‘फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळ्या’मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी करणार्या कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान करण्यात येतो. ही गेल्या सहा दशकांची परंपरा आहे. गेल्या वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. अभिनेता सलमान खान फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार असून अभिनेता मनीष पॉल हा त्याच्यासोबत असेल.
हा पुरस्कार सोहळा २७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आला असून, हा कार्यक्रम वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. या कार्यक्रमात अभिनेता विकी कौशल, अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस परफॉर्मन्स करतील. या कार्यक्रमाची तिकीट विक्री लवकरच सुरू होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण २८ एप्रिल रोजी कलर्स वाहिनीवर रात्री ९ वाजता केले जाणार आहे.
वर्ल्डवाईड मीडिया लिमिटेडचे सीईओ दीपक लांबा म्हणाले, ‘सहा दशकांच्या दीर्घ प्रवासात भारतीय चित्रपटसृष्टीवर प्रेम करणार्या मंडळींकडून मिळालेले प्रेम आणि आदर पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. हे प्रेम असेच वृद्धींगत होत राहावे या उद्देशाने आम्ही दरवर्षी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्यांचा सत्कार करण्यासाठी एका दिमाखदार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करत असतो.
ह्युंडाई मोटरचे सीओओ तरुण गर्ग यांनी म्हटले आहे की ‘ह्युंडाईच्या सौजन्याने आयोजित होणार्या फिल्मफेअर पुरस्कारामुळे ही चित्रपटसृष्टी अधिक बहरत जावी यासाठी चित्रपट बनविणारे आणि त्यामध्ये विविध प्रयोग करणारे यांचा गौरव करण्यासाठी जो प्रयत्न होत आहे त्यात आमचाही हातभार लागत असल्याचा आम्हाला आनंद आहे.’
फिल्मफेअर मासिकाचे संपादक जितेश पिल्लई म्हणाले, ‘यंदाच्या या सोहळ्याचा सूत्रसंचालक म्हणून सलमान खान असणे ही फिल्मफेअरसाठी अभिमानाची बाब आहे. सलमानचे सूत्रसंचालन आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे उत्तम कार्यक्रम या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आम्ही या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहात आहोत.’
अभिनेता सलमान खान म्हणाला, ‘या चित्रपटसृष्टीचा मी गेली अनेक वर्षे हिस्सा राहिलेलो असून या नात्याने मी सांगतो की, फिल्मफेअरने हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जगभर प्रसिद्ध अशा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्यासाठी मीही उत्सुक असून, प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आनंद लुटणं ही माझ्यासाठी प्राथमिकता आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा सन्मान-सत्कार करण्यासाठी फिल्मफेअरने हा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.’