काही माणसं म्हणतात, कल किसने देखा, आजच जे काही जगायचं ते जगून घ्या, मजा करून घ्या. काही माणसं सांगतात, उद्याची तजवीज आजच करून ठेवा, मौजमजा करू नका, बचत करा. तुम्ही काय करता?
– सावनी बाळापुरे, नांदेड
मी जनाचं ऐकतो… आणि मनाचं करतो.
आमीर, सलमान, शाहरूख या तीन खानांपैकी तुमचा आवडता खान कोणता आणि का?
– प्रांजली पाटील, सातारा
प्रांजळपणे सांगतो प्रांजलीताई… हे खान मला का आवडतील? राष्ट्रभक्त आहे मी. खानांऐवजी जनानखाना आवडतो. पण हे कोणाला बोलू नका… उगाच राष्ट्रद्रोही ठरायचो.
अलीकडे का कोण जाणे, रोज पहाटे पहाटे दचकून जाग येते… काय कारण असेल?
– तरूणकुमार कांबळे, अकोला
इडी पीडेची भीती वाटत असेल. तसं नसेल तर लवकर श्रीयुत बना. तरुण आहात, त्यात कुमार आहात… रात्र तळमळत काढल्यावर पहाटे डोळा लागतो तेवढ्यात दुधवाला येतो. ते घ्यायला हक्काचा माणूस आला की पहाटे पहाटे जाग येणार नाही.
बायका नवर्यांना ‘थोडं जेवून घेता का?’ याच्याऐवजी ‘थोडी घेऊन जेवता का?’ असे म्हणाल्या तर?
– अशोक परब, सावरकर नगर, ठाणे
बायकोने ‘घेतली’ नाहीये ना ते आधी चेक करा.
संतोष भाऊ, जगातला सर्वात जास्त कमाई करून देणारा धंदा कोणता?
– पांडुरंग फुलकर, बारामती
कितीही हुशार असलात, तरी अडाणी बनून कुठलाही धंदा करा… पैसाच पैसा कमावाल… वर कसली चौकशी नाही… कर्ज माफ… देशाच्या जडणघडणीत तुमचं नाव घेतलं जाईल ते वेगळंच!
उशीखाली लसणाच्या पाकळ्या ठेवून झोपल्यावर चांगली झोप लागते म्हणे… तुमचा अनुभव काय?
– आत्माराम पाठराबे, अकोला
असे अनुभव स्वत:चे स्वत:च घ्यायचे असतात आत्मारामजी, आत्मनिर्भर बना. लसणाच्या पाकळ्या घेऊन झोप लागलीच तरी घरी कळू देऊ नका… बायको लसूण लपवून ठेवेल… मग स्वत:चाच हात उशाखाली घेऊन झोपायची वेळ येईल…
तुमच्या लहानपणी तुम्हाला कोण बनायचं होतं?
– ऋत्विक देशपांडे, खारघर
लहानपणी नवरा बनायचं होतं. पण आमच्या लहानपणी भातुकली कालबाह्य झाली होती. म्हणून मोठेपणी नवरा झालो. आणि खर्या संसारात भातुकलीतला नवरा बनून उरलो.
तुम्हाला आंबे कसे खायला आवडतात, कापून, सोलून की चोखून?
– अविनाश बनसोडे, नाशिक
आंबे कुठले आहेत त्यावर अवलंबून आहे.
उन्हाचा तडाखा सुरू आहे सध्या. काही थंड घेता की नाही अधूनमधून?
– संतोष पाटणकर, जत
अधूनमधून नाही… रोज घेतो… कंपनी द्यायला येताय का? पण तुमची तुम्ही घेऊन या… रोज सरबताची बाटली!
मुलगी पाहायला गेले आणि लग्न झालेली मेव्हणीच पसंत करून आले, असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का?
– रत्नाकर चव्हाण, पाटोदा
का अडचणीचे प्रश्न विचारताय… एक वेळ डिग्री दाखवायला सांगा ती दाखवतो… पण असे नाजुक प्रश्न विचारू नका.
पवार साहेब, तुम्ही अधूनमधून नॉट रिचेबल का होता हो? केवढं टेन्शन येतं सगळ्या महाराष्ट्राला.
– मैथिली रावराणे, पाताळगंगा
टेन्शन नाही ओ… लोकांचं पित्त खवळतं (तेवढाच इम्पॉर्टन्स मिळतो… हे फक्त तुमच्या माझ्यात.)
‘ती येते आणिक जाते, येताना कधी कळ्या आणिते अन् जाताना फुले मागते…’ याचा अर्थ काय?
– सायमन रॉड्रिग्ज, मीरा रोड
याचा अर्थ फुलवालीची उधारी ठेवू नका. त्याच दिवशी पैसे द्या. आज कळ्या घेऊन, दुसर्या दिवशी पैसे देतो असं सांगून, तुम्ही पैसे नाही दिलेत आणि तिने कळ्याच मागितल्या, तर तुम्ही कळ्या कुठून देणार? नशीब समजा ती फुले मागतेय.