माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याने एखादी गोष्ट मनावर घेतली की तिचा पिच्छा पुरवल्याशिवाय तो राहात नाही. बाबरी शिवसैनिकांनी पाडली नाही, अयोध्या आंदोलनात शिवसेनेचे योगदान नव्हते, अशी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अन्याय करणारी विधाने भाजपाभूषण चंपा यांनी केल्यानंतर त्यांना ‘भाजपादूषण’ म्हणण्याची एकाही भाजपवाल्याची हिंमत झाली नाही. पण, थेट दिल्लीवरून अमित शहांनी त्यांना असे काही झापले की चंपांनी कितीही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी जे उघडे पडायचे होते ते पडलेच. अमित शहांनी शेलारमामांकडे नाराजी व्यक्त केली आणि शेलारमामांनी कधी नव्हे ती ही नाराजी महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचविण्याचे पुण्यकार्य केले. बाबरी पडल्यानंतर भाजप नेत्यांनी आमच्या कार्यकर्त्यांचे ते काम नाही, असे बोलून जबाबदारी झटकल्यानंतर त्यांचा पळपुटेपणा बाळासाहेबांच्या लक्षात आला. बाबरी पाडण्यात शिवसैनिकांचा हात होता, असे विधान पत्रकारांनी केल्यानंतर, तसे असेल तर मला त्या शिवसैनिकांचा अभिमानच आहे, असे बेधडक विधान बाळासाहेबांनी एका क्षणात केले आणि ते खरे ठरविणारे पुरावे काही दिवसांतच सापडले. हजारो शिवसैनिकांचा त्यात सहभाग होता. त्यापैकी अनेकांवर खटले दाखल झाले. त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. हे सारे पाहिलेले, भोगलेले आणि शिवसेना आणि बाळासाहेबांवर नितांत प्रेम करणारे उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेशातील शिवसैनिक आणि त्यांचे नेते आजही हयात आहेत. बाबरी प्रकरणानंतर अतिरेक्यांनी मुंबईत घडवलेले बॉम्बस्फोट, त्यात शेकडो जणांचे गेलेले जीव, बाळासाहेबांवरही झालेला हल्ल्याचा जीवघेणा प्रसंग यापाठी बाबरी प्रकरणाची त्यांनी घेतलेली जबाबदारी हेच कारण होते. त्यामुळेच देशातील पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर बाळासाहेबांचा क्रमांक पहिला होता आणि त्याबद्दल बाळासाहेबांना भीती नव्हे तर अभिमानच वाटत होता. एवढी मोठी जबाबदारी घेणार्या बाळासाहेबांचा चंपासारख्या थिल्लर नेत्याकडून झालेला अपमान महाराष्ट्रच काय, देश सहन करणार नाही. चंपाच्या या विचित्र वक्तव्याने भाजपचे नामोनिशाण मिटू शकते, याची कल्पना आल्यामुळेच अमित शहांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली… पोक्याचंही टाळकं सटकलं आणि माझी परवानगी घेऊन तो चंपांची मुलाखत घ्यायला गेला. त्यावेळी त्या दोघांत झालेली ही प्रश्नोत्तरे…
– नमस्कार चंपा. तुम्हाला चंपा म्हटलं तर चालेल ना?
– का नाही चालणार? मला आमच्या जिल्ह्यातही चंपाच म्हणतात. मलाही ते आवडतं. तुम्ही माझ्या प्रतिक्रियेची प्रतिक्रिया घ्यायला आलात ना?
– प्रतिक्रियेची उत्तरक्रिया करणे हा आम्हा पत्रकारांच्या कर्तव्याचाच एक भाग असतो. असो. पण भाजपाचे एवढे ज्येष्ठ नेते असूनही तुम्ही असे का बरळलात? जी गोष्ट सार्या जगाला ठाऊक आहे ती तुम्हाला ठाऊक नसावी हे मोठे आश्चर्यच आहे.
– काय असतं, हल्ली मला विस्मरणाचा आजार सुरू आहे. इंग्रजीत त्याला काहीतरी म्हणतात. तुम्हाला सांगतो कदाचित तो नसेलही, पण मी कधी काय बोलतो ते मलाच आठवत नाही. आणि स्वभावच गमत्या असल्यामुळे मला पक्षात कधीच कोणी सिरीयसली घेत नाही.
– पण तुम्ही तर बाळासाहेबांचा अपमान करून तुमच्या पक्षाचीच नव्हे तर सार्या देशाची मान शरमेने खाली घालायला लावलीत.
– मी काय बोललो ते आता मला आठवत नाही. पण बाळासाहेबांचा अपमान माझ्या हातून कधीच होणार नाही. या जन्मी काय कुठल्याच जन्मी हे पाप मी करणार नाही.
– पण यावेळी केलेच ना? आणि नंतर अमित शहांनी चंपी केल्यावर नेहमीप्रमाणे काहीतरी थातूरमातूर खुलासा केलात ना!
– मी कुठे खुलासा केला? तो आमच्या शेलारमामांनी केला.
– मग तुम्ही बोललात ते काय?
– मी कुठे काय बोललो?
– कमाल आहे तुमची. तुम्ही कुठल्या मतदारसंघाचे आमदार आहात हे तरी लक्षात आहे ना?
– कोल्हापूरचा. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. आताही तोंडाला पाणी सुटतं.
– आणि असं बोलून दुसर्याच्या तोंडाला पाने पुसता. मग पुण्यात काय आहे?
– पुण्यात पेठा आहेत. शनिवारवाडा आहे. पर्वती आहे. दगडूशेठ हलवाईंचा गणपती आहे. मला पुणं फार आवडतं.
– अहो, पण तुमचा मतदारसंघ आहे ना तिथे?
– माझा कुठला मतदारसंघ? मतदारसंघ बापटांचा होता. टिळकांचा होता. मी चुकत नसेल तर रवींद्र धंगेकरांचा होता.
– तुम्ही कोल्हापुरातून पडाल म्हणून तुम्हाला पुण्यात नाही का ढकललं?
– मला ढकलण्याची कुणाची हिंमत नाही. ते बावनकुळे माझ्याबद्दल काहीही वेडेवाकडे बोलतात आणि तुम्ही ते ऐकता. मला सारखे पाण्यात पाहतात ते. काहीतरी अफवा उठतात आणि मला त्रास देतात. येत्या निवडणुकी या सर्वांना धडा शिकवणार आहे मी. कोल्हापूरचा हिसका काय असतो हेच दाखवणार आहे मी.
– कसब्यात ‘हू इज धंगेकर?’ असा सवाल तुम्हीच विचारला होता ना? तेव्हा या धंगेकरांनी भाजपावर मोठा विजय मिळवून तुमचेच दात घशात घातले होते ना?
– मला काही आठवत नाही. पण माझ्याविरुद्ध कारस्थाने करणार्या त्या बावनकुळे आणि मुनगंटीवारांना चांगलीच अद्दल घडवणार आहे मी.
– ती घडवाल तेव्हा घडवाल हो. पण आता तुमची जी अब्रू गेली आहे ती कशी भरून निघणार?
– कसली अब्रू? कुणाची अब्रू? माझ्या अब्रूचं खोबरं करणार्यांचा मी सूड घेईन… तुम्ही निघा बघू. नाहीतर माझा आसूड हवेत फिरवल्यावर शेलारमामाही घाबरून पळून जातील.