स्थळ – देवांचे राजे इंद्रदेव यांची सभा.
सिंहासनावर बसलेले इंद्रदेव. एप्रिल महिना असल्याने मूल्यमापनाचा अर्थात अप्रेझलचा हा महिना आहे. पराशर, वाल्मिकी, मेधातिथी, याज्ञवल्क्य, भालुकी असे अनेक ऋषी आपण घडवलेल्या शिष्योत्तमांचे कार्यातील मूल्यमापन करीत आहेत.
एका स्थानावर राजा हरिश्चंद्र बसलेले आहेत. त्यांना आजकालच्या जमान्यात काहीच काम शिल्लक नसल्याने त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे.
एका खुर्चीत विश्वकर्मा आहेत. आपण विश्वाची निर्मिती का केली असा त्यांना हल्ली प्रश्न पडू लागलेला आहे.
एका अप्सरेला फावल्या वेळात लिखापढीचे आणि निवेदनाचे काम दिलेले आहे.
सोम, अग्नी, विश्व, चित्रसेन, सत्यवान, एकता अशा सगळ्या लोकांचे मूल्यमापन झालेले आहे. अत्यंत कठीणप्रद काळामुळे दरवर्षीप्रमाणे यादेखील वर्षी त्यांना बढती मिळालेली नाही. याउलट अग्नीने उत्तम कार्य केले नाही या कारणाखाली त्याच्या २ अप्सरा आणि ४ सेवक काढून घेण्यात आलेले आहेत.
आता वेळ आलेली आहे सूर्यदेवाची. मुळातच मूल्यमापनास यायला सूर्यदेवांना उशीर झालेला आहे. मीटिंगला यायला त्यांना एवढा उशीर झाल्याने त्यांना मेमो मिळालेला आहे. पुढचे आठ दिवस सूर्यदेवाचे वर्किंग अवर्स रोज अर्धा तासाच्या हिशेबाने वाढवलेले आहेत.
धावत पळत सूर्यदेव इंद्रसभेत प्रवेश करतात.
इंद्रदेव : काय हे सूर्यदेव, तुम्हाला यायला केवढा हा उशीर? सभा संपत आली आता. तुम्हाला कल्पना आहे ना आमची सभा देखील विविध भारतीच्या सभेसारखी असते. ‘बेला के फूल’ झालं की समाप्त. आज तुमच्यामुळे आम्हाला सगळ्यांना ओव्हरटाईम द्यावा लागणार.
सूर्यदेव : काय करणार महाराज? एप्रिल, मे महिना म्हणजे आम्हाला जास्तीचं काम करावं लागतं आणि नेमका तुम्ही अप्रेझल याच महिन्यात ठेवता. आम्हाला किती पळापळ करावी लागते. तुम्हाला कितीदा म्हटलं की जुलै, ऑगस्टमध्ये ठेवलं तर जरा आमचा लोड कमी असतो. पण वरुणदेवांना तुम्ही नेहमीच फेवर करता, खास त्यांच्यामुळे एप्रिल महिन्यात अप्रेझल ठेवता.
इंद्रदेव : बरं बरं, ते असू दे. तुमचा रिपोर्टदेखील उशिरा जमा केलात तुम्ही. आणि काय हो हे, किती अंडरपरफॉर्म केलंय तुम्ही? मागच्या वर्षी मार्च महिन्यात तापमान ४०पर्यंत गेलं होतं, यावर्षी पस्तीसच? टार्गेट वाढवलं नाही तर किमान मागच्या वर्षीइतकं तरी करायला हवं ना? या ३५ डिग्रीचं स्पष्टीकरण द्या आधी.
सूर्यदेव : महाराज, त्याला मी अजिबात कारणीभूत नाही. मी तुम्हाला म्हटलं ना तुम्ही वरुणदेवांना जास्त फेवर करता. मार्च हा महिना काय पावसाचा महिना आहे? मार्च-एंड आला तरीही टार्गेट पूर्ण झालं नाही हे लक्षात आलं आणि वरुणदेव या महिन्यातही पाऊस पाडून मोकळे झाले. त्यांच्यामुळे माझा उन्हाचा इफेक्ट कमी होतो ना. काय करणार आता?
इंद्रदेव : तुमच्याकडे ना रडण्यासाठी आणि कमी प्रगतीसाठी नेहमीच काहीतरी कारणे असतात.
सूर्यदेव : असं कसं म्हणता तुम्ही महाराज? इतकी वर्षं मी इमानेइतबारे सृष्टीची सेवा करतो आहे. कंटाळा आला तरीही मी सेवानिवृत्तीचा विचारही केला नाही. मला काय हरिश्चंद्रासारखी व्हीआरएस घेता आली नसती का? पण आपल्यापेक्षाही जास्त मी त्या जीवसृष्टीचा विचार करतो. त्यांचं जीवन माझ्यावर अवलंबून आहे. तुम्ही मात्र माझं टार्गेट दरवर्षी वाढवता आणि अखंड प्राणिमात्रामध्ये मला बोल ऐकावे लागतात. केवढी काहिली, केवढा आग ओकतोय हा, आता काय आम्हाला भाजून काढल्यावरच मावळणार का? असं काहीही लोक बोलतात. शिवाय माझं नाव तर सरळपणी घेतच नाहीत. सुर्व्या काय, सूर्या काय, लाल गोळा काय? असं काहीही म्हणतात? चंद्राच्या वाट्याला केवढं प्रेम आहे? रात्रीच्या वाट्याला किती ममता आहे? पावसाळा, हिवाळा यावर लोक कविता करतात. नाहीतर उन्हाळा… आंबे खायला मिळतात म्हणून फक्त लोक उन्हाळ्याची वाट बघतात. नाहीतर त्या हणमंत्यासारखं लोकांनी काहीतरी करून मला गिळायला कमी केलं नसतं. या पृथ्वीवरील मानवाचं काही सांगता येत नाही. काहीतरी तंत्रज्ञान शोधून काढतील आणि माझ्या जवळही पोचतील. किती दुःख आहेत महाराज माझ्या आयुष्यात? काय सांगू तुम्हाला?
लोकांना जे काय सौंदर्य दिसतं ते हिवाळा आणि पावसाळ्यात दिसतं. उन्हाळा मात्र रणरण… त्यामुळे आमच्या वाट्याला नुसते शिव्याशाप. अपवाद म्हणून सोडलं तर आमच्यावर कोणी कविता करत नाही की कोणी कथा लिहित नाही. लिहिलंच तर फक्त उल्लेख. तोही कसा… रणरणतं ऊन होतं. सूर्य आग ओकीत होता. उन्हाळा मी म्हणत होता. जमिनीला भेगा पडल्या होत्या.
हे असं आमचं वर्णन. माझा आवडता ऋतू यात सगळे पावसाळा नाही तर हिवाळा लिहिणार. उन्हाळा हा आवडता ऋतू म्हटलेलं एकतरी उदाहरण दाखवून द्या महाराज. खरं तर सगळ्यात जास्त मजा उन्हाळ्यात करायला मिळते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी एवढा आग ओकतो त्यामुळे शाळेला सुट्टी मिळते. मुलांना घरी कितीतरी मजा करता येते. हल्लीच्या ट्रेंडप्रमाणे सगळ्यांना सहलीला जाता येते. आमरस-पुरी खाऊन लोक झोपा काढतात आणि तरीही माझ्या नावाने खडे फोडतात. बरं बाकीच्या ऋतूत माझा सहभाग नसतो, असे थोडीच आहे. बाकीच्यांच्या परफॉर्मन्ससाठी मी माझी तीव्रता कमी करतो. नाहीतर हिवाळ्यात यांना थंडी कशी मिळेल? पावसाची मजा कशी अनुभवता येईल? पण तरीही उन्हाळा म्हटलं की त्याचा संबंध थेट माझ्याशी लावला जातो.
उदाहरण देतानासुद्धा कधी माझे उदाहरण दिलेले पहिले आहेत का? चार पावसाळे जास्त पाहिले आहेत तुझ्यापेक्षा, असे म्हणतात. थंडीच्या महिन्याचा संबंध मजा करण्याशी जोडतात आणि उन्हाळा मात्र शिक्षा म्हणतात. उन्हाळ्यात लग्न नको रे बाबा म्हणतात. तरीही अजून मी मनावर घेतलं नाही म्हणून. थोडे ५-७ डिग्री तापमान वाढले ना मग कळेल यांना माझी खरी आग काय असते ते.
बरं ही मनुष्यजात धडपणे राहणार नाही. माझ्या किरणांची तीव्रता हल्ली थेट त्यांच्यापर्यंत पोहोचू लागलेली आहे. सिमेंटची बांधकामे, एसी, जंगलतोड अशा कितीतरी गोष्टींचा माझ्यावर होणारा परिणाम माहिती असूनही हे लोक शहाणे होत नाहीत आणि मग उन्हाळ्याला, पर्यायाने मला नावे ठेवतात.
या सगळ्याचा परिणाम माझ्या मूल्यमापनावर होणार आहे हे यांना कळते का? दरवर्षीप्रमाणे मला यावर्षी देखील बढती मिळणार नाही, माझ्या पगारात आणि आणि बाकीच्या फायद्यांमध्ये काहीही वाढ होणार नाहीये. गेली कित्येक वर्षे माझ्या सीएल लॅप्स होतात. पीएल तर घेण्याचा विचारच सोडा. खरं तर एप्रिल आणि मे हे दोनच महिने माझे जास्तीच्या कामाचे आहेत. थोडंफार काम ऑक्टोबरमध्ये असतं. बाकीचे महिने कामाचा नुसता उजेड पाडला तरीही पुरेसे असते. पण मागच्या कित्येक वर्षात कामाचा ताण एवढा वाढला आहे की हल्ली मला जानेवारीपासूनच काम करावे लागते. मध्येच वरुणदेव मला त्रास देतात. बरं जूनमध्ये सुद्धा वरुण वेळेवर हजर होत नाही. चार्ज हँडओव्हर केल्याशिवाय माझी सुटका नाही. त्यामुळे कितीतरी वर्षं मला जूनमध्येसुद्धा उन्हाळा चालू ठेवावा लागलेला आहे. एवढं करून कोणी कौतुक करेल तर शप्पथ. मी तापाने जळतो, पण माझ्या परफॉर्मन्सवर मात्र सगळे जळतात. माझं दुःख कोणालाच कळणार नाही. अप्सरा मला घाबरतात. माझ्या जवळ यायलासुद्धा तयार होत नाहीत. त्यांना अँटीग्लेयर मास्क आणि क्रीम लावा म्हटलं तरी त्या ऐकत नाहीत. माझं नाव जरी ‘मित्र’ असलं तरी मला कोणीही मित्र म्हणायला तयार नसतं.
पण केवळ जीवसृष्टीच्या चांगल्यासाठी मला सगळं सहन करावं लागतं. शिवाय पृथ्वीतलावरील काही लोक माझ्या नावाने रोज ‘सूर्यनमस्कार’ घालतात. त्यांना मला जागावे लागते. एकदा त्यांनी प्रणाम केला की त्यांचं भलंच करावं लागतं. त्यामुळे भले माझी बढती करू नका महाराज, पण किमान माझे वर्किंग अवर्स वाढवू नका. माझं काही नाही, पण पृथ्वीवरील लोकांना त्याचा त्रास होईल. पृथ्वीवर डिग्री वाढली की बढती मिळते म्हणून तीच प्रथा स्वर्गात देवाने चालवू नये. माझ्या जिवाची काहिली होते आहे तेवढे पुरेसे आहे, प्राणिमात्रांच्या जिवाची काहिली होऊ देऊ नका.