शाहू महाराजांच्या निधनामुळे प्रबोधनकारांच्या आयुष्यातलं शाहू पर्व अचानक थांबलं. या पर्वाने त्यांना हिंमत दिली आणि घडवलं. त्याचं कृतज्ञ प्रतिबिंब ‘सर्चलाईट विझला’ या प्रबोधनमधील मृत्यूलेखात दिसतं.
– – –
मी जाण्यास तयार आहे. डर कुछ नहीं. सबको सलाम बोलो, असा शेवटचा निरोप घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी अत्यंत निडरपणे या जगाचा निरोप घेतला. आदल्याच रात्री उशिरा प्रबोधनकारांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी महाराजांच्या आग्रहाखातर छत्रपती प्रतापसिंहांवर झालेल्या अन्यायाचा इतिहास लिहिण्याची शपथ घेतली होती. त्यानंतर प्रकाशित झालेल्या १६ मे १९२२च्या प्रबोधनच्या अंकात प्रबोधनकारांनी शाहू महाराजांवर `सर्चलाईट विझला!’ हा मृत्युलेख लिहिला. या मुळापासून वाचावा अशा अग्रलेखाचा संपादित भाग वाचकांसाठी इथे आवर्जून देत आहे…
श्री मन्महाराज शाहू छत्रपतींची निधनवार्ता ऐकून गेल्या ६ मे रोजी सार्या जगाला दणक्याचा अनुभव आला. छत्रपतींचे घराणे व तक्त ही महाराष्ट्राच्या विशुद्ध प्रेमाची पूज्य दैवते आहेत. या दैवतांकडे आशापूर्ण नेत्रांनी आपल्या भाग्योदयाच्या सूर्यप्रकाशाची वाट महाराष्ट्र आतुरतेने पहात असतो. करवीरकर छत्रपती महाराष्ट्राच्या पुनर्घटनेचे आत्मा होते. यामुळे तर त्यांच्या आकस्मिक निधनवार्तेचा धक्का महाराष्ट्राला अत्यंत भयंकर प्रमाणात भासल्यास नवल नाही. महाराजांच्या मृत्यूने सार्या विवेकी जगाची कल्पनाशक्ति आश्चर्याने व निराशेने स्तिमित झाली. महाराजांच्या चरणसेवेत हयात घालविणार्या हुजर्यांपासून तो राजकारणाच्या क्षेत्रांत ‘बेस्ट अलाय’ (उमदा दोस्त) मानणार्या जॉर्ज बादशहापर्यंत सर्वांची अंत:करणे महाराजांच्या आकस्मिक निधनामुळें दुभंगली आहेत. शाहू छत्रपती हे राजपुरुषांत, समाज सुधारकांत, विद्याप्रसारकांत आणि अस्पृश्योद्धारकांत सक्रीय तडफडीचे अग्रणी असल्यामुळे, त्या त्या क्षेत्रांतल्या लोकांच्या महत्वाकांक्षेला बसलेला जबरदस्त धक्का कदाचित स्वार्थमूलक म्हणून, आपण त्यांच्या शोकमग्न स्थितीकडे कानाडोळा केला तरी क्षणभर क्षम्य ठरेल. परंतु वाचकहो, विचार करा. ज्या छत्रपतींची स्वारी नुसत्या शिकारीला निघाली तरी कमीत कमी ५० माणसांचा परिवार सहज बरोबर असायचा; भराभर सुटणार्या ज्यांच्या सरकारी व खासगी हुकुमांची ताबिली करण्यासाठी दिवाण साहेब, प्रायवेट सेक्रेटरी, खाजगी कारभारी यांची फलटण जय्यत असे; त्या सर्व समर्थ महाराजांच्या अंतकाळी त्यांच्या प्रिय राणीसाहेब, लाडके युवराज किंवा खास विश्वासू दिवाणसाहेब यांपैकी एकालाहि त्यांच्या पुण्यदर्शनाचा अखेरचा लाभ लाभूं नये, हा विपरीत दैवयोगाचा वङ्कााघात त्यांनीं कसा काय सहन केला असेल, तो त्यांचा त्यांनाच माहित!
श्री मन्महाराज शाहू छत्रपती हे एक असे अद्वितीय पुरुषश्रेष्ठ होते की ते अनेकांना अनेक रंगांत दिसत असत. नानाविध लोक त्यांना नानाविध दृष्टीनी पहात असत व ते त्यांना तसे दिसतही असत. नव्हे, आम्ही स्पष्टच म्हणतो की ते खरोखरच नानारंगी महापुरुष होते. पण त्यांत मुख्य खुबी मात्र ही असे की प्रत्येक रंगांत त्यांचे प्राविण्य त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला जागच्या जागीं चारी मुंड्या चीत करण्याइतके शंभर नंबरी तेखदार असे. चित्पावनांना ते वैर्याप्रमाणे दिसत, देशस्थांना धार्मिक क्षेत्रातल्या बंडखोरांप्रमाणे भासत, मुंबई व हिंदुस्थान सरकारला ते ‘प्यारे दोस्त’ असत, ब्राह्मणेतरांना ते मायबाप वाटत, तर अस्पृश्यांना ते खास परमेश्वराचे अवतारच भासत असत. आज हिंदुस्थानात लॉर्ड डलहौशीच्या पाट्यावरवंट्यांतून बचावलेली संस्थाने व संस्थानीक काही थोडथोडके नाहीत. पण त्या सर्वांची बुद्धिमत्ता एकांगीच. शाहू महाराजांचे गाडे अगदीच न्यारे!
क्षेत्र राजकीय असो, सामाजिक असो, धार्मिक असो किंवा कसलेही असो, त्यांत महाराजांचें प्राविण्य तुफानी मेघगर्जनेप्रमाणें दाणादाण उडविल्याशिवाय राह्यचेच नाहीं. एखाद्या चळवळीत कोल्हापूर सरकारची उडी पडली की `वाघोबाची स्वारी आली रे आली’ असा सर्व प्रतिस्पर्ध्यांना एकजात दांडगा वचक बसत असे. असला हा ‘महाराष्ट्राचा पटाईत वाघ’ दुर्दैवाने एकाएकी शांत झाल्यामुळे अनेक चळवळी व संस्था यांचें चैतन्यच नष्ट होते की काय अशी वाजवी भीती आज उत्पन्न झाली आहे. त्यांच्या दीर्घसूत्री कल्पनाशक्तीने उभारलेल्या अनेक मनोरथांच्या इमारती ठिकठिकाणीं अपूर्ण स्थितीत पडलेल्या आहेत. लोकजागृतीच्या चैतन्याचीं बीजें सर्व महाराष्ट्रभर पेरून, त्यापैकी कित्येकांची जोमदार रोपटी व टवटवीत कळ्या त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्या, हे खरे; तथापि त्या इमारतींची पूर्णता करणे व ठिकठिकाणच्या नानाविध चैतन्याच्या रोपट्यांना वडिलांच्या मार्गे पाणी खत घालून त्यांचे मोठमोठे वृक्ष बनविण्याची कामगिरी सरळ रेषेत श्रीमद्युवराज उर्फ आमचे नवीन छत्रपती राजाराम महाराज यांच्यावरच येऊन पडत आहे, हे सांगणे नको.
वरवर पाहिले तर छत्रपतींच्या निंदकांची संख्या बरीच असावी, असा समज होतो; पण हा समज खोटा आहे. प्रत्यक्ष प्रमाणावरून असे सिद्ध होईल की त्यांच्या निंदकांचा आरडाओरडा राष्ट्रीय मुशींतला असल्यामुळे त्याचा आवाज रिकाम्या घागरीप्रमाणे जरी बराच घुमतो, तरी छत्रपतींच्या चहात्यांची व त्यांना मायबाप किंवा देवाप्रमाणे मानणार्या लोकांची संख्या मोजवणार नाहीं इतकी अफाट आहे. प्रस्तुत प्रसंगीं छत्रपतींच्या निंदकांच्या कारस्थानांची परिस्फुटता आम्ही करू इच्छित नाहीं; तथापि एवढें मात्र सांगणे प्राप्त आहे की हा निंदकांचा संप्रदाय महाराष्ट्रांत स्थापन करण्याचें पुण्य पुण्याच्या केसरीने मिळवून, आपल्या विशिष्ट समाजाची छत्रपति-द्वेषाची परंपरा अखंड पुढे चालविली आहे.
खुद्द टिळक हयात असताना अहिनकुलवत केसरी करवीरचा झगडा निदान बराच सभ्यपणानें चालत असे. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर श्री. नरसोपंत केळकरांनी महाराजांना ‘स्वराज्यद्रोही छत्रपती’ ठरविण्याचा जो पोरकट उपद्व्याप केला आणि कित्येक बेअक्कल मराठ्यांना हाती धरून रस्त्यावर त्यांना धोंडे मारविण्याचा व खोट्या फिर्यादी करून त्यांच्या अब्रूला मलीन करण्याचा, आपल्या राष्ट्रीय पक्षाच्या पंखाखालीं जो अश्लाघ्य नातुशाही प्रयत्न केला, त्यामुळे तर केसरीच्या राष्ट्रीयत्वाचा हलकटपणा बहुजनसमाजास अधिकच सप्रमाण प्रत्ययास आला. ज्या वेळीं केसरीचे ‘स्वराज्यद्रोही’ आर्टीकल महाराजांनी वाचले, तेव्हा ते खदखदा हसले व म्हणाले, ‘पुअर चॅप! पॉलिटीक्स इज नॉट सो चीप!’ (मूर्ख बेटा! राजकारणाचा मामला इतका सवंग झालेला नाही.) महाराजांच्या निंदकांची रिक्रुटभरती केसरी कंपूकडून जसजशी होत असे, तसतशी त्यांच्या चहात्यांची व भक्तांचीहि संख्या सहस्र पटीने वृद्धिंगत होत असे.
श्रीमंत सयाजीराव गायकवाडाप्रमाणे छत्रपतींनी ‘तत्राप’ची व्याख्याने फारशी झोडली नाहीत. श्री बाबासाहेब इचलकरंजीकरांप्रमाणे इंग्रजी मराठी ग्रंथसंभार प्रसविला नाही. तथापि त्यांचे ज्ञान अगदी ‘अपटुडेट’ असे. दररोज भोजनोत्तर हिंदुस्थानातली काही प्रसिद्ध वर्तमानपत्रे ते आपल्या रीडरकडून नियमित वाचवून घेत असत. त्यांची स्मरणशक्ती इतकी अचाट असे की १५-१५ वर्षांपूर्वी झालेल्या संभाषणांतली वाक्ये ते जशीच्या तशी बिनचूक पाठ म्हणून दाखवीत असत. सरकारी प्रकरणांच्या बाबतींत रेफरन्स सांगण्यांत तर त्यांनी शेकडो वेळा आपल्या रेकॉर्डकीपरलाही चकवायला सोडले नाही, कोण व्यक्ती कोठे काय काय चळवळ करीत असते याची माहिती त्यांना भरपूर असे.
परंतु महाराजांची कीर्ति महाराष्ट्रेतिहासाच्या मंदिरांत अजरामर ठेवण्यासारखे लोकोत्तर कार्य त्यांनी जे केले, ते ब्राह्मणेतरांची सामाजिक व धार्मिक पुनर्घटना हे होय. आद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून तो सातारच्या शेवटल्या प्रतापसिंह छत्रपतींच्या दुर्दैवी नाशापर्यंत, जी गोष्ट एकाही तक्तनशीन छत्रपतीला साध्य झाली नाही, ती गोष्ट शाहू महाराजांनी बोलबोलता यशस्वी करून दाखविली. भिक्षुकशाहीचे बंड मोडून ब्राह्मणेतर समाजांना स्वतःचे सामाजिक व धार्मिक स्वातंत्र्य जाहीर करण्याइतकें नैतिक धैर्याचे चैतन्य अखिल महाराष्ट्रात थरथरविण्याची महाराजांनी जी अद्भुत कामगिरी बजावली आहे, तिचे महत्व राष्ट्रीय प्राण्यांच्या नातुशाही धांगडधिंग्यामुळे आज जरी कोणाच्या नीटसे ध्यानात येणार नाही, तरी धावत्या काळाच्या टांचाखाली भिक्षुकशाही चाणक्यांच्या कारस्थानाचा चेंदामेंदा उडताच, सारा हिंदू समाज, सारे हिंदू राष्ट्र, सारी विवेकी दुनिया आद्य छत्रपती इतक्याच गौरवाने शाहू छत्रपतींच्या नावाचा आदरपूर्वक गौरव करतील.
कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे मनाची सनातन वक्रता धारण करणारे केसरीकर महाराजांच्या मृत्युलेखांत साळसूदपणाचे नक्राश्रू गाळतांना म्हणतात की ‘धर्मशास्त्र, राजकारणशास्त्र, समाजशास्त्र या तिन्हीमध्ये वक्र(?) बुद्धीचा नांगर खोल घालून सत्तेच्या बळावर शाहूमहाराजांइतकी हल्लीच्या काळांत दुसर्या कोणीही विचारी जमीन उलथीपालथी केली नसेल त्यांनी केलेल्या मेहनत मशागतीने कोणत्या प्रकारचे पीक आले हे लोकांना दिसतच आहे. `या उद्गारांतली वक्रोक्ती व व्यंगोक्ती क्षम्य मानून, आम्ही केसरीकारांना नम्रपणे बजावून सांगतो की खरोखरच महाराजांच्या नानाविध चळवळींनी दक्षिण महाराष्ट्रात जे मुबलक पीक आले आहे, ते इतके जोमदार व सकस आहे की त्याचा मृत्यू महाराजांच्या मृत्यूने होणारा नव्हे. ते पीक ‘लोकांना दिसत आहे’, तुम्हाला भासत आहे आणि जसजसा अधिक काळ लोटेल तसतसे तें नातुप्रासादिक राष्ट्रीय भिक्षुकांच्या उरावर थैथै नाचणारहि आहे. हे पीक म्हणजे पुणेरी देशभक्तांचे पीक नव्हे. हे पीक म्हणजे राष्ट्रीयांच्या कुप्रसिद्ध तोंडचोंबडेपणाचे पीक नव्हे. हे दीनदुनियेच्या जागृतीचे पीक आहे. भिक्षुकशाही बंडाचा समूळ विध्वंस करणार्या अस्सल लोकशाही चैतन्याचे अमर्त्य चैतन्य आहे. वाकड्या दरात वाकडी मेख मारणार्या कर्तबगार छत्रपतींच्या पटाईत कल्पनाशक्तीचा हा थैमान आहे. या थैमानाचा हादरा महाराजांच्या हयातीतच एवढा जबरदस्त प्रसृत झालेला आहे की त्यांच्या मृत्यूची बातमी पोहचताच ज्या तुमच्या सातारकर अधम सांप्रदायिकांनी पेढ्यांची खैरात वाटली, त्या अधमांचे किंवा खुद्द तुमचे, सातारा जिल्ह्यातल्या एखाद्या खेडेगांवात जाऊन फंडासाठी फुटकी कवडी किंवा स्वराज्य प्रवचनावर मुठभर डाळ-तांदूळ मिळविण्यासाठी मात्र आता तोंड उरले नाही.
शाहूमहाराजांच्या मृत्यूने एक पट्टीचा राजकारणी मुत्सद्दी, खंबीर समाजसुधारक, धैर्यवान धर्मक्रांतिकार, सक्रीय अस्पृश्योद्धारक, जगप्रसिद्ध पहिलवान, निधड्या छातीचा शिकारी, राष्ट्रीय पक्षाच्या कारस्थानी मार्गातला काटा आणि दीनदुनियेच्या भवितव्यतेवर प्रकाश पाडणारा सर्चलाईट नाहीसा झाला, असेच म्हटले पाहिजे.
कै. छत्रपतींच्या आत्म्याला जगदीश चिरकाल शांती देवो!