‘मार्मिक’ साप्ताहिकाचा पहिला अंक १३ ऑगस्ट १९६० रोजी निघाला. त्यानंतर ‘मार्मिक’ने सतत मराठी माणसांवरील होणार्या अन्यायाविरुद्ध लिखाण केले. मराठी माणसाचे स्फुल्लिंग चेतवण्याचे काम केले. मराठी माणसाचे दैनंदिन जीवनाचे प्रश्न सरकार दरबारी मांडले. शासकीय-निमशासकीय कार्यालयात, कंपन्या-कारखान्यात भूमिपुत्रांना नोकरी मिळावी म्हणून बाळासाहेबांनी ‘मार्मिक’मधून सडेतोडपणे भूमिका मांडत चळवळ उभारली. बेरोजगार मराठी तरुण ‘मार्मिक’च्या कार्यालयात आपली गार्हाणी, अन्याय कथन करू लागला. याचा परिणाम मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना ‘शिवसेना’ स्थापण्यात झाला.
१९ जून १९६६ साली स्थापन झालेल्या शिवसेनेची भूमिका, लढा ‘मार्मिक’मधूनच महाराष्ट्राला कळत गेला. शिवसेनेच्या स्थापनेत आणि पुढील यशस्वी वाटचालीत ‘मार्मिक’ने महत्त्वाची कामगिरी बजावली. कारण स्थापनेनंतर शिवसेनेला प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे विरोधकही तयार झाले. शिवसेनेवर दररोज नाना आरोप होत होते. तेव्हा त्या आरोपांना, टीकेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘मार्मिक’मधून उत्तर द्यायचे. मार्मिक हे साप्ताहिक होते. त्यामुळे रोजच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी, त्यांचा समाचार घेण्यासाठी एका सप्ताहाची वाट पाहावी लागत असे. नाही म्हणायला काही मराठी दैनिके कधी-कधी शिवसेनेची बाजू घेत असत. पण ते अपुरे होते. शिवसेनेवर होणार्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी एक दैनिक असावे असा विचार बाळासाहेबांच्या मनात आला.
दरम्यान, १९८८ साली महानगरपालिकेच्या निमित्ताने शिवसेना नेते सुभाष देसाई संभाजीनगरमध्ये २०-२५ दिवस तळ ठोकून होते. या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, सुभाष देसाई आदींनी ‘लोकमत’ कार्यालयाला आणि प्रेसला सदिच्छा भेट दिली. बाळासाहेबांचे जुने स्नेही पत्रकार अशोक पडबिद्री लोकमतमध्ये होते. बाळासाहेबांनी पाठीवर थाप मारीत सहज म्हटले, काय अशोक मुंबईला येणार का? जुना स्नेह कामी आला. बाळासाहेबांनी दैनिक काढायचे हा विचार पक्का केलाच होता. सुभाष देसाई आणि उद्धव ठाकरे यांनी त्या दृष्टीने कामकाजास सुरूवात केलीच होती. सगळी जुळवाजुळव झाली. दैनिक काढण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर २३ जानेवारी १९८९ रोजी मध्यरात्री शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सुरू झाले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, मोठ्या थाटामाटात शिवसेनाप्रमुखांच्याच शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले.
प्रकाशन प्रसंगी बाळासाहेब म्हणाले, ‘हिंदुत्वाचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी आणि दररोज होणार्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ‘सामना’ हे नवं शस्त्र असेल आणि उद्या पाळी आली तर आम्हाला खर्या शस्त्रालाही हात घालावा लागेल.’ तामिळनाडूत काँग्रेसचा पराभव केल्याबद्दल करुणानिधी यांचे त्यांनी अभिनंदन केले. शिवसेनेकडे आर्थिक कार्यक्रम नाहीत म्हणून आमच्यावर टीका होते. पण ‘द्रमुक’कडे तरी कोठे आर्थिक कार्यक्रम आहे? असा सवाल त्यांनी केला. ‘सामना’चे प्रकाशन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या समारंभात महापौर छगन भुजबळ, शिवसेना नेते सर्वश्री मनोहर जोशी, दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर यांचीही भाषणे झाली. ‘सामना’चे कार्यकारी संपादक अशोक पडबिद्री यांनी प्रास्ताविक केले, तर सुभाष देसाई यांनी सूत्रसंचालन केले. या समारंभाला शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांची अभूतपूर्व गर्दी होती. सर्वांना प्रवेश नसल्याने अनेकजण बाहेर उभे राहून भाषण ऐकत होते.
‘सामना’चा पहिला अग्रलेख होता, ‘या असे सामन्याला’… या अग्रलेखात सामना सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. वाचकांना उद्देशून अग्रलेखात बाळासाहेब म्हणाले होते-
‘‘प्रिय वाचकहो,
आज दैनिक ‘सामन्या’स सुरूवात होत आहे. बरीच वर्षे दैनिक काढायचे असे चालले होते. परंतु सर्व अडचणी आणि कटकटी यांमधून, दैनिकासारखा व्याप अंगावर घ्यायचा म्हणजे हल्लीच्या काळात द्रोणागिरी पर्वत उचलण्यासारखाच प्रकार म्हणायचा. परंतु हे मारुतीचे बळ केवळ जनता जनार्दनाने आम्हाला दिले आणि त्या बळावरच हे पर्वतप्राय कार्य आम्ही करू शकलो.
फ्री प्रेस सोडल्यानंतर १३ ऑगस्ट, १९६० या वेळी ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकाला आम्ही हात घातला. त्यावेळची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. कारण मराठी साप्ताहिके धडाधड बंद होत होती. आचार्य अत्र्यांचा ‘नवयुग’, ‘समीक्षक’ रामभाऊ तटणीसांचे ‘विविधवृत्त’ आणि बाकीची मासिके यांनी केव्हाच ‘राम’ म्हटला होता. अशी परिस्थिती असताना आम्ही साप्ताहिकाचे धाडस केले. दामाजीपंतांचा शाप तर नेहमीच असतो, परंतु त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे म्हणजे आमचे वडील यांचे नैतिक पाठबळ आणि बुवासाहेब दांगट यांची मदत यामुळेच ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक निघू शकले. ‘मार्मिक’च्या माध्यमातून शिवसेना उभी राहिली आणि शिवसेनेच्या प्रचारतंत्रातून आज दैनिक ‘सामना’ उभा राहत आहे.
इथे केवळ आम्हालाच नव्हे, तर तमाम हिंदू बांधवांच्या-भगिनींच्या आनंदास पारावार उरलेला नसेल, बँकेची कर्जे डोक्यावर घेऊन आम्ही ‘सामन्या’स उभे आहोत, तरी पण आता मागे फिरायचे नाही. एरव्ही आम्ही या फंदात पडलो नसतो. परंतु शिवसेनेचा व्याप जसजसा वाढू लागला आणि आता तर तिची पाळेमुळे ग्रामीण भागात पसरू लागली. तसतशी दैनिकाची अडचण भासू लागली. दोन हात करताना साप्ताहिकाची ताकद कमी पडू लागली. कारण शिवसेनेच्या वाढत्या यशामुळे शत्रूही वाढू लागले. आम्ही महाराष्ट्रामध्ये भूमिपुत्राच्या बाजूने, म्हणजे मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी उभे राहिलो, त्यावेळीही आम्हाला संकुचितवादी, प्रांतीयवादी, जातीयवादी अशी विशेषणे लावण्यात आली, तरी आम्ही हटलो नाही. आता देशावर छुप्या पाकधार्जिण्या मुस्लिमांचे हिरवे मनसुबे लादले जात असताना आणि पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांचे हिंसाचाराचे हत्याकांड चालू असताना या देशात आता हिंदुत्वाच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण झाला आहे आणि धोका टाळण्यासाठी माझ्या मराठी मातीने जर पुढाकार घेतला नाही तर केवळ हतबलतेने या देशाची दुसरी फाळणी पाहण्याचे नशिबी येण्याची शक्यता आहे. केवळ याच पोटतिडिकेने आम्ही हिंदुत्वाला धार आणण्यास बसलो.
दैनिक ‘सामना’ वेळोवेळी अनेक विषय हाताळणार आहे. येणारे हल्ले परतवणार आहे. अनेक प्रश्न आम्हाला संयमाने हाताळावे लागतील. पण बरीच प्रकरणे आम्हाला आमची लेखणी ज्वालामुखीच्या लाव्हारसात बुडवून लिहावी लागतील. त्यामुळे क्षणभर काही लोकांना आमच्या भाषेचा तोल गेल्यामुळे कावल्यासारखे होईल. परंतु त्यामागील अन्यायाबद्दलची चीड त्यांनी लक्षात घ्यावी. एरवी आम्हाला आपणहून कोणाला दुखवायचे नाही. आजपर्यंत आम्ही तसे केले नाही आणि करणार नाही. ज्या ज्या वेळी अंगावर आले, त्याचवेळी शिंगाचा वापर आम्ही केला आहे. एरवी काही चांगल्या गोष्टींचे आम्ही रणशिंग फुंकून स्वागतच केले आहे. ‘सामन्या’चे वैशिष्ट्य म्हणजे दैनिक ‘सामना’ ह्या वृत्ताचे ‘पावित्र्य’ राखणार आहे. विरोधकांच्या बातम्या कुठे दाबल्या जाणार नाहीत. त्यांना प्रसिद्धी, व्यवसायातील जे पावित्र्य टिकवायचे असते त्यादृष्टीने, त्या बातम्यांना आवश्यक महत्त्व दिले जाईल. परंतु त्यानंतर ‘भाष्य’ आमचे राहील. वार्ताहरांच्या बातम्यांतून वार्ताहरांचे भाष्य मात्र छापणार नाही, तर बातम्यांत केवळ सत्य परिस्थितीचे चित्रण असेल आणि भाष्य मात्र ‘सामना’च्या स्तंभातून केले जाईल. हे पावित्र्य सध्या नष्ट झाले आहे, ते ‘सामना’ टिकविणार.
आज या दैनिक ‘सामना’च्या प्रकाशनाच्या वेळी आम्हाला प्रकर्षाने जर कुणाची आठवण होत असेल तर, प्रथम आमच्या वडिलांची, कारण त्यांची मनापासून इच्छा होती की, महाराष्ट्राचे असे एक प्रखर, स्वतंत्र विचारप्रणालीचे दैनिक असावे. ते स्वप्न आता जनार्दनाच्या आशीर्वादाने पुरे होत आहे. दुसरे स्मरण होत आहे ते नाशिकचे प्रा. वि. मा. दी. पटवर्धन यांचे. प्रबोधनकारांनंतर वि. मा. दी. यांनीच अक्षरशः आमच्या पाठीवरून आधाराचा हात फिरवला होता. आज ते हात जरी दुरावले असले तरीही अशा आदर्शाची जाणीव आम्हाला कुरवाळीत आहे आणि तिसरे स्मरण आमचे बुवासाहेब दांगट यांचे. आजपासून सुरू झालेला हा ‘सामना’ सर्वांसाठी पराकोटीची लढत देणार आणि उद्या महाराष्ट्र विधानसभेवर शिवरायाचा हा भगवा झेंडा आई जगदंबेच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या साधू-संताच्या साक्षीने मजबुतीने फडकविणारच याबद्दल आम्हाला खात्री आहे! जय हिंद, जय महाराष्ट्र!
‘मार्मिक’मुळे शिवसेना, शिवसेना लढाईमुळे सामना सुरू झाला. सामनातील लढ्यामुळे १९९५ साली शिवसेनेला युतीत सत्ता मिळाली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशी विराजमान झाले. गेल्या ४०-५० वर्षांत अनेक दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके निघाली आणि बंदही पडली. परंतु १९८९ साली सुरू झालेल्या दैनिक सामनाची पत्रकारितेच्या विश्वातली घौडदौड आजही सुरूच आहे. सर्व टीका-टोमणे झेलीत, अडथळे पार पाडत पत्रकारितेचे घेतलेले असिधाराव्रत आजही सुरू आहे. अव्यहारिपणे सुरू राहणार आहे. कारण सामन्याच्या मनातील नाद-निनाद हा ‘सामना’ आहे.