खारघर दुर्घटना घडल्यानंतर दुसर्या दिवशी माझा परमप्रिय मानलेला मित्र पोक्या याचं कुरियर मला मिळालं. नेहमीप्रमाणे माझ्या भेटीला प्रत्यक्ष न येता याने कुरियर का पाठवलं, याचा खुलासा ते उघडल्यावरच झाला. त्यात तो लिहितो, ‘टोक्या, मला माफ कर. मी तुझ्या भेटीला येऊ शकलो नाही. मी फार विमनस्क अवस्थेत आहे. खारघरला महाराष्ट्र भूषण सत्काराच्या वेळी मी तिथेच व्यासपीठाशेजारी रेंगाळत होतो. काही विपरीत घडणार असेल तर त्याची चाहूल मला कधीकधी आधीच लागते. त्यामुळे मी आदल्या दिवसापासूनच बेचैन होतो. मला सिक्स्थ सेन्स आहे, असं मला वाटतं. यापूर्वीही काही वाईट घटना घडण्यापूर्वी मला तसे काही ना काही संकेत मिळाले होते. त्यामुळे मी सावध असलो तरी अस्वस्थ होतो. उन्हाचा एवढा तळतळाट होता की डोक्यावर टोपी घालूनही त्याचा काही उपयोग नव्हता. मी व्यासपीठाच्या आडोशाला सावलीत उभा असलो, तरी समोर उन्हात अंगाची काहिली होणारे जीव पाहून मनाचा थरकाप होत होता. पाण्याचे टँकर जनसमुदायाच्या एकाच बाजूला लावले असल्यामुळे दुसर्या टोकाकडील श्री भक्तांना पाणी मिळणं मुश्कील होतं. चार-पाच तास काही खाल्ले नसल्यामुळे त्यांच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. त्यात काहीजण घेरी आल्यामुळे पडत होते. त्यातील काही बेशुद्ध झाले होते.
मी व्यासपीठावर मागच्या बाजूने जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांना सांगितले की समोर बसलेल्या श्रीसेवकांची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. काही बेशुद्ध झाले आहेत, तर काही तडफडत आहेत. तुम्ही तातडीने लक्ष घाला. त्यावर सीएम म्हणाले, ‘सगळी व्यवस्था चोख केली आहे. तुम्ही काळजी करू नका.’
मी बाहेर आलो तेव्हा तिथे गर्दीच्या एका बाजूला पाणी पिण्यासाठी टँकरपुढे माणसांची एकच गर्दी झाली होती, काही श्रीसेवक पाणी मिळेल म्हणून जीव मुठीत घेऊन पाण्याच्या दिशेने धावत होते. अंगात त्राण नसल्यामुळे काहीजण तिथेच इतर श्रीसेवकांच्या अंगावर कोसळले. जमाव वाटेल तसा पाणी पाणी करत धावत असताना एकच चेंगराचेंगरी झाली. त्यात काहीजण दुसर्यांच्या पायाखाली तुडवले गेले. सगळीकडे हलकल्लोळ माजला, तरी व्यासपीठावरून मोठमोठ्या वक्त्यांची लांबलचक भाषणबाजी सुरूच होती. समोर विदारक दृश्य दिसत असताना त्यांचे वाक्तुषाराचे फवारे उडतच होते. त्यातच कसाबसा महाराष्ट्र भूषण सोहळा उरकून घेण्यात आला.
निदान त्यानंतर व्यासपीठावरील एकातरी नेत्याने खाली उतरून प्रत्यक्ष जमावात जाऊन काय परिस्थिती आहे याचं आकलन करून घेण्याची गरज होती. पण व्यासपीठावर थंड एसीची हवा खात बसलेल्या आणि थंडगार बाटल्यांमधून स्वत:ची तहान शमवणार्या एकाही नेत्याला समोर तहानेने तडफडत असलेल्या जिवांची दया आली नाही किंवा त्यांच्यासाठी दयाबुद्धीने तरी धावून जावं, असं वाटलं नाही. कारण त्या गर्दीत आपणही तुडवले गेलो असतो, अशी भीती त्यांना होती. समोर अॅम्ब्युलन्सचे सायरन वाजत होते. जवळजवळ तिथेच बारा जणांचा जीव गेला होता.
श्री भक्तच एकमेकांना सावरत मदत करत होते. सर्वत्र बेशुद्ध पडलेल्या महिला, त्यांना पाणी देणारे कार्यकर्ते, पंख्याने वारा घालणार्या बाया दिसत होत्या. डॉक्टरांचे पथक बेशुद्ध माणसांवर उपचार करत होते. युद्धभूमीसारखं सारं वातावरण होतं. पण काळीज नसलेल्या माणुसकीशून्य नेत्यांना त्यांची काहीच पडली नव्हती. जखमी आणि बेशुद्ध लोकांना तातडीने इस्पितळात हलवण्यात येत होतं. सगळीकडे हाहाकार माजला होता, पण एकाही नेत्याने बाहेर काय चालले आहे, याची विचारपूस केली नाही. उलट ती सारी व्यासपीठावरील व्हीआयपी मंडळी शाही मेजवानीसाठी जाण्याच्या तयारीत होती. बाजूच्या एका बंद शामियान्यात त्यांच्या शाही भोजनाची सोय केली होती. हा म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार होता. पण त्या निगरगट्ट नेत्यांना त्याचे काहीच नव्हते. कारण त्यांचे राजकीय काम झाले होते.
मी गुपचूप आत शिरलो आणि कोपर्यात एका पडद्यामागे उभा राहून सारा प्रकार पाहात होतो. गारेगार शामियान्यात पंचपक्वानांची जेवणावळ सुरू होती. दिमतीला हातात पंचपक्वानांच्या थाळ्या घेऊन रूबाबदार वेषात वाढप्यांची फौज कुणाला काय हवे नको ते बघत होती. अमित शहांसाठी ढोकळा, खांडवी, थेपले, उंधयू अशा गुजराती पदार्थांची खास रेलचेल होती. ते मिटक्या मारत खात होते. ‘इतना अच्छा खाना बहोत दिन से नहीं खाया’ असं म्हटल्यावर मुख्यमंत्र्यांची कॉलर टाईट झाली. त्याशिवाय पंगतीत वांग्याचं मसालेदार भरीत, वाटल्या डाळीचे कढीवडे, शेवयांची ड्रायफ्रूट खीर, पाच प्रकारच्या कोशिंबिरी, केशरी भात, पंचामृत लाडू, पुरणपोळ्या, थंडगार पन्हे, जीरा सरबत असा सारा खास बेत होता.
कधी खायला मिळत नाही अशा तर्हेने काहीजण हादडत होते. सारेजण मुख्यमंत्र्यांची इतके स्वादिष्ट भोजन खिलवल्याबद्दल तारीफ करत होते. ‘अगले टाईम मोका आया तो इससे बेहतर खाना खिलाऊंगा’ अशा शब्दात त्यांनी तृप्तीचा ढेकर दिला आणि आजचा समारंभ कसा दृष्ट लागण्याजोगा झाला अशा शब्दात सारेजण मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत होते.
बाहेर घडलेल्या दुर्घटनेबद्दल एक तरी नेता बोलेल, असं वाटलं होतं, पण फडणवीसांसह सारेजण शहा यांची खुषमस्करी करण्यात दंग होते. मसाला पान मागवू का, असे सीएमनी आग्रहाने विचारताच झाले तेच खूप झाले, मन तृप्त झाले असे सर्वांनीच बोलून दाखवत सीएमचे आभार मानले.
हा सारा प्रकार पाहून मला मात्र राहवले नाही. मी तडक पडदा सारून बाहेर आलो आणि म्हणालो, मुर्दाड नेत्यांनो, तिथे बाहेर उन्हात तडफडून सोहळ्यासाठी आलेले भक्त मरताहेत, बेशुद्ध पडताहेत आणि तुम्ही इथे मेलेल्यांच्या श्राद्धाचे जेवण जेवत बसलात काय? या पापाला क्षमा नाही. निदान आता तरी बाहेर जा आणि काय हलकल्लोळ उडालाय तो स्वत:च्या डोळ्यांनी पाहा…
मी हे बोलताच त्यातील काहीजण धावले तर काही मागच्यामागे निघून गेले. मग पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे, असे म्हणून अमित शहाही सटकले. धन्य तो स्वार्थीपणा, धन्य ते नेते…