सतीश आचार्य (मेल टुडे, सिफी, स्पोर्ट्स क्रीडा, बॉलिवुड हंगामा यांच्यासाठी व्यंगचित्रे काढणारे मुक्त व्यंगचित्रकार)
कर्नाटकातील कुंडापुरा या गावातून मी १९९३ साली मुंबईत आलो तेव्हा दोन महान व्यंगचित्रकारांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. एक होते आर. के. लक्ष्मण, त्यांची व्यंगचित्रं मी लहानपणी नकलीत असे. दुसरे होते बाळासाहेब ठाकरे. एका कन्नड दैनिकात त्यांच्याविषयीचा लेख मी वाचला होता. त्यांची व्यंगचित्रं पाहून मी खूप प्रभावित झालो होतो. मुंबईला आल्यावर बाळासाहेबांची आणखी अनेक चित्रं पाहायला मिळाली आणि मी त्यांचा चाहता बनलो. महाराष्ट्रात मराठी माणसावर होणार्या अन्यायाला कुंचल्याच्या माध्यमातून वाचा फोडून बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आणि ते देशातील मोठे नेते बनले, पण त्यातून आमच्या व्यंगचित्रकला क्षेत्राचं मोठं नुकसान झालं… कधीही भरून न येणारं! विचार करा, देशातल्या नंतरच्या घडामोडींवर एकीकडे लक्ष्मण आणि दुसरीकडे बाळासाहेब व्यंगचित्रांच्या स्वरूपात भाष्य करत असते, तर काय बहार आली असती! पण ते होणे नव्हते! लक्ष्मण यांच्या मूडी स्वभावाविषयीच्या कहाण्या ऐकून मला त्यांना भेटण्याची हिंमत झाली नाही. अनेक वर्षे ‘मातोश्री’च्या जवळ राहून बाळासाहेबांनाही भेटण्याचं धाडस केलं नाही कधी! माझी व्यंगचित्रे त्यांना पसंत पडतील का, अशी भीती वाटत राहिली आणि तो योग हुकला.