ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सुरु होता… हृषिकेशला पगार झाल्याचा मेसेज आला. काही पैसे काढण्यासाठी तो घराजवळच्या बँकेच्या शाखेत गेला. तिथे गेल्यावर त्याला कळलं की त्याच्या सेव्हिंग्ज खात्यात जमा झालेल्या पगारातून सहा हजार रुपयांची रक्कम कट झाली होती. त्याने कोणताही व्यवहार केला नव्हता, पैसे काढले नव्हते, कसलंही डिडक्शन ड्यू नव्हतं, मग हे पैसे कसले कट झाले, हे त्याला कळेना. हा प्रकार काय आहे, हे समजून घेण्यासाठी त्याने बँकेच्या अधिकार्यांशी संपर्क साधला. तेव्हा नेहमीप्रमाणे, चौकशी करून सांगतो, असे उत्तर त्याला मिळाले. आपला विम्याचा हप्ता नाही की घराच्या कर्जाचा हप्ता नाही, असे असताना हे सहा हजार रुपये नेमके कसे कट झाले, याचा शोध हृषिकेश पण घेऊ लागला.
दुसर्या दिवशी कंपनीत गेल्यावर आधी त्याने अकाउंट्स विभागाकडे धाव घेतली आणि त्यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्यांच्याकडून त्याला समाधानकारक उत्तर मिळेना. हैराण झालेल्या हृषिकेशने दुपारच्या जेवणाच्या सुटीत कॉम्प्युटरवरून त्या बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधला आणि त्या नंबरवर फोन केला. कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हने विचारले, सर, तुमची काय तक्रार आहे. हृषिकेश म्हणाला, माझ्या खात्यामधून परस्पर सहा हजार रुपये काढले गेले आहेत. ते मी काढलेले नाहीत. ते कोणी, कसे काढले, ते मला सांगा आणि माझ्या अकाऊंटवर ते परत जमा करून घ्या. त्यावर त्या एक्झिक्युटिव्हने तक्रार घेऊन आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे हृषिकेशचे टेन्शन थोडे हलके झाले. दुपारी चारच्या सुमाराला हृषिकेशच्या मोबाईलवर एक फोन आला, मी बँकेतून बोलत आहे, तुमचे पैसे बँकेतून कट झाल्याची तक्रार रिफंड विभागाला प्राप्त झाली आहे. तुम्हाला हे पैसे परत द्यायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला ‘एनीडेस्क’ नावाचे एक अॅप डाउनलोड करावे लागेल. त्याची लिंक तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवत आहे. हृषिकेशने ते अॅप डाउनलोड केले. तुम्हाला पैसे द्यायचे आहेत, त्यामुळे तुमचे बँक अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला १० रुपयाचा एक व्यवहार करावा लागेल, असं त्या व्यक्तीने सांगितल्यानंतर हृषिकेशने १० रुपयाचा व्यवहार केला. त्या अधिकार्याने हृषिकेशला सांगितले, तुमचे खाते व्हेरिफाय झाले आहे. आता तुमच्या खात्यामध्ये तुमचे चुकीने कट झालेले सहा हजार रुपये जमा होतील. आणि हो, सगळ्यात महत्वाचे म्हणजे बँक तुम्हाला ५० हजार रुपयांची रक्कम नुकसान भरपाई म्हणून देणार आहे, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये एकूण ५६ हजार रुपये जमा होतील. तुमचे पैसे जमा झाले की आम्हाला लगेच या क्रमांकावर कळवा. हे बोलणे संपते ना संपते तोच हृषिकेशच्या बँक खात्यामधून ५६ हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज त्याला आला. ५६ हजार रुपये क्रेडिट होण्याच्या आपल्याच अकाऊंटमधून ते डेबिट कसे झाले, म्हणून हृषिकेशने पुन्हा त्या क्रमांकावर फोन केला आणि झालेला प्रकार सांगितला. तेव्हा, हा प्रकार चुकून झाला असेल, आता तुम्हाला एक लाख १२ हजार रुपये येतील, तुम्ही फोन बंद करू नका, असे त्याला सांगितले गेले. हृषिकेशने त्याच्यावर विश्वास ठेवून फोन सुरूच ठेवला. तेव्हा त्याला परत ५६ हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला.
आपण इथे पुरते फसलो आहोत, अशी शंका हृषिकेशला आली. त्याने लगेच तो फोन कट केला आणि बँकेत जाऊन ते अकाउंट फ्रीझ केले. सहा हजार रुपये कसे कट झाले, याचा शोध घेण्यासाठी निघालेल्या हृषिकेशने इंटरनेटवर बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर शोधतानाच चूक केली होती. त्याने आर्थिक गैरव्यवहार करणार्या टोळीने टाकलेला बनावट नंबर डायल केला आणि तो आयताच त्यांच्या जाळ्यात सापडला.
हा सगळा प्रकार घडल्यानंतर हृषिकेशने या सगळ्या प्रकारची थेट पोलिसात तक्रार केली. त्याची झाली तशीच फसवणूक झाल्याच्या दोन तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. पोलिसांनी या प्रकारांचा छडा लावण्याचे ठरवले आणि तपासाला सुरुवात केली. हृषिकेशची ज्या नंबरवरून फसवणूक झाली होती, त्याचा तपशील काढल्यावर पोलिसांना हा प्रकार दिल्लीमधून झाल्याचे समजले. आरोपींनी हृषिकेशची फसवणूक केल्यानंतर तो मोबाईल क्रमांक बंद करून टाकला होता. पोलिसांनी तो फोन सुरु असताना त्याचे अखेरचे लोकेशन शोधून काढले आणि दोन पथकांची स्थापना करून याचा छडा लावण्यास सुरुवात केली. दिल्लीतल्या ज्या भागातून हा प्रकार घडला होता, त्या ठिकाणी पोलिसांचे एक पथक जाऊन थडकले. दिल्ली पोलिसांची मदत घेऊन सायबर सेलने या प्रकरणाची पाळंमुळं खणायला सुरुवात केली, तेव्हा एका परिसरात दोन बेडरूमच्या फ्लॅटमधून हे रॅकेट सुरु असल्याचे त्यांना आढळून आले. पोलिसांनी तिथे छापा टाकून हे उद्योग करणार्या मंडळींना ताब्यात घेतले. तेव्हा आपण इथे नोकरी करतो आहोत, असे त्यांनी सांगितले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी हा सगळा प्रकार कसा सुरु होता, हे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी केलेल्या प्रयत्नामुळे या रॅकेटचा भंडाफोड झाला. या टोळीतल्या सदस्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी जेलमध्ये केली गेली. त्यांच्या खात्यांमध्ये वळती झालेली रक्कम तक्रारदारांना परत करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली. केवळ सुदैवानेच हृषिकेशचे पैसे परत मिळाले.
हे लक्षात ठेवा…
आपण फार सहजतेने गुगलवर विश्वास ठेवतो. गुगलच्या सर्च इंजिनवर बँकांचे, पेटीएम, गुगल पे यांच्या कस्टमर केअरचे नंबर शोधतो आणि त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतो. असे नंबर शोधताना सावध राहा. पॉपअप, अॅड किंवा खोटी माहिती देणार्या वेबसाईटपासून सावध राहायला हवं. मूळ बँक किंवा संस्थेचं हुबेहूब पेज बनवून खोटे, फसवे क्रमांक दिले जातात. ते या फ्रॉड मंडळींचेच असतात. तिथून पुढे तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकता. मग ते तुम्हाला खेळवत खेळवत लुटून मोकळे होतात. महत्वाचे म्हणजे कस्टमर केअर म्हणून कोणतीही कंपनी कधीही मोबाईल क्रमांक देत नाही, तो कायम लँडलाइन नंबरच असतो, हे डोक्यात फिट करून ठेवा. त्याचबरोबर कोणतीही बँक किंवा फायनान्स कंपनी ही ‘एनीडेस्क’सारखे रिमोट अॅक्सेस असणारे अॅप डाऊनलोड करण्यास सांगत नाही. तुम्ही शहानिशा न करता असे अॅप डाऊनलोड केले तर तुमच्या बँक खात्याची माहिती त्यांच्याकडे अगदी सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि आपण एका क्षणात कंगाल होऊन जातो. ऑनलाइन कोणाच्याही सूचनांनुसार आपण कोणतेही अॅप डाऊनलोड करण्याची चूक करू नये.