उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत फिरायला गेलं नाही, तर ती सुट्टी फाऊल ठरते, असे शेजारच्या रश्मी वहिनी सांगत होत्या. हे ऐकलं मात्र, आमचे धाबे दणाणले, माझ्या तर अस्मितेलाच धक्का बसला; मराठी माणसाची अस्मिता आहे, कधीही धक्का बसू शकतो. मी लगोलग घरी येऊन हे सगळ्यांना सांगितलं. सुट्टीत फिरायला जायचा विचारही मनात येऊ नये म्हणजे आपण किती मागासलेले आहोत याची कल्पना आहे काय? असा रोखठोक प्रश्नही मी उपस्थित केला.
मग आमच्या चौकोनी टेबलाभोवती आमची परिषद भरली. किमान मराठी अस्मितेचा विचार करून तरी आपल्याला फिरायला जायलाच हवं, यावर सगळ्यांचं एकमत झालं. या बाबतीत आम्ही मराठी माणसांपेक्षा वेगळे निघालो. एकमत होतंय म्हणजे काय? कुठे फिरायला जायचं यावर मात्र एकमत होणं जरा अवघड म्हणजे जवळपास अशक्यच होतं. मला कुठेही चालणार होतं. लेकीला थंड हवेचं ठिकाणच हवं होतं. लेकाला जिथे पुष्कळ राइड्स असतील अशा ठिकाणी जायचं होतं आणि नवर्याला तर गेलं नाही तरी चालणार होतं. जायचंच असेल तर फक्त अप्रेझल संपल्यावर जाऊ या, एवढी किमान पात्रता अट नवर्याने ठेवली होती.
हे ठरवणं एवढं कठीण जात होतं तसा मला प्रश्न सतावत होता की सोशल मीडियावर लोक फिरण्याचे एवढे फोटो टाकत असतात ते कसे काय? अमुक अमुक ठिकाणी जायचं हे त्यांचं ठरतं कसं? आणि ठरल्यावर ट्रॅव्हल कंपनीतर्फे जावे की आपले आपण हे कसे ठरवतात? ते ठरलं तर आपला कुत्रा कोणाकडे ठेवायचा इथपासून ते सहलीला जाताना नक्की थंडीचे कपडे न्यावेत, पावसाचे न्यावेत की उन्हाळी कपडे घ्यावेत हा प्रश्न कसा सोडवायचा? आम्ही मागच्या वर्षी हिमाचल ट्रिपला गेलो होतो तिथे मनालीला थंडी होती, सिमल्याला बर्फ होतं, खज्जियारला उन्हाळा होता आणि सगळ्या ठिकाणी मध्येच थोडा थोडा पाऊसही पडला होता. कपडे विकणार्या तिथल्या लोकांचा व्यवसाय तेजीत चालावा, म्हणून ते कृत्रिम पद्धतीने ऋतुरोपण करीत असावेत, अशी मला शंका आहे.
सहलीला जाताना मला पडणारा अजून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे कॅमेरा घ्यावा की फोनमध्येच फोटो काढावेत? फोटो काढल्याशिवाय आणि ते सोशल मीडियावर टाकल्याशिवाय सहलीला जाणे सार्थकी लागूच शकत नाही. कोणीतरी मागच्या वर्षी आमच्या एका ग्रुपवर मेसेज टाकला होता की सहलीला गेल्यावर आपले तिथले फोटो सोशल मीडियावर टाकू नयेत. अशाने आपण घरी नसल्याचे लोकांना लक्षात येते आणि चोरी होण्याची शक्यता वाढते. म्हणजे सोशल मीडियावरील लोक चोर आहेत असे त्यांचे म्हणणे असावे काय?
शिवाय याच संदर्भातील अजून एक मेसेज फिरत होता, सोशल मीडियावरील फोटोमुळे चोराला अमुक एकजण घरी नसल्याचे समजले आणि तो देखील बायकामुलांसह सहलीला गेलेल्या माणसाच्या घरी सहलीला म्हणून येऊन राहिला. जाताना चिठ्ठी ठेवून गेला की बेडरूममधील एसी नीट काम करत नाहीये, पुढच्या सुट्टीच्या आत दुरुस्त करून घ्या.
मला या सहलीला जाणार्या लोकांचं काही समजत नाही. म्हणजे सहलीला जायचं म्हणून आधी खरेदी? सहलीला जायला नवीन कपडेच कशाला लागतात? हा प्रश्न सहलीसाठी खरेदी करणार्या मैत्रिणीला विचारला तर ती माझ्याकडे अक्षरशः वेड्यागत बघत राहिली. शेवटी हताश होऊन तिने उत्तर दिले, म्हणजे दरवर्षी तेच शर्ट्स आणि जीन्स घालायच्या की काय? मी एकही शर्ट रिपीट केला तर माझ्या मैत्रिणी लगेच विचारतात, हा मागच्या वर्षी काश्मीरला जाताना घेतलेला शर्ट ना गं?
मुळात ती मागच्या वर्षी काश्मीरला गेली होती हे तिच्या लक्षात होतं आणि शिवाय तोच शर्ट घातला होता हे देखील लक्षात होतं. बायकांच्या या स्मृतीला खरंच सलाम करावा. शिवाय ट्रिपला गेल्यावर जीन्स आणि शर्ट्स नाही घातले तर त्या शहरात प्रवेश देत नसावेत का, असाही प्रश्न मला विचारावा वाटला. पण आधीच्या प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तरानंतर माझी काही हिम्मत झाली नाही.
म्हणजे सहलीच्या आधी खरेदी, सहलीला गेल्यावर तिथल्या प्रसिद्ध वस्तूंची खरेदी आणि आल्यावर ही खरेदी ठेवण्यासाठी नवीन कपाटाची खरेदी. एप्रिल महिन्यात बोनस देण्याची पद्धत यासाठीच रूढ झाली असावी.
बरं, जिथे जाऊ तिथल्या वस्तू घेणंही का गरजेचं असतं ते काही कळत नाही. आता तर जागतिकीकरण झाल्यापासून चितळेंची बाकरवडी अमेरिकेत किंवा गेला बाजार दुबईतही मिळते. मग कशासाठी विकत घ्यायचं सगळं? जम्मूला जाऊन आल्यावर मंजिरी वहिनींनी तिथून अक्रोड आणले. टीव्हीवरील जाहिरातीत आजोबा दाताने अक्रोड फोडतात, हे मंजिरी वाहिनीच्या नवर्याने म्हणजे श्रीयुत संदेश दादांनी बघितलेले होते. आता मी देखील दाताने कसे अक्रोड फोडतो हे दाखवण्यासाठी त्यांनी आम्हाला घरी बोलावले. पण अक्रोड तोंडात घालताच संदेश दादांचे दोन दात घशात गेले. आपलेच दात घशात घालणे यालाच म्हणतात का? पुढच्या वेळी अक्रोडाबरोबर ते फोडायचं मशिनही जम्मूहून आणा असा सल्ला मी वहिनींना दिला. त्या दिवशीपासून वहिनी मला बघून दातओठ खात असतात.
जी गत अक्रोडची तीच बाकीच्या वस्तूंची. आसामला, दार्जिलिंगला चहाच्या मळ्यात टेस्टिंगसाठी दिलेला अप्रतिम चहा आपण घरी आणतो आणि घरी पिऊन बघितल्यावर मात्र चहाची चाह कायमची संपते. स्पेशल म्हणून आणलेले बदाम घरी कुजके निघतात. काश्मीरचं केशर घरी आल्यावर नुसत्याच रंगीत काड्या होऊन समोर येतं. बरं खायच्या वस्तू न आणता कपडे किंवा इतर वस्तू आणाव्या तर त्यात आपण इतके जास्त फसवले गेलेले असतो की विचारता सोय नाही. कलकत्त्याहून तिथली स्पेशल सुती साडी मोठ्या हौसेने आणली. या किंमतीत जगात कुठेही ही साडी मिळवून दाखवा असे आवाहन त्या दुकानदाराने केल्यामुळे मला भलताच जोश चढला होता. मी एकहाती घरच्या सगळ्यांसाठी मिळून डझनभर साड्या घेऊन टाकल्या. कोलकाता स्पेशल म्हणून लगेच तयार करून ती साडी ऑफिसला दुसर्याच दिवशी नेसून गेले, तर मैत्रिणीनेही अगदी तशीच साडी नेसलेली होती. ती तिने ओळखीच्या साडीवाल्या मुलाकडून माझ्या साडीच्या निम्म्या किंमतीत घेतलेली होती. म्हणजे मी जिथे साडी घेतली त्या किमतीइतकी किंमत जगात कुठेही मिळणार नाही हे वाक्य खरे होते तर; मी ते चुकीच्या पद्धतीने घेतले होते इतकेच.
सहलीला गेल्यावर तिथे न आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे भीतीदायक राइड्स. या राइड्स म्हणजे काहीजणांना रोमांचकारी अनुभव वाटतो, मला मात्र तो पैसे देऊन भीती विकत घेण्याचा प्रकार वाटतो. म्हणजे आमच्या पुण्याच्या काकांना, जिममध्ये जायचं म्हणजे पैसे देऊन लोकांचं लोखंड उचलायचं असं वाटतं, तसेच काहीसे आहे हे. पण हल्ली मुलांना तेच हवेसे वाटते.
बरं या सहलींना ग्रुपबरोबर जावं की फक्त आपल्या कुटुंबाबरोबर हा एक उत्तर नसलेला प्रश्न आहे. कारण ग्रुपबरोबर जायचं म्हणजे काही अटींची पूर्तता करावी लागते. उदा. मागच्या वर्षी आमची मुलं एका ग्रुपबरोबर तरुण मुलांच्या सहलीवर जाणार होती. मग आम्ही दोघांनी कुठल्या तरी कपल स्पेशलला जाण्याचे ठरवले, तर फक्त तरुण लोकांसाठी ही सहल आहे असे कळले. खास तरुण लोकांसाठी ‘हनिमून स्पेशल’ अशी ती जाहिरात होती. याला काय अर्थय, तरुण नसलेल्या लोकांना हनिमूनला जाण्याचा अधिकार नाही की काय?
निसर्ग स्पेशल अशी जाहिरात करून एका कंपनीने आम्हाला सहलीला नेले आणि ‘निसर्ग’ नावाच्या हॉटेलात उतरवले होते. तेव्हापासून टूर कंपनीबरोबर जायचे की नाही असा आम्हाला प्रश्न पडू लागलेला आहे. प्राणी, निसर्ग, वस्तूंची खरेदी, खेळ, राइड्स, एक ना हजार गोष्टी बघण्याचा आपला मानस असतो आणि त्याच्या आवडीपायी आपण सहलीला धावत राहतो. लोक जातात म्हणून आपण जात राहतो. यातील किती ठिकाणी आपल्याला खरंच जावंसं वाटलं म्हणून आपण जात असतो? टिकमार्क करायचे म्हणून ती जागा बघायची आणि पुढे चालू पडायचे याला सहल म्हणणार का? यातील किती ठिकाणं आपल्याला आवडली म्हणून आपण तिथे पुन्हा पुन्हा जातो? अर्धं जग बघून झालंय याचा अभिमान आपण मिरवून मिरवून कोणापुढे मिरवणार आहोत? त्यातून आपल्याला आनंद मिळाला की नाही, हा प्रश्न आपल्याला कधी पडणार?
फोटोसाठी, खरेदीसाठी, ठिकाणं बघण्यासाठी न काढता फक्त आपल्याला आनंद मिळावा म्हणून एखादी सहल काढली तर?