सरकारने फुकटात इयरफोन वाटले, तर लोक सार्वजनिक ठिकाणी मोबाइलचा ट्रांझिस्टर करणे थांबवतील काय?
– तपन साळवी, मिरा रोड
तुम्हाला वाटतं.. सरकार काही फुकट देईल? आता फुकट वाटू आणि नंतर दाम दुपटीने वसुल करु… अशी हुशारी करुन एखाद्या अडाणी माणसाने इयरफोन फुकट वाटलेच तर फुकट मिळतंय म्हटल्यावर लोक गर्दी करुन चेंगरुन मरतील. नंतर हफ्ते भरुन मरतील.
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. तुमचा अनुभव काय?
– वरदा पावशे, सिंहगड रोड, पुणे.
प्रेम हे डोळस असतं… आपल्या प्रेमाच्या माणसावर नजर ठेवून असतं. (तुम्ही तुमच्या ह्यांच्या मोबाइलवर नजर ठेवून असता की आंधळं प्रेम करता?) प्रेम आंधळं नसतं. भक्ती आंधळी असते. देवाची नाही.. कोणाची ते विचारु नका.
तुम्ही जगात सगळ्यात जास्त कोणत्या प्राण्याला घाबरता?
– राही सोनावणे, चेंबूर
वाघीण (घरातली).
महात्मा गांधी ‘खेड्याकडे चला’ असे म्हणत असत. आजकाल विवाहेच्छुक मुली ‘शहराकडे चला’ असे का म्हणतात?
– अशोक परब, सावरकर नगर, ठाणे
हल्ली विवाह गांधीवादी मुलं पाहून नाही, तर गांधीवाल्या नोटा असलेली मुलं बघूनच केले जातात.. आणि अशी मुलं शहरातच असतात हे उघड सत्य आहे… (एवढं उत्तर पुरे का? नाही… सावरकर नगरमध्ये राहता म्हणून विचारलं.)
शब्दांवाचून शब्दांचा पलिकडले नेमके कसे कळते?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
याचं उत्तर शब्दांवाचूनच द्यावं लागेल.. पण शब्दांवाचून उत्तर मला देता येणार नाही.. आणि दिलंच तर माझ्या बाबांना पण वाचता येणार नाही… तुम्हाला शब्दांवाचून वाचता येत असेल, तर शब्दांवाचून उत्तर दिलंय असं समजा आणि घ्या वाचून अलिकडचं पण आणि पलिकडचं पण…
पावसाळा आला की आपण म्हणतो, ‘नेमेची येतो पावसाळा’… पण, हल्ली त्याचा काही नेमच नाही राहिलेला. यापुढे ही कविता म्हणायची कशी?
– सुशांत रमेश देवकर, सावंतवाडी
तुम्हाला म्हणायचीय तशी म्हणा कविता.. उगाच आपण म्हणतो म्हणून आम्हाला तुमच्यात घेऊ नका… आम्ही नाही म्हणत बाबा कविता-बिविता… हवा तेव्हा पाऊस आला तर म्हणतो बरं झालं वेळेवर आला… नको तेव्हा आला तर शिव्या घालतो.
मुलींना नेमकी कशा प्रकारची मुले आवडतात?
– साहिल पाटील, अंमळनेर
आधी सांगा नेमक्या कशा प्रकारच्या मुलींना?… तरीही सांगतो… कुठल्याही प्रकारच्या मुलींना ‘तशा’ प्रकारची मुलं आवडत नाहीत.
माझी १८ वर्षांची मुलगी सतत मोबाईलवर मग्न असते. विचारलं तर म्हणते, कामच करते आहे. ती नेमकं काय करत असते हे मला कसे कळेल?
– विलास बोले, जालना
मिस्टर बोले… हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है… (उगाच दुसर्याच्या कामात नाक खुपसू नये. तरीही खुपसावसं वाटलंच तर आपण १८व्या वर्षी केलेली कामं आठवा… की ती आठवल्यामुळेच तुम्ही अस्वस्थ होताय?)
एका स्मार्टफोनचे आयुष्य साधारण किती वर्षे असते?
– अंजुम मुल्ला, विक्रोळी
बायकोला पासवर्ड कळेपर्यंत…
उत्तर भारतात गावठी कट्टा खराब दर्जाचा असेल, तर त्यात घातलेलं काडतूस जागेवरच फुटतं किंवा उलटं घुसतं म्हणे. तुमची काय विशेष टिप्पणी?
– तात्या वाघमारे, बीड
कधी कधी फडतूस प्रश्नाला उत्तर दिलं तर आपलंच उत्तर उलटं घुसतं.. त्यामुळे नो उत्तर.. सॉरी.
अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास, हिंदू-मुस्लीम ऐक्य, गांधीजींचा इतिहास हे विषय वगळले आहेत एनसीईआरटीने. असाच भूगोलातून चीन वगळला तर तो मास्टरस्ट्रोक ठरेल का?
– अभिषेक साळवे, तुर्भे
गुगलच्या वर्तमानात इतिहास पुसून भविष्याला काय घंटा फरक पडणार आहे… पण चीनच्या भूगोलात फरक पडेल. ज्यामुळे आपल्या भूगोलात फरक पडेल. पण त्यामुळे आपल्या मास्टरस्ट्रोकवाल्या मास्टरमध्ये फरक पडणार आहे का? हा खरा प्रश्न आहे…