टीव्हीवर एक पत्रकार परिषद चालू होती. मुलाखत देणारे नेते एका पत्रकारावर जोरात ओरडले, ‘चूप बस रे…’
पत्रकार म्हणाला, सर, जरा गोड बोला. ओरडता काय?
नेते म्हणाले, अहो, सच्चा मराठी माणूस आहे, गोड बोलणं आणि छुपे वार करणं आपल्या रक्तातच नाही.
ही पत्रकार परिषद झाल्यावर मी खूप विचार करीत बसले. कारण कुठल्याही महत्वाच्या गोष्टीवर विचार केल्याशिवाय मला जमतच नाही. काय आहे की एका मोटिवेशनल स्पीकरने मला विचार करण्यासाठी खूप म्हणजे खूपच प्रेरित केलेले आहे. त्याने मला शिकवले आहे की मध्ये ४-५ मिनिटांचा वेळ मिळाला की त्यात साधक बाधक विचार करत राहावा. म्हणजे जेव्हा घाईघाईत निर्णय घ्यायची वेळ येते, तेव्हा आपल्याकडे विचार तयार असतो. त्यामुळे डोळे मिटून मी दिवसातून १५-२० वेळा तरी हल्ली असे ४-५ मिनिटांचे विचारांचे चक्र पूर्ण करून घेते. घरचे म्हणतात की झोप काढते, पण मला त्याचे काही वाटत नाही.
तर मी असा विचार करत होते की पत्रकाराने एवढी विनंती करूनही नेत्याने ती कशी बाणेदारपणे धुडकावली. याला म्हणतात मराठी अस्मिता. नाही म्हणजे नाही गोड बोलणार. गोड बोलण्याचा संदेश फक्त संक्रांतीला दिला जातो आणि तिला अजून चिकार वेळ आहे.
राजकारण, अर्थकारण, इतिहास सगळीकडे डोकावल्यावर लक्षात आले की ‘व्हिटॅमिन गोड’ची मराठी माणसाला गरजच नसावी. मराठी माणूस गोड बोलला तर त्याचे म्हणणे समोरच्या माणसापर्यंत पोचत नसावे, अन्यथा सकल मराठी जनता अशी का बोलली असती? बघा, म्हणजे उदाहरणाने पटेल. मराठी नवराबायको एकमेकांशी कधी गोड बोलतात का? मराठी आईवडील मुलांशी कधी गोड बोलतात का? म्हणजे आपला मुलगा खेळताना पडला असेल तर बाकीच्या बायका मुलांचे औषधपाणी करतात, आपल्याकडे आई काय म्हणते, कुठे गेला होतास धडपडायला?
मराठी सासू सून हे संबंध बघा. दुकानदार गिर्हाईक हे नातं बघा. चुकून आपण गोड बोललो तर गिर्हाईक पुन्हा आपल्या दुकानात येईल याची दुकानदारांना भीती वाटते. मध्यंतरी मी एका शहरात मिसळ खाल्ली. हॉटेलवाला मला म्हणाला, ‘तुम्हाला तिखट लागलंय का, वडीचं दही देऊ का?’ मराठी माणसाची ही सहृदय वागणूक बघून माझं हृदय भरून आलं. महाराष्ट्रात जन्माला आलेला हा एखादा मूळ गुजराती अथवा मारवाडी हॉटेलवाला तर नाही ना अशी शंका देखील मी त्याला विचारली. पण तसे नव्हते. म्हणजे मराठी माणूसच एव्हढा गोड बोलत होता. महागाई आणि कोरोनानंतरचा काळ मराठी माणसाला काय काय करायला लावेल, सांगताच येत नाही.
बॉस आणि त्याच्या हाताखालचे लोक यांची वागणूक बघितली तर यात मराठी कोण असेल हे लगेच ओळखू येते. आपण हाताखालच्या लोकांना चांगली वागणूक दिली किंवा चुकून गोड बोललो तर ते शेफारतील आणि यानंतर भविष्यात कधीही चांगले काम करणार नाहीत याची बॉसला बहुधा खात्री वाटत असावी. त्यामुळे कितीही उत्तम काम केले तरी तो माफक शब्दांत त्यांची स्तुती करतो.
दहावीमध्ये ९९.९९ टक्के मार्क घेतलेल्या एका मराठी मुलाला त्याची आई रागावत होती, ‘बघ, केला ना हलगर्जीपणा, गमावलास ना ०.०१ टक्का.’ आणि हीच बातमी मैत्रिणीला फोनवर सांगत होती, ‘लेकराने पांग फेडले बाई माझे.’ म्हणजे काय तर मुलांशी चुकून गोड बोललं तर पाप लागतं हे नक्की.
काही वर्षांपूर्वी मी अमेरिकेला गेले होते, तेव्हाची गोष्ट. वॉशिंग्टन रेल्वे स्टेशनवर माझा जरासा गोंधळ उडालेला होता. म्हणून मी जरासा एशियन दिसणार्या एका माणसाला इंग्रजीमधून माझा गोंधळ बोलून दाखवला आणि त्याला मार्गदर्शन करण्यास सांगितले. त्याने जितके त्रासिक आणि तुसडे भाव चेहर्यावर आणणे शक्य असेल तेवढे आणून फक्त एका फलकाकडे बोट दाखवले. मला हव्या असलेल्या माहितीसाठीच्या सगळ्या सूचना त्या फलकावर होत्या. इसमाच्या चेहर्यावरील त्रासिक भाव अजून तसेच होते. मी त्याला मराठीतच विचारले, ‘तुम्ही मराठी आहात काय?’ आता मात्र चेहर्यावरचे त्रासिक भाव बदलून तिथे आश्चर्याने जागा घेतलेली होती. त्याने मला गच्च मिठीच मारली. त्याने विचारले, ‘तुम्ही कसे काय ओळखलंत?’
मी म्हटलं. ‘यशस्वी रीतीने इतका कडवटपणा आणि त्रासिकपणा फक्त मराठी माणूसच चेहर्यावर आणू शकतो. भाऊ, आपल्याला गोड बोलण्याला मनाई आहे.’
मी असंही ऐकलंय की मराठी माणसाच्या पूर्वजांना मधुमेहाचा शोध सगळ्यांत आधी लागलेला होता. त्यावेळच्या एका सुप्रसिद्ध वैद्याने असे सांगितले होते की मराठी माणूस गोड बोलणे जितके सीमित ठेवेल, तितका तो मधुमेहापासून दूर राहील. पण, काही वर्षांपासून मराठी माणूस गोड बोलू लागला आणि परिणाम आपण आज बघतच आहोत. अखंड महाराष्ट्र मधुमेहाने ग्रासला आहे.
मला तर वाटतं की फार जास्त गोड बोलणं मराठी माणसाला परवडणारं नाहीच. त्याचे परिणाम फार भयानक होत असावेत. आता इतिहासच सांगतो की पानिपताच्या मोहिमेवर पेशवे संक्रांतीला निघाले. जिथे सत्तेची युद्ध लढण्याची प्रेरणा संक्रांतीतून मिळते, तिथे गोड कशासाठी बोलायचं?
आता आपले राजकारणी बघा. कसे सांगतात, ‘राजीनामा खिशात घेऊन चालतो आपण.’ म्हणजे हे जर खूप गोडीने त्यांनी सांगितले तर आपल्याला पटेल का? त्यामुळे गोड न बोलण्यातच हशील आहे किंवा मराठी माणसाची खरी ओळख दडलेली आहे. अथवा एखाद्याला मी असा झाडला हे सांगण्यात आपल्याला जो परमोच्च आनंद मिळतो, किंवा अभिमान वाटतो, तो कसा वाटला असता. अमुक एका राज्यकर्त्याला वेड्याच्या इस्पितळात दाखल करायला हवे असे दुसर्या पार्टीचा नेता म्हणाला की अमुक पार्टीचा राज्यकर्तासुद्धा तितक्याच उद्धटपणे उत्तर देतो. यात केवढी म्हणून करमणूक दडलेली आहे. आपण जर असे कणखर आणि उद्धट नसतो तर राज्य घडलेच नसते. मी तर म्हणते प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेल्यावर तितक्याच बाणेदारपणे आपण सांगायला हवे की अशा थुकरट प्रकल्पाची काही गरज नाही.
मराठी माणसाच्या रक्तातच गोड बोलण्याची मात्रा कमी आहे. फेसबुकवर एका मैत्रिणीने विचारले, ‘नवीन लग्न झाले आहे. आजवर मी कधीही कोणाशी गोड बोललेले नाही. पण आता लग्न झालेले आहे. सुरुवातीचे काही दिवस तरी मला सासरच्यांशी गोड बोलावे लागेल, तर ते कसं बोलतात?’ मी एकदम तडफदारपणे लिहिले, ‘गोड बोलण्याचा आणि मराठी माणसाचा काय संबंध? असलं काहीही करू नकोस. नसते लाड आपल्याला परवडणारे नाहीत. वेळीच शहाणी हो आणि आपला विचार मागे घे.’
उद्धट बोलण्याने माणसाचा समोरच्यावर जेवढा प्रभाव पडतो तेवढा गोड बोलण्याने पडणेच शक्य नाही हे माझे ठाम मत झालेले आहे. आता बघा, ‘थोबाडीत ठेवून देईन’ या वाक्याचा कसा जोर पडतो, याऐवजी जर कोणी म्हणाले, ‘असे करणे बरोबर नाही, केल्यास मी रागे भरेन हां’… मला सांगा, दोन्हीही वाक्यातील कोणते वाक्य जास्त प्रभावशाली वाटते?
आपल्या राज्यातील जमीन रांगडी, माणसे रांगडी. मग भाषा गोड आणि सरळ असणारच कशी? एका उत्तर प्रदेशीय सहकार्याने मला एकदा विचारले होते, ‘आप मराठी लोग नॉर्मली बात करते हो तो भी लगता है की झगडा हो रहा है, आप लोग कभी मीठी बात करते नहीं क्या?’ मी त्याला म्हटलं, ‘नहीं, हमें मीठा बोलना मना है…’ मराठी माणसाच्या रांगड्या बोलण्याचा हा उत्तर प्रदेशीय सहकार्याने जर मराठी माणूस गोड नाही असा समज करून घेतला असेल तर ही त्याची अल्पबुद्धी आहे.
मराठी माणसाच्या या रांगड्या बोलण्यातच त्याचा स्वाभिमान दडलेला आहे. तीच त्याची ओळख आहे. तो जर गोड बोलत राहिला असता तर क्रांतीचं बीज मराठी मातीत रुजलंच नसतं. तो जर असा राकट राहिला नसता तर मुगल, आदिलशाही आणि निजामशाहीशी झुंज देणेही शक्यच नव्हते. इतिहासापासून वर्तमानापर्यंत मराठी माणूस भलेही गोड बोलला नसेल, पण देशाप्रती आपल्या कर्तव्याला तो कधीही विसरलेला नाही. मग त्याला उच्चतम पद मिळो अथवा ना मिळो. रांगडं बोलणं हा मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि आपली अस्मिता तर जपलीच पाहिजे.