आईवडील मुलांना सांगतात की आम्ही तुमच्यासाठी खस्ता खातोय, मुलांना वाटतं, आईवडिलांच्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठीच आपण जगतो आहोत… यातलं खरं काय?
– सावित्री झेंडे, हडपसर
आईवडिलांमुळे मुलं जन्म घेतात आणि मुलांच्या जन्मामुळे आईवडील या नात्याचा जन्म होतो, हेच खरं आहे… उत्तर आवडलं, पटलं असेल तर सांगा… मी पण बैठक भरवत जाईन म्हणतो…
‘सत्यमेव जयते’ ही प्रतिज्ञा खरी मानून एक दिवस सगळे भारतीय खरं बोलू लागले, तर काय होईल?
– दानिश शेख, राजापूर
म्हणजे खोटं कोणीच बोलणार नाही?? मग नेता कोण बनणार याच्यावरून भांडणं सुरू होतील. (काही कळतंय का बघा…)
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?
– रेवा पोंक्षे, धंतोली
बायको माहेरी गेल्यावर जे नवर्याला वाटतं तेच सुख असतं.. असं मला तरी नक्की वाटतं…
सगळ्यात घातक नशा कोणती? दारूची, भांगेची, ड्रग्जची की आणखी कशाची?
– वसंत नलावडे, कोल्हापूर
मिस्टर वसंत, तुम्हाला कुठली नशा आहे पसंत? तेवढीच विचारा ना! आडून आडून कशाला विचारताय?
सिनेमाच्या चालीवर भजनं रचून गाणे ही भक्तीची कोणती पातळी आहे, असं वाटतं तुम्हाला?
– प्रवीण शिंदे, घाटकोपर
डीजेच्या पातळीपेक्षा खूपच कमी पातळी आहे ही!
मी लॅपटॉप विकत घेतलाय. घरातूनच काम करायचं म्हणतोय. आता एक नोकरी मिळायला पाहिजे फक्त! तुमच्या माहितीत आहे का असं काही काम?
– प्रणय पंडित, बेळगाव
आता नोकरी मागा… मग पगार मागा… मग पेन्शन मागा… मग जुनी पेन्शन मागा… तुमच्या आयडिया माहितीयत.. तुमच्यासारख्या लोकांमुळेच आपल्याकडे आलेले प्रोजेक्ट बाहेर जातात… संस्था बाहेर जातायत… असंच केलंत तर एक दिवस सरकार पण बाहेर जाईल…मग बसा मला प्रश्न विचारत.
आजकालच्या मुलींना साधा, सरळ मुलगा का बरं आवडत नाही?
– संतोष पाटील, रोहा
साधा आणि सरळ या शब्दांशी तरी आपला संबंध आहे का? आडनाव सोडा… नावावरुनच सांगतो.
२०२४मध्ये कोण पंतप्रधान होईल असं तुम्हाला वाटतं?
– उषा परांजपे, दापोली
सांगेन… पण दक्षिणा कोण देणार?… तुम्ही… की जे पंतप्रधान होतील ते?
ज्याच्यातून माणसाला आवश्यक असलेली सर्व व्हिटॅमिन्स मिळतील, असे कोणते फळ आहे?
– रामेश्वर साळुंखे, पनवेल
फणस.. पण आख्खा एकट्याने खायचा… सालीसकट.
पृथ्वी स्वत:भोवती फिरतेच, पण ती सूर्याभोवतीही फिरतेय. म्हणजे आपण एकाच जागेवर दोनवेळा कधीच नसतो. हे खरे आहे ना?
– सावनी पाळंदे, पुणे
अर्धच खरं आहे मॅडम. पृथ्वी चंद्राभोवती फिरते तेव्हा कोण कोणाभोवती फिरतो ते कोण कोणाला कधीच सांगत नाही.
बँकवाले नेहमी चेकच्या मागे का सही करायला सांगतात? बरं, तिथे सहीसाठी मार्किंगही करत नाहीत… पंचाईत होते ना राव…
– सुरेश सावंत, लोणावळा
थोडे दिवस थांबा.. उरल्या सुरल्या बँका बुडाल्या की तुम्हाला वाटेल तिथे सह्या करा.. (अहो का हुशारी करताय? अडाणी माणूस पण बँका सांगतील तिथे सह्या करतो.. आणि करोडो रुपये कर्ज घेऊन ते माफ पण करुन घेतो.)
एखाद्या पुरुषाला तो म्हातारा झाला आहे याची जाणीव केव्हा होते?
– अशोक परब, सावरकर नगर, ठाणे
जाणीव सोडा… असे प्रश्न पडतात तेव्हाच पुरूष म्हातारा झालेला असतो.
माणूस ‘जोरू का गुलाम’ कसा बनतो?
– अन्वर शेख, कुर्ला
नो पर्सनल प्रश्न प्लीज…
तुम्हाला रोज लोक किती शिव्या देतात, याचा काही हिशोब आहे का तुमच्याकडे?
– कुंदा मुनघाटे, वरोरा
का?? त्यातल्या काही तुम्हाला हव्या आहेत का?