उन्हाळा आला की अनेकांना आठवतो स्विमिंग टँक. उन्हाळ्यात ठिकठिकाणचे स्विमिंग टँक फुल असतात. उन्हात पाण्यात डुंबायला मजा येतेच आणि सुटी आहे, नवं काहीतरी शिकायचं आहे, तर पोहायला शिकू या, उत्तम व्यायाम आहे, म्हणून पोहायला शिकायला टँकवर येणारेही खूप असतात. आता तर अनेक सोसायट्यांमध्ये स्विमिंग पूल आतच असतात. अर्थात ही शहरांतली मजा. गावांमध्ये विहिरी आणि नद्या हेच जलतरण तलाव… यातल्या कोणत्या ना कोणत्या ठिकाणी कुणी भोपळा पाठीला बांधून, टायरच्या ट्यूबमध्ये हवा भरून तर कुणी कॅन किंवा फ्लोटर्स लावून पोहायला शिकले असेल… मी कसा शिकलो, ही एक वेगळीच गंमत आहे…
मी लहान असताना माझे काका मला पोहायला शिकवण्यासाठी कराडच्या कृष्णा घाटावर घेऊन गेले. तिथे माझा चुलत भाऊ केदार आधी माझ्या पाठीला ५ लिटरचा रिकामा कॅन बांधायचा. मग मी आरामात पोहायचे. नंतर कॅनची जागा एका प्लास्टिकच्या कोल्ड्रिंक बाटलीने घेतली. मला वाटलं, अरे देवा, आता मी या नदीत बुडणार… पण तसं झालं नाही… बाटलीनेही चांगली मदत केली. मला व्यवस्थित पोहता येत होतं. यानंतर मात्र भावाने मला कोणत्याही आधाराशिवाय पोहायला सांगितले. मला वाटत होतं की यात अवघड काय, पोहायचं कसं हे तर मला माहितीच आहे, मी सहज पोहू शकेन. मी आत्मविश्वासाने पाण्यात शिरलो आणि हात पाय हलवू लागलो. मला थकल्यासारखं वाटेपर्यंत आणि माझे हात थांबवून पाय जमिनीला स्पर्श करेपर्यंत माझी गती सुरळीत चालू होती. पुढच्या टप्प्याला मला पायाखाली जमीन जाणवली नाही आणि मी नदीच्या मध्यभागी असताना घाबरून मदतीसाठी ओरडलो. चुलत भावाने मला बाहेर काढलं आणि खूप ओरडला. म्हणाला, तू चांगला पोहतोस, तरी पुढे का जाऊ शकत नाहीस?
त्यानंतर मी कधीही खोल पाण्यात नदीच्या मध्यभागी गेलो नाही. माझे पाय जमिनीला टेकतात तिथपर्यंतच आत जाऊन मी पोहायचो. नाहीतर कॅन किंवा फ्लोटर पाठीला बांधून खोल पाण्यात जायचो.
जशी पोहण्याची मजा असते, तशीच वॉटर पार्कची पण वेगळी मजा असते. आम्ही आणि मित्रमंडळी सुट्टीत एकदा तिथे गेलो होतो. तुम्ही गेला नसाल तर एकदा नक्की जा. तिथे भव्य वॉटर स्लाईड्स, कारंजे, कोस्टर्स, गेम्स तुम्हाला नक्कीच भुरळ घालतील. इथे कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची मजा काही औरच असते. स्विमिंग शॉर्ट्समध्ये मुक्तपणे फिरणे, पाण्यात खेळणे, अशी धमाल करता येते.
कुठेही पाण्यात गेले की एक अनुभव सर्वांनाच येतो. कानात पाणी जातंच. पाण्यातून बाहेर पडल्यावर नीट ऐकू येत नसेल, तर आपण कानात बोटे घालून जोरजोरात ती हलवतो. डोके एका बाजूला झुकवून जोरजोरात उड्या मारून ते पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. हे पाहणार्यांना किती हास्यास्पद वाटत असेल ना.
पोहायला गेल्यावर चेष्टा-मस्करीही होतेच. मित्रांशी शर्यत होते, मजेच्या काँपिटिशन होतात. उदाहरणार्थ ‘श्वास पाण्यात जास्त वेळ रोखून धरण्याची काँपिटिशन. पाण्यात जास्त वेळ राहिल्यास त्वचेला सुरुकुत्या पडतात, मग खूप चिडचिड होते. पण बेस्ट गोष्ट म्हणजे पोहल्यानंतर सर्व जण दमतात आणि खूप भूक लागते. मग भरपूर जेवणही जाते. तु्म्ही पोहून आल्यावर किती जेवता ते मला माहीत नाही. मात्र मी नेहमीपेक्षा दुप्पट खातो आणि भाजी-आमटी माझ्या आवडीची असेल तर मी तुडुंब जेवतो.
असो. आता बाय बाय. मला आता भूक लागलीये. कारण मी नुकताच पोहायला जाऊन आलोय… तुम्हीही आठवा आता पोहायला गेल्यावर काय-काय मस्ती करता ते… अजून शिकला नसाल तर लगेच शिकायला सुरुवात करा.
हॅपी स्विमिंग!