कुठल्याही घटनेचा, गोष्टींचा, भूतकाळाचा अतिविचार केल्यास नकारात्मकता वाढते आणि बरेचदा मग निर्णय घेतांना गोंधळ उडतो. पण काहीदा या अतिविचारांचा फायदाही होण्याची शक्यता असते. आपल्या विचारांचे पॅटर्न्स ओळखून जे काही हाती आहे, त्यात समाधान मानणं हा आजच्या सुपरफास्ट ‘मेट्रो लाईफ’मध्ये एकमेव पर्याय उरतो. आपलं दुःख इतरांशी तुलना करण्यापेक्षा जे आहे त्यातच सत्याला सामोरं जाणं उत्तम! हा मनोवैज्ञानिक विचार नाट्यपूर्ण प्रायोगिक शैलीत मांडण्याचा ‘प्रयोग’ हा नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते संदेश कुलकर्णी यांनी ‘पुनश्च हनिमून’ यातून मांडला आहे.
वयाच्या चाळिशीत पोहोचलेले एक दांपत्य, सुहास आणि सुकन्या देशपांडे. शहरातल्या ‘मेट्रो लाईफ’मध्ये पुरते अडकलेले घडाळ्याच्या काट्यावरलं जीवन. सुहास हा एक कादंबरीकार. लेखक, तर सुकन्या ही एका चॅनलवरची निवेदिका. ‘ब्रेकिंग न्यूज’मध्ये अडकलेली. कामामुळे दोघांच्या ‘तन’ आणि ‘मना’मध्ये पोकळी निर्माण झालेली. वादविवाद आणि कटूता वाढत चाललेली. अशा काहीशा बिघडलेल्या दांपत्यजीवनात पुन्हा सारं काही सुरळीत सुरू व्हावं, या हेतूने हे एका निर्णयापर्यंत पोहचतात. दहा वर्षांपूर्वी लग्नानंतर माथेरानच्या ज्या ड्रीमलँड हॉटेलात हनिमून केला, त्याच हॉटेलात, त्याच ‘सूट’मध्ये पुन्हा नव्याने सुरुवात करायची. आणि हे दोघेजण भर पावसात वाट चुकत-चुकत एकदाचे पोहचतात. नंतर भूतकाळ-भविष्यकाळ तसेच वर्तमानातल्या प्रसंगांची मालिकाच आकाराला येते. आणि हेच कथानक व शैलीचे बलस्थान ठरते.
सुहासचा भूतकाळ म्हणजे आठवणींचा कोलाजच अवतरतो. बालपणापासूनचे त्याला बंध आहेत. त्याची आजी त्याला ‘कृष्णा’ या नावाने हाक मारायची. आजीचा आवाज आजही त्याच्या कानात घुमतोय. त्याच्या वडिलांनी रेल्वेरुळावर उडी मारून आत्महत्या केली. जीवन संपविले. ही त्याची एक हृदय हेलावून सोडणारी जखमच. मनाच्या उपचारासाठी त्याची झालेली सायकोथेरेपी आणि डॉक्टरांची भेट. बालवयात त्याने मांडलेला ‘घरघर’ हा खेळ. त्या खेळातून त्याला झालेली बाहुलीरुपी कन्या. ‘टिकली’ तिचं नाव. प्रत्यक्ष जीवनात मुलाबाळाची या दोघांमध्ये गैरहजेरी. त्याभोवतीच्या काही आठवणी. अशा एक एक गोष्टीतून या दोघांचा भूतकाळ जागा होतो. जो त्यांच्यासोबत कायम चिटकला आहे. साथसोबतच करतोय.
गाडीच्या आरशावर लिहितात की, ‘ऑब्जेक्टस् इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अॅपियर,’ असंही सुकन्या एकदा म्हणते. तर भूतकाळात डोकावूनसुद्धा वर्तमानकाळाशी फारकत घेणे योग्य नव्हे, असा दुसरा युक्तिवाद सुहासचा आहे. हे सवाल-जवाब, टोपणे-प्रतिटोमणे, वाद-विवाद दोघांत सुरूच आहेत. त्यात खंड नाही. आता ‘हनिमून’सारख्या एका नाजूक ‘स्थानकावर’ त्यांचा हा संवाद सुसंगत आहे काय? एकाच वेळी भूतकाळ-वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ जगणं म्हणजे त्यांचं ‘अस्तित्व’ म्हणायचे काय? साप-मुंगूसाचा खेळ जसा खेळावा तसे हे दोघे हा खेळ खेळताहेत. जो दोन अंकातल्या पकडबंद संवादात पूर्ण बांधून-कोंडून ठेवतो.
ज्या कारणांसाठी हे प्रौढ दांपत्य हॉटेलात पोहचले आहेत, तो हेतू साध्य होतोय काय? त्यांची अर्धवट राहिलेली ‘इनिंग’ इथे पूर्ण होते काय? एक कादंबरी पूर्ण करण्याचा सुहासचा बेत यशस्वी होतो का? की त्याचं जगणं म्हणजेच कादंबरीचं सत्य कथानक बनतं? या प्रश्नांची उत्तरे ही थेट अनुभवणच उत्तम. कारण उत्तरे ही प्रत्येक रसिकाला त्याच्या मनोवृत्तीतून वैचारिक उंचीतून उलट-सुलट मिळू शकतील. काहीदा त्याचे मनोरंजन वाटेल तर काहींना त्यामागील गंभीरता अस्वस्थ करेल.
बुद्धिबळाचा खेळ अतिविचारी, विक्षिप्त तसेच विचित्र खेळाडूंचा समजला जातो, तसाच खेळ नवरा-बायकोच्या नातेसंबंधात आणि वैयक्तिक जीवनात इथे मांडला आहे. जो रंगतो. या खेळातून मरगळलेल्या जीवनात शेवटी पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण होते. हरवलेला आत्मविश्वास पुन्हा येतो आणि हा खेळ संपतो. ‘शतरंज के खिलाडी’प्रमाणे पटावर मांडलेला खेळच खलनायक ठरतो आणि प्रेमाचा विजय होतो.
हरीण आणि वाघाची गोष्ट. जंगलातल्या हरणाच्या मनात पहाटे उठल्या-उठल्या विचार येतो की मला आज दिवसभर खूप पळावे-धावावे लागेल. नाहीतर जंगलाचा राजा सिंह मला खाऊन टाकेल. तर दुसरीकडे सिंह उठल्यावर विचार करतो की, मला आज काही केल्या हरणापेक्षा गतीने धावावे लागेल. नाहीतर मी उपाशी मरून जाईन. या दोघांनाही जगायचे आहे. पण त्यासाठी दोघांनाही या आजच्या वेगवान मेट्रो लाईफमध्ये संघर्ष अटळ आहे आणि त्याखेरीज जंगलरुपी गर्दीच्या शहरात जगता येणार नाही. दोन्हीकडे परिस्थिती तशी कायम आहे, हेच खरे!
यातील प्रमुख दोन व्यक्तिरेखा अर्थातच देशपांडे दांपत्यांच्या. ज्या आव्हानात्मक. नाटक, मालिका, सिनेमा, वेबसीरिज या सर्व माध्यमात चमकणार्या अमृता सुभाष यांनी सुकन्याची तर संदेश कुलकर्णी यांनी सुहासची भूमिका केलीय. प्रत्यक्ष जीवनातही हे ‘जोडीदार’ असणारे रंगकर्मी. प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी दोघांच्या पाठीशी असल्याने अभिनयातील परिपक्वता नजरेत भरते. दोघांच्या जीवनात रंगभूमी हा एक महत्त्वाचा भाग आहे. रंगमंचावर दोघांमध्ये प्रचंड ऊर्जा पदोपदी जाणवते. यात त्यांच्या भूमिका वैशिष्ट्यपूर्ण. सुहासला उच्चारात अडथळ्यांचा आजार आहे. जोरात आणि वेगात एकमेकात शब्द गुंतवून तो अनेकदा बरळायला लागतो. तर सुकन्या ही चॅनलवरल्या वाकड्या नजरेकडे दुर्लक्ष करून नोकरी करतेय. तिला आईशी मोबाईलवरून कायम संवाद साधून बारीकसारीक डिटेल्स देण्याची विचित्र सवय आहे. दोघांचा भावनिक कोंडमारा, चिडचिड, नेमकेपणानं साकार होते. त्यांच्यासोबत मॅनेजर, न्यूजरूम बॉस, लोकलचा प्रवासी, या सहभूमिका अमित फाळके यांनी मस्त उभ्या केल्यात. अभिनयातली सहजता नजरेत भरते. पबजी, मेकअपमन, प्रवासी, शाळेतला मुलगा, या भूमिका मंगेश काकड याने चांगल्या केल्यात. छोट्या भूमिका असल्या तरी त्या कथानकाला पूरक ठरतात. या चौघाजणांचं ‘टीमवर्क’ अप्रतिमच.
नाट्याचे लेखक-दिग्दर्शक एकच. त्यामुळे चांगली पकड आणि सांगड एकूणच निर्मितीत दिसते. रेकॉर्डिंगमध्ये ज्याप्रकारे फास्ट
फॉरवर्ड, फास्ट बॅक आणि फ्लॅशबॅक हा तांत्रिक प्रकार असतो. तसाच रंगमंचावरल्या घटनांमध्ये आहे. तशी संहिता खास लिहिली आहे. भूत-भविष्य आणि वर्तमानकाळ याची शैलीदार सांगड ज्या प्रकारे घातलीय ती विलक्षणच! एका स्पर्धेत ‘संहिता लेखना’चा पुरस्कारही नाटककार संदेश कुलकर्णी यांना मिळालाय. नव्या प्रायोगिक प्लस व्यावसायिक वाटेवरली संहिता म्हणून अभ्यासपूर्ण तसेच दिशादर्शक आहे. अनेक संवाद, घटना या विनोदी ढंगात वाटल्या तरी त्यामागला आशय गंभीर आहे. एकाच वेळी दोन्ही भावना त्यातून प्रगट होऊ शकतात. जीएंच्या कथेतले वळवळणारे नाग किंवा ग्रेस यांचे काव्य तसेच मुंबईवरलं ‘मीटर’मध्ये बसवलेले मुक्त काव्य या संदर्भांमुळे संहिता मराठी साहित्याशी प्रामाणिक वाटते. कादंबरीकार शोभून दिसतो.
नेपथ्यकार मीरा वेलणकर यांच्या कल्पकतेला दाद द्यावी येवढी त्यात क्षमता आहे. त्यांनी संहिता व सादरीकरणावर बराच अभ्यास केल्याचेही जाणवते. एक भलेमोठे घड्याळ. पण त्यात कुठेही काटेच नाहीत. वेळ दाखविणारे काटेच गायब आहेत. तर दुसरीकडे वरपासून ते खालपर्यंत तिरका छेद असलेली दुभंगलेली खिडकी. हे सारं काही प्रतीकात्मक असले तरी त्यातून वातावरण निर्मिती उत्तम होते. नरेंद्र भिडे यांचे संगीत कुठेही भडकत नाही. तसेच आशुतोष पराडकर यांची प्रकाशयोजना नाट्यशैलीला समर्पक आहे. श्वेता बापट यांची वेशभूषा ही दोन्ही भूमिकांचे वय, समज याचा पुरेपूर विचार करून उभी केलीय. तांत्रिक बाजूंनी नाट्य चांगले आहे. काळ्या ड्रेसमधले नृत्यही अप्रतिमच!
‘बॉम्बे बेगन्स’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘सिलेक्शन डेज’ या वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोहचविणारी आणि ‘गली बॉय’साठी थेट ‘फिल्मफेअर’ पुरस्काराची मानकरी ठरलेली अमृता सुभाष हिचे हिंदीतही चाहते आहेत. तिथेही तिने जम बसविला आहे. या पार्श्वभूमीवर याच नाटकाचे हिंदी रूपांतर असलेल्या ‘फिर से हनिमून’चे प्रयोग रसिकांपुढे होत आहेत. पृथ्वी थिएटरच्या फिल्म फेस्टिवलमध्ये झालेल्या या हिंदी प्रयोगाला रसिकांनी उचलून धरले. ही मराठी संहिता आता हिंदीतही चर्चेत आहे!
काही व्यक्तिरेखा बरंच काही सांगतात. वेगळा अनुभव देतात. त्या नटालाही संपन्न करतात. तर काहीदा अस्वस्थही करून सोडतात. आणि नाटककारापेक्षा कलाकारच नकळत व्यक्तिरेखेच्या अधिक जवळ ओढला जातो. तसंच काहीसं इथेही झालंय. मराठी हिंदीत ‘अमृता-संदेश’ हे दोघेही प्रथमच यातून एकत्र रंगभूमीवर भूमिका करीत आहेत. हाही यातला योगायोग अन वेगळेपणा!
कलात्मकता हा तर प्रायोगिक नाटकातील स्थायीभावच. त्यातून नाट्यातील सौंदर्यस्थळे अधिकच नजरेत भरतात. निर्मितीप्रक्रियेतून एकच ओळखीची अन् अनुभवलेली गोष्ट वेगळ्या चष्म्यातून मांडण्याचा प्रयत्न इथे यशस्वी झालाय. नव्या वाटेवरला लक्षवेधी आविष्कार त्यातूनच सिद्ध झालाय.
नवरा-बायकोच्या नातेसंबंधांवर आजवर शेकडो नाटके रंगभूमीवर आलीत. मराठी नाटक हे दिवाणखान्यातून म्हणजे कुटुंबप्रधान कथानकातून कधी बाहेर पडणार, हा परवलीचा सवालही वारंवार परिसंवाद चर्चा गप्पा यात हमखास विचारला जातो. पण ‘पुनश्च हनिमून’ हे नाट्य एकीकडे दांपत्याचं आजच्या ‘मेट्रो लाईफ’मधलं जिणं आणि दुसरीकडे कलाक्षेत्रातल्या दोन दालनांत सक्रीय असलेल्या कलावंतांचा संघर्ष झगडा त्यात आहे. नाजूक नात्याच्या, दुहेरी गोष्टीचा हा आविष्कार म्हणजे चौकटीबाहेरचा वळणावरला प्रवासच म्हणावा लागेल.
सेकंड हनिमूनसाठीचा माथेरानच्या हॉटेलमधला प्रवेश आणि शेवटी सारा पसारा तिथेच सोडून जातांना पुन्हा-पुन्हा तिथेच येण्याचा सकारात्मक निर्णय घेतला जातो. तो खूप काही सांगणारा ठरतो.
पुनश्च हनिमून
लेखन/दिग्दर्शन – संदेश कुलकर्णी
नेपथ्य – मीरा वेलणकर
संगीत – नरेंद्र भिडे
प्रकाश – आशुतोष पराडकर
वेशभूषा – श्वेता बापट
सूत्रधार – दिगंबर प्रभू
निर्मिती – स्क्रिप्टीझ क्रिएशन्स