मंजुल (दै. जागरण, राष्ट्रीय सहारा, फिनॅन्शियल एक्सप्रेस, इंडिया टुडे, इकॉनॉमिक टाइम्स आणि डीएनएमध्ये कारकीर्द घडवलेले मुक्त व्यंगचित्रकार)
मुंबईत येण्यापूर्वीही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची व्यंगचित्रे मला परिचित नव्हती असे नाही. नव्वदच्या दशकात जेव्हा शिवसेना आणि भाजपा युतीचे पहिले सरकार महाराष्ट्रात बनले तेव्हा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने बाळ ठाकरेंवर ६ पानांची एक खास पुरवणी काढली होती. यात त्यांनी बनवलेली कॅरिकेचर आणि व्यंगचित्रे तर होतीच, पण त्यांच्यावर लिहिण्यात आलेले काही लेखही होते. या पुरवणीत छापलेल्या रंगीत कॅरिकेचरमधील परफेक्ट रंग बाळासाहेबांची रंगांवर असलेली जबरदस्त पकड स्पष्ट दिसत होती. ती पुरवणी आजही माझ्या घरी असली पाहिजे. त्याच पुरवणीत एक कॅरिकेचर संजय गांधी यांच्यावरही होते. त्यात एक सर्वसामान्य भारतीय गुप्तांगांवर हात ठेवून पळत होता आणि संजय गांधी हातात कात्री घेऊन त्याच्यामागे धावत होते. ही कल्पना जेवढी सरळ होती तेवढीच ती सहजपणे अनेक जटील समस्या उघड करणारी होती. आणीबाणीच्या दिवसांत नसबंदीची लोकांमध्ये असलेली भीती, संजय गांधी कुठल्याही पदावर नसतानाही सरकारवर नियंत्रण ठेवत असल्याची कहाणी, सर्वसामान्य माणसाच्या मनातील भीती, हे सर्वकाही या एका कार्टूनमध्ये बाळासाहेबांनी समाविष्ट केले होते. संजय गांधी यांच्या चेहर्यावरचे हावभावही पाहण्यासारखे होते. ते शब्दांमध्ये वर्णन करता येणार नाहीत. पण बाळासाहेब माझ्यासाठी राजकीय नेत्याहून खूप मोठे होते. एक व्यंगचित्रकार म्हणून मी त्यांच्या कामाचा चाहता होतो आणि राजकीय नेते म्हणून त्यांचा टीकाकार. मीही वेळोवेळी त्यांच्यावर असंख्य कार्टून्स बनवली. मुंबईत येण्यापूर्वीही आणि मुंबईला आल्यावरही. मुंबईवर आल्यावर लगेचच माझ्या हाताला एक पुस्तक लागले. त्यात आर. के. लक्ष्मण आणि बाळ ठाकरे यांची अशी व्यंगचित्रे होती, जी त्यांनी आपापल्या करीयरच्या प्रारंभी फ्री प्रेस जर्नलसाठी काढली होती. दुर्दैवाने पुस्तकाची प्रॉडक्शन क्वालिटी खूपच खराब होती. त्यामुळे ते नीट वाचता येणेही शक्य नव्हते. त्यामुळे त्यावरून त्यांच्या कामाचा अंदाज लावणेही खूप कठीण होते.