आमच्या कंबोडिया ट्रिपमधलं हे शेवटचं शहर. हो शहर हा शब्द पक्का शोभून दिसेल अशी ही जागा आहे. बॅटमबाँगवरून तिथं पोचायला साधारण सहा साडेसहा तास लागतात. रस्त्यात तुम्हाला व्हिएतनाम, थायलंड वरून कंबोडियात येणार्या अनेक बस दिसतात. जमिनीने जोडलेले हे देश. त्यामुळे अनेक जण फिरायला जाताना व्हिएतनाम कंबोडिया हे देश एकत्र करतात.
आमचा न्होम पेन्हमधला मुक्काम एका खास हॉटेलमध्ये होता. राजवाड्याला लागूनच अगदी छान म्हणता येईल असं हे हेरिटेज हॉटेल होतं. खोल्या मोठ्या आणि जुन्या सामानाने परिपूर्ण होत्या. बाथरूम इतकी मोठी की इतर हॉटेलांची अख्खी खोली त्यात बसावी. पण हॉटेलमधलं वेगळेपण होतं तिथलं रेस्टॉरंट आणि ब्रेकफास्टची जागा. जेवणाची जागा स्विमिंग पूलच्या बाजूला होती. तुम्हाला पोहायचं असेल तर तुम्ही विशिष्ट रकमेचं खाण्याचं बिल बनवलं पाहिजे, तर तुमच्यापैकी एकाला पोहण्याची परवानगी मिळेल अशी पाटी तिथं होती.
ब्रेकफास्ट करायच्या ठिकाणाची तर वेगळीच तर्हा. तिथं तुम्हाला कुठलंच पादत्राणे घालून जायची मुभा नाही. पादत्राणे खालच्या मजल्यावर काढायची आणि एक लहानसा लाकडी जिना चढून वरच्या मजल्यावर ब्रेकफास्ट घ्यायला जायचं. ही व्यवस्था आम्ही इतर कुठंच पाहिलेली नव्हती. म्हणून याचं कौतुक वाटलं.
राजवाडा हे इथलं प्रमुख आकर्षण. पूर्णत: ख्मेर पद्धतीनं बांधलेला. राजवाड्यात प्रवेश करायचा तर तुम्हाला गुडघ्याच्या खाली असलेली पॅण्ट आणि कोपरापर्यंत असलेलं टी शर्ट घालावं लागतं. तुमच्याकडे ते नसलं तर या दोन्ही गोष्टी झाकल्या जातील, असं बहिर्वस्र तुम्हाला तिकीटबारीवर विकत मिळतं. आपण भारतीयांना त्याचं फार कौतुक वाटण्याचं कारण नाही. कारण आपल्याकडे त्याहून कितीतरी उत्कृष्ट राजवाडे आहेत. मेकाँग नदीच्या शेजारी हा राजवाडा आहे. आपल्याला राजाची झोपण्याची वेळ पाहून जाता येतं आणि राजा इथं प्रत्यक्ष राहत असल्यानं फक्त थ्रोन हॉल (आपण आपल्याकडे याला दरबार हॉल म्हणतो) आणि आसपासच्या इमारती तेवढ्या पाहता येतात.
जवळच एक लोखंडी बनावटीचा नेपोलियन टॉवर आहे. तो फ्रेंच लोकांनी मुळात सुएझ कालव्याच्या उद्घाटनाच्या वेळी बनवला आणि शेवटी तुकड्या तुकड्यात कंबोडियाला पाठवला असं म्हटलं जातं. एक नेपोलियनचं नाव सोडलं तर आम्हाला तरी त्यात फार भव्य असं काही वाटलं नाही. अर्थात राजवाड्याचं मुख्य आकर्षण वाटलं ते तिथला सिल्वर पॅगोडा. याला सिल्वर पॅगोडा म्हणतात कारण याच्या फरशा चक्क चांदीच्या आहेत. आपण चांदीच्या फरशा असं म्हटलं तरी सध्या या फरशा खराब होऊ नयेत म्हणून आच्छादून ठेवल्या आहेत. नाही म्हणायला पायर्यांजवळ थोड्याशा चांदीचं दर्शन होतं. या पॅगोडातली भगवान बुद्धांची मूर्ती खूप सुंदर आहे, अनेक प्रकारच्या रत्नांनी आणि जडजवाहिरांनी मढलेली आहे. एका छोट्याशा काचपेटीत श्रीलंकेकडून भेट म्हणून मिळालेली मूर्ती वेगळी ठेवलेली आहे.
दुसरं आकर्षण आहे तुओल स्लेंग वस्तुसंग्रहालय. याला आकर्षण म्हणावं तर तो कंबोडियाच्या अत्यंत काळ्या इतिहासाशी निगडित आहे. पूर्वी इथं रीतसर एक शाळा होती. मग १९७५ साली ख्मेर रूशची जुलमी राजवट सुरू झाली. मग ही शाळा तुरुंग बनला. ‘मन परिवर्तन’ या गोंडस विचाराखाली इथं अनेकांना डांबून ठेवलं जाई. त्यांचे अतोनात हाल केले जात आणि सरतेशेवटी त्यांना मारून टाकलं जाई. त्या केवळ चारेक वर्षांच्या काळात जवळपास २०,००० लोकांची इथे कत्तल केली गेली. त्यांना जवळच्या भागात पुरून टाकलं गेलं. विशेषतः बुद्धिवंत मंडळींची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. त्यांचे अवशेष आजही जमिनीतून वर येतात. ते खूप जपून एकत्र केले जातात. अशा हाडांचा संग्रह आपल्याला पाहायला मिळतो. या क्रूरकर्म्याच्या हातून स्त्रिया, लहान मुलं कोणीच सुटलं नाही. जवळच असलेल्या एका झाडावर डोकं आपटून आपटून कित्येक मुलांचा जीव घेतला गेला. ते झाड देखील आपल्याला दाखवतात. त्यावर म्हणे आजही मुलांच्या रक्ताचे डाग दिसतात. आम्ही ते पाहायला गेलो नाही. असलं काही पाहायची इच्छा नव्हती.
विशेष सांगायचं तर या क्रूरपणाच्या नोंदी अगदी काटेकोरपणे जपून ठेवल्या गेल्या आहेत. जणू हे कुठलं तरी चांगलं काम आहे. तुओल स्लेंगला जाताना आमचा टूकटूकवाला भावूक झाला होता. त्याचे वडील डॉक्टर आणि आई फिजियोथेरपिस्ट. दोघांनाही असाच मृत्यू आला. त्यावेळी तो खूप लहान होता. आता तो उपजीविकेसाठी रिक्षा चालवतो. त्याची कहाणी ऐकून गलबलायला झालं. अनेक लोकांनी या क्रूरतेचा सखोल अभ्यास केला आहे. त्यावर सिनेमे बनवले आहेत. या तुरुंगाच्या पहारेकर्यांची मुलाखत घेऊन अचूकपणा आणायचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी ‘ख्मेर रोग किलिंग माची’ या नावाचा सिनेमा रोज सकाळी ९ वाजता आणि ‘बिहाईंड वॉल्स’ नावाची डॉक्युमेंटरी रोज दुपारी पावणे चार वाजता दाखवली जाते. सगळं पाहताना अंगावर काटा येतो. या सगळ्यातून वाचलेली दोन माणसं या परिसरात आपली खरीखुरी कहाणी सांगत आजही फिरतात, असं आम्ही ऐकलं. आम्हाला काही ती प्रत्यक्ष दिसली नाहीत.
हे झालं वस्तुसंग्रहालयाबद्दल. अशाच किलिंग फील्ड्स शहरापासून काही किलोमीटर्सवर आहेत. लोकांना तिथं प्रत्यक्ष मारण्यात आलं. आम्हाला आणखी क्रूरता पाहायची नव्हती, म्हणून आम्ही तिथं गेलो नाही.
राजवाड्याजवळच कंबोडियाचं राष्ट्रीय संग्रहालय आहे. हे खूपच सुंदर आणि या देशाच्या पूर्वेतिहासाची खूप चांगली ओळख देणारी वास्तू आहे. ती आवर्जून पाहायला हवी, कारण इथे आपल्याला या भागात हिंदू संस्कृती किती खोलवर रुजलेली होती, याचे खूप पुरावे मिळतात. इथे अगदी दुसर्या तिसर्या शतकापासूनचे अवशेष जपून ठेवलेले आहेत. आम्हाला विशेष भावला पहुडलेला विष्णू, इथल्या मूर्तींमध्ये हरिहर फार रुचला. आपण हरिहर हा शब्द नियमितपणे हर म्हणजे शंकर आणि हरी म्हणजे विष्णू यासंदर्भात वापरतो. दोन्ही भगवंतांचे प्रारूप स्पष्टपणे दाखवणारी एक मूर्ती या संग्रहालयात आहे. तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे या मंडळींनी संग्रहालयाच्या समोरचा बगीचा देखील उत्तम बनवला आहे, राखला आहे. मेकाँग नदी या शहराची जीवनदायिनी. संध्याकाळच्या वेळी नदीच्या पाण्यातून फेरफटका मारण्याची संधी चुकविण्यात अर्थ नाही.
व्हॅट नॉम्ह हे इथलं आणखी एक आकर्षण. एका सत्तर-ऐंशी फूट उंचीच्या बारकुशा टेकडीवर हे आहे. या देवळाला इथं खूप महत्व आहे. इथल्या एका स्त्रीला समोरच्या मेकाँग नदीवरून वाहत येणार्या एका झाडाखाली बुद्ध मूर्ती सापडली. तिची इथं प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या स्त्रीचं नाव पेन्ह, लेडी पेन्ह. स्थापना टेकडीवर केली गेली. टेकडीला स्थानिक भाषेत म्हणतात न्होम. म्हणून शहराचं नाव झालं न्होम पेन्ह. देऊळ नेहमीच्या देवळासारखं साधंसुधंच आहे. पण तिथे स्वैर बागडणारे हॉर्नबिल पक्षी तुम्हाला जास्त आकर्षित करतात. हा पक्षी भारतात दिसतो. पण बर्याचदा जोडप्यानं वावरतो. इथं चांगले तीस-चाळीस हॉर्नबिल आपल्या आसपास फिरत असतात. अर्थात ते इतक्या जवळून जातात की त्यांच्या शिंगांइतक्या जाड चोचींमुळे आपल्याला इजा तर होणार नाही ना, याची भीती वाटते. देवळाच्या समोरच एका कोपर्यावर एका झाड आहे. त्या झाडाला असंख्य वटवाघळं उलटी लटकताना दिसतात. पण त्यांना मारण्यावर या शहरात कायद्यानं बंदी आहे. इथल्या लोकांना वटवाघळं खायला आवडतं. ती नामशेष होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जात असावी.
इथे खूप मार्केट्स आहेत. पैकी सेंट्रल मार्केट आणि रशियन मार्केट जास्त प्रसिद्ध आहेत. या शहरात रशियन लोकांची वस्ती लक्षणीय आहे, असं टूकटूकवाल्यानं आम्हाला सांगितलं. त्यात तथ्य किती ते कळलं नाही. पण जेव्हा आम्ही मार्केटमध्ये गेलो तेव्हा रशियन मंडळी फार दिसली नाहीत. विकायला ठेवलेल्या वस्तूदेखील बव्हंशी चिनी बनावटीच्या होत्या. बांबूची कलाकुसर आणि रेशमी कपड्यांचा कारभार कंबोडियात बराच चालतो असं ऐकून होतो. वस्तू खूप महाग असल्यानं विकत घेण्याचा बेत रहित केला.
तर आमची कंबोडियाची सहल अशी संपन्न झाली. येताना न्होम पेन्हच्या पाहुणचाराचा वेगळाच अनुभव घेतला. विमानतळावर वेटिंग भागात खूप डास होते. त्यांनी आम्हाला अक्षरशः फोडून काढलं. मनातल्या मनात कंबोडियाच्या मलेरियाची भीती बाळगत आम्ही घराचा रस्ता धरला.