‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट मराठी तरुणांना संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा आहे, याची मला खात्री झाली. आयुष्य हे बागडण्याचे क्रीडांगण नसून प्रतिकुल परिस्थितीत झुंज देण्याचं रणांगण आहे, हा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल.’ असे गौरवोद्गार विशेष सरकारी वकील पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांनी या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यानिमित्त काढले.
‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. जेष्ठ विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते संगीत प्रकाशित करण्यात आले. त्याप्रसंगी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष सुरेश हावरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मराठी माणूस हा केवळ नोकरीत रमणारा नाही तर व्यवसायात उतरून नोकर्या देणारा होऊ शकतो आणि ह्या महाराष्ट्रात केवळ आणि केवळ मराठी माणसाचाच डंका वाजला पाहीजे, असे वातावरण हा चित्रपट निर्माण करेल असे उद्गारही सुरेश हावरे यांनी याप्रसंगी काढले.
‘मराठी पाऊल पडते पुढे’ या शीर्षकातच मराठी माणूसही प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकतोय हे स्पष्ट होते. निर्माते प्रकाश बाविस्कर हेसुद्धा एक व्यवसायिक आहेत. लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांनी लिहिलेल्या कथेमध्ये व्यवसायाऐवजी मराठी माणूस नोकरीला जास्त महत्व देतो. पण मोजक्या व्यक्तीच व्यवसायाकडे वळतात. त्यावेळी मात्र नायकाला इतर प्रस्थापित व्यावसायिकांकडून त्रास होतो, त्याविरोधात नायक करीत असलेला संघर्ष, त्याची व्यावसायिक मानसिकता, सचोटी आणि अडचणीतून मार्ग काढण्याचा रोख कसा असावा? हे चित्रपटाच्या माध्यमातून मांडले आहे.
प्रकाश बाविस्कर हे या सिनेमाचे निर्माते असून स्वप्निल मयेकर हे लेखक दिग्दर्शक आहेत. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटात मुख्य नायकाच्या भुमिकेत प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील आहे, तर ‘गोव्याच्या किनार्यावर…’ या म्युझिक अल्बमच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे मुख्य भूमिकेत आहे. यांच्या सोबत ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गीतकार रेश्मा कारखानीस, किरण पाटील, कृपेश पाटील आणि प्रवीण माळी यांच्या गीतरचनांना संगीत दिग्दर्शक समीर खोले यांनी संगीतबद्ध केले आहे. त्यावर स्वप्निल बांदोडकर, धनंजय सरतापे, निमिषा बाविस्कर, मयुरा खोले आणि प्रवीण माळी यांनी स्वरसाज चढवला आहे. प्रथमच या चित्रपटात अहिराणी गाण्याचा समावेश करण्यात आला आहे.
– संदेश कामेरकर