‘लोकसत्ता’चा छायाचित्रकार प्रशांत नाडकर याचे अकस्मात निधन झाल्याची बातमी आली आणि धक्काच बसला. त्याच्या अनेक आठवणी जागृत झाल्या.
प्रशांत काही वर्षापूर्वी द वीक या इंग्रजी साप्ताहिकासाठी काम करत होता. त्यावेळी गुजरातमधील भुज गावात झालेल्या भूकंपामुळे शेकडो लोक जमिनीखाली गाडले गेले होते. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अकस्मात कोसळलेल्या आपत्तीमुळे सर्वत्र हाहाःकार पसरला होता. घटनेच्या दुसर्याच दिवशी सकाळी प्रशांत विमानाने गुजरातला पोहचला आणि तेथून मोटारीने भुजला गेला. भूकंपग्रस्त लोकांच्या समस्यांचे फोटो घेण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.
तिथे एका कोसळलेल्या इमारतीखाली एक पोकळी निर्माण झाली होती, त्यात कुणाल जोशी नावाचा १४ वर्षांचा मुलगा अडकला होता. त्याच्या पायावर भिंत कोसळल्यामुळे जागचे हलता येत नव्हते. डोक्यावर प्रचंड स्लॅब लोंबकळत होती. अंधारात कुणाल दिसत नव्हता, पण त्याचा आक्रोश ऐकू येत होता. त्या आवाजाच्या दिशेने प्रशांत टॉर्च घेऊन ढिगार्याखाली निर्माण झालेल्या अरुंद मार्गाने गुडघे टेकत हातावर चालत पंधरा फूट आंत शिरला आणि त्याने कुणालचा फोटो घेतला. त्याला धीर दिला, पाणी पाजले आणि परत आला. अग्निशमन दलाचे जवान आणि लष्करी अधिकार्यांच्या विरोधाला न जुमानता प्रशांतने जिवावर उदार होऊन एका फोटोसाठी केवढे धैर्य दाखवले?
चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर कुणालला ढिगार्याखालून बाहेर काढण्यात यश आले, पण त्याचा एक पाय निकामी झाला. तळपत्या उन्हात, उच्च तापमानात अंगाची लाहीलाही होत असताना प्रशांत अशा अनेक ढिगार्यांखाली उंदरासारखा सरपटत जायचा आणि दुर्दैवी जिवांचे फोटो काढून परत यायचा. असे सहा दिवस गेले. एक शर्ट एक पॅन्टवर तो दिवस रात्री मोटारीत झोपायचा. अधूनमधून भूकंप व्हायचा आणि मोटार धडधड हालायची. लोकांची घर शिल्लक राहिली नाही. सर्वजण रस्तोरस्ती तंबू ठोकून त्यात राहायचे. खायला अन्न नाही. प्यायला पाणीही मिळेनासे झाले. अशा परिस्थितीत प्रशांत रोज अनेक फोटो काढून मुंबईत पाठवित होता.
अशीच दुसरी एक आठवण.
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचिरोली गांवात काही जहाल नक्षलवादी पोलिसांना शरण आले होते. सर्व पीपल्स वॉर ग्रुपचे सदस्य होते. या ग्रुपमध्ये असताना कुणीही विवाहबंधनात अडकायचे नाही असा दंडक आहे. पण त्यातून बाहेर पडून विवाह करणार एक जोडपं होतं. पोलिसांनी प्रशांतची त्यांच्याशी गाठ घालून दिली. त्यामुळे भीती नव्हती. अन्यथा कुणाची बिशाद त्यांच्या वाटेला जायची. प्रशांतचा स्वभाव बडबड्या. बोलता बोलता त्याने नववधूकडून बरीच माहिती काढून घेतली. वहिनी, एक सांगा तुम्ही लग्नापूर्वी कसे आणि कुठे कुठे ढिशक्यांव ढिशक्यांव करत होता? मग तीही बोलू लागली. पोलीस ऐकतील म्हणून तिने जवळ बोलावून घेतले आणि आपण बॉम्बगोळे फेकून एकाच वेळी अनेकांचे कसे मुडदे पाडले, त्याचे थरारक वर्णन करुन सांगितले. प्रशांतने पोलिसाला विनंती करून त्याची रायफल तिच्या हातात दिली आणि तिचे फुलनदेवीच्या स्टाईलमध्ये फोटो काढले. जेमतेम साडेचार फूट उंचीची किरकोळ देहयष्टी असणारी ती महिला वजनदार रायफल सहज हाताळत होती, याचे प्रशांतला आश्चर्य वाटले. रायफलीच्या बारीकसारीक पार्ट्समधील तांत्रिक माहितीही तिने प्रशांतला समजावून सांगितली. एव्हाना पोलिसाची कर्तव्यबुद्धी जागृत झाली आणि फोटोतील रायफल माझी होती, याची कुठेही वाच्यता करू नका अशी विनवणी करु लागला. ही गोष्ट प्रशांतने आजपर्यंत गुपीत ठेवली होती.
अशीच तिसरी आठवण.
अभिनेता सलमान खानला फेरा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नरीमन पॉइंट येथील बजाज भवनमधील कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. अधिकार्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर तो बाहेर पडल्यानंतर सुमारे डझनभर प्रेस फोटोग्राफरनी त्याचा पाठलाग करून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. याचा राग अनावर होऊन सलमानने दोन तीन फोटोग्राफरना ठोसे लगावले. मग त्यांनीही जशास तसे ठोसे लगावले.
भर रस्त्यात चालू झालेली फायटिंग आणि अनेक कॅमेरामन त्याचे फोटो काढत आहेत, हे पाहून लोकांना सिनेमाचे शूटिंग चालू असल्याचे वाटले. बघ्यांची गर्दी वाढू लागली तसे सलमान गाडीत जाऊन बसला. या मारामारीचे अनेक आँखो देखे हाल प्रशांत नाडकरने आपल्या कॅमेर्यात अचूक टिपले. त्यावेळी प्रशांत गुजरात समाचारमध्ये नोकरी करत होता. निर्भय पथिक, दोपहर, प्रâी प्रेस, रायटर्स वृत्तसंस्था आदी ठिकाणीही प्रशांतची अनेक छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत.
तो जेव्हा इंडियन एक्सप्रेस ग्रुपमध्ये नोकरीला लागला, तेव्हाचा प्रसंग.
दादर येथील शिवसेना भवनखाली जमलेले शिवसैनिक आणि स्वामी समर्थ मठाजवळचे मनसेचे कार्यकर्ते यांच्यात तुंबळ हाणामारी सुरु झाली होती. एकमेकांवर दगडफेक करण्यात अनेक तरुण मुले जखमी झाली. ही लढाई दोन तीन तास चालू होती. पुरेसा पोलीस फाटा आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित असतानाही दंगल आटोक्यात येत नव्हती. प्रशांत नाडकर आणि मी या दंगेखोरांचे फोटो टिपत होतो. एका बेसावध क्षणी भला मोठा दगड प्रशांतच्या डोक्यावर येऊन आदळला. आणि तो क्षणात रक्ताने लालबुंद झाला. नशिबाने डोळा वाचला. एका मागोमाग एक दगड माझ्या पायाजवळ येऊन पडले, पण माझे दैव बलवत्तर म्हणून एकही दगड लागला नाही. मी प्रशांतला शेजारच्या दुकानात घेऊन गेलो आणि मूठभर हळदीचा बुक्का जखमेवर लावला, तरीही रक्त थांबेना मग डोक्यावर घट्ट रुमाल बांधला. तोही रक्ताने ओलाचिंब झाला. अशा अवस्थेत तो मोटरसायकल चालवत नरीमन पॉइंट येथील एक्स्प्रेसच्या ऑफिसमध्ये गेला. रात्रपाळीच्या पत्रकारांना त्याने घडलेली हकीगत सांगितली. सर्व फोटो संगणकावर टाकले पण अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे दवाखान्यात गेला. डॉक्टरांनी त्याच्या डोक्यावर चार टाके घातले. दोन दिवसांची विश्रांती घेऊन हा पठ्ठ्या पुन्हा लढाईवर जाण्यास तयार झाला.
अगदी काल परवापर्यंत म्हणजे कोरोनाच्या संक्रमण काळात तो मुंबई नाशिकपर्यंत फोटो काढत फिरत होता. त्याने प्रकृतीकडे लक्ष दिले नाही. त्याचा परिणाम असा झाला की ज्या ठिकाणी दगड लागला होता, त्या दुखण्याने उचल खाल्ली आणि त्याचे डोके वारंवार दुखू लागले. रोज हॉस्पिटलच्या वार्या सुरु झाल्या. अनेक नामांकित डॉक्टरांनी औषधोपचार केले. कित्येक तपासण्या, एक्सरे, उलटसुलट रिपोर्ट, गोळ्या आणि इंजेक्शन घेऊन प्रशांत पार थकून गेला. प्रकृती साथ देईनाशी झाली. दुर्दैवाने डोळ्यावर परिणाम झाला आणि दृष्टी गेली. सर्वत्र अंधार दिसू लागला. उषःकाल होता होता काळरात्र झाली. इच्छा असूनही नोकरीवर जाता येत नव्हते. गेले वर्षभर तो घरी होता. मालकाने नोकरीवरून काढले नाही, पण पगार देणे बंद केले. लाखो रुपये औषधपाण्यावर गेले. सर्व पैसे संपले. एक दागिनाही शिल्लक राहिला नाही. कर्ज काढून घर घेतले होते, त्यावरही जप्ती आली होती.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात त्याने अनेक फोन केले. मी म्हणालो येतो नक्की येतो भेटायला. त्यावर तो म्हणाला आलास तर १५ डिसेंबरच्या आत ये. कारण १५ तारखेला घरावर जप्ती येणार आहे. त्यानंतर मी नसेन तेथे.
आता तर तो या जगातच नाही. प्रेस फोटोग्राफरने कसे असावे, याचा आदर्श असलेल्या प्रशांतच्या पदरात नियतीने त्याच्या गुणांना साजेसे दान टाकले नाही, याची खंत कायम राहील.
प्रशांतला आदरांजली.