गुलामांच्या त्या बाजाराचे बेछूट दर्शन घडल्यापासून शिवबांची झोप उडाली होती. गुरांसारखी जिवंत हाडामांसाची स्त्रियापोरे विकलीच कशी जाऊ शकतात? त्यांनी कारभारी कारकुनांना फैलावर घेतले, ‘‘असा घृणास्पद बाजार आमच्या पुण्यात भरता कामा नये. कायद्यानेही तो कायमचा बंद पाडला पाहिजे!’’ असा त्यांनी आग्रह धरला…
मेहता प्रकाशनाच्या ‘महा सम्राट’ या छत्रपती शिवाजी महाराजांवरील कादंबरीमालेतील झंझावात या पहिल्या खंडातील संपादित प्रकरण.
– – –
शिवबांचे पथक पुढे पुढे सरकत होते. छोट्या, मोठ्या आणि आकर्षक अशा चीजवस्तूंनी बाजार मोडून गेला होता. रस्त्यातले शेकडो बैल, तितक्याच म्हशी, घोडी, बकर्या यांच्या बाजारात तर मुंडाशे आणि पागोटेवाल्या खेडुतांची चिक्कार गर्दी उडाली होती. त्यांच्या सोबत पाठीवर वेण्यांचे लांब पट्टे सोडलेल्या परकरी आणि झबल्यातल्या लेकीबाळी होत्या. बकर्याकोंबड्यांसारखीच तिथे पोरासोरांचीही मोठी कलकल वाढली होती.
घोड्यावरच्या शिवरायांना नदीच्या एका काठावर जुनाट वड आणि पिंपळवृक्षांची मोठी दाटी दिसली. त्या वृक्षांच्या डहाळ्या-पारंब्यांवरून शिवबांची नजर खाली उतरली. तसा त्यांनी आपल्या घोड्याचा लगाम खेचला. सारे थबकून उभे राहिले. शिबवा समोर पाहत होते, तर तिथे विक्रीसाठी आणलेल्या गाडग्यामडक्यांसारखीच अनेक चिमुकली मुले-मुली हारीने मांडली गेली होती. ती सारी किडकिड्या अंगाची, पिंजारल्या केसांची गरिबाघरची अश्राप मुले. तशाच बाजूला उदास चेहर्याने गुडघ्यात मुंडी घालून बसलेल्या मुली. त्यांच्या पायाकडे शिवबांची नजर जाताच त्यांच्या पोटात ढवळून आले. पलीकडे गुरांच्या बाजारात गाय-वासरे, म्हशी पळून जाऊ नयेत म्हणून त्यांना दोरखंडाला बांधले जायचे, तसेच इथे मुलामुलींच्या पायांना दोर्या आणि काथ्यांच्या पेंडी बांधलेल्या होत्या. अनेक कोंबड्यांचे पाय एके जागी बांधावेत तसाच तो घृणास्पद आणि ओंगळवाणा प्रकार दिसत होता.
राजांनी तिथेच वैतागून उजवीकडे नजर टाकली. तर तिथे त्याहीपेक्षा भयानक चित्र होते. अनेक तरुण आणि धडधाकट पोरी आणि गरीब स्त्रिया बाजारात बसवल्या गेल्या होत्या. सर्वच थरांतल्या. काही डोंगरी आदिवासी तर कोणी गरीब कुणबाऊ. तिथे दख्खनच्या शेतामाळातल्या सावळ्या पोरीच नव्हेत तर हैदराबादी गोर्याचिट्ट्या मुसलमानी तसेच चेऊल-वसई आणि गोव्याकडच्या किरिस्ताव भुर्या केसांच्या, पिठासारख्या पांढर्या पोरीसुद्धा विक्रीसाठी आणल्या गेल्या होत्या.
शिवबांच्या घशाला कोरड पडल्यासारखे झाले. त्यांनी आपल्या एका सोबत्याला विचारले, ‘‘अरे चिंतोबा, हा काय प्रकार आहे?’’
‘‘ह्यालाच म्हणतात बटकींचा बाजार.’’
‘‘बटकींचा म्हणजे?’’
‘‘गुरांच्या बाजारात जशा गाई-म्हशी विकल्या जातात, तसाच पोरा-पोरींच्या विक्रीचा बाजार—हा तर रोजच भरतो.’’
त्या अभागी मुलीबाळींकडे आणि त्यांच्यासोबतच पल्याडच्या बाजूला बसवलेल्या तरुण कोवळ्या पोरांकडेही बघताना शिवरायांचे काळीज ढवळून निघाले. तेवढ्यात त्यांचे लक्ष हातात चांदीच्या मुठीचे लंबे चाबूक घेऊन फिरणार्या इराणी आणि तुरानी सौदागरांकडे गेले. भरपेट खाऊन खाऊन सुटलेली त्यांची चरबीदार गबदुल शरीरे, त्यांच्या मेंदीभरल्या आखूड दाढ्या, डोईवरच्या पीळदार इस्लामी टोप्या, घोट्यापर्यंतचे लांब ढगळ हिरवे झगे आणि घोळदार लेहेंगे!
बटकीच्या बाजारात रेंगाळणार्या गिर्हाइकांना आपल्या किनर्या आवाजात ते सौदागर आकृष्ट करत होते, बोलीचा हेल काढत मोठमोठ्याने किंचाळत होते, ‘‘ले लो भाई ले लो—’’
‘‘अभी अभी भागानगरसे आया हुवा कडक माल । पाच होनमें पाच खूबसूरत लौंडियाँ।’’
‘‘ले लो, ले लो—मकान के लिए ले लो, दुकान के लिए ले लो। शादीबारातमें तोहफा देने के लिए! अगर एक साथ जादा छोकरीयाँ या छोकरे लेंगे तो सस्तेमें दे देंगे!’’
‘‘खाना पकाने के लिए ले लो, आराम या बिस्तर के लिए ले लो! पक्का माल, अभी अभी आया हुवा नया कडक मालऽऽ’’
बटकी बाजारातले ते ओंगळवाणे दृश्य बघताना शिवबांना भडभडून आले. तो गुलामीचा माल खरेदी करायला आलेली गुलछबू मंडळी वृत्तीने बदमाष आणि बेकार होती. तरुण पोरीबाळींच्या अंगाखांद्यावर नव्हे तर त्यांच्या कमरनितंबांवर ते बिनधास्त टपल्या मारत होते. चिमटे काढत होते.
ते दृश्य बघताना शिवबांच्या अंगातले रक्त उसळले. त्यांनी पट्कन आपला घोडा पुढे घातला अन् हातातल्या चाबकाचे चार तडाखे समोरच्या सौदागरांच्या पाठीत हाणले. शिवबांबरोबरच त्यांचे इतर घोडेस्वार मित्रही बाजारात घुसले. त्या सर्वांनी त्या व्यापार्यांना आणि सौदागरांना झोडपून काढायला सुरुवात केली. तसे त्या व्यापार्यांनी आपल्या झग्यात लपवलेले धारदार सुरे बाहेर काढले. समोरून आवेशात उलटा हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला; परंतु शिवबांसोबतचे साठ-सत्तर घोडेस्वार म्हणजे मावळातली धाडसी आणि कडाची पोरे होती. त्यांनी त्या व्यापार्यांना झोडझोड झोडले. त्यांचे हात-पाय बेदम सडकून काढले.
बाजूच्या बाजारातील गिर्हाइके, दलाल आणि व्यापारीही तिथे धावले. त्यातले अनेक जण शहाजीराजांचा आणि जिजाऊंचा पुत्र म्हणून शिवबांना ओळखत होते. जहागिरी त्यांची होती. मालक तेच होते. त्या सर्व धाडसी पोरांचा ठावठिकाणा त्या सौदागरांना कळला. तशी त्यांनी माघार घेतली. तोवर शिवबांच्या साथीदारांनी गुलामांच्या पायातले दोर कापायला सुरुवात केली. त्यांना मोकळे सोडले. त्यामध्ये कोणी मारून मुटकून पळवून आणलेली, कोणी विकलेली, कोणाला सावत्र म्हणून जड झालेली, अशा अनेक दुर्दैवी जाती होत्या. आपल्या पायातले गुलामीचे दोरखंड तुटल्याने अनेक जण आनंदी झाले; परंतु त्यातले मोकळे झालेले काही भाबडे, ‘‘भैया, आज रात का खाना कहाँ मिलेगा?’’ असे करुण आवाजात आपसात चौकशी करू लागले.
सौदागरांचे ते लटांबर घेऊन शिवराय आणि त्यांचे दोस्त लाल महालावर गेले. वाड्याच्या अंगणात आलेली ती अनोखी जत्रा पाहून जिजाऊसाहेबही स्तंभित झाल्या. शिवबांच्या अंगातील उसळलेले रक्त काही शांत व्हायला तयार नव्हते. दंडाबेड्या घातलेल्या त्या उन्मत्त सौदागरांना शिवबांच्या घोड्यासमोर त्यांच्या साथीदारांनी आणून फेकले. संतप्त शिवबा त्यांच्यावर उसळले, ‘‘अरे दुष्टांनो! माणसाच्या पोटी जन्म घेऊन माणसं कसली विकता? कसला हा धंदा?’’
‘‘हुजूर, हमारे भी बालबच्चे है, ये तो हमारा भी धंदा है सालों से!’’
‘‘लक्षात ठेवा! यापुढे आमच्या जहागिरीत हा असा बटकींचा बेछूट बाजार म्हणजेच स्त्रिया-पोरांची विक्री आम्ही अजिबात कोणालाही करू देणार नाही!’’
त्या बाजाराचे बेछूट दर्शन घडल्यापासून शिवबांची झोप उडाली होती. गुरांसारखी जिवंत हाडामांसाची स्त्रियापोरे विकलीच कशी जाऊ शकतात? त्यांनी कारभारी कारकुनांना पैâलावर घेतले, ‘‘असा घृणास्पद बाजार आमच्या पुण्यात भरता कामा नये. कायद्यानेही तो कायमचा बंद पाडला पाहिजे!’’ असा त्यांनी आग्रह धरला; परंतु त्यांच्या अंमलदारांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न चालवला. गुलामांच्या खरेदी-विक्रीची पद्धत ही काबूल, कंदाहार, पेशावर, ढाका अशी अवघ्या जगभरातली रीत आहे. आपल्या एका जहागिरीत ती बंद पाडली तरी बाहेरचे बाजार आणि सौदे आपल्या मुठीत नाहीत.
शिवरायांनी मात्र आपल्या जहागिरीपुरता कठोर निर्णय घेतला होता. गुलामांच्या खरेदी-विक्रीवर इतका भयंकर दंड वाढवला होता की लवकरच ती बेछूट खरेदी-विक्री जवळपास बंदच पडली होती.
सुरुवातीला दूर डोंगरमाथ्यावरच्या एखाद्या धनगराच्या छोट्याशा वाड्यात किंवा आदिवासी पाड्यात जेव्हा शिवबांची ती तरुण सेना अचानक घुसायची, तेव्हा तिथली पोरेसोरेच काय पण म्हातारी माणसेही घाबरून धूम पळायची. बाजूच्या जंगलझाडीच्या आडोशाने त्या पथकाकडे टकमक बघायची. मात्र जेव्हा शिवबांच्या चेहर्यावरचे ते मिठास हास्य आणि डोळ्यांतले चमकदार भरवशाचे पाणी दिसायचे, तसा सर्वांना मोठा आधार वाटायचा. त्यामुळे ‘शहाजीराजांचा आन जिजाऊंचा ल्योक त्यो हाच शिवबा’ ही ओळख बारा मावळाच्या काळजात घुसायला वेळ लागला नाही.
बांबूच्या बनात घुसलेली वावटळ मोठाच धुडगूस घालते, तसेच शिवबांच्या मस्तकात विचारांचे पलिते पेटत होते. आतून एक बेचैनी त्यांना हैराण करून सोडत होती. इथल्या रानातल्या, रंजल्यागांजल्या, पिचलेल्या, भोळ्याभाबड्या माणसांचे दास्य संपायला हवे. देवादिकांच्या नावावर गोरगरिबांना लुबाडणार्या धर्ममार्तंडांना रोखायला हवे अन् गावावर अचानक टोळधाडीसारखी येणारी जुलमी इस्लामी राजकर्त्यांची अत्याचारी फौज जिथल्या तिथे रोखायला हवी.
कर्नाटकातून परतताना शहाजीराजांनी सांगितलेली एक लहानशी गोष्ट त्यांना खूप महत्त्वाची वाटत होती; कारण तिचा आशय खूप मोठा होता, ‘‘हे इस्लामी राज्यकर्ते एक वेळ आपल्याजवळचे हत्तीघोडेच काय, पण स्वत:च्या डोळ्यांतल्या बाहुल्यासुद्धा आम्हाला काढून देतील; पण कोणत्याही परिस्थितीत किल्ल्यांचं दान किंवा बक्षीस देणार नाहीत. किल्ले हेच त्यांच्या सामर्थ्याचं खरं गंडस्थळ असतं.’’ त्याची आठवण काढून शिवराय माँसाहेबांना म्हणायचे, ‘‘आबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या मुलखातले सारे गड आणि किल्ले मिळत नसतील, तर हल्ले चढवून, आक्रमण करून वा लढाई छेडून ते प्राप्त करायलाच हवेत.’’
लाल महालात जिजाऊंचा दरारा मोठा होता. काही दिवसांच्या आतच सर्वांना कळून चुकले, या माउलीच्या महालाच्या ओसरीवर आंधळ्या-पांगळ्यांची, दुर्दैवी स्त्रियापोरांची, नव्हे एकूणच सर्व दुर्बलांची बाजू मोठ्या हिरिरीने उचलून धरली जाते. तिथे न्यायदानास उशीर लावणे म्हणजे बहाद्दुरी नव्हे तर अन्याय मानला जातो. तातडीचे न्यायदान म्हणजे पुण्याईचा प्रसाद ठरतो. लाल महालात स्वत: जिजाऊ न्यायदानास बसत. शिवाय दादोजी कोंडदेव आणि काझी अब्दुल्ला या दोघांचेही तिथे दोन वेगळे न्यायकक्ष होते. प्रकरणे अकारण तुंबून राहता कामा नयेत असेच सूत्र प्रमाण मानले गेले होते. काझीसाहेबांच्या आणि दादोजींच्या न्यायासनासमोर रयतेचे पुरेसे समाधान झाले नाही, तर त्या इसमाला फिर्यादीचा अधिकार होता. संबंधितांची फिर्याद स्वत: जिजाऊसाहेब ऐकायच्या.
मग काही दिवसांच्या अनुभवाने, श्रवणभक्तीने, निरीक्षणशक्तीने, अभ्यासाने शिवबा स्वत:च न्यायदानात चांगले तरबेज होऊ लागले. अनेकदा मावळात फिरताना ते सर्व जण आपली फिरती न्यायालयेही चालवत. गावपारावर नव्हे, तर एखाद्या डेरेदार आम्रवृक्षाखालीसुद्धा न्यायदान पार पडत असे. न्यायाची गंगा आपल्या घरात आल्याने गोरगरीब सुखावत होते.
मावळखोर्यांतून शिवबा सातत्याने दौड करायचे, तेव्हा अनेकदा अनुभवी दादोजी कोंडदेव सोबत असायचे. ते स्वत:ही न्याय करत; मात्र ज्या तडफेने, धाडसाने आणि गतीने मावळ खोर्यातील तरुणाई शिवबांच्या सोबत उभी राहत होती, ते पाहून आणि स्वराज्याच्या दिशेने त्यांची चाललेली ती आक्रमक आराधना, किंवा वेळेपरत्वे दिसणारा दांडगावा बघून दादोजीपंत काळजीत पडत. शिवबांना थोडे सावकाशीने, सबुरीने घ्या असा सल्ला देत.
आता मावळ खोर्यातील लहान-थोरांना पोरगेल्या दिसणार्या ह्या आपल्या शिवबा नावाच्या राजाचे मोठे कौतुक वाटू लागले होते. हा राजपुत्र गरिबांच्या एकपाखी घरात, केंबळांच्या भिंतीआड आणि शेणकाल्याने सारवलेल्या जमिनीवरही येऊन हक्काने बसतो. वरी, नाचणीची भाकर कांद्यासोबत खातो! सवां&नाच सहज जिंकीत जाणारे ते नितळ, कोवळ्या चर्येवरचे मोहक हास्य, त्यांचे ते भव्य कपाळ, त्यावरचा तो अष्टगंधाचा टिळा तर कधी तिथे रेखलेली ती चंद्रकोर, ते तेजाळ आणि भेदक डोळे. एकूणच शिवबांचे रूप हे दिलखेचक आणि आबालवृद्धांनाही हवेहवेसे वाटणारे होते.
तसा शिवबांसाठी मावळ मुलूख परका नव्हताच. पूर्वी तो निरा नदीपर्यंत निजामशाहीचा भाग होता. त्यांचे आजोबा मालोजीराजांना पहिल्यांदा पुणे आणि सुप्याची मिळालेली ती जहागिरी. आता दादोजी कोंडदेवांनीही मलिकबाबांचीच वसूल पद्धती पुढे चालू ठेवली होती.
शहाजीराजांच्या जीवनात उद्भवलेले नानाविध प्रसंग आणि कडू-गोड घटना. विचित्र परिस्थितीमुळेच त्यांना अनेक चाकर्या बदलाव्या लागल्या. मोगल, निजाम, विजापूरकर असे अनेक दरबार झाले; पण ते आपल्या मावळ मुलखाला कधीही विसरले नाहीत. त्यांनी मलिक अंबरच्या निजामशाही काळात मावळातल्या भूमिपुत्रांना नोकर्या लावल्या, सनदा दिल्या. देशमुख-देशपांडे, पाटील-कुलकर्णी असे महसुली अंमलदार नियुक्त केले. त्यामुळेच परंपरागत सर्व देशमुखांना आणि देशपांड्यांना शिवबा आपल्या घरचेच वाटायचे. त्यामुळेच त्यांच्याकडून शिवबांच्या हाकेला जोरकस प्रतिसाद मिळत होता.
अर्थात सर्वच वतनदार एका सुरात चालणारे नव्हते. काही जण मुद्दाम नडायचे. हिरडस मावळ खोर्यातल्या कृष्णाजी बांदलाने तर मर्यादा ओलांडली. एकदा शिवापुरात शिवबा आपल्या मित्रांसमवेत उभे होते, तेव्हा जंगलपट्ट्यातून धावत येणारी जखमी घोडी त्यांनी बघितली. ती सारी जनावरे ओळखीची नव्हे, तर दादोजी कोंडदेवांच्या बेहेड्यातील होती. मूर्खपणाने नव्हे तर अमानुष पद्धतीने त्या घोड्यांच्या चक्क शेपट्या कापून टाकल्या होत्या. तिकडचा वतनदार कृष्णाजी बांदल याच्या आगाऊपणाचाच तो सारा खेळ होता. त्या संतापजनक प्रकारामुळे लाल महालातही खूप चिडचिड झाली. शिवबा तर कमालीचे संतापले.
आऊसाहेबांच्या आदेशानुसार दुसर्याच दिवशी चक्रे फिरली. दादोजीपंत, कान्होजी जेध्यांना शिवापूरच्या पेठेत भेटले, तेव्हा कान्होजींनी कृष्णाजी बांदलांना बोलावून घेतले. तेवढ्यापुरती शांतता झाली; मात्र कृष्णाजी बांदलाच्या अंगातला सरंजामी वरचढपणा काही केल्या कमी होईना. शेवटी पुन्हा त्याला पुरंदरावर बोलावून घेण्यात आले. खूप समजावले. तरीही मानेनात म्हणून गोणीमध्ये बांधून टाकले. हाल केले. शेवटी त्याचे हात-पाय तोडून त्याचा चौरंग बनवला, तेव्हा कुठे त्याच्या उर्मटपणाचा रंग उतरला. अशा कडक प्रसादानंतर मात्र कोणाही देशमुख किंवा देशपांड्याकडून अश्लाघ्य प्रकार घडून आला नाही.
एके दिवशी लाल महालातील न्यायकक्षात मंत्रध्वनीसारखा गंभीर स्वर दुमदुमला!
‘‘बाबाजी भिकाजी गुजर! आपण रांझे गावचे, खेडेबेहर्याचे पाटील, आपण गुन्हेगार आहात. एका गरीब, असहाय, माहेरवाशीण, लेकुरवाळ्या स्त्रीवर, तिच्या अब्रूवर आणि मिळकतीवर गैरवर्तन करण्याचं आपणाकडून पाप घडलं आहे. आता आमच्यासमोर नोंदवलेल्या साक्षीची आणि संबंधित सर्व पुराव्याची आम्ही स्वत: जातीने छाननी केलेली आहे. संबंधित तक्रारीच्या चौकशीत आपल्यासारख्या एका सरकारी अंमलदाराकडून एका दुबळ्या महिलेवर घडून आलेला नीच गैरवर्तनाचा प्रकार सिद्ध झाला आहे. सदरहू गुन्ह्याबद्दल श्रीमान बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटील, तुमचे दोन्ही हात आणि तुमचे दोन्ही पाय तात्काळ वृक्षाच्या फांदीसारखे छाटले जावेत! तुमच्या देहाचा विनाविलंब चौरंग बनवण्याची आम्ही सजा फमा&वितो आहोत!’’
त्या दिवशी लाल महालातील त्या शब्दांना कठोर मंत्रघोषाची धार चढली होती. त्या अपूव& निकालपत्राची तात्काळ झालेली ती अंमलबजावणी, खेकड्याच्या नांग्या मोडाव्यात तसे रांझ्याच्या पाटलाचे छाटलेले ते अवयव, रक्ताच्या पुरात तडफडत पडलेले ते त्याचे असहाय धूड, तो सारा प्रकारच सवां&ना सुन्न करून सोडणारा होता.
त्या छोट्याशा न्यायमंदिरातील कठोर निकालपत्राचे कंप आणि निनाद मात्र फक्त बारा मावळांत थांबून राहिले नाहीत, तर त्याचे प्रतिध्वनी दोन दिवसांच्या आत सवां&च्या कानोकानी, अगदी वृक्षांच्या पानोपानी, सर्व दर्याखोर्यांत वार्यासारखे पसरले.
असाही एखादा अभूतपूर्व न्यायनिवाडा होऊ शकतो तर!
अशा अभूतपूर्व आणि क्रांतिकारी निवाड्याचा पडघम शिवबा नावाचा एक पोरसवदा राजा वाजवू शकतो! पुरुषसत्ताक व्यवस्थेत अबलांच्या न्यायाची तुतारी फुंकू शकतो, ही गोष्ट दसमुलखी झाली.
एरवी एका अशिक्षित, खेडूत, असहाय कुणबाऊ स्त्रीला समाजाच्या लेखी अशी किंमत ती काय असते? अशा कित्येक गरीब, वंचित बायाबापड्यांना असे जुलमी रेडे भातखाचरातला ओला चिखल तुडवावा तसे पिढ्या न् पिढ्या चिरडतच आले होते; मात्र तशा अन्यायी, बेछूट कारवायांना न्यायसदनावरून पायबंद घालणारा याआधी कोणी मायेचा पूत निपजलाच नव्हता.
एकूणच जनामनाच्या दृष्टीने न देखिले, न ऐकिले असे घडले होते. त्या एका निवाड्याने शिवबा नावाच्या राजपुत्राला ‘शिवराय’ ही उपाधी मिळाली होती. गोरगरीब कष्टकर्यांना तर आपला त्राता भेटल्याचा अवघा आनंद झाला होता. कितीतरी वर्षांनी
ह्या जुलमी सुलतानशाहीच्या पाषाणी भिंतींना भेदून एका दुर्दैवी स्त्रीची चीखपुकार पुढे निघून गेली होती.
एरवी, अशी भयंकर शिक्षा सरकारी अंमलदारास कोणी फर्मावली असती, तर एखादी स्त्री घाबरून तिथेच भीतीने गळून पडली असती; पण त्या सजेचे शब्द जेव्हा कानावर पडत होते, तेव्हा जिजाऊंची चर्या कठोर आणि निर्धारी होत गेली. महालातील इतर कारकून अंमलदार आणि तिथे मौजूद असलेले शिवबांचे सर्व सहकारीही अगदी गोठून गेल्यासारखे दिसत होते. त्या न्यायसदरेवरून शिवराय जेव्हा पायर्या उतरून खाली आले, आपल्या खासगी महालाकडे चालले, तेव्हा आपल्या मुखातील मंत्रघोषाला एवढी तेजस्वी ताकद कोणी दिली, याचा ते स्वत: विचार करू लागले.
शिवरायांना मग आठवू लागल्या जिजाऊसाहेबांच्या सोबतच्या त्या अविरत चर्चा. विजापूरच्या रस्त्यात चाललेली ती एका उमरावाची बारात. त्या बेगमेसोबत बापाने दिलेले ते दहेज. समोरच्या घोड्यांच्या रथावर ठेवलेल्या हिर्यामाणकांनी भरलेल्या पराती. अन् त्या वरातीच्या सोबतच चाललेला तो गुलामांचा मेळा. एकूण एक हजार दास-दासी. पैकी सातशे अबला. त्या सार्या अकरा वर्षांपासून पंचविशीतल्या दुर्भागी स्त्रिया. अनेक जणींचे अतिशय देखणे, गोरेपान इराणी किंवा तुराणी चेहरे. त्यातल्या अनेक दक्षिणी, ब्राह्मण, मुसलमान आणि काही बंगाली स्त्रियाही. त्यांची नावे कोणती, गावे कोणती, जातधर्म कोणता याचे कोणाला कसलेच सोयर नव्हते. विचारायचे कारण नव्हते. फक्त घरकामाला, बागकामाला, पाणी खेचायला, दळण दळायला उपयोगी पडणारे त्यांचे कष्टाळू शरीर. बाकी त्यांचा तरुण देह कोणीही भोगला तरी तो कायद्याने गुन्हा नव्हता. कारण दु:खाने, दारिद्र्याने थरथरणार्या त्या गरीब जिवांना साधे मनुष्य या अर्थाने जगायचे कोणतेही अधिकार नव्हते. अशा अभागी जिवांना ‘गुलाम’ म्हटले जायचे.
ह्या सुसंस्कृत दुनियेत सर्वत्र अशा गुलामांचे बाजार भरत होते.
एखाद्या फौजेने एखादा नवा मुलूख जिंकला की पहिली कुर्हाड बसायची ती त्या मुलखातल्या कोवळ्या मुला-मुलींवर. हजारोंच्या संख्येने अशा गुलामांना पकडून आणायला लष्करासोबत खास वेगळी पथके असायची. एखादे युद्ध जिंकले की बटकींच्या बाजारात नवा माल आला म्हणून सौदागर, व्यापारी आणि खरेदीदारही खूश व्हायचे. थोरामोठ्यांच्या लग्नकार्यात तर हा माल खूप खपायचा. दहेज म्हणून लग्नात असे शेकडो गुलाम बहाल केले जायचे. त्या पोरीबाळींच्या किंवा मुलांच्या भावभावनांशी कोणाला देणे-घेणे नव्हते. बाजारात जशा बकर्यांच्या किंवा कोंबड्यांच्या जोड्या मोजून देतात, तसाच इथे आकडा महत्त्वाचा असायचा. या सार्या प्रकाराला मोठी राजमान्यता होती. जहांगिर बादशहाने तर काही लाख मुली प्रशियाच्या राजाला गुलाम म्हणून विकल्या होत्या.
आताचा हिंदुस्थानचा बादशहा शहाजहान जो आपल्या बेगमेच्या, मुमताजच्या मरणाने वेडापिसा झाला होता, तिच्या प्रीतीची अमर निशाणी म्हणून ज्याने नुकताच ताजमहाल बनवला होता, त्याचा जनानखाना शेकडो गरीब, सुंदर, दुर्दैवी स्त्रियांनी खचाखच भरला होता. एवढेच नव्हे तर आग्य्राच्या आपल्या महालातून वावरताना त्याने स्वत:साठी पुरुष रखवालदार कामावर ठेवलेच नव्हते. जळीस्थळी सुंदर चेहर्यांचे दर्शन घडावे म्हणून त्याने तार्तार जातीच्या रखवालदार स्त्रियांना शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले होते. त्यांची खास नेमणूक स्वत:च्या तैनातीत केली होती. महालातून जिथे-तिथे दिसणार्या त्या उंचेल्या, मजबूत आणि आकर्षक बांध्याच्या तार्तार स्त्रिया म्हणजे शहाजहानला आपल्या जिंदगीतला सुगंधी विरंगुळा वाटायचा.
बर्याचदा जिजाऊसाहेबांसोबत शिवरायांची गुलामांच्या बाजारासह अनेक विषयांवर मसलत चालायची. एकदा शिवराय बोलले, ‘‘माँसाहेब, निजामशाही काय, मोगलाई काय, या सर्व इस्लामी राजवटीत बायाबापड्यांना शेळ्यामेंढ्यांएवढीही किंमत नाही, जशा काही त्या किड्यामुंग्याच!’’
‘‘थांबा बाळराजे, अशा नीच कृत्याचा विचार करताना कोणी आपल्या हिंदुत्वाचाही गर्व बाळगण्याचं कारण नाही,’’ जिजाऊ सांगू लागल्या, ‘‘आजही या मितीला दक्षिणेत जिंजी नावाच्या राज्यात विजय राघव नावाचा हिंदू राजा राज्य करतो आहे. त्या महाभागाने किती स्त्रियांशी अगदी देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्नं करावीत? सांगा बरं.’’
‘‘असतील पंचवीस-तीस.’’
‘‘अहो, पाचशेहून अधिक स्त्रियांशी त्या विजयरावाने अगदी कायदेशीर लग्नं केली आहेत हो! सत्तेच्या आणि संपत्तीच्या जोरावर मुजोरी दाखवणार्या ह्या अशा सर्वधर्मीय नीच महाभागांना पोरीबाळी म्हणजे काय वाटतात? माळावरच्या गवताच्या काड्या?’’
राजांचे बालमित्र विश्वासराव दिघे यांनी लाल महालाच्या पायरीवर एके सकाळी राजांना गाठले. ते कौतुकाने सांगू लागले, ‘‘शिवराय ऽ रांझाच्या दुष्ट पाटलाला आपण फर्मावलेली सजा आणि त्याची तिथेच तात्काळ केलेली अंमलबजावणी या प्रकारामुळे बाहेर चोहो दिशांना कसला दंगा उडाला आहे, त्याची कल्पना आहे तुम्हाला?’’
‘‘दंगा म्हणजे?’’
हळव्या मनाचे दिघे शांत, धिम्या सुरात घडल्या प्रसंगाचे सार सांगू लागले, ‘‘बाहेर दुनियेतले सारे खानदानी राजे, महाराजे, पंडित, ब्राह्मण, धर्माधिकारी, बलवान दांडगेश्वर, अगदी गाठीला पैसा असणारे व्यापारी दलालसुद्धा पोरीबाळींच्या वस्त्राला हात घालणं हा पराक्रम समजतात. एरवी, त्यांचा आकांत आणि आक्रोश ऐकतो कोण? आक्रोशाच्या कितीही घंटा बडवल्या, तरी गाभार्यातले देव काही जागे होत नाहीतच. उलट डोळ्यांवर कातडी ओढून ते चिडीचूप बसतात; पण आता ह्या रांझेकर पाटलाच्या प्रसंगानंतर आजूबाजूंच्या जहागिरीमध्ये आणि दौलतीमध्ये पडघम वाजतोय. पुण्याच्या जहागिरीत शिवबा नावाचा असा एक पुत्र एका महामातेच्या पोटी जन्मला आहे, ज्याने एका गरीब अबलेवर अत्याचार करणार्या आपल्याच सरकारी अंमलदाराचा कायद्याच्या करवतीने चौरंग केला. आपल्या अंमलदाराचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून चारी दिशांना भिरकावून दिलेत!’’
‘‘दिघेऽ एवढा बोलबोला झाला आहे ह्या प्रकाराचा?’’
‘‘बोलबाला कसला घेऊन बसलात शिवबा? चोहो बाजूंना आपल्या पराक्रमाचा पवाडा गाण्यासाठीच वावटळी उठताहेत. दुनियेतल्या सर्व धर्म-जातीतल्या लेकीबाळी धर्माचा भाऊ मिळाला म्हणून तुमच्याच आरत्या ओवाळत सुटल्या आहेत—’’
‘‘जय जगदंबऽ! जय घृष्णेश्वराऽ!’’ शिवरायांनी मोठ्या समाधानाने आपले नेत्र मिटले. ‘‘होय शिवबा, एखादं महायुद्ध जिंकून जेवढी कीर्ती तुम्हाला लाभली नसती, त्याच्या कैकपटीने तुमच्या ह्या एका कृत्याने पहाडासारखी कमाई करून ठेवली आहेऽ!’’