहिले. त्यांची कारकीर्द हा कर्नाटकाचा एक सुवर्णकाळ होता असे विविध आर्थिक अहवालातून स्पष्ट होते. तेव्हा निष्कलंक कारभार केल्याचे फळ त्यांना दहा वर्षाने मिळाले आणि ते परत आता मुख्यमंत्री झाले. डी. के. शिवकुमार हे तेव्हा देखील सरकारमध्ये दोन नंबरचे महत्व ठेवून होते, जे ते आज देखील ठेवून आहेत.
सिद्धरामय्यांनी २००६ साली जनता दल सोडून आमदारकीचा राजीनामा दिल्यावर झालेली चांमुडेश्वरीची पोटनिवडणूक त्यांच्यासाठी अवघड होती. सत्ताधारी भाजपा व जनता दल (स) यांच्या युतीच्या उमेदवारासमोर निभाव लागणे कठीण होते. पक्षात सर्वोच्च स्थानासाठी आव्हान देऊन बाहेर पडलेला हा विद्रोही नेता हरवणे हे तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना जमले नसते तर त्यांची राजकीय पत कमी झाली असती. आजवरच्या सर्वाधिक गाजलेल्या या पोटनिवडणुकीत कुमारस्वामींनी पैशाचा महापूर आणला, ज्यात सिद्धरामय्या यांचे वाहून जाणे निश्चित होते. मुख्यमंत्री स्वतः रात्रंदिवस तिथे ठाण मांडून बसले होते. सिद्धरामय्या हरणार ही खबर दिल्लीपर्यंत पोहोचली आणि सोनिया गांधी यांनी डी. के. शिवकुमार यांना तिथे योग्य ती रसद पुरवायचे आदेश दिले आणि सिद्धरामय्या फक्त २५७चे निसटते मताधिक्य घेऊन निवडून आले. २००२ साली महाराष्ट्रातील विलासराव देशमुख सरकार पडणार होते, तेव्हा त्यांनी देखील याच भरवशाच्या शिवकुमारांना फोन केला होता आणि रातोरात महाराष्ट्रातले काँग्रेस आमदार शिवकुमार यांच्या कर्नाटकातील रिसॉर्टवर हलविले गेले होते. अहमद पटेल यांना गुजरात राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होणार असे लक्षात आल्यावर याच व्यक्तीवर जबाबदारी दिलेली होती. निष्ठेने पक्षसेवा करणारे शिवकुमार सोनिया गांधीच्या प्रत्येक आदेशाचा आदर आजवर करत आले, तसा त्यांनी मागच्या आठवड्यात देखील केला आणि मुख्यमंत्रीपदावरचा दावा विनातक्रार सोडला.
१९८५ साली वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी राज्यातील सर्वात शक्तिशाली नेत्याविरूद्ध म्हणजेच एच. डी. देवेगौडांविरूद्ध डी. के. शिवकुमार पक्षाचा आदेश आला म्हणून लढले आणि अर्थात हरले. त्यानंतर चार वर्षांत ते त्याच विधानसभेतून अवघ्या २७व्या वर्षी आमदार म्हणून निवडून गेले व ते आजवर एकूण आठ वेळा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले आहेत. आज ते उपमुख्यमंत्री झाले असले तरी त्यांची सरकारमधील ताकद मुख्यमंत्र्यांइतकीच असणार हे निश्चित. आजवरचा त्यांचा राजकीय प्रवास यशाची चढती कमान ठरत गेला. बरेचदा राजकीय यश मिळवणारे व्यावसायिक यश मिळवू शकत नाहीत आणि मग खोके घेऊन स्वतःला विकतात. शिवकुमार मात्र बांधकाम, रिसॉर्ट, सिमेंट अशा विविध उद्योगात स्वकर्तृत्वाने यशस्वी ठरले. आज एकाचवेळी १३५० कोटींची कर भरलेली स्वतःची मालमत्ता जाहीर करणारे ते दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तरीही ते राज्यातील दुसर्याः क्रमांकाचे पद मिळवून सत्तेत रहातात हे सहजसाध्य नाहीच. तरीही त्यांना आयकर आणि आर्थिक गुन्ह्यात गोवून पन्नास दिवस तिहार जेलमध्ये पाठवण्याची मर्दुमकी पंतप्रधान मोदींनी दाखवली. त्यावेळी सोनिया गांधी गोदी मीडियाच्या टीकेची पर्वा न करता या खंद्या शिलेदाराला भेटायला स्वतः तिहार जेलमध्ये गेल्या होत्या. तेव्हा हा सतनूरचा वाघ भावनाविवश होत रडला होता. मुख्यमंत्री बनण्याची आपली महत्त्वाकांक्षा नक्कीच आहे, पण पक्षाची महत्वाकांक्षा जास्त महत्वाची आहे, असे प्रांजळपणे मान्य करून सोनिया यांच्या निर्णयाला मान देणारा आणि सातत्याने काँग्रेस पक्षासोबत रहाणारा शिवकुमार हा नेता आहे. शिवासिद्धाची ही जोडी जोपर्यंत आहे, तोपर्यंत तरी कर्नाटकात काँग्रेस पक्ष संपवणे हे भाजपासाठी दिवास्वप्नच रहाणार आहे. महाराष्ट्रात आणि देशातील काँग्रेस पक्षातील नेत्यांनी या जोडीचा आदर्श घेऊन एकीचा मंत्र जपला तर त्यांना देखील नक्कीच उज्वल भवितव्य आहे..