कोलकत्यातल्या रेड लाईट एरियात २००८ला गेल्यावर तिथल्या एका बंगाली गायिकेने फार सुंदर आवाजात ‘लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो…’ हे गीत ऐकवलं होतं. ऐकता क्षणापासून काही केल्या त्या आवाजाने पिच्छा सोडला नव्हता, त्या मुलीच्या आवाजात प्रचंड वेदना जाणवत होत्या. आठवड्यानंतर तिथून निघण्यापूर्वी पुन्हा एकदा तिला भेटावं म्हणून दरबार एनजीओच्या कार्यकर्त्यासोबत तिच्या बगानवाडीवर गेलो, तर वाईट बातमी कानावर आली. तिने पंख्याला ओढणी बांधून जीव दिला होता. कुणाच्या आठवणीने ती इतकी शोकाकुल झाली होती हे उमगलेच नाही. तेव्हापासून हे गाणं माझ्यासाठी हॉन्टेड साँग झालंं. काही काळानंतर राजाजींची माहिती कळली, आणि मग हे गाणं आवडत असूनही आपण होऊन ऐकणं बंद केलं. कुठं कानावर पडलं की मग मात्र राहवत नाही. ‘लग जा गले…’ हे नुसतं गाणं नसून त्यात दोन जिवांच्या भावना कैद आहेत!
७ फेब्रुवारी १९६४ रोजी ‘वो कौन थी’ रिलीज झाला आणि अडीच वर्षांतच २९ जुलै १९६६ रोजी या चित्रपटाचे गीतकार राजा मेहंदी अली खान यांचं निधन झालं. ‘वो कौन थी’साठी त्यांनी दिलेलं ‘लग जा गले..’ हे अप्रतिम गाणं दिग्दर्शक राज खोसला यांनी आधी रिजेक्ट केलं होतं. हे गाणं नाकारल्याचं राजाजींना विलक्षण दुःख झालं, त्यांनी आपल्या भावना संगीतकार मदन मोहन यांच्या कानावर घातल्या. इतकं चांगलं, अर्थपूर्ण गाणं नाकारल्यामुळे मदनजींनाही वाईट वाटलं. त्यांनी चित्रपटाचा नायक मनोजकुमारना बोलवून घेतलं आणि त्याच्यामार्फत निरोप देऊन राज खोसलांना पुन्हा एकदा गाणं ऐकण्याची विनंती केली. दुसर्यांदा गाणं ऐकताच राज खोसला दिङमूढ झाले. हे गाणं आधी रिजेक्ट केल्याचा त्यांना खेद झाला. सिनेमा सुपरहिट झाला.
हॉरर प्लस रोमान्सचा नवा ट्रेंड आला. या चित्रपटातली गाणीही हिट झाली. तरी राजा मेहंदी अली खान मात्र दुःखात बुडाले होते. जीव लावून लिहिलेली गाणी लोक डोक्यावर घेताहेत, पण आपल्या भावनांचं काय हा प्रश्न त्यांना सतावत असावा. ‘लग जा गले…’ची दास्तान शोकात्मकतेकडे झुकणारी आहे.
आपण एखादं गाणं गुणगुणत असतो. त्यातला अर्थ भावला, ती रचना आवडली, त्यातली धून पसंत पडली तर ते गाणं आपल्याला मनापासून आवडतं. ते गाणं कुठंतरी आपल्या काळजाला स्पर्श करत असलं तर मग बाकीच्या गोष्टींची नोंद अनाठायी ठरते. ही गाणी आपल्या मनात कोरली जातात, त्यांना अढळस्थान असते. असंच फीलिंग ‘लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो..’ या अवीट गोडीच्या देखण्या गीताबाबतीत आहे. या गाण्याची पार्श्वभूमी दुःखद आहे…
गीतकार राजा मेहंदी अली खान यांची रोमँटिक गीतं हॉन्टेड कॅटेगरीमधली वाटावीत इतकी गूढतेकडे झुकणारी आहेत. फक्त ३८ वर्षे जगलेल्या या माणसानं खंडीभर गाणी लिहिली नाहीत, पण जी लिहिली ती अजरामर होतील अशीच लिहिली… यातली काही गाणी वानगीदाखल देता येतील. ‘अगर मुझसे मुहब्बत है’, ‘आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे’, ‘मेरा सुंदर सपना बीत गया’, ‘तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा’, ‘तेरे बिन सावन कैसे बिता’, ‘आप युंही अगर हमसे मिलते रहे’, ‘नैना बरसे रिमझिम’, ‘आखरी गीत मोहब्बत का’, ‘आपके पहलू में आकर रो दिये’, ‘तुम बिन जीवन कैसे बिता, पूछो मेरे दिल से’… ही सगळी गाणी एका जोडप्याच्या संवादाची गाणी आहेत हे आधी खरं वाटणार नाही. पण वास्तव तसंच होतं.
ताहिरा हे राजा मेहंदी अली खान यांच्या पत्नीचं नाव. हे दोघेही उच्चशिक्षित घरातले होते. फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये न जाता ते भारतातच राहिले. ताहिराला मूलबाळ झालं नाही, याचं राजासाहबला दुःख नव्हतं. पण ताहिरा यामुळे दुःखी असायच्या. तर राजासाहब याचा जिक्र कधी करत नसत. आपल्या देखण्या बायकोवर त्यांचं अमीट प्रेम होतं, अगदी तिच्या श्वासावर त्यांचा श्वास चाले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ताहिराने अपत्यप्राप्तीसाठी उपचार आणि चाचण्या सुरु केल्या, पण त्या दरम्यान एका परिचित डॉक्टरांनी त्यांना सावध केलं की त्यांना कर्करोग असू शकतो. या बातमीनं ताहिरा डगमगल्या नाहीत, पण राजा मेहंदी अली खान मात्र पुरते कोसळले. या काळात ते शोकमग्न होते, पण ताहिराला तसं त्यांनी कधी दाखवलं नाही. मात्र त्यांच्या गीतातून तो दर्द झळकत राहिला. इथे साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांच्या प्रेमबंधाचं गीतातलं प्रकटन नकळत आठवतं.
प्राणाहून प्रिय असलेल्या पत्नीचा विरह होणार ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही आणि या दरम्यानच ते आजारी पडले. त्यांनी हाय खाल्ली. अवघ्या काही वर्षात त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या काही निकटच्या स्नेह्यांच्या मते त्यांनी इस्पितळातच आत्महत्या केली, पण याला कधीही दुजोरा मिळू शकला नाही. ‘लग जा गले कल फिर रात हो ना हो.. ‘ हे गीत पत्नीचं आजारपण कळल्यानंतर त्यांच्या लेखणीतून पाझरलं होतं! त्यामुळे त्या प्रेमाला शोकमग्नतेची झालर आहे. आश्चर्याची गोष्ट अशी होती की ताहिरा यांना कोणताच आजार नव्हता, त्या बरीच वर्षं जगल्या. राजासाहबचं पत्नीवरचं प्रेम आणि तिने त्यांना दिलेला प्रतिसाद हा त्यांच्या प्रेमगीताचा आत्मा होता.
स्वातंत्र्यपूर्व भारतातील खरेखुरे राजे असलेल्या पित्याच्या पोटी जन्माला आलेल्या राजा मेहंदी अली खानचे वय चार वर्षाचं असतानाच त्यांचे वडील निवर्तले होते. आई आणि मामूने सांभाळ केलेल्या राजासाहबच्या काव्यात अतिसंवेदनशीलता आधी विधवा आईच्या स्नेहार्द्र प्रेमातून द्रवली होती आणि ताहिराशी संपर्क झाल्यावर तिच्याबद्दलच्या भावना शब्दबद्ध झाल्या. राजासाहबचा स्वभाव अधिक हळवा होण्याचं आणखी एक कारण होतं. बॉलिवुडशी जोडले जाण्याआधी त्यांची भेट उर्दूचे प्रतिभावान लेखक सआदत हसन मंटोंशी झाली होती, ज्यांनी त्यांची भेट अशोक कुमारशी घालून दिली होती. राजासाहब मंटोला कधीच विसरू शकले नाहीत, त्यामुळे जीवनाकडे बघण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनात स्त्रीविषयक कमालीचं हळुवार प्रेम झळकतं.
पत्नी आपल्याला सोडून जाणार, न जाणो उद्याची रात्र असेल नसेल, आपण आज तिची गळाभेट घेतलीच पाहिजे या नितळ भावना त्यांच्या लेखणीतून साकार होण्याची पार्श्वभूमी ही अशी आहे. ‘लग जा गले…’चा इतिहास असा दुःखदायक आहे. हे गाणं ऐकायला आवडतं, पण पाहायला आवडत नाही. पौर्णिमेचा चंद्र ढगाळ वातावरणात झाडांच्या फांद्याआडून डोकावतोय आणि शुभ्र चमकत्या मोत्यांच्या सरी ल्यालेली काळ्या साडीतली देखणी साधना गूढ सुरांत त्याला साद देतीय. तो खेचल्यागत तिच्या मागे मागे येतोय. सगळा भवताल भारून गेलेला आहे. हातून काहीतरी निसटतंय, काहीतरी चुकतंय, असे भाव त्याच्या ठायी आहेत. हा रोमान्स एक लयीतला कधीच वाटत नाही. यात काहीतरी आर्त आहे हे गाणं पाहताना आणि ऐकताना लगेच जाणवतं. हे जे काही टोकरणारं आहे ते राजा मेहंदी अली खानचं अंतर्मन आहे, जे आपल्या काळजाचा ठाव घेतं. आपण नकळत त्याच्याशी कनेक्ट होतो. प्रेमाचं हे असंच असतं.
गाण्याची पार्श्वभूमी कळल्यापासून साधना आणि मनोजकुमारच्या जागी रुबाबदार राजाजी आणि देखण्या ताहिरा दिसू लागतात.
हे सर्व खरं असलं तरी याच चित्रपटातल्या दुसर्या एका गीतानं मनाला आणखी एक डंख होतो. तो कमालीचा विस्मयकारक आहे. पत्नीच्या विरहकल्पनेनं घायळ झालेल्या राजाजींना ताहिरानेही काहीतरी सुनावलं असेल नाही का? मग तिने जे सुनवले तेही त्यांनी शब्दबद्ध केले असेल का, याचे उत्तर माझ्याकडेही नाही. पण राहून राहून तसेच वाटते, कारण त्या गीताचे बोल असेच पोखरून काढणारे होते. राजाजींनी ‘वो कौन थी’च्या त्या गीतात ताहिराजींपासून अश्रू लपवत काळीज ओतून लिहिलं असेल असं मला वाटतं. कारण त्या गीताचे बोल होते, ‘जो हमने दास्तान अपनी सुनाई आप क्यों रोये?’ तुम्हाला काय वाटते ताहिरा यांनीच हा प्रश्न राजाजींना केला असेल की नाही?
प्रेम हे असं असतं… जो ते अनुभवतो, तो त्यावरच जगतो आणि त्यावरच मरतो. बॉलीवुडमुळे भारतीय जनमानसाला प्रेमाची भाषा अधिक नेटकेपणाने कळली, त्यातलं मर्म समजण्यास मदत झाली. हिंदी सिनेमात प्रेमकथांची रेलचेल नेहमीच असते. मात्र याशिवाय बॉलीवूडच्या तारकाविश्वातही प्रेमाची अगणित कारंजी फुलत असतात. अलिकडच्या काळात माध्यमे वा सोशल मीडिया नेहमीच बॉलीवुडचे नकारात्मक स्वरूप समोर आणताना दिसतात. मात्र अशी उत्तुंग उत्कट भव्योदात्त रिअल लाईफ प्रेमकथा लोकांपुढे आणली जात नाही. आपण प्रेमाचे भुकेले आहोत मग आपण तरी यास न्याय दिला पाहिजे. प्रेम वाढले पाहिजे कारण आताच्या काळात तर प्रेम करणं हाच विद्रोह झालाय. बॉलीवुड नेहमी प्रेमरंगात रंगलेले असते, म्हणून ऑलवेज लव्ह बॉलिवुड! ‘लव्ह बॉलीवुड’ हादेखील एक विद्रोहच ठरावा!