कुमार वयाच्या मुलांचे भावविश्व खूपच कल्पनारम्य असते आणि त्यांची बरीचशी गरज कॉमिक्स पुरी करतात; ज्यात परिकथा असतात, राजे महाराजे, त्यांच्या राण्या, त्यांचे महाल, रामायण-महाभारतातील विस्मयकारक कथा आणि प्रसंग. इंग्रजीतील भाषांतरित टारझन, रॉबिनहूड, फँटम हेन्री, काल्विन, सुपरमॅन, स्पायडरमॅन, जेम्स बॉण्ड, चारुहास पंडितांचा चिंटूसारख्या कॉमिक स्ट्रिप्स यांनी मुलांचे मन आणि कल्पकता याला खतपाणी घातलं आहे. सोपी हास्यचित्रं त्यांना नक्कीच आवडतात. १९७० ते २००० सालापर्यंत मी मुलांसाठी हजारो हास्यचित्रे, मुखपृष्ठे, चित्रकथा, रेखाटल्या. सरकारी किशोर मासिक, अ. रं. शिरवाडकर यांचा कुमार, सर्जेराव घोरपडे यांचे टारझन, बिरबल क्रीडांगण, नागपूरच्या ना.स. देशपांडे यांचे गंमत जंमत वगैरे. मात्र जवळपास ३० वर्षे मी दिल्ली प्रेस समाचार पत्र या दिल्लीस्थित संस्थेच्या सरिता, मुक्ता, चंपक, गृहशोभा यांच्यासाठी व्यंगचित्रे, हास्यचित्रे, इलस्ट्रेशन्स दिली.
परेशनाथ हे मालक संपादक होते. अत्यंत चोखंदळ. त्यांची आठदहा मासिके साप्ताहिके लाख लाखभर खपाची होती व आहेतही. ती हिंदीत असल्याने सर्व उत्तर भारतीय त्यांना वाचक म्हणून मिळालेत. मानधन अत्यंत उत्तम देत. त्यांच्या चंपक साप्ताहिकासाठी मी शेकडो मुखपृष्ठे, चित्रमाला, कथाचित्रे दिली. त्यामुळे मुलांची मानसिकता, त्यांची कल्पनारम्यता त्यांचे नाजुकसे जग मला न्याहाळता व अभ्यासता आले. दिल्ली प्रेस समाचार पत्रची पाच मजली एसी इमारत आहे. परेशनाथ हे अत्यंत शिस्तीचे कडवे, देवाला न मानणारे. संपूर्ण स्टाफ व कार्यकारी संपादक यांच्यावर प्रचंड वचक. पण अत्यंत कल्पक आणि कलासक्त.
माझे एक कुलकर्णी नावाचे मित्र होते. त्यांनी चंपकसाठी १९७५ सालादरम्यान एक दोन कथा लिहिल्या. मला म्हणाले, ‘माझ्या कथा तशा टामटूम आहेत, पण तुमच्या चित्रामुळे कदाचित त्या छापून येतील. प्लीज या कथांना चित्रे देता का?’ मी त्यांच्यासाठी चार-पाच चित्रे काढून दिली. यथावकाश कुलकर्णीना पत्र आले की तुमच्या कथा मला फारशा आवडल्या नाहीत, पण चित्रे आवडली. तुम्ही चित्र काढत असाल तर तुम्हाला इलस्ट्रेशन्ससाठी काही कथा पाठवतो. कुलकर्णी मला पत्र दाखवून म्हणाले, ‘करता का सुरू!’ आणि तिथपासून जवळपास २५ वर्षे मी प्रचंड काम केले.
एके वर्षी हरिद्वारहून परतताना दिल्लीत वेळ होता म्हणून मी परेशनाथजींना भेटलो. आठवणीने बुके घेतला, कारण माणसाची
गॅरंटी नव्हती. प्रचंड यश आणि पैसा मिळाला की माणसं थोडीशी अॅटीट्युडी, अहंबाज होतात. त्यांना बुके दिला. त्यांनी जडपणे बसा म्हटले. त्यांना समेवर आणण्यासाठी मी इकडचे-तिकडचे बरेच छोटे छोटे विषय काढून पाहिले. मी विचारलं, माझी चित्र आपणास आवडतात का? कपाळावरच्या आठी तशीच ठेवत ते म्हणाले, माझ्याकडे ५० चित्रकार आहेत. त्यांचं तिरपट उत्तर. विषयांतर करत मी म्हणालो की मी नाशिकला राहतो. शिरडीला साईबाबांचे मंदिर आहे. वेळ काढून या. अनेक भाविक तेथे येतात. आपणास मी एस्कॉर्ट करीन!
‘मी देव मानत नाही. देवाच्या भरोशावर कुठलीच कामे करू नका. गुणवत्तापूर्वक प्रामाणिक कष्ट करा. जसं तुम्ही माझ्यासाठी काम केलं त्याबद्दल मी तुम्हाला पैसे दिले. येथे देव कुठेय? मी पथारी गोळा केली, म्हटलं येतो. त्यांनी एक छोटसं गिफ्ट दिलं, उसनं हसून मला निरोप दिला. मी बाहेर येऊन चंपक, गृहशोभाच्या कार्यकारी संपादकांना भेटलो. परेशनाथांशी भेट झाल्याचेही बोललो. दोघांनीही मला विचारले ते तुमच्याशी बोलले का? कारण ते सहसा कोणालाच भेटत नाहीत, कारण इथं प्रेसमध्ये शेकड्याने व्हिजिटर्स येतात. मोठे साहेब भेटण्याची गॅरंटी नसते. प्रत्येक मासिकाचा कामाचा कक्ष वेगळा. आम्ही संपादक एकमेकांना भेटतही नाही. बरेचदा कोण कोणते काम करतो हेही ठाऊक नसते. पण प्रत्येकाला खूपच छान मानधन वेळेत मिळते.
त्या काळात किशोरचा खप खूपच वाढला होता. कार्यकारी संपादक अच्युत शिरवाडकर होते. त्यांनी मला निमंत्रित केले. मी बरीच चित्रे त्यांच्यासाठी काढली. किशोरवरचे एक मुखपृष्ठ मला आठवते… इंग्रजी किलबिल स्कूलमधील मुलांना घेऊन एक बॉब कट केलेली मॅडम एसटीने एका हिल स्टेशनला निघाली आहे. ३०-४० वर्षांपूर्वी एसटी हा एकमेव पर्याय पुर्या महाराष्ट्राला व्यापून होता. ५०-६० मुलांनी एसटी गच्च भरली आहे. रडारडी, आरडाओरडा, दंगामस्तीने गाडी गजबजली आहे. मॅडम कंडक्टरला शांतपणे म्हणताहेत.’ कंडक्टर फक्त एकच तिकीट द्या.. माझं. बाकीची सर्व मुलं तीन वर्षाखालची आहेत! कंडक्टर चक्रावला नाही तरच नवल? माझ्या व्यंगचित्रांच्या कार्यक्रमात हे चित्र मी मुद्दाम रेखाटायचो. ‘एकच तिकीट द्या,’ हा शेवटचा पंच असायचा. गंमत जंमत दिवाळी अंक सुरू झाला, त्यावर ३० ते ४० वर्षे फक्त माझी एकट्याची कव्हर्स होती. कारण मुलांना अभिप्रेत रंगसंगती, सुंदर, निरागस मुले, विनोद मस्तच असत. सर्जेराव घोरपडे स्वतः चित्रकार होते. त्यांची ‘बिरबल’, ‘क्रीडांगण’, ‘टारझन’ ही मासिके आकर्षक असूनही खप नसे, अडीच तीन रुपये किंमत असूनही. तेथे मी व्यवहार केला नाही, उलट खूप चांगली चित्र देत राहिलो. मी नेहमीच अंकांची परिस्थिती पाहून मुखपृष्ठ किमती लावत असे. चित्र शंभरचे असो की हजाराचे- चित्राच्या कल्पनेत, क्वालिटीत भेदभाव नसे. कारण व्यवहार संपादकापुरता मर्यादित असतो, चित्र हजारो वाचकांसाठी असते. अनेक दिवाळी अंक माझ्याकडे माझ्या मुखपृष्ठ व खिडक्यांसाठी टिकून राहिले. काही संपादकांनी चित्रकार बदल करून पाहिले आणि अंकाचे गठ्ठे परत आल्याचा अनुभव घेतला. याचा अर्थ ‘अहम् ब्रह्मास्मी’ असा नाही. ज्याची त्याची काही काळापुरती क्रेझ असते. यात नट, नाटककार, सिनेमातले हीरो हीरोइन्स, संगीतकार-लेखक-कवी सगळेच आले. लहान मुलांच्या चित्रांमध्ये प्राणी, पक्षी, जनावरे यांचा भरपूर वापर असायचा. त्यात मुले जास्त रमतात.
शिरवाडकर यांच्या ‘कुमार’च्या एका दिवाळी अंकात माझ्या नजरचुकीने तिरंग्याचा हिरवा रंग वर, तर भगवा खाली झाला. संपादकापासून कोणाच्याच लक्षात ही गोष्ट आली नाही. मात्र अंक मार्केटात गेल्यावर कुणीतरी वाचकाने संपादकांना कळविले. पुढच्या एका अंकात संपादकांनी व मी चुकीबद्दल क्षमा मागितली. विषय संपला. असं काही आजच्या काळात घडते, तर विचार करा मी व संपादक देशद्रोही ठरुन मीडियाने राजकीय पक्षांनी किती हलकल्लोळ उडविला असता?
आणखी एक फरक नमूद करावासा वाटतो. मोठ्यांच्या दिवाळी अंकाची मुखपृष्ठं ही थोडी रोमँटिकच लागायची (अंक मार्केटमध्ये क्लिक व्हावा म्हणून संपादकांची धडपड). याउलट लहान मुलांच्या दिवाळी अंकांमध्ये हे सगळे संकेत बदलून जायचे. गोजिरी मुले, मध्यमवर्गीय आईबाप, दिवाळीतला आकाशकंदील, येणारे पाहुणे, फटाक्यांची धुमशान… विनोद व हास्यचित्रे या माध्यमातून हे दर्शन घडवावे लागत. त्यात एकही रोमँटिक रेषा चितारली जायची नाही. शक्यतो दिवाळी अंकाची मुखपृष्ठ ही शाब्दिक नसतात. त्यात प्रासंगिकता अधिक असते वा एखाददुसरा सूचक शब्द.
लहान मुलांचे अनेक दिवाळी अंक निघाले, पण त्यांनी कधीच बाळसं धरलं नाही. कारण जाहिरातींची कमतरता. जाहिरात हा दिवाळी अंकाचा प्राणच आहे. बरेच अंक अजूनही तग धरून आहेत. पण, जगण्याचा ट्रेंडच बदलला आहे. मोठी माणसं कधीचीच वाचनापासून दूर झालीत. टीव्ही सिरीयल आणि २४ तास मोबाईल अगदी गळ्यापर्यंत आला आहे. हळूहळू मुले मोबाईलवरील गेममध्ये अडकत चाललीत. २०व्या शतकानंतर नंतर जीवनशैली पूर्ण बदलली आहे. जुन्या, जाणकार शैलीदार लेखकांची, कादंबरीकारांची, नाटककारांची नावे आता विस्मरणात चाललीत. नव्या पिढीला ती माहीतच नाहीत. पुस्तकांना खप नसल्याने प्रकाशकही हात राखून आहेत.
हौशी लेखक, कवी पुस्तकं काढतात, पण त्यांच्याकडे वितरणाची सोय नसते. त्यामुळे बरेचदा चांगले साहित्य वाचकांपर्यंत पोचत नाही. कारण समाजाची जडणघडण पूर्णपणे पुसली गेलीय. कालातीत रामायण, महाभारत बर्यापैकी तग धरून आहे. पण पुढच्या दहा वर्षात काय टिकेल व काय विकेल हे माहित नाही. या पिढीला गुगलसारखा अल्लादिनचा जादूचा दिवा सापडला आहे. घासला की त्यातला जिनी हवं ते दाखवतो. त्यात आता अॅलेक्साची भर पडलीय. तिला काही विचारा, ती उत्तर देते. रोबोट्सची पलटण जन्म घेत आहेच. ते हल्ली घरदार बर्यापैकी झाडत आहेत. ऑपरेशन थिएटरमध्ये मदतही करत आहेत. कदाचित आजोबा-आजीची जागा हे रोबोट्स घेतील. मुलांना मांडीवर थोपटत छान छान गोष्टीसुद्धा सांगतील. त्यात मायेची ऊब असेल की नाही सांगता येत नाही. जगभर माणसांना नोकर्यावरून कमी करण्याचा धडाका चालू आहे, कारण क्षितिजापलीकडे हेच तंत्रज्ञान, विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून दबा धरून बसले आहे.