सुट्टी सुरू झाली की आम्ही वेगवेगळ्या गोष्टींच्या योजना आखायच्या, त्यात या सुट्टीत कुठे फिरायला जायचे आणि कोणकोणते खेळ खेळायचे याचा विचार सगळ्यात आधी व्हायचा. हल्ली आपण नवीन खेळणी, गेमिंग कन्सोल, प्लेस्टेशन किंवा ऑनलाइन गेम खरेदी करतो. पण, त्यासाठी सुट्टी कशाला हवी? हे खेळ असतातच की बारा महिने सोबतीला. एरवीही तेच खेळत असता ना तुम्ही?
तुमचे आई-वडील किंवा काका, मामा वगैरे तुमच्या वयाचे होते, तेव्हा त्यांच्याकडे हे गेम्स नव्हते, हे तुम्हाला माहिती असेलच (कारण सतत आमच्या वेळी हे असं नव्हतं आणि तसं नव्हतं, हे सांगतच असतात ना ते). पण, त्यांच्याकडे मोबाइल नव्हता, टीव्ही नव्हता, प्लेस्टेशन नव्हतं तर ते काय खेळत असतील, याचा विचार केलात का कधी?… अरे नाही, मी क्रिकेट, फुटबॉल किंवा बॅडमिंटनबद्दल बोलत नाहीये. हे पण सुट्टीत खेळले जाणारे खेळ आहेतच, पण त्यांच्यात ती मजा नाही, जी मी सांगतोय त्या खेळांत आहे. हे आपले पारंपरिक खेळ आहेत आणि मोस्टली तुम्ही ते खेळलेले असण्याची शक्यता नाही. आंधळी कोशिंबीर, लगोरी, लपंडाव, विटी दांडू ही त्या खेळांची नावं आहेत. ती पण तुम्ही कधी ऐकलेली नाहीत? जाम बोअर पब्लिक आहात यार!
या गंमतीशीर नावांप्रमाणे हे खेळही अतिशय मजेदार, खेळायला सोपे आणि मिळून मिसळून खेळता येणारे आहेत. परीक्षा आणि निकालांचा सगळा ताण अगदी चुटकीसरशी काढून टाकणारे खूप छान ‘स्ट्रेस बस्टर्स’ आहेत हे. तुमच्यातल्या काहींनी हे खेळ खेळले असतील. त्यांना गोळा करा आणि माहिती घेऊन खेळा. मी बेट लावून सांगतो की तुम्ही सर्व या खेळांचा नक्की आनंद घ्याल आणि मजा कराल.
यांतला माझा सर्वात आवडता खेळ म्हणजे आंधळी कोशिंबीर. या गेममध्ये एकाच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि त्याने इतरांना पकडण्याचा प्रयत्न करायचा. जो या पट्टी बांधलेल्याच्या तावडीत सापडतो, त्याच्यावर पुढचं राज्य येतं आणि त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते. इतरांनी मिळून डोळे बांधलेल्याची दिशाभूल करायची ही यातली सगळ्यात मेन गंमत. तीच या खेळातील मज्जा आहे. एका बाजूला टाळी वाजवायची आणि शांतपणे दुसर्या बाजूला जाऊन उभे राहायचे, असे उद्योग पोरं करतात या खेळात.
लगोरी हा अतिशय स्पर्धात्मक खेळ. यामध्ये दगडांचा किंवा ठोकळ्यांचा एक मनोरा बसवला जातो. एक संघ बॉलने हा छोटेखानी मनोरा तोडतो आणि तो पुन्हा बांधण्यासाठी धावतो. पण या खेळातील ट्विस्ट असा आहे की मनोरा उभारताना प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूने या संघातील खेळाडूला चेंडू मारला आणि तो त्याला लागला तर संपूर्ण संघ सामना गमावतो. ही धावपळ करण्यात आणि पाडलेला मनोरा उभारण्यात किती मज्जा-उत्साह-जोष असतो ते हा खेळ खेळल्यावरच कळते. चेंडू चुकवून खापर्यांचा मनोरा पुन्हा उभारण्याची धडपड खूपच उत्साहपूर्ण असते. ही एक्साइटमेंट तुम्हीही अनुभवाच…
लपंडाव, लुका-छुपी किंवा हाइड अँड सीक हा पण एक मजेदार खेळ. यात ज्याच्यावर राज्य असतं तो भिंतीकडे तोंड करून एक ते पन्नास आकडे मोजतो आणि तेवढ्या वेळात खेळातील इतर सगळे लपून बसतात. त्यांच्यापैकी काहीजण तर अत्यंत रहस्यमय ठिकाणी लपतात. त्यामुळे शोधणार्याची अक्षरशः दमछाक होते. जो सापडेल, त्याच्यावर पुढचं राज्य येतं. एखाद्याने याच्या पाठीत धपाटा मारला तर राज्य कंटिन्यू करावं लागतं.
विटीदांडू हा मोकळ्या मैदानात खेळायचा खेळ. बांबूचा दीड-दोन फुटी दांडू आणि दोन्ही बाजूला टोक केलेली चारपाच इंचाची विटी. जमिनीत खाच करुन पिच तयार करायचे. तिच्यावर विटी ठेवून ती कोलायची (म्हणजे काय ते पप्पांना विचारा). ती कुणाच्या हाती लागली आणि त्याने झेलली तर आऊट. नाहीतर ती पुन्हा दांडूने विशिष्ट पद्धतीने उडवून टोलवायची. तिच्यामागे धावत राहायचं.
चलो भाईलोग, मार्मिक रख्खो और निकलो घर से बाहर… तेवढा वेळ मोबाइलपासून पण दूर राहाल, हा बोनस!